श्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 03:51 AM2018-03-04T03:51:18+5:302018-03-04T03:51:18+5:30
एरवी ती श्वास घेणारा एखादा देखणा पुतळा असावा, तशी असे. शांत. अबोल. स्थिर! पण तिच्या स्थिर, कोरड्या नजरेच्या आतली दोन ओली तळी मला दिसली होती...
- सुभाष अवचट
एरवी ती श्वास घेणारा एखादा देखणा पुतळा असावा, तशी असे. शांत. अबोल. स्थिर! पण तिच्या स्थिर, कोरड्या नजरेच्या आतली दोन ओली तळी मला दिसली होती... कधी कधी वाटे, आपल्यामागे राजवाड्याची दारं बंद करून, जुनं सगळं आयुष्य मागे सोडून जंगलातल्या मोकळ्या शुद्ध हवेत खुला श्वास घ्यायला आसुसलेली राणी आहे ही! वयाच्या चौथ्या वर्षापासून तिला कॅमे-यासमोर कामाला जुंपणारं पोरवय. वडलांच्या माघारी आई आणि सावत्र भावंडांच्या अधाशी घशात पैशाच्या राशी ओतताना करपलेलं तारुण्य. पुढे बॉलिवूडने रुतवलेला विषाचा श्रीमंत, सोन्याचा दात. विश्वासघाताचे लचके आणि न पेलवणा-या अफाट लोकप्रियतेच्या शिखरावरचं घुसमटलेलं एकाकीपण... - ती बोलायची नाही. तिच्या डोळ्यातल्या तळ्यात या कहाण्यांचे तुकडे कधी कधी हलताना दिसायचे ...तेवढंच!
पंचवीस वर्षं तरी झाली असतील. कदाचित तीस. नीतू कोहली ही माझी आर्किटेक्ट मैत्रीण. बड्या लोकांच्या घरांचं इंटिरिअर करायची. तिची कामाची स्टाइल थोडी उफराटी होती. म्हणजे बाई आधी पेंटिंग्ज निवडायची आणि मग त्या कलरस्कीमप्रमाणे बाकीचं सुशोभन.
एका दुपारी मला नीतूचा फोन आला. मला म्हणाली, सुभाष, एक क्लायंट आहे. अमक्या-अमक्या हॉटेलमध्ये दुपारी तमक्या वाजता येशील का?
मी कामात होतो. दुपारी झोप काढली. झोपेतून उठून तसाच तणतणत गेलो... तर समोर श्रीदेवी!
दोन मिन्टं काही कळेचना. एवढी प्रसिद्ध बाई. तोवर स्टार झालीच होती जवळजवळ. पब्लिक पागल झालेलं होतं तिच्यापायी... ती अशी साक्षात समोर! क्षणभर काही ‘कनेक्ट’च होईना. पडद्यावर ही बाई तोवरच्या चाचरत्या, भित्रट हिंदी सिनेमाला आग लावायला आल्यासारखी वागे... ती ही अशी? श्वास घेणारा देखणा पुतळा असावा, अशी. शांत बसलेली. पंचतारांकित हॉटेलच्या त्या गार, थिजलेल्या श्रीमंत खोलीत रंगवल्यासारखी. जणू चित्रच. काही भिंतीवर लावलेली. एक समोर बसलेलं. हाय नाही, हॅलो नाही. नुसतं शांत बसणं. अबोल. नजर स्थिर.
म्हटलं, बापरे! हे आता काय!!
नीतूने तिची चर्पटपंजिरी चालवली होती. श्रीदेवीने तिचं मुंबईतलं पहिलं घर विकत घेतलं होतं. नीतूला त्या नव्या घरासाठी माझी चित्रं विकत घ्यायची होती, म्हणून ही मीटिंग ठरवलेली. पण जिच्यासाठी हा सगळा उपद्व्याप, ती बाई एक अक्षर बोलायला तयार नाही. नुसते डोळे. रोखलेले. शेवटी मीच कळवळून विचारलं, बाई गं, काय पायजे तुला?
‘मॅडम, आपको क्या चाहीये? मैं क्या कर सकता हूं आपके लिए?’
तरीही तेच. नुस्तं हलकं हसू. बाकी गप्प. अक्षर नाही.
शेवटी मी उठलो आणि निघालो. नीतूला म्हटलं, हिला माझ्या घरी घेऊन ये. तिथे स्टुडिओत तिला बघू दे! काही आवडलं तर ठीक. नाहीतर जाऊ दे!
दहाएक दिवसांनी एका दुपारी खरंच दोघी आल्या. न सांगता सवरता माझ्या दारात उभ्या.
मी टरकलोच. म्हटलं, आता आली का पंचाईत!
नीतू आली की आत घुसायचीच भरर्कन! तिच्यामागे पाय न वाजवता श्रीदेवी आत आली. घरात चक्कर मारून तिने भिंतीवर लावलेले, उभे केलेले माझे कॅनव्हास बघितले. पाणी पीत असल्यासारखी पिऊन घेणारी नजर. तहानलेली गप्प नजर. माझ्या हॉलमध्येच मी रंगवत बसतो. समोर एक मोठीच्या मोठी गादीची बैठक आहे साधीशी. चित्रंं बघून झाल्यावर श्रीदेवी मुकाट्याने त्या बैठकीवर बसली. डोळे तसेच. भिरभिरते. नजर स्थिर. रिकामी.
बाईला काही आवडलं का, कळायला काही मार्ग नव्हता.
‘आप बुरा तो नही मानेंगे..?’ - एक विचित्र करकरीत धार असलेल्या तिच्या त्या पातळ आवाजात बाई पहिल्यांदा काहीतरी बोलली. मी काही बोलणार तोवर तिने तिची महागडी पर्स हलकेच उघडून त्यातून एक चार-सहा घड्या केलेल्या कागदाची जुनी पुडी उघडली.
ते एक चित्र होतं. कुठल्याशा आर्ट मॅगझिनमध्ये छापलेलं. जुन्या, अलंकारिक युरोपियन शैलीचं. मोठा मंचक. त्यावर पसरलेली एक बाई. तिच्या अंगावर नाजूक फुलाफुलांचा चुण्याचुण्यांचा झगा वैगेरे.
‘आप हसना मत प्लीज, लेकीन मै कुच्च अय्सा चाअती ती...’
मी डोक्याला हात लावला आणि मनातून नीतूला हजार शिव्या दिल्या.
श्रीदेवीला म्हटलं, मी नाही करत अशी चित्रं. माझे फाटके हमाल, माझे वारकरी कसे आवडतील तुला? सोड तू हा हट्ट!
पण नीतू ऐकायला तयार नव्हती. म्हणाली, जमेल काहीतरी!
शेवटी वैतागून मी म्हटलं, चल, हिचं घर तरी दाखव! बघू काही सुचतं का!
श्रीदेवी एका हॉटेलात राहात होती. अंधेरीला तिच्या नव्या घराचं काम अजून पूर्ण व्हायचं होतं.
माझ्याकडे एक जुनी फियाट होती तेव्हा. ती काढली. त्या खटाºयात बसून आम्ही अंधेरीला निघालो. तर सिग्नलवर कुणीतरी श्रीदेवीला ओळखलं. आता राडा होणार हे दिसल्यावर कशीबशी गर्दीतून गाडी काढून आम्ही तिच्या नव्या घरी पोचलो, तोवर मागून तिचे सिक्युरिटीवाले धापा टाकत धडकले. त्यात तिचा सावत्र भाऊ होता हे मला संदर्भावरून कळलं. बांद्र्याहून मॅडम एकदम गेल्या कुठे हे कळेना म्हणून सगळे भिरभिरले होते. तो सावत्र भाऊ भयंकर भडकला होता. तिकडे तिच्या अम्माने म्हणे पोलिसांना फोन करायचा बाकी ठेवला होता. तिला वाटलं, लेक संधी साधून पळून गेली. कोण राडा...
ही बया गप्प!
तिच्या घरात शिरल्यावर मी हतबुद्धच झालो. सगळ्या भिंतींना गुलाबी रंग लावलेला. हॉलमध्ये सगळीकडे शोभेच्या महागड्या वस्तू खचाखच. मखमली पडदे. आर्ट डेको स्टाइलचं अवजड, नक्षीचं फर्निचर. जमिनीवर अख्खं पाऊल आत रुतेल इतका जाड गुलाबी गालिचा. आणि सोफ्यावर गुलाबी फरचा मऊमऊ थ्रो!
हलकेच बसलो.
एकतर माझा खरखरीत अवतार.
आणि त्यात तिचं मऊमऊ सौंदर्य. शिवाय तिचं गुलाबी घर. काही जमेना. माझा श्वास घुसमटला होता.
तेवढ्यात चहा आला.
तो कप हलकेच हातात घेताना मी न राहवून समोर बसलेल्या श्रीदेवीला म्हटलं, हे घर कसं मेन्टेन करणार तुम्ही? माझ्यासारख्या धसमुसळ्या माणसाच्या हातून तुमच्या या गुलाबी गालिच्यावर चहा सांडला तर?... आणि मुख्य म्हणजे बूट कुठे काढायचे?’
ती खळखळून हसली. पहिल्यांदाच.
देखण्या पुतळ्यावरची रेघ पहिल्यांदाच सरकन हलली... आत एक स्त्री होती!
मिश्कील. खुली. प्रसन्न.
ती दिसली.
मला म्हणाली, ‘आय एम टेलिंग नीतू... शी इज न्नॉट लिसनिंग! यू टेल हर ना!!’
मी म्हटलं, सांगतो! माझं काय जातंय? नाहीतरी माझं पेंटिंग घेणार नाहीच्चात तुम्ही!!!
तिच्या त्या भोकरासारख्या डोळ्यात पाणी येईपर्यंत ती खळखळून हसली.
श्रीदेवीच्या त्या गुलाबी घरात माझं पेंटिंग लागलं नाही. पण तिच्या स्थिर, कोरड्या नजरेच्या आतलं ओलं तळं हलताना मला दिसलं.
नंतर दहाएक वर्षं गेली असतील.
श्रीदेवीला कधीतरी चुकून पडद्यावर बघितलं असेल-नसेलही.
मग एकदम तिने बोनी कपूरशी लग्नच केलं.
बोनी माझा सख्खा मित्र. त्याचा भाऊ अनिल कपूरची बायको सुनीता इंटिरिअर डिझायनर. तीही मैत्रीण. त्यामुळे घरी जाणं-येणं. या माझ्या जिव्हाळ्याच्या कुटुंबात श्रीदेवी आली, ती बोनी सोडून बाकीच्यांना दुखवूनच!
अवघड, नाजूक काळ होता.
मग बोनीने जुहूला नवीन घर घेतलं. दोघं तिकडे शिफ्ट झाल्याचं कळलं होतं. श्रीदेवीने सिनेमात काम करणं थांबवलंय असंही समजलं. संपर्काचं कारण नव्हतं. निमित्तही!
नंतर खूप दिवसांनी एकदा फोन वाजला, तर पलीकडे श्रीदेवी. मला म्हणाली, पेंटिंग्ज हवी आहेत तुझी. घरी येते. आणि आली. तिच्याबरोबर जान्हवी होती. बाळ. मी काळजीत.
आता हिच्यासाठी कुठून आणू मी मंचकावर पसरलेल्या गुलाबी नक्षीच्या डेकोरेटीव्ह बायका?
पण यावेळी तिच्या पर्समध्ये घडी केलेली चित्राच्या कागदाची पुडी नव्हती. मला म्हणाली, बघू का तुझं काम?
म्हटलं, खुश्शाल!
छोट्या जानूला तिने एक कोरा कागद दिला. थोडे रंग देऊन तिला गुंतवलं आणि माझ्या स्टुडिओत मांडलेल्या कॅनव्हासच्या ओळीओळींमधून खूपवेळ फिरत राहिली.
मी काम करत असलो, की रंग कालवलेल्या बादल्या, ट्यूब्ज, ब्रश यांचा पसारा फार असतो. तिने वाटेतल्या रंगांच्या ट्यूब्ज, ब्रश असं सगळं मला न विचारताच आवरलं. नीट ठेवलं. सहा पेंटिंग्ज निवडली. आणि एक जीझस!!
मला म्हणाली, आय वॉण्ट हीम! बंद पापण्यांना करुणेची किनार असलेला जीझस!!!
तिला हवा होता. श्रीदेवीला.
मी चरकलोच. ही इतकी कशी बदलली? कधी बदलली? हे एवढं फक्त गेल्या दहा वर्षात?
कचकडी, टिचक्या गुलाबी गर्दीतून बाहेर पडून जीझसच्या एकाकी सोनेरी नजरेत उतरण्यासाठी धडपडतेय ही... असं काय हिरावून घेतलं असेल आयुष्याने हिच्याकडून? आणि एवढी किंमत चुकवून हिच्या पदरी जे पडलं, ते इतकं वेगळं कसं?
मी काही बोललो नाही.
काही सुचलंच नाही.
पण एक नक्की :
त्या संध्याकाळी उशिरा निरोप घेईपर्यंत आमची मैत्री झाली होती! मला एक सख्खी मैत्रीण मिळाली.
स्मितानंतरची मैत्रीण.
जाणं-येणं सुरू झालं. मी सुभाषजीचा नुस्ता सुभाष झालो. आणि ती नुस्ती श्री.
बॉलिवूडमधून स्वत:हून बाहेर पडली होती. आयुष्य नव्याने मांडायला घेतलं होतं तिने. घरही. दोन लहानग्या मुली, नवरा आणि घर- हेच जग. एवढंच! कपूर कुटुंबात एक साहजिक कडवटपणा होता तिच्याविषयी. तिने काही तक्रार न करता तो हलकया हाताने पुसायला घेतला असावा, हे मला लांबून दिसत होतं. घराची देखरेख, दोन मुलींचं संगोपन, आल्यागेल्याला पोटभर खाऊपिऊ घालणं, साधी चहा-कॉफीची वेळ असली, तरी टेबलावर खाद्यपदार्थांची रेलचेल असेल असं पाहणं यात ती सदैव बुडालेली असे.
आम्ही भेटलो की गप्पा. त्याही अशाच खाण्यापिण्याच्या, प्रवासाच्या, चित्रांच्या. तिच्या बोलण्यात चुकूनही कधी तिच्या चित्रपटांचे, एवढंच काय, फिल्मी दुनियेतल्या कोणाचे-कशाचेच संदर्भ कधी चुकूनसुद्धा येत नसत.
कधीकधी मला वाटे,
आपल्यामागे राजवाड्याची दारं बंद करून, जुनं सगळं आयुष्य मागे सोडून जंगलातल्या मोकळ्या शुद्ध हवेत खुला श्वास घ्यायला आसुसलेली राणी आहे ही!
एकदा मला म्हणाली, सुभाष, माझ्या अम्माचं पोर्टेट करशील का?
मी म्हटलं, नाही. तुझी अम्मा आहे, तूच कर!
मग आमच्या मैत्रीत रंग आले.
एकदा म्हणाली, फार इच्छा आहे की पुन्हा रंग लागावे माझ्या बोटांना. पण भीती वाटते.
विचारलं, कसली भीती?
तर गप्प. उत्तर नाही. हा तिचा स्वभाव. चुकून एखाद्या दुखºया नसेवर हात पडला तर पटकन मागे येऊन मिटून जायचं. ओठांची शिवण काही केल्या उसवायची नाही. तिचं वेदनादायी लहानपण मला ऐकून-वाचून माहिती होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिला कॅमेºयासमोर कामाला जुंपणारं पोरवय. वडलांच्या माघारी आई आणि सावत्र भावंडांच्या अधाशी घशात पैशाच्या राशी ओतताना करपलेलं तारुण्य. पुढे बॉलिवूडने रुतवलेला विषाचा श्रीमंत, सोन्याचा दात. विश्वासघाताचे लचके आणि न पेलवणाºया अफाट लोकप्रियतेच्या शिखरावरचं घुसमटलेलं एकाकीपण...
ती बोलायची नाही. तिच्या डोळ्यातल्या तळ्यात या कहाण्यांचे तुकडे कधीकधी हलताना दिसायचे तेवढंच!
तिच्या बोटात रंग होते. लहानपणी. नंतर हरवले.
आता पुन्हा तिला तहान लागली होती.
म्हणाली, मला शिकव. मदत कर.
मग एके दिवशी बाजारात जाऊन रंग आणले, कॅनव्हास आणले, तिला झेपतील असे ब्रश निवडले आणि सगळं पाठवून दिलं तिच्याकडे. म्हटलं, कर आता सुरुवात!
श्रीने एक नवीन झगडा सुरू केला.
मुली लहान होत्या. त्यांच्यामागे तिचा अख्खा दिवस जाई.
मग फोन करून म्हणे, काय करू, सुभाष... मला वेळच मिळत नाही! वेळ काढला तर काही सुचत नाही. तुला कसं सुचतं?
मुलींना घेऊन श्री स्टुडिओत यायची. प्रत्येक कॅनव्हाससमोर उभी राहून विचारायची, हे तुला कसं सुचलं?
मग मी वैतागायचो. म्हणायचो, अगं, असं नाही सांगता येत. शेवटी तिला म्हटलं, असं कर, तुझे सगळे रंग, कॅनव्हास, ब्रश सगळं एका खोलीत हलव. आणि दिवसातला काही वेळ तिथे जाऊन नुस्ती शांत बसत जा. आपोआप सुचेल तुला.
मुली थोड्या सुट्या झाल्यावर तिला हे साधू लागलं. तिच्या मनाच्या तळातल्या, जुन्या, मागे राहिलेल्या राजवाड्याच्या बंद खिडक्या कॅनव्हासवर कधीकधी किलकिल्या झालेल्या दिसायच्या. हात चांगला. रंगांची जाण. अॅबस्ट्रॅक्ट काम करायची. मी त्या रेषांमधले रंग वाचायचा प्रयत्न करायचो. फार काही उलगडायचं नाही. मायकेल जॅक्सन हा या भूमीतलावरचा तिचा सगळ्यात आवडता पुरुष! तिने मायकेलचं एक पोर्टेट केलं होतं.
बोनीला बायकोचं फार कौतुक. तो म्हणायचा, प्रदर्शन करू तुझ्या चित्रांचं. तिचा ठाम नकार. तिला वाटे, या असल्या चित्रांना लोक हसतील.
लोक काय म्हणतील? - हे श्रीने तिच्या आयुष्याला घालून घेतलेलं एक काटेरी कुंपणच होतं. बोनीशी लग्नाचा निर्णय घेऊन पोटातल्या जाह्नवीसह तो अंमलात आणताना तिने ते ओलांडलं. एकदाच. नंतर नाही.
कधी धबाबा अंगावर कोसळणारा-कधी अचानक आटणारा पैसा, खाजगीपण ओरबाडून घेणारी प्रसिद्धी, निवांतपण शोषून घेणारं ग्लॅमर या सगळ्यातून पाय मोकळा करून घेऊन श्रीने स्वत:पुरतं एक छोटंसं वर्तूळ आखून घेतलं होतं. या वर्तुळात मजेने फिरणारी श्री मी आमच्या मैत्रीच्या गेल्या वीस वर्षात पाहिली. या काळात तिने मुलींना जन्म दिला, त्यांना निगुतीने वाढवलं, त्यांच्याकरता घर उभारलं, चालवलं, या घराच्या आतल्या वातावरणाला फिल्मीपणाचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाही. तिच्या घरात कधी फिल्मी पार्ट्या झाल्या नाहीत, प्रायव्हेट स्क्रीनिंग्ज झाली नाहीत, पुरस्कारांच्या चमकत्या बाहुल्या उघड्यावर येऊन बसल्या नाहीत.
श्रीच्या घरात दंगा झाला तो मुलींंच्या मैत्रिणींचा! त्याही शाळेतल्या मैत्रिणी. स्टार-कीड्स नव्हेत! पार्ट्या झाल्या त्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांसाठी ! अन्न शिजलं ते तिने स्वत: रांधलेलं. मासे शिजले ते तिने स्वत: सात बंगल्याच्या कोळणींकडून घासाघीस करून आणलेल्या ‘बाजारा’तले!
मुली मोठ्या होत होत्या तोपर्यंत तिला ‘बॉलिवूड’ची आठवण येत असल्याचं चुकूनही कधी तिच्या डोळ्यात दिसलं नाही. या काळात तिने तिच्या मनासारखं आयुष्य आखलं होतं आणि ती ते हट्टाने जगत राहिली. तिचं बालपण हिरावून घेणाºया, तिचं तारुण्य पणाला लावणाºया काळावर ही बाई सूड उगवतेय असं मला कधीकधी वाटे. खरं तर तिने तिच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वात ठळक खूण असलेली अभिनयकला, नृत्यकला स्वत:च्या आयुष्यातून पुसून टाकली होती. मला कधीकधी फार प्रश्न पडत. हिला त्या हरपल्या श्रेयसाची आठवण येत नसेल का? काळाबरोबर बदलत्या बॉलिवूडमधल्या उत्तमोत्तम संधी आपल्या वाट्याला याव्यात म्हणून तिच्यातली अभिनेत्री तळमळत नसेल का? उद्या मी ठरवलं समजा, की पेंटिंग न करता जगून पाहू, तर मला जमेल का?
श्रीने कधी कसल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.
ती फक्त हसायची. ते हास्य प्रसन्न आहे की करुण, चुकार पातळ आहे की दुधावरच्या सायीसारखं मृदू, पोकळ आहे की अर्थगर्भ, यावरून आपण उत्तरांचे अंदाज बांधायचे!
या काळात तिने मनाजोगी चित्रं रंगवली. कॅनव्हाससमोर गेलं की भीती वाटते, काही सुचत नाही म्हणून घाबरणारी श्री... दहा दहा तास पेंटिंग करायला सरावली होती. या काळात तिने खूप प्रवास केले. जणू राहिलेलं, सुटलेलं, हरवलेलं सगळं जगून घेत होती ती.
श्री, बोनी आणि मी एकदा कॅनडाला मॉण्ट्रीयलमध्ये दोनेक आठवडे राहिलो होतो. बोनी शूटिंगमध्ये होता. आम्ही दोघे भटकत होतो. सकाळी सकाळी उठून बूट घालून मैलोन्मैल चालायला जायचो. पाय दुखेस्तो चालत राहायचं. तिथलं उत्तम आर्किटेक्चर बघत हिंडायचं. खाणंपिणं आणि गप्पा. पण त्यात व्यक्तिगत सुखदु:खाच्या गोष्टी नाहीत. आपल्या जगण्याबाहेरचे विषय. प्रसन्न विषय. मजेचे, प्रेमाचे विषय! चित्रांचे, रंगांचे विषय!
तेव्हा चेन्नईला समुद्राकाठी तिचं घर तयार होत होतं. चेन्नई हा तिच्या दिलाचा तुकडा होता. मुंबईत राहायला सरावली होती; पण मनाने ती सतत चेन्नईच्या फ्लाइटमध्येच असे अनेकदा... तिथल्या नव्या घरासाठी श्रीने बरीच खरेदी केली. आम्हाला एका दुकानात फर दिसली. गुलाबी फर. श्रीला मोह पडला असावा.
मी म्हणालो, वेडी आहेस का तू? चेन्नईला नुस्तं उभं राहिलं तरी घामाचं थारोळं साचतं खाली. फर कुठे वापरणारेस तू?
ती डोळ्यात पाणी येईतो हसली.
तिच्या त्या गुलाबी घरातल्या गुलाबी सोफ्यावरचा गुलाबी फरचा थ्रो ती विसरली नव्हती अजून!
एक होतं. श्री हसली, की तिच्या डोळ्यातली दोन तळी हलत. त्या तळ्यातलं पाणी जीवघेणं होतं...
स्मिताने राज बब्बरशी लग्न का केलं असेल? श्रीदेवीने बोनी कपूरशी लग्न का केलंं असेल? (म्हणजे यांच्यापेक्षा बरे पुरुष या दोघींना सापडले नाहीत का असं मनात धरून) कुणाही तिस-या माणसाने हे प्रश्न विचारणं उद्धट आहे, असं मला वाटतं.
असलं कुचकट कुतूहल हा माझा स्वभाव नाही. पण एक नक्की! ... बोनीशी असलेल्या श्रीदेवीच्या नात्याला अनेक पदर होते. प्रयत्न करूनही ते मला कधी उलगडले नाहीत. तो तिचा नवरा होता. त्यापेक्षा जास्त आणि त्याच्या आधी तो तिचा मित्र होता. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी असा ‘मित्र’. बॉलिवूडमधल्या बायकांच्या नशिबी असे मित्र नसतात शक्यतो.
एरवीच्या आयुष्यातल्या वैवाहिक नात्याच्या मुळाशी स्त्री-पुरुषांमधल्या शारीर आकर्षणाचा, लैंगिक आसक्तीचा वाटा ठळक असतो. बॉलिवूडमध्ये ही गणितं वेगळी दिसतात. शरीर हे त्या इंडस्ट्रीचं ‘माध्यम’च ! रोजचं रोजीरोटीचं काम, त्याच्याशी जोडलेले भावभावनांचे खेळ, राजकारणं, द्वेष, दुष्मनी, हेवेदावे, यशापयशाचे झोपाळे, प्रसिद्धीचे झोत, उपेक्षेचे काटे हे सगळं त्या शरीराभोवतीच फिरणार. पुढेपुढे त्याचं अप्रूप उरेनासं होतं, आणि सहवासाची, मैत्रीची भूक लागते ती एकाकी पडलेल्या मनाला. शरीराची वजाबाकी कधीची होऊन गेलेली असते. मन तहानलेलं राहातं.
- बोनीची खंबीर मैत्री ही श्रीसाठी अखंड थंडाव्याची खोल विहीर होती जणू ! तिने बोनीचं आयुष्य सावरलं. त्याचं घर उभं केलं. स्वत:ला न मिळालेलं सुरक्षित, सुसंस्कृत, संपन्न बालपण आपल्या मुलींच्या वाट्याला यावं म्हणून तिच्यातली अम्मा अखंड धडपडत राहिली.
श्री किती ताकदीची अभिनेत्री होती, हे मी सांगण्याची जरूर नाही, पण आपल्याच देखण्या सौंदर्याच्या सापळ्यात अजाणता अडकत गेलेल्या, हव्याहव्याशा प्रसिद्धीच्या नशेसोबत नकोशा नैराश्याच्या गर्तेत पाय फसलेल्या, चुकीच्या निर्णयांची शिक्षा भोगणाºया काहीशा दुभंगल्या व्यक्तिमत्त्वाच्या तरुण मुलीपासून अत्यंत खंबीर आणि संतुलित, समर्थ ‘स्त्री’त्वापर्यंतचा जो प्रवास श्रीदेवीने केला, त्याचा मी साक्षी आहे.
हे आव्हान मानसिक पातळीवर तिने पेललं, निदान त्या झगड्यासाठी स्वत:ची सगळी ताकद पणाला लावली हे नक्की!
पण मग ती शरीराच्या पातळीवरले सापळे आपल्या पायातून सोडवू शकली नाही का?
पन्नाशी ओलांडल्यावरही तरुण राहाण्या-दिसण्याच्या अट्टहासापायी तिने स्वत:च्या शरीराची नासाडी करून घेतली का?
श्री स्वत:च्या शरीराच्या दृश्य रूपाबाबत अत्यंत काटेकोर होती, हे खरं!
फिल्मी पार्ट्या - समारंभांमध्ये रंगरंगोटीने सजलेली श्री मला कधी ओळखीची वाटली नाही. ते तिचं ‘खरं’ रूप नव्हतंच. चेहºयावर मेकअपचा लवलेश नसलेली साध्या ट्रॅकसूट-टी-शर्टमधली श्री माझ्या खंडाळ्याच्या स्टुडिओत मुलींना घेऊन चित्रं बघायला यायची, तर तिला कुणी ओळखतही नसे.
पण वजनाबाबत मात्र ती विलक्षण जागरूक होती. खाद्यपदार्थांनी भरून ओसंडणा-या टेबलावर सगळ्यांना आग्रहाने वाढून झाल्यावर स्वत:साठी एका छोट्या वाटीत कसलंतरी ‘फूड’ घेऊन खाताना मी तिला पाहिलं आहे.
‘तू हे काय खातेस?’ - असं विचारलंही आहे. त्यावरून तिची टिंगलही केली असेन अनेकदा. पण ती उतरत्या वयातही सुंदर राहण्या-दिसण्यासाठी काही ‘भलतंच’ करत असावी, इतकी ‘माइण्डलेस’ नव्हती नक्की!
पुनरागमनानंतर तिने भूमिका केल्या, त्याही तिच्या वयाच्याच तर होत्या. चेहे-यावरल्या सुरकुत्या झाकण्याची, वय लपवण्याची, निसर्गावर विजय मिळवल्याच्या बतावण्या करण्याची सक्ती नव्हती त्यात.
अर्थात, एक मान्य करायला हवं.
स्मिता आणि श्री.
माझ्या दोन्ही मैत्रिणी एका अत्यंत दुष्ट आणि क्रूर इंडस्ट्रीचा एक भाग होत्या.
इथे अजूनही विशिष्ट आकारा-उकाराचं ‘शरीर’ हेच नट-नट्यांचं भांडवल आहे. मुखवटे हाच या इंडस्ट्रीचा ‘चेहेरा’ आहे. इथे माणसं सतत खोटी वागतात. कळप करून जगतात. संधी मिळताक्षणी दुस-याच्या मानेवर पाय देऊन आपण उभं राहण्याइतकी धूर्त असतात. आपल्या कृतक प्रतिमेचा ‘मेकअप’ उतरवण्याची भीती वाटते त्यांना. मग ही माणसं स्वत:लाच घाबरायला लागतात. स्वत:पासून दूर पळतात. नाती खोटी. अफेअर्स खोटी. ब्रेकअपही खोटे. शिवाय यांच्या बेडरूममधली धुणी रोज चव्हाट्यावर धुतली जाणार. यांच्या खाजगी आयुष्यात रस असलेले तिºहाईत टोचा मारून मारून रोज नवं रक्त काढत राहणार. रोज बदलत्या उसन्यापासन्या कपड्यांइतकंच इथलं यश क्षणभंगुर आणि अपयशाची धास्ती अक्षय!
माणसांचे घास घ्यायला सोकावलेलं आहे हे जग!
त्या जगाची मान मुरगळण्याची हिंमत अगदी आत्ताआत्ताची ! दंडात फालतू बेटकुळ्या न भरता आपल्या खड्ड्याखुड्ड्याच्या चेहेºयाने बाजी मारणारा नवाजुद्दन नाहीतर इरफान आत्ता आत्ता उगवताहेत इथे. ‘खड्ड्यात जा’ असं सांगून आपल्या मनाचं तेच करणारी विद्या बालन किंवा कंगना एखाद-दुसरीच!
श्रीच्या पिढीकडे ही हिंमत नव्हती. स्मिताच्या तर नव्हतीच नव्हती. त्यांनी खूप अल्पविराम, स्वल्पविराम सोसले आयुष्यात. बुद्धिमान स्त्रिया होत्या त्या आणि संवेदनशील... म्हणूनच जास्त सोसणं आलं त्यांच्या वाट्याला.
श्री मला दिसली, भेटली; ती ही अशी. पण ती तशीच फक्त होती का?
नाही! कशी असेल?
काल सहज बोलताबोलता विचारलं, तर जाणवलं, की माझ्या घरी काम करणाºया अरुणाला दिसलेली श्रीसुद्धा मला दिसली त्यापेक्षा कितीतरी वेगळी होती. एकदा तिने आणलेलं आइस्क्रीम अरुणाच्या हातून सांडलं, तर श्रीदेवीसारखी स्टार बाई कशी पटकन फडकं घेऊन ते पुसायला धावली होती, हे आठवून अरुणा हळहळत होती.
श्री याच्यापेक्षा वेगळीही होती. असणारच.
माझ्या वाट्याला आलेला तिच्या आयुष्याचा तुकडा वेगळा होता... एवढंच!
श्रीने आग्रहाने घरी नेलेला माझा जीझस तिच्या घराला लागलेल्या आगीत अर्धा जळला म्हणून केवढी हळहळली होती ती.
मला म्हणाली, रिस्टोअर कर!
शक्य नव्हतं ते.
मग म्हणाली, दुसरा जीझस दे.
...कुठून आणू आता दुसरा जीझस?
शब्दांकन : अपर्णा वेलणकर (aparna.velankar@lokmat.com)