विसर्जनातले सर्जन

By Admin | Published: September 9, 2016 05:28 PM2016-09-09T17:28:11+5:302016-09-09T17:28:11+5:30

विघ्नहर्त्याच्या विसर्जनाची घटिका जवळ येते आहे. त्याला निरोप देताना, आपण त्याच्याबरोबर काय देऊ? दहा दिवस गणेशोत्सवात साठवून ठेवलेली पाने, फुले, दूर्वांच्या जुड्या आणि पत्रींचे ढीग. मूर्तीवरून काढलेले पुष्पहार. शिवाय देवाला श्रद्धेने वाहिलेली फळे, नारळ, देवाची वस्रे आणि प्रसाद! - हे सारेच मंगलमय वातावरणात करता येईल का? असा प्रश्न मनाशी धरून आम्ही काम सुरू केले आणि काही मार्गही शोधले. त्याबद्दल...

Surgeon of Immersion | विसर्जनातले सर्जन

विसर्जनातले सर्जन

googlenewsNext
नलिनी नावरेकर
 
गणेशाचे सर्जन आणि विसर्जन.
गणेशाची मूर्ती आणि त्याचबरोबर देवाचे निर्माल्य, गणपतीला वाहिलेले पाने-फुले-दूर्वा इ. पाण्यामध्ये विसर्जित करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याचा हेतू चांगलाच आहे. देवाला वाहिलेल्या या गोष्टी पवित्र असतात. त्या पवित्र ठिकाणीच टाकल्या जाव्या. कुठेतरी पडून राहू नये, पायदळी जाऊ नये, त्याची विटंबना होऊ नये. म्हणून मग पाण्यामध्ये - नदी, समुद्र, तळी, तलाव, विहिरी अशाठिकाणी विसर्जन करण्याची पद्धत रूढ झाली. पण आजच्या काळात तो एक प्रश्न होऊन बसला आहे. कारण लोकसंख्या वाढली. एके ठिकाणी वस्ती अर्थात लहान-मोठी शहरे वाढू लागली, घरोघरी गणपती बसवायचे प्रमाण वाढले. त्यात सार्वजनिक गणेश मंडळाची भर पडत चालली. त्यामुळे निर्माल्याचे प्रमाण वाढले. आणि नदी-तलावांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण ओघानेच आले. म्हणून मग आता गणेशमूर्ती आणि निर्माल्याचे नदी-तलावात विसर्जन करू नका, असे सांगण्याची वेळ आली. काही सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, काही ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिकाही निर्माल्य संकलन करू लागल्या आहेत.
नाशिकजवळच्या आमच्या निर्मलग्राम केंद्रात आम्हीही हे काम हाती घेतले आहे. आम्ही विचार केला, नदीचे प्रदूषण जेवढे टाळता येईल तेवढे टाळू, तिचे पावित्र्य राखू. निर्माल्याचेही पावित्र्य राखू. निर्माल्य गंगामातेच्या ऐवजी भूमातेला अर्पण करू. ती त्याचे चांगल्या पद्धतीने विघटन करेल. म्हणजेच निर्माल्याचे खत करू आणि वृक्षदेवतेला अर्पण करू. 
लोकांकडून निर्माल्य घेतले. गोळा केले. पाहिले तर त्यात फक्त खत करण्यासारख्या गोष्टी - पाने, फुले, पत्रीच नव्हते तर त्यात देवाला वाहिलेले धान्यही होते. फळे, नारळ, देवाचे वस्र आणि प्रसादही होता. असे बरेच काही होते, की त्याचे खत बनणार नव्हते. खत बनवणे योग्य ठरणार नव्हते. मग आम्ही सफाईच्या शास्त्रानुसार वर्गीकरण करायचे ठरवले.
निर्माल्याचे वर्गीकरण आम्ही करायला घेतले खरे; पण त्याची काय अवस्था होती? दहा दिवस गणेशोत्सवात साठवून ठेवलेली पाने, फुले, दूर्वा आणि फळे यांची अवस्था बरी नव्हती. हळद-कुंकू-गुलाल सांडलेले, एकत्र झालेले. गहू, तांदूळ, इतस्तत: पसरलेले, अशी सारी अवस्था! अशा स्थितीत वर्गीकरण करणे हे जिकिरीचे आणि कष्टाचेही होते. नाशिकची गोदावरी स्वच्छ, सुंदर अन पवित्र राखण्याची तीव्र इच्छा आणखी पक्की होत गेली, शिवाय मदतीला आलेल्या हातांनी ‘निर्माल्य अभियाना’च्या कामाला बळ मिळत गेले. 
खरे तर आदर्श स्थिती अशी असावी की हे असे काम करायची वेळच यायला नको. लोकांनी आपापल्या घरीच गणेशमूर्ती आणि निर्माल्याचे विसर्जन आणि विनियोग करावा. विचारपूर्वक केले तर ते सहज शक्य आहे. त्यासाठी लोकांचे प्रबोधन व्हायला हवे. पण त्याला वेळ लागेल. तोपर्यंत काय? देवाची इच्छा आहे तोवर- दुसऱ्या शब्दात शक्ती, क्षमता आणि सर्वांची साथ आहे, तोवर- हे काम करत राहायला हवे. 
आपल्याकडे घरोघरी गणपती बसवण्याची रूढी आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचीही परंपरा भरात आहे. भक्तिभावाने आणि हौसेने आपण गणपती बसवतो. दहा दिवस त्याची आस्थेने, श्रद्धेने, आनंदाने आणि उत्साहाने पूजा करतो. परंतु दहा दिवसानंतर विसर्जनावेळी मात्र चुकीच्या पध्दतींचा पुरेसा विचार करत नाही. त्या प्रश्नांवर मंगलमूर्तीवरच्या श्रध्देइतकेच मंगल आणि सुंदर तोडगे शोधण्याचा विचार करत नाही.
- त्यातूनच मग पर्यावरणाचे आणि स्वच्छतेचेही प्रश्न उभे राहातात. पूर्णत: विसर्जित न झालेल्या मूर्तींचा प्रश्नही त्यातूनच येतो आणि गंभीर बनतो. चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या आराध्यदेवतेची, श्रद्धास्थानाची पर्यायाने आपलीच विटंबना करतो. त्याचबरोबर नदी-निसर्ग- पर्यावरण यांची हानी- मानहानी करून साधनसंपत्तीही वाया घालवतो.
देवाची वस्त्रे, कागद, फोटो, प्लॅस्टिक नदी परिसरात इतस्तत: पसरतात. नारळ, दक्षिणा-पैसे नदीत, नदीकाठी सोडून दिले जातात आणि कुणीतरी गरजू, गरीब मुले खटाटोप करून ते हस्तगत करतात. अशी सगळी ‘अवस्था’ असते. - त्यापेक्षा विचारपूर्वक योग्य पद्धतीने विसर्जन केले तर?
पण म्हणजे कसे??
गणेशमूर्ती शास्त्रसंमत म्हणजे मातीच्या आणि लहान आकाराच्या बसवाव्यात, याविषयी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाले आहे, होत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. या मूर्तींचे े विसर्जन घरच्या घरी किंवा शेतात जाऊन करावे. मोठ्या टिपात, टाकीत पाणी घेऊन विसर्जन करून माती पुन्हा बागेत किंवा शेतात मिसळून द्यावी. मूर्ती शाडूमातीची असल्यास तीच माती पुन्हा मूर्ती कामासाठी वापरता येते. पाने, फुले, दूर्वा घरच्या झाडात, कुंडीत टाका. त्यास खत न म्हणता, वृक्षदेवतेला अर्पण केले म्हणा. नारळ, फळ, प्रसाद खराब होण्यापूर्वीच, घरी सर्वांनी मिळून श्रद्धेने खा. किंवा वाटून द्या. धान्य, दक्षिणा (सुपारी, नाणी) इ. गोष्टी सत्पात्री दान करा. अशा पद्धतीने विनियोगपूर्वक विसर्जन झाले तर सर्वकाही खऱ्या अर्थाने ईश्वरार्पण झाले असे होईल. निर्माल्याचे पावित्र्य राखले जाईल. हे काहीच शक्य नसेल तर निर्माल्य संकलन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांच्याकडे व्यवस्थित पद्धतीने सुपूर्द करा.
याबाबतीत एक मोठा प्रश्न येतो. प्रबोधन करून नदीपात्रात जाणाऱ्या निर्माल्याचे संकलन केले; ... पण मग पुढे काय? 
त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्याबद्दल सांगतो. आम्ही निर्माल्य गोळा केले आणि त्याचे वर्गीकरण केले. त्यात एकूण पंचवीस ते तीस प्रकारच्या लहान मोठ्या वस्तू, पदार्थ होते. जे सारेच गणरायाबरोबर नदीकडे विसर्जित होणार होते. आता त्याचे काय करायचे? 
सफाईच्या तत्त्वज्ञानानुसार आम्ही म्हणतो, या जगात टाकाऊ अशी वस्तू नाही. प्रत्येक गोष्टीचा उत्तम विनियोग करून घेतला पाहिजे. 
आणि इथे तर चांगल्या गोष्टी टाकाऊ होऊन चालल्या आहेत. वाया जात आहेत. पण हे संकलित निर्माल्य म्हणजे आमच्यासमोर आव्हानच होते. या सगळ्या वस्तंूपैकी कशाकशाचा काय उपयोग करायचा, जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल, याचा नुसता विचार करणे म्हणजे डोक्याची चांगलीच कसरत होती, खुराक होता डोक्याला! भावना, पावित्र्य, स्वच्छता, आरोग्य, वैज्ञानिक, पुनरूपयोग/पुनर्चक्र ीकरण या सगळ्याचा मेळ घालायचा आणि तेही लवकरात लवकर! सोप्या गोष्टींचा विनियोग तुलनेने लवकर झाला.
उदाहरणार्थ नारळ! विनियोग काय?- खाणे! 
निर्माल्य संकलनात आलेल्या नारळापैकी सुमारे साठ ते सत्तर टक्के नारळ खाण्यासारखे होते. इथेही मन थोडे दोलायमान झालेच. पण अगदी जुन्या विचारांच्या आजीही म्हणाल्या, ‘प्रसाद म्हणून खाऊन टाकायचे नारळ!’ मग सर्व कार्यकर्त्यांना दोन-दोन, तीन-तीन असे नारळ वाटले गेले. खराब झालेले बरेच नारळ होते. ते करवंट्यांपासून वस्तू बनवण्यासाठी ‘अर्थ केअर’ या संस्थेला दिले. फळेदेखील खाण्याचीच वस्तू! ती खासकरून आजूबाजूच्या मुलांना वाटली. काही फळे कार्यकर्त्यांनीही नेली. जी माणसांना खाण्यासारखी नव्हती, ती गायींना घातली. आणि अगदी खराब फळांचे खत केले. प्रसादाच्या अन्नाचे वेगळ्या पद्धतीने खतात रूपांतर केले. पाने, फुले, पत्रीचे तर सरळसरळ सेंद्रिय खत बनवून ते भूमातेला कामी आले. देवाच्या मूर्ती प्लॅस्टिकपासून पितळेपर्यंतच्या, आणि देवांचे फोटो, पूजेची भांडी इ. वस्तू इच्छुक लोकांना वाटत गेलो.
फोटोंचे काय करायचे?- शेवटी विचार करून मार्ग काढला. निर्माल्यातल्या फोटोंचा प्रत्येक भाग सुटा केला. फ्रेमच्या लाकडी पट्ट्या, मागचे प्लायवूड किंवा हार्डबोर्डचे आधार सुटे केले. हुक, खिळे, पत्रे असे काही निघाले, ते इतर धातुबरोबर पुनरूपयोगासाठी दिले. हे काम करताना हात थबकला. मनात किंचितसे डगमगले. देवांचे फोटो! ते असे विलग करायचे???
- शेवटी स्वत:लाच सांगितले, मूर्ती तयार झाली की, तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मगच ती देव बनते. तीच मूर्ती भंगली, अगदीच खराब झाली की तिच्यातले देव मानलेले देवपण संपते. देवाला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. तो अनादि अनंत आहे. तो कसा तुटेल फुटेल? विलग होते ती मूर्ती, फोटो! ते देवाचे प्रतीक असते! जसे शरीरात प्राण असतो, म्हणून मनुष्य जिवंत असतो. देह निष्प्राण झाल्यावर त्यालाही जाळावेच लागते ना! - तसेच या भंगलेल्या मूर्ती आणि फोटोंचे! मनुष्यदेहाप्रमाणेच या देवाच्या प्रतीकांचेही विचारपूर्वक व्यवस्थापन करायला हवे.
समर्थ रामदासस्वामींच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात. भिक्षा मागण्यासाठी समर्थ घरोघरी जात. समाजात सगळे लोक सारखे नसतात. एका घरातली माउली चुलीला पोतेरे करत होती. यांची हाक ऐकून, हातात पोतेरे घेऊनच आली. तिला समर्थाची थोरवी काय माहीत? तिला वाटले, काय हे गोसावडे; येतात आपले भिक्षा मागायला!
तिने रागातच ते पोतेरे समर्थांकडे भिरकावले. समर्थांनी ते शांतपणे उचलले. स्वच्छ धुतले. त्याच्या वाती केल्या आणि मारु तीपुढे लावल्या.
- आम्ही निर्माल्याचा सदुपयोग करून संपूर्ण स्वच्छता करण्याचा प्रयत्न करीत आहोत, समर्थांच्या कृपाशीर्वादाने! गेली काही वर्षे आम्ही नेटाने हा निर्माल्य संकलनाचा उपक्रम करतो आहोत. त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपडतो आहोत. या लिखाणातली चौकट पाहा, म्हणजे निर्माल्यात काय काय असते, याचा अंदाज येईल. हे सगळे असे फेकून का द्यायचे? त्यापेक्षा घरच्या घरी विनियोग आणि विसर्जन हा चांगला मार्ग! ते शक्य नसेल तर यातील काही गोष्टी सत्पात्री आदरपूर्वक दान करणे हा एक मार्ग! किंवा ठिकठिकाणी निर्माल्य संकलन करून त्याचा विचारपूर्वक विनियोग करणाऱ्या संस्था, समूह तयार व्हावेत आणि निदान त्यांच्यापर्यंत आपण हे सर्व पोहोचवावे. 
श्रीगणेश ही तर स्वच्छतेची देवता! तो तर विघ्नहर्ता आहे आणि आपण मात्र आपल्या व्यवहाराने समाज, जलाशय, निसर्ग, परिसर यांना विघ्नात टाकायचे का?
- गणपती घरी आल्यावर जसे जिकडे-तिकडे प्रसन्न वातावरण असते, तसेच गणपती विसर्जनानंतरही प्रसन्न राहायला हवे. त्यात अप्रसन्नता कशाला?


काय काय आणि किती किती?

आमचे कार्यक्षेत्र आहे नाशिक. नाशिक शहर परिसरातील गणेश विसर्जनाच्या अनेक ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे गंगापूर धरणाच्या अलीकडची जागा; तिकडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही हे निर्माल्य संकलन अभियान राबवतो. फक्त या एकाच शहराचा विचार केला, तरी एकूण निर्माण होणाऱ्या निर्माल्याच्या प्रमाणात आमचे काम आणि शक्ती म्हणजे दर्यातला खसखशीचा दाणा!
-तरीही आमच्याकडे जमलेल्या निर्माल्यातल्या चिजांची काही वर्षांपूर्वीची ही आकडेवारी पाहा :


पाने, फुले, दूर्वा - १५०० ते २००० किलो
चांगली फळे - ५० ते १०० किलो 
खराब फळे - ५० ते १०० किलो
नारळ - चांगले १५० ते २००
खराब ४० ते ८०
खोबरे (वाट्या व तुकडे) - ६ ते १० कि.
धान्य - २५ ते ४० किलो 
प्रसादाचे अन्न - १५० ते ३०० किलो
वस्रे - २० ते ३० किलो
कागद - सुमारे ३-५ पोती
प्लॅस्टिक - सुमारे ९ ते १० पोती
सुपाऱ्या, बदाम (पूजेचे) - ३ ते ५ किलो
पैसे (दक्षिणेचे) - ६०० ते १००० च्या दरम्यान 
देवाचे फोटो - ५० ते ६० 
च्या आसपास लहान-मोठे फोटो 
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या देवतांच्या मूर्ती 
- १ ते २ पोती
देवाच्या धातूंच्या मूर्ती - १५ ते ३०


याखेरीज हळदकुंकू, कापूर, पूजेची काही उपकरणे, सजावटीच्या वस्तू, पोथ्या, धार्मिक पुस्तके इ. अनेक गोष्टी आहेत. नंतर आम्ही इतक्या काटेकोरपणे मोजमाप केलेले नाही; पण अलीकडच्या वर्षात या आकडेवारीत मोठी वाढ झाली, हे निश्चित! - केवढे हे आकडे आणि केवढ्या या वस्तू, पदार्थ! नाशिक शहर आणि परिसरातल्या फक्त एका ठिकाणाहून जमा झालेल्या! संपूर्ण नाशिक शहराचा विचार केला तर याच्या किमान शंभर तरी पट निर्माल्य निघत असणार! एका शहरातून एवढे तर लहान-मोठ्या इतर सगळ्या शहरातून एकूण किती होईल? संपूर्ण महाराष्ट्राचे केवढे होईल?

(लेखिका नाशिकनजिकच्या गोवर्धन गावात ग्राम स्वच्छतेचे प्रयोग आणि संशोधन करणाऱ्या 
‘निर्मल ग्राम निर्माण केंद्रा’च्या अध्यक्ष आहेत.)

nirmalgram@rediffmail.com

 

Web Title: Surgeon of Immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.