​​​​​​​होकारात्मक पिझ्झाची गोष्ट !...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 06:01 AM2021-06-27T06:01:00+5:302021-06-27T06:05:01+5:30

सध्याचे वातावरण अतिशय निराशादायक आहे; पण दिलाशाच्या चार शब्दांनीही आपली मन:स्थिती सकारात्मक होऊ शकते. आपण होकारात्मकतेकडे झेप घेऊ शकतो. पण त्यासाठी आपण नियमितपणे खाल्ला पाहिजे ‘सोबर पिझा’! - नेमका काय आहे हा पिझा आणि तो बनवायचा कसा?..

The story of a positive pizza! ... | ​​​​​​​होकारात्मक पिझ्झाची गोष्ट !...

​​​​​​​होकारात्मक पिझ्झाची गोष्ट !...

Next
ठळक मुद्देया पिझाचं नाव ‘सोबर पिझा’! ‘सोबर’ या इंग्रजी शब्दाची पाच अक्षरं. एस-ओ-बी-ई-आर. प्रत्येक अद्याक्षर अतिशय महत्त्वाचं आहे.

- डॉ. राजेंद्र बर्वे

‘माझी तक्रार अशी आहे की मानसिक आधार देणं, मानसोपचार या पद्धती उत्तम आहेत. सध्याच्या नकारात्मक वातावरणात दिलाशाच्या चार शब्दांनी मन:स्थिती बदलू शकते, हे ही मान्य आहे. मानसिक आरोग्य आणि स्थिरतेची किती गरज आहे. याची जाणीव आज समाजाला होत आहे..’

शो संवाद करणाऱ्या काकांचं वय बरंच होतं. फॅमिली डॉक्टर म्हणून केलेल्या कामाचा अनुभव होता, यात शंकाच नाही; परंतु त्यांच्या तक्रारीचा सूर बदलत नव्हता. मी त्यांना थांबवत म्हटलं, ‘तुमची नेमकी तक्रार सांगा ना! म्हणजे उत्तर देता येईल. डॉक्टरकाका गोंधळले. तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की मानसोपचारानं मनोवृत्तीत होकारात्मक बदल व्हायला बराच काळ लागतो. आग लागल्यावर विहीर कशी खणायची यावर प्रवचन ऐकण्यात कोणाला रस वाटत नाही. मानसिक ताण तणावावर प्रथमोचार आहेत का? फर्स्ट एड टाइप काही उपलब्ध आहे का?..

डॉक्टरांचा चेहरा निवळला. बरोब्बर ओळखलंस! केवळ दुसऱ्यानं फर्स्ट एड कशी द्यावी, इतकंच नाही तर स्वत:ला मदत कशी करावी? कारण तणाव निर्माण झाला की काही सुचत नाही. मन भरकटत राहातं. आपल्या जिवाची घालमेल होते, कसल्याही चांगल्या विचारांची आठवण राहात नाही. कधी कधी तर आजूबाजूला काय घडतंय हेही उमगत नाही. विशेष म्हणजे श्वास अडकल्यासारखा होतो! काय करावं अशा वेळी?

मी म्हटलं, ‘सोबर’ राहावं. येस, सोबर म्हणजे भानावर राहावं!

डॉक्टरकाका थोडे कातावले, मस्करी करू नकोस!! दारू पिणाऱ्या माणसाला ‘सोबर’ राहण्याची ताकीद दिली जाते.

तसं नाही हो! सोबरचा इथे अर्थ जवळपास जाणारा आहे. सोबर म्हणजे भानावर येणं. दारूचा अमल दूर करून सोबर होतात, तसंच मानसिक तणावामधून भानावर आलं की मन शांत, स्वच्छ आणि होकारात्मक होतं. होकारात्मकतेकडे झेप घ्यायची आहे ना, मग भानावर या. सोबर राहा.

कोड्यात टाकू नकोस, नीट काय ते सांग? - डॉक्टरकाका उत्सुकतेनं, पण दमात घेत म्हणाले.

इथे दिलेल्या वर्तुळाच्या आकृतीवरून लक्षात येईल. आपण याला होकारात्मकतेचा पिझा म्हणू.

या पिझाचे पाच तुकडे आहेत. होकारात्मकतनेच्या पिझाचा बेस कसला? तर स्वत:ला मदत करण्याच्या मानसिक तयारीचा! यावर अनेक टॉपिंग वापरता येतात. आपल्या आवडीनिवडीनुसार निवडा.

या पिझाचं नाव ‘सोबर पिझा’! ‘सोबर’ या इंग्रजी शब्दाची पाच अक्षरं. एस-ओ-बी-ई-आर. प्रत्येक अद्याक्षर अतिशय महत्त्वाचं आहे.

सध्याच्या तणावग्रस्ततेच्या काळात आपण यंत्रमानव झालोय. यात भय-भीती, भयगंड हा एकच प्रोग्रॅम आहे. पण होकारात्मकतेचा पिझा खाल्ला की आपण चक्क बुद्धिमान, विचारी आणि सुसंस्कृत होतो.

अशी ही होकारात्मक पिझाची गोष्ट !...

खा, हा 'सोबर' पिझा! 

स्टॉप-

एस म्हणजे स्टॉप. थांबा. हे थांबणं फार महत्त्वाचं आहे. तणाव निर्माण झाला की शारीरिक बदल होतात. म्हणजे आपण काही तरी ॲक्शन घ्यायला लगेच सज्ज होतो. हृदयाचे ठोके वाढतात. श्वासाचं नियमन होत

नाही. अशावेळी थांबणं सर्वात उत्तम. अवघड घाटातून जाताना अचानक लक्षात येतं की इंजिन गरम झालंय. आपल्याला ठिकाण लवकर गाठायचं असलं तरी आपण थांबतो. गाडीचं बॉनेट उघडतो आणि म्हणतो, थांबलोय बरं आम्ही. जरा दम खा. थंड हो. तसं हे थांबणं, घाई असली तरी थांबा, दम खा. तणावग्रस्त अवस्थेत काम करत राहिलात तर शरीर जास्त थकेल. अपघात अथवा इजा हो. शकते.

ऑब्झर्व्ह

ओ म्हणजे ऑब्झर्व्ह. अर्धा-एक मिनिट थांबलात तरी पुरे. आता किंचित स्थिरावून निरीक्षण करा. जरा मनाचा कानोसा घ्या. शरीराची पाहणी करा. विसावलात की आपोआप हृदयाचे ठोके नियमित होतात. जरा हाता-पायांची हालचाल करा. इतर कोणाची मदत मिळते का पाहा, पण धावपळ न करता थांबलेले राहा.

ब्रिद-

बी म्हणजे ब्रिद. श्वास घ्या. श्वास आणि नि:श्वास हे आपले जन्माचे साथीदार. आता त्यांच्या नियमनाचं महत्त्वाचं गुपित सांगतो. अस्वस्थ असलो की श्वासोच्छ्‌वास वरच्यावर होतो. रागावलो तर भसाभस, जोराजोरात श्वास घेतो नाकपुड्या फुलवून. आणि खंतावलो की श्वास पकडून ठेवतो. सुटकेचा नि:श्वास सोडेपर्यंत. अशा तणावग्रस्त क्षणी वस्तुत: मेंदूला प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्याची गरज असते. ओव्हरटाइम काम करत असतो बिचारा! आणि आपण त्याची प्राणवायूची गरज भागवत नाही. मग तो थकणार नाही का? आता श्वास घेताना हळूहळू पण दीर्घ श्वास घ्या. हवेचा आवाज न करता आणि त्यापेक्षा अधिक वेळ घेऊन हलके हलके सोडा. नि:श्वास लांब हवा, कारण तणावामुळे निर्माण झालेली नकोशी द्रव्यं शरीराबाहेर फेकायची असतात ना! असे पाच-दहा-पंधरा श्वास घ्या आणि सोडा. आपली हवा, आपलं नाक बिनधास्त वापरा. आता हळूच लक्षात येईल की आपलं शरीर विसावतंय, घाम कमी येतोय. डोक्यातला विचारांचा गोंगाट कमी होतोय.

एक्स्पांड-

आता पुढची पायरी ई म्हणजे एक्स्पांड. विस्तार करा. तुमच्या लक्षात आलं का की इतक्या वेळ आपण स्वत:तच अडकलेलो होतो. स्वकेंद्री झालो होतो. आता नजर फिरवा इकडेतिकडे. पाहा बरं सभोवताली काय दिसतंय? आकाशाचा रंग निळाच आहे आणि हवेची एखादी मंद झुळूकही येतेय. एखादा पक्षी गात असेल. अहो, जगाचं राहाटगाडगं चालू आहे म्हणजे चालूच होतं. आपलं फक्त लक्ष नव्हतं! आता दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या गोष्टी लक्षपूर्वक पाहा. ओळखा काय काय परिचित खुणा दिसताहेत? ओळखीच्या चार गोष्टी दिसल्या की मनाला दिलासा मिळतो. आपल्याभोवती आहे बरं का सगळं, या विचारांनी एक गंमत होते. मनाला सांगू नका, पण मनाचं लक्ष स्वत:वरून उडतं आणि त्यालाच मनाची, जाणिवांची क्षितिजं विस्तारणं, असं म्हणतात.

रिस्पाँड-

आता आर म्हणजे रिस्पाँड. आपण तणावग्रस्त असलो की आततायी होतं. बोलू नये ते चटकन बोलतो. करू नये ते करून बसतो आणि मग पस्तावतो. या सगळ्या गोष्टी यांत्रिकपणे घडतात. अगदी नकळत; पण मन:स्थितीत बदल झाला की आपोआप दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांना आपण रोखतो आणि योग्य प्रतिसादाची निवड करतो.

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: The story of a positive pizza! ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.