‘शत्रू’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:02 AM2019-06-16T06:02:00+5:302019-06-16T06:05:05+5:30
शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्याच समाजातल्या एखाद्या कलावंताच्या कलाकृतीतून जास्त धोका आहे, समृद्ध सांस्कृतिक वातावरण आपल्याला मारक ठरेल, असं सत्ताधार्यांना ज्यावेळी वाटायला लागतं, त्यावेळी त्यालाच ते शत्रू मानायला लागतात. अशा वेळी प्रत्येकानंच सजग राहायला हवं, नाही तर तो समाज संपायला वेळ लागत नाही.
- गिरीश कर्नाड
मराठी साहित्यिकांच्या या महनीय मेळाव्यापुढं उभा असताना माझ्या मनात परकेपणाची जराही भावना नाही. मी महाराष्ट्रात जन्मलो. माझं प्राथमिक शिक्षण मराठीतून झालं आणि मराठी वाड्मयावरच मी वाढलो, पोसलो.
माझ्या सुदैवानं, नाटककार या नात्यानं आजच्या मराठी रंगभूमीवरच्या काही अत्यंत प्रतिभासंपन्न लोकांशी माझा जवळून संपर्क आला. माझ्या आई-वडिलांमुळे नाट्यपरंपरा हा मला माझा व्यक्तिगत वारसा वाटत आला आहे. कन्नड नाटक मंडळ्यांचे प्रयोग मी पाहिले, ते त्या मंडळ्या युद्धानंतरच्या काळात जेव्हा घसरणीला लागल्या, त्या वेळचे प्रयोग. परंतु त्या वेळीदेखील त्यांच्यावर महान मराठी आदर्शांची छाप स्पष्ट दिसत होती. तिच्यामुळं मी प्रभावित झालो. मला प्रेरणा मिळाली.
कन्नड आणि मराठी अशा दोन अत्यंत समृद्ध संस्कृतीची मेहेरनजर असणं ही कोणाही लेखकाच्या दृष्टीनं मोठी भाग्याची गोष्ट असते, याची साक्ष महान कन्नड कवी द. रा. बेंद्रे व विद्वान शं.बा. जोशी यांचं लिखाण देतं. दोघांची मातृभाषा मराठी, धारवाडला शेजारी-शेजारी राहिले आणि खर्या शेजार्यांप्रमाणे भांडलेदेखील. ते भांडत मात्र कन्नड भाषेत ! इतिहास आपल्याला सांगतो, की भक्तिसंप्रदायाचा उगम तामिळनाडूमध्ये झाला. कर्नाटकात येऊन तो विकास पावला. लिंगायत शरणांचं महान वचन-वाड्मय निर्माण झालं़ तेथून तो महाराष्ट्राकडं वळला. ज्ञानेश्वर नामदेवादी संतांच्या वाड्मयाचा फुलोरा निर्माण करून, पुन्हा माघारी कर्नाटकाकडं वळला आणि पुरंदरदास, कनकदास या वैष्णव संतांना प्रेरणा देऊन उत्तरेकडं जाऊन फोफावला. धर्म, वाड्मय, नाटक, कला यांमध्ये, किंबहुना एकूण विचारधारणेतच, या दोन भाषांमधलं आदानप्रदान इतकं व्यामिर्श स्वरूपाचं आहे, की त्यांचं विश्लेषण करणं कठीण आहे.
भिन्नतेच्या दृष्टीनं विचार करायला लागलो, तर एक गोष्ट लक्षात येते, ती अशी, की महाकाव्याची परंपरा ही कन्नड साहित्याची शक्ती आहे, बलस्थान आहे. नवव्या शतकापासून कन्नडमध्ये महाकाव्यं रचली गेली आहेत व आजही लिहिली जात आहेत. या साहित्य-प्रकारानं कन्नड भाषेस बळकटी आणि स्थैर्य मिळवून दिलं आहे.
दुसर्या बाजूनं विचार केला तर आधुनिक कन्नड माणसाला मराठीकडं आदरानं पाहावं लागतं, असे दोन विषय आहेत. एक म्हणजे विनोद. आम्ही कन्नड माणसं हसतो; पण साहित्यात नव्हे. त्यामुळं गडकरी, अत्रे, कोल्हटकर, चिं. वि. जोश्यांपासून थेट पु.ल. देशपांड्यांपर्यंत विनोदी लेखक तुम्हांला देणार्या परंपरेचा आम्हांला हेवा वाटतो. पु.लं.नी तर रंगभूमी आणि विनोद या दोहोंवर अधिराज्य केलं आणि या यशाला मोठय़ा मनाची आणि उदार हृदयाची अजोड जोड दिली.
दुसरी गोष्ट म्हणजे, निष्ठावंत सामाजिक व राजकीय विचारवंतांची परंपरा. आगरकर, फुले, टिळक, आंबेडकर या विचारवंतांनी प्रश्न उपस्थित करण्याची, चर्चेची, वादविवादाची, चिंतनाची आणि परीक्षणाची एक निर्भय परंपरा निर्माण केली. मराठीत आजही ही परंपरा जिवंत व जोमदार आहे.
आधुनिक कर्नाटकात अशा बुद्धिवादी-इंटलेक्च्युअल परंपरेचा पूर्ण अभाव आहे. गेली काही शतकं कर्नाटकात राष्ट्रीय पातळीचे विचारवंत निर्माण झाले नाहीत. इतकं जवळचं नातं असणार्या या दोन भाषा याबाबतीत इतक्या वेगळ्या असाव्यात, ही गोष्ट थक्क करणारी आहे. तिचा अधिक खोलात विचार केला पाहिजे.
भारत ही एक लोकशाही आहे. आपली घटना जगातील उत्कृष्ट घटनांमध्ये गणली जाते. स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतर आपण खचितच अभिमानानं म्हणू शकतो, की आणीबाणीची दोन लाजिरवाणी वर्ष सोडता, आपले शास्ते नेहमी लोकांचे प्रतिनिधी होते व आहेत. निदान तत्त्वत: तरी आपण प्रत्येक नागरिकाचं विचारस्वातंत्र्य, इतरांचं मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नांचा अधिकार आणि आपल्या पसंतीचं चांगलं जीवन जगण्याचा अधिकार मान्य करतो, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.
हिटलरच्या गुप्त पोलीसदलाचा प्रमुख फील्ड मार्शल हरमन गोअरिंग यानं एकदा असं म्हटलं की ‘संस्कृती’ हा शब्द कानांवर पडताक्षणी मी ब्राउनिंग शोधू लागतो. ‘ब्राउनिंग’ या शब्दानं त्याला ब्राउनिंग नावाचा इंग्रज कवी सुचवायचा नव्हता, तर त्या नावाचं एक रिव्हॉल्व्हर त्याला अभिप्रेत होतं. समृद्ध व ओजस्वी सांस्कृतिक वातावरण जुलुमशाहीला मारक ठरेल, तिचा उपहास करील, हे गोअरिंगनं नेमकं ओळखलं होतं. हिटलर, स्टालिन, माओ-सगळी एकच कहाणी. शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्याच समाजातल्या एखाद्या चित्रकाराच्या रेखाचित्रापासून आपल्याला जास्त धोका वाटतो, तो खरा जवळचा शत्रू असतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता आह़े
‘जिथं मनाला भीती शिवत नाही आणि
मस्तक उन्नत आहे;
जिथं ज्ञान मुक्त आहे
जिथं समाज दुभंगलेला नाही
संकुचितपणाच्या घरगुती भिंतीनी,
जिथं शब्द बाहेर पडतात,
सत्याच्या खोल दरीतून उत्स्फूर्तपणं;
जिथं पूर्णत्व मिळविण्यासाठी अखंड
उद्यमशीलता आपले बाहू पसरत आहे.
जिथं रूढीचं वाळवंट विचारांचा निर्मळ ओघ
ग्रासून टाकत नाही
जिथं होतात समृद्ध विचार आणि
आचार तुझ्या प्रेरणेनं
अशा ह्या स्वातंत्र्याच्या स्वलरेकात,
हे तात,
माझा देश जागृत होऊ दे.’
ही कविता ब्रिटिश राजवटीत लिहिलेली आहे. इंग्रजांनी तिच्यावर आक्षेप घेतला नाही. तिच्याबद्दल पेच कधी निर्माण झाला, ठाऊक आहे? आणीबाणीत. त्या वेळी, वर्तमानपत्रांवर ती छापण्याची बंदी घातली गेली. आणीबाणीच्या या काळातच दिल्लीत माहिती व प्रसारण खात्यामध्ये - मिनिस्ट्री ऑफ इन्फर्मेशन अँण्ड ब्रॉडकास्टिंगमध्ये - फिल्म दिग्दर्शकांची एक मीटिंग बोलावली गेली होती. तीत सत्यजित रे, हृषिकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मी उपस्थित होतो. तेव्हा, चित्रपट बनवणार्या मंडळींना माहिती व प्रसारण मंत्रालयानं असा इशारा दिला होता, की भारतात दलित किंवा स्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांची नोंदच नाही. कारण आपण एक सहिष्णु समाज आहोत. चित्रपट बनविणार्यांनी अशा विषयांपासून दूर राहिलेलंच बरं.
चित्रपट-दिग्दर्शक मृणाल सेन यांनी सांगितलेली एक बोधकथा आहे. त्यांना ही कथा चार्ली चॅप्लिनच्या एका पुस्तकात मिळाली.
एका राजकीय कैद्याला मृत्यूची सजा झाली होती. त्याच्या वधासाठी गोळीबार-पथक तयारीत उभं होतं. (तुम्हांला माहीत असेल, की या पथकात निदान दहाजण असतात. त्यामुळं या कृत्याचं उत्तरदायित्व व्यक्तिश: आपल्यावर आहे, अशी अपराधी भावना कोणालाही वाटत नाही.)
शिक्षेच्या तहकुबीची आशा होती. त्यामुळं पथकाचा मुख्य अधिकारी तहकुबीचा हुकूम घेऊन येणार्या जासुदाची अधीरतेने प्रतीक्षा करीत होता. परंतु जासूद आला नाही.
नेमलेल्या वेळी अधिकार्यानं आज्ञा केली : ‘तैयार’ आणि वंगण दिलेल्या यंत्राप्रमाणे पथकानं एकसाथ रायफली सज्ज केल्या.
अधिकार्यानं पुढं फर्मावलं,
‘नेम धरा !..’
पुन्हा एकदा तितक्याच यांत्रिक सफाईनं सर्वांनी नेम धरला.
अकस्मात क्षितिजावर एक स्वार दिसला. जिवाच्या करारानं तो आपल्या हातातला तहकुबीचा हुकूम फडकावून दाखवत होता.
त्याला पाहताच आनंदानं हुरळलेला अधिकारी ओरडला.
‘थांबा..’
आणि यांत्रिक सफाईनं पथकानं एकसाथ गोळ्या झाडल्या.
ही नुसती कथा नाही. आपण सजग राहिलो नाही, तर आपल्या समाजाचं भविष्यात काय होईल, याचं हे नेमकं चित्र आहे.
(अहमदनगर येथे 3 जानेवारी 1997 रोजी झालेल्या 70व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनप्रसंगी उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणाचा संपादित सारांश.)