राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 03:21 AM2020-12-06T03:21:43+5:302020-12-06T03:22:13+5:30
Dr. Babasaheb Ambedkar : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्वच देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. त्यांचा यंदा 64 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबरचा हा दिन आपल्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची शक्ती देणारा, राष्ट्रप्रमाची शिकवण देणारा हा दिवस आहे. ही भावना मनामनात जागी करणे हेच त्यांना अभिवादन ठरेल.
- रामदास आठवले
(केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री )
रवर्षी ६ डिसेंबरला मुंबईत चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी होते. देशविदेशातून लाखो लोक स्वयंप्रेरणेने चैत्यभूमीला येतात. शिस्तीत आणि शांततेत दर्शन घेऊन आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्याला विनम्र अभिवादन करतात. या वर्षी मात्र कोरोना महामारीचा धोका देशभर असल्याने यंदा चैत्यभूमीला गर्दी करू नका, असे आम्ही सर्वांनीच आवाहन केले आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर भीमभक्तांची गर्दी होणार नाही, मात्र त्याच भक्तिभावाने, विनम्रभावे आंबेडकरी जनता आपापल्या घरी, आपल्या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. या वर्षी चैत्यभूमीवर गर्दी होणार नाही, मात्र कोरोनाचे संकट देशावरून दूर झाले की आंबेडकरी जनतेची पावले आपोआप चैत्यभूमीकडे वळतील हे नक्की.
चैत्यभूमीवर दरवर्षी रेकॉर्डतोड ग्रंथखरेदी होते. वाचाल तर वाचाल, हा विचार आंबेडकरी जनतेने शिरोधार्ह मानला असून साहित्य, संस्कृती, शिक्षण आदी क्षेत्रांत आंबेडकरी जनता पुढे येत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्य वर्गाला स्पृश्य-अस्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले. गावकुसाबाहेर असणाऱ्या या बहिष्कृत समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. निरक्त क्रांतीपर्वाचे उद् गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष ठरले आहेत. संविधानाचे शिल्पकार म्हणून भारताचे भाग्यविधाते; आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्वच देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. बहिष्कृत तसेच अस्पृश्य समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. त्यांनी व्यक्तिपूजेला विरोध केला. मात्र राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली. त्यासाठी ते नेहमी म्हणत असत की, मी प्रथम भारतीय आणि अंतिमत:ही भारतीयच आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे या विचारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रप्रेमाची शिकवण देत होते.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचेही शिल्पकार ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संसदीय लोकशाहीसाठी भारतीय संविधान जगात आदर्श संविधान म्हणून नावाजले गेले आहे. सामाजिक समता, आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, बंधुता, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य या मूल्यांमुळे भारतीय संविधान मजबूत आहे. आणि संविधानामुळे भारतीय संसदीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मजबूत उभी आहे. भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डौलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे. त्यामुळे लोकशाहीचा प्राण ठरलेले भारतीय संविधान प्रत्येक देशवासी मानत आहे. जो संविधान मानत नाही त्याला भारत देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधानातून डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली आहे. सर्वांनी आपापला धर्म पाळला पाहिजे. मात्र इतरांच्या धर्माचाही आदर केला पाहिजे. धर्मावरून तेढ निर्माण होता कामा नये. धार्मिक भेदभावातून देशात फूट पडता कामा नये. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म, प्रांत, भाषापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असल्याचा उपदेश केला आहे. त्यातून त्यांनी आपणास राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती शिकविली आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्राभिमानी आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार जाती-जातीतील, धर्मा-धर्मातील संघर्ष मिटला पाहिजे. जाती-धर्मातील संघर्ष मिटत चालला आहे. मात्र अजूनही काही प्रमाणात दलित-आदिवासींवर अत्याचार होतात. धार्मिक, जातीय संघर्ष होतात. वाद होतात. जाती-धर्मात होणारे वाद संपूर्णत: मिटले पाहिजेत. जातिभेद, धर्मभेद, सर्व भेदभाव मिटवून समतावादी भारत साकारला पाहिजे. आपण जाती-धर्माचा गर्व बाळगण्यापेक्षा भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे. आपण प्रथम भारतीय आणि अंतिमत:ही भारतीयच असलो पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमाची भावना मनामनात जागी करणे हेच खरे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल.