अध्यात्मिक: पराक्रमाचे अधिष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 06:02 AM2019-02-03T06:02:02+5:302019-02-03T06:05:03+5:30
माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही.
संकलन बाबा मोहोड
माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही. अशावेळी माणूस स्वत:ची जात आणि वैयक्तिक स्वार्थ विसरून जातो. एक विशाल ध्येय त्याच्यासमोर दिसू लागते आणि त्या ध्येयासाठी तो आपले जीवन-सर्वस्व समर्पण करतो.
पाकिस्तानशी आपण केलेल्या युद्धात याची पदोपदी अनुभूती आलेली आहे. आपल्या सैन्यातील कितीतरी मुसलमान सैनिक बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूचे तोफखाने बंद पाडले आहेत. शत्रूचे रणगाडे ताब्यात घेतले आहेत आणि शत्रूवरच त्यांचा उपयोग केला आहे. ही सर्व शक्ती कुठून आली? ही देशप्रेमाची शक्ती आहे. तिची जोपासना आपण मनपूर्वक केली पाहिजे.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अठरा अध्यायाची गीता सांगितली. अर्जुनाने ती ऐकली. पण तिचा परिणाम अर्जुन संन्यासी होण्यात झाला नाही. उलट त्याला त्याच्या प्राप्त कर्तव्याची जाणीव झाली आणि तो स्थिर चित्ताने युद्ध कार्यात रमून गेला. कुणातरी कवीने त्याचे वर्णन केले आहे.
‘‘अर्जुना देऊनी समाधी,
सवेचित घातला महायुद्धी’’
आजची गरज:-
हे वीरतेचे ज्ञान, ही पराक्रमाची कला तुम्ही अवगत करण्याची आज आवश्यकता आहे. देश फक्त धान्यावर जगत नाही, शस्त्रास्त्रांवर जगत नाही, अधिक लोकसंख्येवरही तो जगत नाही. यासाठी स्वाभिमान आणि वीरता हवी. ज्या देशाजवळ नैतिक आणि सांपत्तिक असे दुहेरी बळ असते तोच देश अशा धुमश्चक्रीत जिवंत राहू शकतो. इतर देश किड्यामुंगीसारखे मरगळून जात असतात.
म्हणून शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कवायत आली पाहिजे. सुरावर गाता आले नाही तरी चालेल, परंतु त्याला तालावर चालता आले पाहिजे. तो महाविद्यालयात आला की एक शूर सैनिक म्हणून देशाने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. या देशाचा प्रत्येक तरुण आधी सैनिक आणि नंतर विद्यार्थी, शेतकरी, कामगार असा कुणीतरी असला पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या मनातला द्वेष संपत नाही तोपर्यंत युद्धाचा धोका टळू शकत नाही. पराजयातून द्वेषाची भावना बळावत असते. पाकिस्तानवर ती प्रतिक्रिया ताबडतोब होईल. तो नाना मार्गांनी आपल्याला उपद्रव देईल. तुमचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मातीत घालण्यासाठी सतत धडपडेल. त्या दुष्ट वृत्तीचे दमन अपरिहार्यपणे आपणास करावे लागेल. ही देशाची गरज आणि वस्तुस्थिती तुम्ही महाविद्यालयाच्या तरुण विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे आणि सर्वतोपरी सावध राहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात साधू, पंडित, विद्वान हे अशा गोष्टींचा विचार करीत असत. मग ते तरुणांना मार्गदर्शन करीत आणि आज्ञा देत. त्या व्यवस्थेतील मर्म आपण समजून घेतले पाहिजे.
स्वामीच्या आज्ञा, सेवका प्रमाण ।
तेथे हुतू पण, कामानये ।।
अशी स्थिती असली पाहिजे.
दुबळ्या माणसाला कुठेच प्रतिष्ठा मिळू शकत नाही. देवसुद्धा दुबळ्याला कधीच प्रसन्न होत नाही. म्हणून आपण विद्येसोबतच बळाची उपासना केली पाहिजे. बलवंत बनले पाहिजे. आम्ही कुणावरही आक्रमण करणार नाही. कुणाला उपद्रव देणार नाही. आक्रमणांचा प्रतिकार मात्र प्राणपणाने करू. आमचे युद्ध कोणाही धर्माच्या विरोधात नाही, तर देशाशी बेईमानी करणाऱ्यांशी, इथे राहून घातपाती कृत्ये करणाºयांशी, सरहद्दीवरून आम्हाला उपद्रव देणाºयांशी, आमच्याशी मैत्रीच्या वल्गना करून छातीत खंजीर खुपसणाºयांशी आमचे युद्ध आहे.