...तर तेव्हा माझा जीव गेला असता 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:43 PM2022-02-13T14:43:16+5:302022-02-13T14:44:59+5:30

श्वेता पेंडसे, अभिनेत्री - मुंबईत सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. पटकन काम मिळत नव्हते. अभिनयाचे स्वप्न बघून मायानगरीत पाऊल ठेवले ...

Struggling Experience of Shweta Pendse | ...तर तेव्हा माझा जीव गेला असता 

...तर तेव्हा माझा जीव गेला असता 

Next

श्वेता पेंडसे, अभिनेत्री -

मुंबईत सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. पटकन काम मिळत नव्हते. अभिनयाचे स्वप्न बघून मायानगरीत पाऊल ठेवले पण येथे सुरुवात झाली ती क्लासेसमध्ये शिकवण्या घेण्यापासून. हळू-हळू लेखन आणि मग अभिनयाचे काम मिळत गेले. पण त्या काळात वेळीअवेळी करावा लागणारा प्रवास सुखकर नव्हता. आता कुठे माझ्या स्वप्नांना आकार यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबई हे शहर मला ऊर्जेचा स्रोत वाटते. मी लिहिलेल्या ‘बार्डो’ चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.  या जादुई शहराच्या मी प्रेमात पडले आहे. प्रणाम मुंबई !

नागपुरात लहानपणापासूनच नाटकांत कामे करायला सुरुवात केली होती. ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ हे बालनाट्य आणि प्रभाकर पणशीकरांबरोबर ‘तो मी नव्हेच’ या व्यावसायिक नाटकात कामे केली होती. नंतर राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने २-३ वर्षं मुंबईच्या फेऱ्या झाल्या. २०११ मध्ये मी लिहिलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘माझिया मना’ या नाटकाला विविध स्पर्धेत जवळपास २६ बक्षिसे मिळाली व मग पुण्या-मुंबईकडे येण्याच्या दृष्टीने विचारचक्र सुरू झाले. प्रत्यक्षात मुंबई गाठायला २०१३ उजाडले. 

मुंबईत काहीकाळ मोठ्या भावाच्या मुलुंडच्या घरात वास्तव्य करून लगेच ठाण्याला भाड्याचे घर घेतले. सुरुवातीचा काळ बिकट होता. पटकन कोणी काम देईना. मग रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण झाले असल्याने ठाणे, मुलुंड, दादर अशा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकवण्या सुरू केल्या. एक दिवस नागपूरकर मित्र आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, इथे अभिनय करायला भरपूर मंडळी आली आहेत. तू लिहितेस छान. लिखाणाचे काम माग. ते पटकन मिळेल. झालेही तसेच. आदेश बांदेकर यांच्या सोहम् प्रॉडक्शनची ‘लक्ष्य’ ही मालिका तेव्हा सुरू होती. त्याच्या लेखनासाठी मी त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून परत घरी येत असताना मला त्यांच्याकडून फोन आला की तुम्ही पुढच्या भागात काम कराल का? दोनच दिवसांनी शूटिंग होतं. तेव्हापासून अनेक भागात भूमिका केल्या. 

‘जयोस्तुते’ आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांच्या शूटिंग करता मला नियमित मुलुंड ते मढ असा पवईमार्गे दुचाकीवरून प्रवास करावा लागायचा. एकदा रात्री घरी येताना दुचाकीवरच डुलकी लागली. कशीबशी थांबून तोंडावर पाणी मारले अन् पुढे निघाले पण झोप अनावर झाली होती. कधी एकदा घरी पोहोचेन असे झाले होते. भांडुपजवळ शेवटी माझा अपघात झाला. हेल्मेटमुळे थोडक्यात बचावले. पण यामुळे माझा प्रवास थांबला नाही. हीच मुंबईची खरी ओळख आहे. त्यामुळेच या शहराच्या मी आकंठ प्रेमात आहे.
- शब्दांकन : तुषार श्रोत्री
 

Web Title: Struggling Experience of Shweta Pendse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.