कोवळी पानगळ थांबवण्यासाठी..

By admin | Published: September 30, 2016 06:16 PM2016-09-30T18:16:58+5:302016-09-30T18:33:27+5:30

कुपोषणाचे गांभीर्य आता साऱ्यांनाच कळले आहे. मात्र त्यासाठी या समस्येच्या मुळाशी जायला हवे.

To stop cobbler ... | कोवळी पानगळ थांबवण्यासाठी..

कोवळी पानगळ थांबवण्यासाठी..

Next

 - वैद्य विजय कुलकर्णी

कुपोषणाचे गांभीर्य आता 
साऱ्यांनाच कळले आहे. 
मात्र त्यासाठी या समस्येच्या 
मुळाशी जायला हवे.
गर्भिणी आणि बालकांच्या 
आहाराकडे लक्ष देतानाच
भारतीय शास्त्राचा उपयोग 
आपल्याच देशातील 
गंभीर समस्येसाठी 
करून घेण्याची मानसिकता 
घडवावी लागेल. 

पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी कुपोषणामुळे ६०० बालमृत्यू झाल्याची ताजी खबर सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली. राज्यातील वनवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषण रोखण्यासाठी शासन गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असूनही कुपोषण कमी होताना दिसत नाही. खरेतर त्यासाठी केवळ शासनच जबाबदार आहे का, हादेखील प्रश्न आहे. वनवासी भागातील लोकांचे पुरेसे आरोग्यशिक्षण नाही. गर्भिणी परिचर्येचा अभाव, गरिबी, पोषण आहाराचा अभाव अशी कितीतरी कारणे कुपोषण वाढवतात. स्तनदा मातेला पुरेसे दूध येत नाही. त्यामुळे तिच्या बाळाला योग्य पोषणमूल्य मिळत नाही हेदेखील त्याचे एक मोठे कारण आहे. 
कुपोषणाच्या समस्येवर तोडगा निघावा आणि बालमृत्यूची संख्या कमी व्हावी असे सर्वांनाच वाटते. शासनालाही ते गांभीर्याने जाणवल्याने अंगणवाडीसारख्या योजनांना सुमारे ४० वर्षांपूर्वी आपल्या देशात सुरुवात झाली. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून लहान बालकांना आणि स्त्रियांना शासनाच्या वतीने पोषक आहार पुरवण्यात येतो. त्यासाठी अंगणवाडी सेविकांची एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे. परंतु या योजनेचे मूल्यमापन योग्य दिशेने करण्याची आवश्यकता आहे. ही योजना कितपत यशस्वी झाली याबद्दल साशंकता आहे. 
आजही या योजनेवर सरकार कोट्यवधी रु पये खर्च करते. एवढेच नव्हे तर 
इ. पहिली ते आठवी या वर्गात शिकणाऱ्या देशभरातील सुमारे १५ कोटी मुलांसाठी शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे. याही योजनेचे योग्य मूल्यांकन झाल्याचे ऐकिवात नाही. वरील योजनेमुळे बालकांच्या आरोग्यामध्ये झालेले परिवर्तन अभ्यासणे गरजेचे आहे. याचा विचार कोण करणार? 

एकात्मिक बालविकास प्रकल्प 
शासनातर्फेमोठी व्याप्ती असलेली ही योजना राबवली जाते. याचे पुढील घटक आहेत...
अ) पूरक आहार
ब) लसीकरण
क) आरोग्य तपासणी उपचार
ड) स्त्रियांना आरोग्य आणि पोषण शिक्षण 
इ) पूरक सूक्ष्म पोषके
फ) ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी 
शाळापूर्व शिक्षण. 
या सर्व उपक्र मांचा समन्वय योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अत्यंत प्रामाणिकपणे सर्व स्तरांवर हे सर्व घटक कार्यरत राहून उपक्र म राबविले गेले तर त्याचे काही ना काही परिणाम दिसू शकतात. या सर्व उपक्रमांमध्ये आहाराचा भाग फार मोठा आहे. आणि त्यावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित झाले पाहिजे. कुपोषित बालकांना आहार देताना त्या बालकाच्या पोटामध्ये कृमी नाहीत ना याची शहानिशा करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबर त्या बालकाची पचनशक्ती योग्य तेवढी आहे ना हेही तपासले पाहिजे. हे सर्व करण्यासाठी आहारातील घटक उदा. तांदूळ, गहू. दूध इ. यांचाही दर्जा उत्तम राखणे याला कोणताही पर्याय नाही. तो तसा राखला गेला, तरच कुपोषणाचे नीट मूल्यांकन करता येणे शक्य होईल. त्या आहाराच्या प्रमाणाची शास्त्रीयताही तपासून बघणे गरजेचे आहे. 
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दररोज प्रत्येक विद्यार्थ्यामागे १०० ग्रॅम तांदूळ दिला जातो. या तांदळाची खिचडी सुमारे ४०० ते ४५० ग्रॅम तयार होऊ शकते. अंगणवाडीतूनही मूळ आहार म्हणून तांदूळ आणि मुगाची खिचडी देतात. यामध्ये खरेतर गाईचे तूप टाकून देणे भारतीय आहारशास्त्रानुसार अत्यंत पुष्टीदायक आहे. कुपोषणाचे सर्वेक्षण, त्यावर आखलेल्या उपाययोजना हे सर्व मुळात केवळ शासनानेच करावे अशातला भाग नाही. अनेक स्वयंसेवी संस्थांची भूमिका याबाबतीत नक्कीच महत्त्वाची आहे. पण अशा सर्व यंत्रणांनी नेमके करायचे काय याचा विचार एकत्रितपणे बसून करायला हवा. महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार कुपोषण समस्या निराकरणाच्या दृष्टीने पूर्वी एका समितीचे गठन केले होते. 
कुपोषण समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडविण्यासाठी गर्भिणी स्त्रियांचे योग्य पोषण करण्याचा आग्रह आणि बालकांनाही आहार देताना मुळात १ ते १.५ वर्षापर्यंत आईचे दूध योग्य प्रमाणात मिळण्याची गरज या दोन गोष्टी कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यास सहाय्यभूत ठरू शकतात. स्त्रियांना आणि बालकांना दिल्या जाणाऱ्या आहारात शतावरी कल्प, खिचडीमध्ये गाईचे तूप, त्याचप्रमाणे राजगिऱ्याची वडी, सातूचे पीठ अशा आहाराचा समावेश शासनानेच करावा, असेही मत नोंदवले गेले आहे. 
भारतीय शास्त्राचा उपयोग आपल्याच देशातील कुपोषणासारख्या गंभीर समस्येसाठी करून घेण्याची मानसिकता आम्हाला घडवावी लागेल. शासन आजपर्यंत पाश्चात्त्य वैद्यकाचाच पुरस्कार करीत आलेले आहे. पण आता आयुर्वेदाचेही महत्त्व पटू लागल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेत आयुष (आयुर्वेद, युनानी, सिद्ध होमिओपॅथी, योग) या विभागालाही समाविष्ट करून घेण्यात आले, त्यामुळे शासनदरबारी आयुर्वेदाला थोडेसे का होईना स्थान प्राप्त झाले आहे. म्हणून या शास्त्रातील अनेक उपक्र मांचा आधार घेऊन प्रत्यक्ष त्याचा अवलंब केल्यास म्हणजेच गर्र्भिणी परिचर्येचे योग्य पालन केल्यास (यामध्ये दूध आणि तूप याखेरीज प्रमाणशीर आणि सहा रसांनी युक्त असा आहारही अभिप्रेत आहे.) 
कुपोषण समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो. 

कसा असावा गर्भिणीचा आहार?

गर्भिणीला नऊ महिने योग्य पोषकांश मिळाल्यास तिचे आरोग्य उत्तम राहते. आणि जन्माला येणाऱ्या बालकाचीही वाढ योग्य तेवढी होण्यास मदत होते. 
ती वाढ होण्यासाठी आयुर्वेदशास्त्राने गर्भिणी परिचर्येचे पालन करण्यास सांगितले आहे. 
यामध्ये प्रत्येक महिन्यात गर्र्भिणीला विविध प्रकारचा आहार देणे अपेक्षित आहे. 

पहिल्या महिन्यात 

गर्भिणीने थंड दूध प्यावे आणि सात्म्य भोजन करावे. 
दुसऱ्या महिन्यात 

मधुर औषधांनी सिद्ध (संस्कारित) असे दूध प्यावे. उदा. ज्येष्ठमध या औषधी वनस्पतीने सिद्ध दूध प्यावे.
तिसऱ्या महिन्यात 

मध आणि तूप मिसळून प्यावे.

चवथ्या महिन्यात 
दुध घुसळून काढलेले लोणी दोन तोळे दररोज घ्यावे.

पाचव्या महिन्यात 
दुधापासून लोणी काढून त्याचे तूप बनवून खावे.

सहाव्या व सातव्या महिन्यात 
सहाव्या व सातव्या महिन्यात हे तूप मधुरौषधांनी सिद्ध करावे.

आठव्या महिन्यात 
आठव्या महिन्यात दुधात सिद्ध केलेली यवागू (कण्हेरी) तूप घालून थोड्या थोड्या अंतराने घ्यावी. आहारविषयक नियम आठव्या महिन्यापर्यंतच दिले आहेत. 
नवव्या महिन्यात 
मधुरौषधी सिद्ध तेलाचा बस्ती देण्यास व याच तेलाचा पिचु योनिमार्गात धारण करण्यास सांगितले आहे. गर्भिणीने या दिनचर्येचे पालन केल्यास गर्भारपणात तिचे पोट, कंबर, कुशी व पाठ ही मृदू होतात. वायू आपल्या मार्गावर राहतो. मलमूत्र विसर्जन सुखाने होते. त्वचा व नखे मृदू राहतात. शक्ती व कांतीची वृद्धी होते व ती स्त्री योग्य काळी उत्तम प्रकारच्या अभिष्ट गुणांच्या बालकाला जन्म देते. आयुर्वेदीय शास्त्रकारांनी वर सांगितलेल्या उपायांना पूर्वीच्या ग्रंथाचा निश्चितपणे शास्त्रीय आधार आहे. आणि आजही त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 
पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून निष्कर्ष रूपाने हे ज्ञान जनतेच्या कल्याणासाठी आपल्यासमोर ठेवलेले आहे.

Web Title: To stop cobbler ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.