अध्यात्म; सैनिकाची देशभक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:00 AM2019-08-11T06:00:00+5:302019-08-11T06:00:10+5:30
भारताच्या प्रत्येक सुपुत्राला आपल्या मायभूमीचा जिव्हाळा असण्यातच त्यांना भूषण आहे. एरव्ही माणसाचे जीवन जीवापुरते असणे म्हणजे काही वैशिष्ट्य नव्हे.
संकलन-बाबा मोहोड
प्रिय मित्र-
तुझे पत्र मित्र मिळाले. तू सैनिक होऊन लढाईवर गेलास हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला आहे. तुझ्यामागे भारताची कोट्यवधी जनता उभी आहे. तुझ्या यशाचे चिंतन ती करीत आहे. तुझ्या वीरवृत्तीचा त्यांना गर्व आहे. भारताच्या प्रत्येक सुपुत्राला आपल्या मायभूमीचा जिव्हाळा असण्यातच त्यांना भूषण आहे. एरव्ही माणसाचे जीवन जीवापुरते असणे म्हणजे काही वैशिष्ट्य नव्हे. मनुष्याला आपल्या समाजाकरिता जगायचे आहे व समाजाच्या हितासाठीच मरायचे आहे आणि हेच त्याच्या जीवनाचे सार्थक आहे असे मी मानतो. आमचा धर्म आजवर हीच शिकवण देत आला आहे. आमचा बराच काळ गुलामगिरीत गेल्याने त्याला विकृत स्वरूप आले आहे. पण ही विकृती व शिथिलता आता नष्ट झाली आहे. तुझ्यासारखे कोट्यवधी तरुण जागृत झाले आहेत.
‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यरात्रिबोधन’ ही उपनिषदाची हाक भारताने सार्थ केली आहे. वास्तविक तरुणाचा हाच बाणा आहे व असावयास पाहिजे. अर्जुनाला वीर असूनही भ्रम झालेला होता व त्याचे भगवान श्रीकृष्णाने निरसन करून त्याला पुन्हा आपल्या कर्तव्याकडे वळविले. याला मी धर्मस्थापना समजतो. धर्मस्थापना म्हणजे मंदिर स्थापना नव्हे! तर धर्मवीर करण्याची परंपरा निर्माण करणे होय.
मित्रा, तू निर्भय वृत्तीने व बाणेदारपणाने आपले कर्तव्य करीत राहा. देशाच्या स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे व मानवतेच्या संस्कृतीचे संरक्षण करणे हा खरा धर्म आहे व तो धोक्यात असल्यास, आक्रमण झाल्यास अन्यायाचा प्र्रतिकार हीच सैनिकाची खरी भक्ती आहे हे विसरू नकोस आणि या आपल्या ऐतिहासिक व वीर परंपरेला सोडू नकोस व आपले कर्तव्यकर्म करीत असताना जर प्रसंगी मृत्यूही आला तरी तुला त्याने मोक्षच मिळेल. वीरगती प्राप्त होईल. यात कसलाही संशय धरू नकोस. तुझ्या यशाने भारत सदैव विजयी राहो. हीच माझी तुला शुभकामना आहे.
-तुकड्यादास