‘खजिना’  वाचवण्याची धडपड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:02 AM2019-09-15T06:02:00+5:302019-09-15T06:05:04+5:30

महापुरात सांगली पाण्याखाली गेलं; पण याच पाण्यात ग्रंथालयांची लाखो दुर्मीळ पुस्तकंही भिजली. बर्‍याच पुस्तकांचा अक्षरश: लगदा झाला. राहिलेली पुस्तकं जगवण्याचे प्रय} सुरू आहेत. त्यासाठी विद्यार्थीही मदतीला येताहेत. हेअर ड्रायरनं पानं सुकवली जाताहेत. त्यांना पावडरी, रसायनं लावली जाताहेत.  हर्बल ट्रिटमेंट दिली जातेय.  ओवा, बदामफुलांची पावडर, बुरशी आणि  वाळवी प्रतिबंधकाची फवारणी केली जातेय. वेखंड पावडरीचा लेप चढवला जातोय.

Struggle to save 'treasure' .. A unique mission to save thousands of books and rare manuscripts damaged in the flood at Sangli | ‘खजिना’  वाचवण्याची धडपड..

‘खजिना’  वाचवण्याची धडपड..

Next
ठळक मुद्देबौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी अनामिक प्रेमींचाही नि:शब्द हातभार..

- श्रीनिवास नागे
भिंती काळवंडलेल्या, भिजून ओल्यागार झालेल्या. पूर येऊन गेल्याच्या खुणा दाखवणार्‍या. त्यांचा कुबट-कोंदट वास नाकात घुसतो. काही ठिकाणी भिंतींचे ढलपे निघालेत, तर काही ठिकाणी पापुद्रे वर आलेत. काळ्या बुरशीची पुटं चढलीत. ती पुसलेल्या जागा काळ्या पडलेल्या. लाकडी फर्निचर पाण्यामुळं फुगलंय. रिकामे रॅक, कपाटं, पुस्तकांच्या जागा ओक्याबोक्या. सगळीच रया गेलेली. शेजारच्या खोल्यांत, छतांवर पुस्तकं सुकत ठेवलेली. हिटर-हेअर ड्रायरनं एकेक पानं वाळवणं सुरू असलेलं. सुकलेल्या पुस्तकांचे गठ्ठे भिंतींच्या आधारानं बांधून ठेवलेले..
- महापुराच्या पाण्याखाली गेलेल्या ग्रंथालयांत दिसणारं हे ताजं चित्र. मन विषण्ण करणारं..
ऑगस्टमधल्या महापुरानं घरादारांसोबत बौद्धिक, वैचारिक वारसा जतन करणारी वाचनालयंही कवेत घेतली होती. या गं्रथालयांनी जिवापाड जपलेल्या संग्रहाची निसर्गाच्या एका झटक्यानं अपरिमित हानी झाली. सांगली जिल्ह्यात 17 ग्रंथालयांना पुराचा जबर फटका बसलाय. त्यात जिल्हा नगर वाचनालयाची हानी सर्वांत जास्त. पलूस तालुक्यातल्या संतगाव, अंकलखोपची दोन वाचनालयं आणि मिरजेच्या कृष्णाघाटावरचं एक ग्रंथालय तर पूर्णपणे पाण्यात होतं. तिथली सगळी ग्रंथसंपदाच चार दिवस पाण्याखाली गेलेली. जिल्ह्यातल्या वाचनालयांची सगळी मिळून तब्बल 94 हजार 386 पुस्तकं पुराच्या पाण्यात भिजली. कोल्हापूर जिल्ह्यातही 22 वाचनालयांतली 40 हजारांवर पुस्तकं पाण्यात गेली. वाचनालयांतून पुस्तकं घेऊन गेलेल्या काही वाचकांच्या घरातही पाणी शिरलेलं, त्यामुळं त्या पुस्तकांचीही हानी झालीये. शिवाय ग्रंथप्रेमींच्या घरातल्या वैयक्तिक संग्रहालयातले ग्रंथ भिजलेत, ते वेगळेच!
थेट पुस्तकांच्या खोल्यांमध्येच पुराचं पाणी शिरल्यामुळं आणि ग्रंथालय व्यवस्थापनाला वेळीच आपत्कालीन व्यवस्था न करता आल्यामुळं ही वेळ आली. यातले काही ग्रंथ तीन-चार दिवस पाण्यात राहिल्यामुळं त्यांचा लगदा झालाय, तर काही अजून तग धरून आहेत. अशा तग धरून असलेल्या, काही प्रमाणात भिजलेल्या पण प्रचंड प्रमाणावर असणार्‍या गं्रथांना वाचवणं आता सुरू झालंय..
**
सांगलीच्या राजवाडा चौकातली महापालिका इमारतीला खेटून उभी असलेली नगर वाचनालयाची तीनमजली इमारत. जिल्ह्याचं सांस्कृतिक केंद्रच जणू. खालच्या मजल्यावर गं्रंथ देवघेव, तर वरच्या मजल्यांवर दोन सभागृहं. सांगलीत आज अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक संस्थांमधली ही सर्वांत जुनी संस्था. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या वाचनालयाची ग्रंथसंपदा एक लाख चौतीस हजार! महापुराच्या आधी तीस हजार पुस्तकं आधीच वरच्या मजल्यावर हलवली होती, तर खालच्या मजल्यावर लाखभर पुस्तकं होती. 
सहा ऑगस्टला संध्याकाळपर्यंत इथं पाणी आलं नव्हतं. ते रात्रीतनं चढलं आणि सात तारखेला सकाळी समजलं की, वाचनालयाच्या खालच्या मजल्यात पाणी घुसलंय म्हणून! 2005 ला बाहेरच्या फुटपाथवर पाणी होतं, त्या अंदाजानं-हिशेबानं तयारी केलेली; पण अंदाजच चुकला. 
वाचनालयात चार फुटापर्यंत पाणी घुसलं. लोखंडी रॅकमधली खालच्या कप्प्यांतली पुस्तकं हलवली होती. हे रॅक लोखंडी असल्यानं हलले नाहीत; पण लाकडी रॅक पाण्यानं हलले, कलंडले, तरंगू लागले. त्यावरची सगळी पुस्तकं पाण्यात! अडीच-तीन फुटी टेबलांवर ठेवलेली पुस्तकं, संगणक यंत्रणाही पाण्याखाली गेली. आठ संगणक, तीन प्रिंटर, तीन इन्व्हर्टर, बॅटर्‍या हा यंत्रणेचा प्रपंच निकामी झाला. बाहेरून आर्मीच्या बोटी वेगानं जाताना पाण्याच्या लाटा उसळायच्या. त्या आत आल्यानं त्यांच्या मार्‍यानं कुठलं सामान कुठं जाऊन पडलं, हे कळलंच नाही. जडशीळ फर्निचरनंही जागा सोडली. रॅकवरचे पाच कप्पे पाण्यात बुडाले. साठ हजारांवर पुस्तकं चार दिवस पाण्यात होती!
काही इंग्रजी पुस्तकं वरच्या मजल्यावर हलवण्यात येणार होती. त्याचे गठ्ठे करून दाराशेजारी ठेवले होते; पण पहिल्यांदा तेच गठ्ठे पाण्यात गेले. त्यांचा लगदा झालाय!
महिनाभर हे वाचनालय बंदच होतं. आता उघडलंय. वरच्या दोन सभागृहात पुस्तकं पालथी करून वाळवायला ठेवलेली. हेअर ड्रायरनं पानं वाळवणं चाललंय. सुकलेल्या पुस्तकांचे गठ्ठे भिंतीकडेला ठेवलेले. त्यात काळी पडलेली, दुमडून गेलेली, हातात धरवत नसलेली पुस्तकंही दिसतात.  काहींना कसल्या-कसल्या पावडरी लावल्या जाताहेत. बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक खजिना वाचवण्यासाठीची ही धडपड.
या वाचनालयाचं वैशिष्ट्य म्हणजे 15 हजार दुर्मीळ गं्रंथ. त्यात जुनी हस्तलिखितं, पोथ्या, ऐतिहासिक बखरी, दस्तऐवज, संदर्भीय टिपणं, चरित्रं, जुन्या दैनिकांचा समावेश आहे. चारशेवर हस्तलिखितं इथं आहेत. वैद्यक, सौंदर्यमीमांसा, आध्यात्मिक, ज्योतिषशास्त्रावरच्या पुस्तकांसोबत इथली आयुर्वेदावरची ग्रंथसंपदा मौलिक समजली जाते. कारण ती इतरत्र आढळणं मुश्कीलच. रामदेवबाबा प्रतिष्ठाननं या ग्रंथांच्या फोटो कॉपी काढून नेल्यात. वाचनालयानं आयुर्वेदावरच्या 700 ग्रंथांचं डिजिटायझेशन केलंय. आता शासनाकडून बाकीचंही होतंय. अडीच हजारांवर बखरी आणि ऐतिहासिक कागदपत्रंही इथं आहेत. या ठेव्याला महापुरात फारसा धक्का लागला नाही, मात्र रॅकवरची पाचशेवर दुर्मीळ पुस्तकं पाण्यात गेली. संगणक पाण्यात गेल्यानं त्यातला डेटा उडालाय. कॉपी करून ठेवलेलं तेवढं वाचलंय. 
वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे सांगतात, महापूर ओसरल्यावर आत आलो, पण हबकीच भरली. ग्रंथ-पुस्तकं पाण्यात भिजलेली. अस्ताव्यस्त पडलेली. बघवत नव्हतं. त्यातून सावरताना आधी सगळी पुस्तकं तिन्ही मजल्यांवर पसरून वाळवून घेतली. पुस्तकं वाळवायला हेअर ड्रायरचा पर्यायही उत्तम ठरला. दोन ड्रायर विकत आणले, तर तीन ड्रायर पुस्तकप्रेमींनी भेट दिले. ड्रायर लावून एकेक पुस्तकाची पानं सुकवून घेतली. सहा कर्मचारी, महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. पुण्यातल्या प्राची परांजपे ज्ञानप्रबोधिनीच्या मुलींना घेऊन आल्या. दहा-दहा मुलींच्या तीन बॅचेस दोन दिवस सांगलीत होत्या. त्यांनी पुस्तकं सुकवण्यासाठी, रसायनं लावण्यासाठी मदत केली. या मदतीसाठी सांगलीच्या पुतळाबेन शहा बी.एड. महाविद्यालयानंही सोळा-सोळा मुलांच्या दोन बॅचेस पाठवल्या.
ग्रंथपाल सुरेखा नाईक सांगतात, शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत दहा-बारा जणांची टीम घेऊन आल्या. त्यांच्या प्रय}ानं विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथालय संघटनेनं दोन हजार वॉटचे दोन मोठे ड्रायर-हिटर दिलेत. त्यामुळं चटाचटा पुस्तकं वाळवता आली. 
पुस्तकं वाळवल्यानंतर त्यांना हर्बल ट्रिटमेंट दिली गेली. ओवा, बदामफुलांची पावडर करून अल्कोहोलमध्ये गरम करून फवारली. बुरशी आणि वाळवी प्रतिबंधक फवारून घेतलं. कमी भिजलेल्या पुस्तकांना वेखंड पावडर लावली गेली.. 
ज्या गं्रथांचा लगदा झालाय किंवा जे जीर्ण झालेत, त्याबाबत फार काही करता येत नाही. पण जे ग्रंथ थोडे भिजलेत, अशांना पुनर्जन्म देता येऊ शकतो. तसे प्रयत्न सफल होताना दिसताहेत. असे ग्रंथ आता वाचकांची वाट बघत रॅकवर विसावू लागलेत..
**
सांगलीच्या नगर वाचनालयाची बातमी समजल्यानंतर पुस्तकप्रेमींचं विश्व हादरून गेलं. कारण वाचनालयाची महती सर्वदूर झालेली. नाट्याचार्य खाडिलकरांचे थोरले बंधू हरी प्रभाकर खाडिलकर हे इथले पहिले कार्यवाह. जनरल माणेकशॉ, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर अशा दिग्गजांनी इथं आवर्जून भेटी दिलेल्या. पुराची हानी समजताच पुस्तकप्रेमी मदतीला धावले.
पूर आल्यानंतर पहिल्यांदा काही प्रकाशकांनी स्वत: संपर्क साधला. मदतीसाठी विचारणा केली. त्यांना प्रत्येकाला नुकसान कळवलं गेलंय. पूर ओसरल्यानंतर दोन दिवसांतच मंत्रालयातही माहिती पाठवण्यात आली.
मराठी प्रकाशक संघाच्या राजीव बर्वेंनी संपर्क साधून माहिती घेतली. त्यांनी ती सगळ्या प्रकाशकांना कळवली. प्रकाशकांनी वाचनालयाला पुस्तकं देणार असल्याचं कळवलंय. काही पुस्तकप्रेमींनी स्वत:कडचे ग्रंथ दिले, तर काहींनी नवीन आणून दिले. ज्येष्ठ नागरिक संघ, शिक्षकांनीही मदतीचा हात पुढं केलाय. मराठी अभिनेते-अभिनेत्रींनी नावं जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्तिश: धनादेश पाठवून दिले. डहाणूचं वाचनालय छोटा टेम्पो भरून पुस्तकं पाठवतंय. डॉ. नीलम गोर्‍हेंनी पाच लाखांची मदत जाहीर केलीय. राज ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरेही मदत देताहेत. 
यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. त्यांनी गावातून पंचवीस हजार रुपये गोळा केले आणि त्यातून पुस्तकं घेऊन आली. आर्ज‍याच्या गंगामाई वाचनमंदिरानं आणि सिन्नरच्या वाचनालयानं प्रत्येकी 11 हजार रुपये पाठवलेत. पुरंदरचे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेने 116 दुर्मीळ ग्रंथ दिलेत.  
नाशिक ग्रंथालयानं नाशकात शास्रीय गायिका मंजूषा पाटील (मंजूषा पाटील सांगलीच्याच.) यांचा कार्यक्रम घेतला. त्यातून एक लाख रुपये जमले. त्यात आपल्याकडचे लाखभर रुपये घालून त्या दोन लाखांचे ग्रंथ घेऊन ती मंडळी येताहेत. पुरातत्व वस्तू, दुर्मीळ ग्रंथ जतन करून ठेवण्यासाठी ज्यांची मदत घेतली जाते, ते प्रसन्न घैसासही या आठवड्यात येताहेत..
शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाचनालयांनाही बळ देणं सुरू झालंय. त्यांना सावरण्यासाठी तिथल्या जिल्हा ग्रंथालय संघानं कंबर कसलीय..

ग्रंथ भिजल्यानंतर..
पुस्तकं, महत्त्वाचे दस्तऐवज, हस्तलिखितं भिजल्यानंतर ती थेट सूर्यप्रकाशात ठेवण्याऐवजी सर्वप्रथम मोठय़ा खोलीत फॅनखाली किंवा हिटरने वाळवावीत. त्यातही संदर्भ ग्रंथ, दुर्मीळ ग्रंथ व किमती ग्रंथ यावर जास्त लक्ष द्यावं. पुस्तकांच्या पानांवरील बुरशी साफ करावी. त्यासाठी अल्कोहोल किंवा तत्सम रसायन वापरावं. 
ग्रंथ सुकल्यानंतर लगेचच ते कपाटात ठेवू नयेत. त्यांना फॅमिगेशन प्रक्रियेची गरज असते. फॅमिगेशन म्हणजे काही रसायनांची धुरी काही काळाकरिता ग्रंथांना देत राहणं. हर्बल ट्रिटमेंटही उपयुक्त ठरते. ही धुरी दिल्यानंतर लाकडी कपाटं, लोखंडी रॅक कोरडे करून त्यावरही बुरशीनाशक, कीटकनाशक फवारावं. नंतर ते सुकवून त्यावर पुस्तकं ठेवावीत.

shrinivas.nage@lokmat.com
(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

Web Title: Struggle to save 'treasure' .. A unique mission to save thousands of books and rare manuscripts damaged in the flood at Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.