कहाणी तिच्या संसाराची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:32 AM2019-03-03T00:32:18+5:302019-03-03T00:34:14+5:30

शंकेची पाल चुकचुकली तरी अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. मात्र, सोमेश्वर-चिंचखरी येथील गजानन बोरकर व त्यांच्या पत्नी नम्रता बोरकर यांचे कुटुंब याला अपवाद आहे. या दाम्पत्याला ‘मेड फॉर इच आॅदर’ची उपमादेखील कमी पडेल. असे दोघांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असून, दोघेही संसाराचा रथ यशस्वीपणे हाकत आहेत.

Story of hers | कहाणी तिच्या संसाराची

कहाणी तिच्या संसाराची

Next
ठळक मुद्देनम्रताला ऐकणे व बोलणे या दोन गोष्टींच्या व्यंगापासून काहीही अडले नाही.

- मेहरून नाकाडे

शंकेची पाल चुकचुकली तरी अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. मात्र, सोमेश्वर-चिंचखरी येथील गजानन बोरकर व त्यांच्या पत्नी नम्रता बोरकर यांचे कुटुंब याला अपवाद आहे. या दाम्पत्याला ‘मेड फॉर इच आॅदर’ची उपमादेखील कमी पडेल. असे दोघांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असून, दोघेही संसाराचा रथ यशस्वीपणे हाकत आहेत.



प्रतिभा रमाकांत मूरकर ही मूळ भाट्ये (जि. रत्नागिरी) येथील. जन्मत: मूकबधिर. वास्तविक, रमाकांत मूरकर यांना दोन मुली, त्यातील एक दिव्यांग. रमांकांत खासगी कंपनीत कामास होते. के. प. मूकबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना अरुण फाटक यांनी मूरकर कुटुंबीयांची भेट घेऊन नम्रताला शाळेत दाखल करण्याची विनंती केली. त्यावेळी भाट्ये खाडीवर पूल नसल्याने राजीवडा ते भाट्ये अशी होडीने वाहतूक सुरू होती. फाटक बार्इंवर विश्वास ठेवून रमाकांत यांच्या पत्नी रश्मी प्रतिभाला भाट्ये किनाऱ्यावर होडीत बसवीत असत. त्यानंतर फाटकबाई स्वत: प्रतिभाला शाळेत घेऊन येत असत. अशा पद्धतीने प्रतिभाचे शिक्षण सुरू झाले.

मूकबधिर शाळेत प्रतिभाने सहावीपर्यंत शिक्षण घेतले. कालांतराने भाट्ये पूल झाला व प्रतिभा एस.टी.ने शाळेत येऊ लागली. प्रतिभा मूकबधिर असली तरी तिला शिवणकामाची आवड होती. तिने शिवणकामाचा डिप्लोमा पूर्ण केला.इतकेच नव्हे, तर एमएससीआयटी हा संगणक अभ्यासक्रम पूर्ण करून मराठी भाषेतील टंकलेखन परीक्षाही उत्तीर्ण झाली आहे. स्टार मेकिंगचे प्रशिक्षण घेऊन ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. मूकबधिर शाळेत शिकलेली प्रतिभा आता आपल्याच शाळेतील मूलांना शिवणकामाचे धडे देत आहे.

सोमेश्वर-चिंचखरी येथील गजानन बोरकर स्वत: रिक्षा व्यावसायिक त्यांच्या घरी आई-बाबा, भाऊ असा परिवार. गजानन बोरकर व प्रतिभा या दोघांची भेट रत्नागिरी बसस्थानकात झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रतिभाला केवळ डोळे, हाताच्या खाणाखुणा या व्यतिरिक्त बोलता येत नाही. हे माहीत असूनसुद्धा गजाजन यांनी प्रतिभाला पत्नी म्हणून स्वीकारायचे ठरविले. गजानन यांच्या आई-बाबांनी प्रतिभाच्या आई-बाबांकडे रीतसर मागणी घातली व लग्न लावून दिले. प्रतिभाला बोलता येत नाही; परंतु कुठे अडले नाही. प्रेमळ, मृद स्वभावाने सासरच्या मंडळींची मने जिंकली. इतकेच नव्हे, तर सासरच्या मंडळींनीदेखील कधीही दिव्यांग म्हणून तिला हिणवले नाही. कालांतराने गजानन व नम्रता यांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलली. प्रतीक व विभव हे दोन्ही मुलगे नॉर्मल आहेत. प्रतीक वाणिज्य शाखेत प्रथम वर्षात शिकत आहे.

विभव मात्र आता नववीत असून, गोदूताई जांभेकर विद्यालयात शिकत आहे. गजानन यांच्या धाकट्या भावाचे लग्न झाले असून, नम्रता धाकटी जाऊ आहे. दीर व जाऊ नम्रताला ‘भाभी’ म्हणून अदबीने हाक मारतात. त्यांनाही दोन मुलगे आहेत. आता एकूण दहा जणांचे कुटुंब आहे; परंतु कुठेही धुसफूस नाही. मुलांच्या शिक्षणासाठी धाकटी जाऊ रत्नागिरीत भाड्याने खोली घेऊन राहत असताना नम्रताच्या धाकट्या विभवचा सांभाळ करते. नम्रता सासू-सासरे, मोठा मुलगा व पतीबरोबर गावातील घरात आहे.

नम्रताचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले. वृद्ध आई एकटीच भाट्ये येथील घरी राहत होती. अचानक आजारी पडल्यानंतर नम्रता आईला सासू-सासऱ्यांच्या परवानगीने घरी घेऊन आली आहे. दहाजणांच्या बोरकर कुटुंबीयांनी नम्रताच्या आईला प्रेमाने स्वीकारले आहे. एकूणच अगदी सुखवस्तू कुटुंबात वृद्ध मंडळींची रवानगी थेट वृद्धाश्रमात केली जाते; परंतु बोरकर कुटुंबीयांनी तर एक वेगळा संदेश समाजाला देऊ केला आहे. नम्रताच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. नम्रताला साध्या फोनवर कॉल आला तरी तिला घरच्यांनी जे काही सांगितले ते समजते; शिवाय नम्रताचीही हुंकाराची भाषा त्यांना कळू लागली आहे. शाळेतून सर्व शिक्षकांनी नम्रताला दहावीच्या परीक्षेला बसण्याचे सुचविले आहे. गजानन बोरकर यांनी तर आम्ही सर्व कुटुंब तिच्या पाठीशी खंबीर राहू, असेही सांगितले. दिव्यांग असतानाही नम्रताला ऐकणे व बोलणे या दोन गोष्टींच्या व्यंगापासून काहीही अडले नाही.
                                                                           (लेखिका लोकमतच्या रत्नागिरी आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: Story of hers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.