असा पाऊस गाताना...
By admin | Published: June 14, 2014 08:10 PM2014-06-14T20:10:18+5:302014-06-14T20:10:18+5:30
आभाळ गच्च होतं... दिवसाउजेडी काळोख दाटून येतो... वारा थांबतो, हवेतला उष्मा वाढतो... आणि मग एक टपोरा थेंब येतो... त्याच्या पाठोपाठ दुसरा येतो... मग तिसरा... मृद्गंध सुटतो... सुरू होतं पावसाचं गाणं...
Next
ना. धों. महानोर
मी शेतकरी आहे. मला विचारलं, तुमचा सगळ्यात आनंददायी दिवस कुठला? तर मी सांगेन ‘आभाळ भरून आलेलं, ढगांचे ढोल वाजताहेत, विजेचं तांडवनृत्य आभाळभर आहे आणि मृग नक्षत्रात पाऊस पडतोय.’
चौफेर आभाळभर पाऊस.. शिवारभर. सर्वत्र पावसाच्या धारा.. आभाळभर चिवचिव. चोचीनं गीत गाऊन स्वागत करणारे, अनेक रंगांचे घिरट्या घालणारे पक्षी, व्याकूळ तृष्णेने मरगळलेली झाडवेली, न्हाऊन धुवून तजेलदार झालेली, तेही झुलतं हिरवं गाणं गाणारी आणि सर्वत्र दूरदूरवर अवघ्या सृष्टीला तजेलदार करणारा, दु:ख झटकून टाकणारा मृद्गंध. पहिल्या पावसानंतरचा नांगराचा भुईचा मृद्गंध वर्षातून फक्त एकदाच सृष्टीला उभारी देणारा.
पक्ष्यांचे लक्ष थवे।
गगनाला पंख नवे।
वार्यावर गंधभार।
भरलेले ओचे झाडातून
लदबदले बहर कांचनाचे।
घन वाजत गाजत
ये थेंब अमृताचे.
अशा ओळी विश्वाच्या साक्षात्काराच्या या क्षणी ओठांवर येतात. कोणीही कितीही बलवंत मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो. पाऊस वेळेवर नसला, घनगंभीर पाण्यापावसानं नदीनाले, शेतं, धरणं यांना नवं चैतन्य देणारा, भक्कम नसला, तर त्याचा कार्यभाग शून्यावरच राहील. शेतीवाडी-पिकं-झाडं-वनश्री-धरण-पाटबंधारे यातून दर वर्षी निर्माण होणारं नवं चैतन्य, विश्वाच्या अन्नाचा घास व जीवन संपूर्ण उभं करणारा फक्त एकच ईश्वर... पाऊस! स्वाती नक्षत्रांना वेढा घालून मृगापासून, तर उत्तरा, पूर्वा नक्षत्रांनंतरही रिमझिम बरसणारा, मदमस्त बरसणारा पाऊस हवा. शेतकरीच नव्हे, तर सगळीच, लहान-मोठा-खेड्यांचा-शहरांचा-पशुपक्षी चराचर यांचा, देशाचा, समृद्ध अर्थव्यवहार उभं राहाणं, पाऊस नसला तर मोडू शकतं आणि चार महिने छान बरसला, तर संपूर्ण जोडूही शकतं. म्हणूनच तर शब्द येतात-
‘बरस रे राजा रोज बरस स्वातीला
बरस स्वातीला भेटे आभाळ मातीला.
पाऊस छान पडला. बाईनं आंघोळ करून नवं नेसून धान्याची ओटी भरली. घुंगरांचा साज चढवून बैलांना कुंकवाचा टिळा लावून तिफणीवर धनधान्य पेरलं जातं. हा नव्या साक्षात्काराचा, सृजनाचा क्षण. शेतकर्याची, खेड्यांची आनंदयात्रा, जगाच्या कल्याणासाठी. तो मोडला, तर देश मोडेल. म्हणून तर सकलांनी पर्जन्यस्तोत्र, प्रार्थना, गाणी कंठ भरून म्हणावी, विश्वाकार पावसाची..
या नभाने या भुईला दान द्यावे।
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला।
जोंधळ्याला चांदणे लखडून यावे.
पावसानंतरचा भुईचा प्रत्येक दाणा-शंभर दाणे देतो, हा केवढा चमत्कार.
रुजे दाणा दाणा। ज्येष्ठाचा महिना।
पाखरांचे पंख आम्हा आभार पुरंना।
ही पावसाची आनंदयात्रा
नवी लवलव कोंबांची
नवी पालवी झाडांना
चिंब कोकिळेचा स्वर,
असा पाऊस गाताना
आषाढाला पाणकळा
सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिर्कावून शब्द येती माहेरपणाला.
वारंवार येणारे दुष्काळ, मोडलेला संसार, गणगोत, लहरीपणानं वर्षभर न येणारा दुष्काळाचा सोबती आणि विक्राळपणानं शेती, घरं, संसार उद्ध्वस्त करणारा, वादळी गारांचा भरडून टाकणारा पाऊस आणि एअर कंडिशन सभागृहात बोलघेवड्या कळवळय़ानं दुष्काळात तोंडाला पाने पुसणारा स्वत:च्या सावलीपुरताच राजकारणी समाज. थेट काळोख्या रस्त्यानं जाणार्यांना थोपवू शकत नाही.
मोडला गेला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा।
ही शेतकर्यांची भावना आहे. आज कोणाच्याही विश्वासावर नाही, फक्त एका, फक्त एका पावसाच्या विश्वासावर ‘मी येतो, भरभक्कम येतो, तू काळजी करू नकोस. नवे नवे प्रयोग करून तुझ्या कष्टानं हे भरडलेलं विश्व नांदू दे. तू नांगर, तिफण हाती घे राजा, मी येतोय.’
बालकवी, बा. भ. बोरकर, ना. घ. देशपांडे, इंदिरा संत, ग्रेस किती शंभर-दोनशेपेक्षा कवींना श्रेष्ठ अशा पावसाची कविता छान लिहिताना, ओठांवर, संगीतावर गाताना, दु:ख विसरून नवं चैतन्य येतं.
‘सरीवर सरी आल्या गं’पासून, तर ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, माझं घर चंद्रमौळी - नको नकोरे पावसा.’ ‘जलधारात तारा छेडत आला श्रावण छंदी फंदी, त्याची चढते गीत धुंदी अशी रुसून मुकी बसून नको आवरू तुझा आज ओला विस्कटलेला साज,’ ‘हा श्रावण गळतो दूर नदीला पूर तरूवर पक्षी’ ‘आला आषाढ श्रावण आला, पावसाच्या सरी किती चातक चोचीनं प्यावा वर्षाऋतू तरी’.
‘मेघदूता’पासून मराठी कवितेला पाऊस- पावसाच्या कवितेनं अधिक समृद्ध केलं. ती पुन्हा पुन्हा वाचावी... गावी अन् दु:ख हलकं करून टाकावं. रानात, पावसात तिला घट्ट बिलगून थरथरताना जवळ घेताना छत्रीतल्या, पावसातल्या नर्गिस-राज कपूरच्या बिलगण्याची गोड आठवण येते. अशा खूप कवितेतल्या प्रसन्न गोष्टी. केवळ पाऊस त्याच्या रिमझिम.. भक्कम बरसण्यामुळे असा पाऊस भल्ता चावट धसमुसळा, लुब्रा, स्त्री-पुरुषांच्या मिलनाला- भुई आकाशाच्या एकसंघ मिठीला गहिरेपण देऊन जगणं चैतन्यमयी करणारा. देशाचा खरा उद्धारकर्ता - कर्ता करविता- फक्त पाऊस.
(लेखक ज्येष्ठ कवी व साहित्यिक आहेत.)