सुपरकिड बनवणारा बाजार
By admin | Published: June 17, 2016 05:31 PM2016-06-17T17:31:27+5:302016-06-17T18:03:01+5:30
बाजारपेठ तर सतत सांगतेय की, तुम्ही कुणीही असा, तुमचं मूल सामान्य आहे की असामान्य की अतिसामान्य याची फिकीरच करू नका. तुम्ही पैसे मोजलेत, सुविधा दिल्या, शिकवण्या लावल्या, तर तुमचं मूल ‘सुपरकिड’ बनू शकतं, आणि अर्थातच हे सुपरकिड उद्या जाऊन ‘जिनिअस’ बनेल! आजचे अनेक पालक या चकचकीत मोहात अडकत जे जे बाजारपेठ विकेल ते विकत घेत सुटलेत!
मेघना ढोके
एका शाळेच्या बाहेरच एक अत्यंत स्मार्ट तिशीतली तरुणी भेटली. जुजबी चौकशा झाल्यावर म्हणाली, ‘‘मी नर्सरीपासून पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी व्होकॅबलरी (म्हणजे शब्दसंग्रह, अर्थात इंग्रजी) वाढवण्याचे क्लासेस घेते. पहिल्या सेशनला या ते फ्री आहे!’’ ज्यांचं वय वर्षे साडेतीनही नाही, मातृभाषा, परिसर भाषाही जेमतेम बोलता येते अशा मुलांना इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढावा म्हणून ट्रेनिंग?
ही कल्पना पचत नव्हती, म्हणून मग त्या क्लासला आपल्या मुलांना पाठवणाऱ्या दोन-तीन आयांना गाठलंच. मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय वर्तुळातल्या तशा त्या ‘सुजाण’ आया होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘तोटा काय आहे? मुलांची शब्दसंपत्ती वाढली, भाषा सुधारली तर त्यानं बिघडेल काय? आणि पुन्हा हे प्रकरण खर्चिक नाही.
आठवड्यातून दोन दिवस तर क्लास, वेळही फार जात नाही. उलट नवीन भाषा मुलं लवकर शिकतील, तोटा काहीच नाही!’’ सकृतदर्शनी तोटा काहीच दिसत नसला, तरी फक्त शब्द-शब्द पाठ करून उपयोग काय? तेही इंग्रजीतले? ज्या शब्दांचे अर्थ कळत नाही, ते शब्द फक्त घोकत राहायचे ते कशासाठी?
या प्रश्नांच्या उत्तराचं सूत्र हेच होतं की, नव्या जगात राहायचं तर इंग्रजी भाषा अस्खलित यायलाच हवी. आणि लवकर शिक्षण सुरू केलं तर जास्त शिकता येईल. पैसा हा प्रश्नच नाही, मुलांना सुविधा देणं हा प्राधान्यक्रम महत्त्वाचा!
क्लासेस घेणाऱ्यांपासून पालकांपर्यंत अनेकांशी बोलत गेलं तर हे एकच वाक्य पुन्हा पुन्हा अधोरेखित होत गेलं. ‘लवकर सुरू केलं, तर जास्त शिकता येईल!’
लवकर आणि जास्त या दोन शब्दातली अधीरता पालकांच्या मनात पेरण्याचं काम सध्याची बाजारपेठ अचूक करते आहे. ‘तुझी रेस अजून संपलेली नाही’ असं जिथं जाहिराती सांगतात, जिथं साबणसुद्धा स्लो नसतो, जिथं मुलांचा ९० टक्के दिमागी विकास पाच वर्षे वय होईपर्यंतच होतो असं बजावलं जातं हे सारं पालकांना अप्रत्यक्षपणे हेच सांगतंय की, तुमचं मूल तुम्ही सुपरकिड बनवू शकता..
लहान मुलांशी संबंधित वस्तू, सेवा, उत्पादनं यापैकी कशावरही नजर टाका.. ते सारं पालकांना आवाहन करत असतं की, ‘मेक युवर चाइल्ड सुपरकिड!’
म्हणजे प्रत्येक मूलच असामान्य असतं, युनिक असतं, वेगळं आणि खास असतं हे पालकांनी मान्य करून आपलं मूल आहे तसं स्वीकारण्याचा टप्पा यायच्या आतच बाजारपेठेनं एक पुढचा टप्पा पालकांच्या पुढ्यात आणून ठेवलाय. जो म्हणतो की, तुम्ही कुणीही असा, तुमचं मूल सामान्य आहे की असामान्य की अतिसामान्य याची फिकीरच करू नका. तुम्ही पैसे मोजलेत, सुविधा दिल्या, शिकवण्या लावल्या तर तुमचं मूल ‘सुपरकिड’ बनू शकतं. आणि अर्थातच हे सुपरकिड उद्या जाऊन ‘जिनिअस’ बनेल, तशी शक्यता तरी तयार असेल!
अलीकडेच एका उन्हाळी शिबिराची जाहिरात पाहिली. वय वर्षे २.५ ते ५ या वयोगटातल्या मुलांसाठी सकाळी १० ते दुपारी १२ अशा टळटळीत उन्हात ते शिबिर होतं. चौकशीसाठी आलेल्या पालकांचीच शाळा घेत शिबिर घेणाऱ्या बार्इंनी एक भलमोठं लेक्चर झोडलं. या बाई एक प्ले स्कूल चालवत होत्या. आणि थेट लंडनहून बालमानसोपचारापासून अजून कसकसलं ट्रेनिंग घेऊन आल्या होत्या.
अर्थात इंग्रजीत बोलत होत्या.
मग म्हणाल्या, ‘‘कम टू अस विथ युअर किड्स प्रॉब्लेम अॅण्ड विल रिपेअर इट प्रॉपरली, अॅट लिस्ट वी विल फिक्स इट अप!’’ शुद्ध मराठीत सांगायचं तर, तुमचं मूल घेऊन या, आणि आम्ही ते रिपेअर करून देऊ. नाहीच झालं तर कामचलाऊ डागडुजी तरी करून देऊ! त्या बार्इंना म्हटलं, मूलं म्हणजे काय मिक्सर, टीव्ही किंवा एखादी सायकल आहे का तुम्ही रिपेअर करायला? फिक्स करायला? की प्रॉडक्ट्स आहेत?
त्यावर त्या म्हणाल्या की, ‘‘ग्लोबल अॅप्रोच ठेवा. ज्या जगात तुमचं मूल भविष्यात वाढणार आहे, त्यासाठी त्याला तयार करायचं तर त्याच्या व्यक्तिमत्त्वातला अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे!’’
विशेष म्हणजे, जमलेल्या दहापैकी सात पालकांनी इम्प्रेस होत बार्इंच्या शिबिरात मूल रिपेअर करायला पाठवायचा फॉर्म भरून टाकला. कारण त्या बार्इंचा वायदाच होता की, इंग्रजी बोलणं, मॅनर्स, म्युझिक आणि डान्सची प्रेझेंटेबल ओळख (म्हणजे चारचौघात गाणं म्हण म्हटलं की म्हणणारं, नाच म्हटलं की नाचणारं मूल), कॉन्फिडन्स हे सारं त्या मुलांच्या डोक्यात भरून देणार होत्या! आणि पालकांना हे सारं पटतं कारण सूत्र तेच की, लवकर सुरू केलं तर आपलं मूल लवकर शिकतं, जास्त शिकतं.
म्हणूनच आता व्होकॅबलरी वाढवण्यापासून ते थेट किड्स योगा, किड्स मेडिटेशन, वैदिक गणित, मीड ब्रेन अॅक्टिव्हिटी, म्युझिकल कॉन्सण्ट्रेशन थेरपी, अबॅकस, फोनिक्स, व्यक्तिमत्त्व विकास (वय वर्षे २.५ पासून पुढे), संस्कार वर्ग आणि विविध छंद वर्ग, कला, क्रीडाप्रकार या साऱ्या ठिकाणी पालकांची गर्दी दिसते. वार्षिक फी १० ते २५ हजारापासून ते एका कार्यशाळेची फी पाच हजारापर्यंत भरणारे पालक या साऱ्या ठिकाणी गर्दी करत आहेत. आणि बाजारपेठ जितकं प्रभावित करत नाही त्यापेक्षा पालकांवरचं पिअर प्रेशर इतकं जास्त असतं की, सगळे करतात म्हणूनही काही पालक या लोंढ्यात स्वत:ला लोटून देतात.
या साऱ्यात अजून दुर्दैव असं की, या साऱ्या शिकण्या-शिकवण्याच्या शाखा, त्यातलं मूळ सूत्र, गांभीर्य याचा काही आगापिछाच नसणारे आणि दोन किंवा तीन महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स करून हे वर्ग सुरू करणारे अनेकजण अनेक शहरांत दुकानं थाटून बसलेले आहेत. शिकवतो आहोत असा नुस्ता घाऊक दिखावा, बाकी नुस्ती पोकळ बडबड. पालकांचे खिसे हलके होतात, आपली मुलं नवीनच काहीतरी शिकताहेत याचं समाधान त्या खिशांत जाऊन बसतं. आणि मुलं मात्र नुस्ते चक्कीत पिसत राहतात. वाईट असं की, अशा प्रकारांमुळे जे कुणी अत्यंत शिस्तीत, गांभीर्यपूर्वक काम करतात त्यांचीही विश्वासार्हता प्रश्नांकित होत जाते.
एखादा माइण्ड गेम असावा तशी ही फॅक्टरी पालक आणि मुलांच्या मनाशी खेळत राहते. सुपरकिड बनण्या-बनवण्याचे नुस्ते आभासी मनोरे बांधले जात आहेत.
आपण या आभासी जाळ्यात सापडत ‘सुपर’ बनवण्याच्या नादात मुलाचं सारं बालपण, सारी निरागसता आणि मुक्त जगण्याचा आनंदच हिरावून घेतोय का, याचा आता पालकांनीच विचार करायला हवा!
आपल्याला सुपरकीड, जिनिअस हवाय की हाडामासाचा, आपलेआप फुलू पाहणारा, जग नव्यानं पाहणारा एक जीव हवाय याचं उत्तर पालकांनी आपल्यापुरतं शोधावं!
ते उत्तर सोपंय..
समोर आहे..
स्वीकारायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे!
एवढं फक्त तपासायला हवं..
१) जे क्लासेस आपण लावतो, त्यांचे दावे हे किमान तर्काच्या कसोटीवर तरी घासून पाहता येतील.
२) आपलं मूल असामान्यच आहे, वेगळंच आहे हे मान्य केलं, तर त्याला अतिरेकी असामान्य बनवण्याचा अट्टहास सोडून देता येईल. सतत क्लासेसमागे पळवून जिनिअस घडतील का?
३) विदेशी भाषा शिकणं वाईट नाही; पण परिसर भाषेतलं, मातृभाषेतलं आकलन हे स्पेलिंग पाठ करत, घोकत बसण्यापेक्षा जास्त आनंददायी असतं. त्यातली उत्सुकताच मेली तर काय हाशील?
४) आपलं मूल उद्याच्या जगात कसं टिकेल याचा विचार करण्यापेक्षा ते उद्याचं जग कसं घडवेल, त्यात आनंदी कसं राहील याचा विचार करता येईल.