जगण्याची फसगत
By admin | Published: December 26, 2015 05:50 PM2015-12-26T17:50:00+5:302015-12-26T17:50:00+5:30
काही हजार रुपये. किरकोळ वाटणा:या या रकमादेखील आता गरजूंचे अवयव काढून घेण्यासाठी पुरेशा ठरताहेत. जगण्याची लढाई हिमतीनं लढता लढता आयुष्याची लढाईच संपून जाण्याची वेळ यातल्या अनेकांवर आली आहे. तेल कधीच संपलं, तूप नशिबात नव्हतंच, पण हातातलं धुपाटणंही ओढून नेलं. अशी गत अवयवदात्यांच्या नशिबी आली आहे. कोण लढणार त्यांच्यासाठी?
Next
नितीन गव्हाळे/सचिन राऊत
दहा-वीस हजार रुपये. काय होईल या रकमेतून? गरिबी दूर होईल? कर्ज हटेल? मुलाबाळांची शिक्षणं होतील? घरदार बांधून होईल? मुलीचं लग्न होईल? परिस्थिती बदलेल?.. ही रक्कम तरी फार मोठी आहे का?.
अर्थातच गरजूंसाठी ती फार छोटीही नाही.
कारण मरमर काम करूनही ही रक्कम ते फेडू शकत नाहीत.
किरकोळ वाटणा:या, पण अडल्यानडल्यांसाठी ‘महाकाय’ झालेल्या अशा रकमादेखील आता आपले स्वत:चे अवयव काढून घेण्यासाठी सध्या पुरेशा ठरताहेत.
अशी किरकोळ देणी फेडण्यासाठी आणि नंतर आपल्याला ‘घबाड’ मिळेल अशा आशेनं अनेकांनी आपल्या किडन्या विकल्या आणि आधीच भुकेकंगाल असलेली ही बापडी ‘अपंग’देखील झाली हे एक विदारक वास्तव आहे..
या वास्तवाचं, हिमनगाच्या टोकावरचं एक जळजळीत सत्य नुकत्याच झालेल्या काही घटनांवरून उघड झालं. त्यातलं एक शहर आहे अकोला.
जगण्याची लढाई हिमतीनं लढता लढता आयुष्याची लढाईच संपून जाण्याची वेळ यातल्या अनेक अभागींवर आली आहे. तेल गेलं, तूप तर कधी नव्हतंच, पण हातातलं धुपाटणंही ओढून नेलं. अशीच गत या अवयवदात्यांच्या नशिबी आली आहे.
फसवणुकीचे मार्ग तरी किती असावेत?
काही हजारांसाठी आता लोकांच्या अंगावरचे अवयवही काढून घेतले जात आहेत.
त्यासाठीची पद्धतही म्हटलं तर अगदी सोपी. परिस्थितीनं पिचलेलं, लोकांकडून नाडलं गेलेलं, काही पैशांसाठी अडलेलं, हतबल, गलितगात्र झालेलं ‘सावज’ अगोदर हेरायचं. मायेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा, त्याच्याशी जवळीक साधायची, त्याला आधार द्यायचा, ‘अरे मी आहेना, तू कशाला काळजी करतोस, हे घे पाच हजार, हे घे अजून चार हजार. पैसे येतील तेव्हा फेड, थोडे थोडे करून दिले तरी चालेल.’ असं म्हणत त्या गरजू व्यक्तीच्या हातात बळेबळेच पैसे कोंबायचे, त्याच्या मनात अडचणीच्या वेळी आपल्याला जणू देवच भेटला, अशी प्रतिमा निर्माण करायची आणि एकदा का त्याच्याकडून पैसे खर्च झाले, की मग हात धुवून त्याच्यामागे लागायचं. काढ आता माङो पैसे. त्याच्यामागे गुंड लावायचे, त्याचं जिणं हराम करायचं आणि नंतर पुन्हा आपणच त्याला मार्ग दाखवायचा. अरे हे बघ, तुङया आयुष्यात हा खरोखरचा देवच आलाय. त्याला तुझी किडनी फक्त दे. त्यानं तुङया दैनंदिन ‘जगण्यात’ काहीही फरक पडणार नाही, उलट काही लाख तुङया हातात पडतील, मालामाल होशील, आयुष्याची ददात मिटेल.
जन्माला आल्यापासून पाठीशी लागलेली ही दरिद्री आयुष्याची ददात एकदाची मिटावी आणि सुखी आयुष्य वाटय़ाला यावं म्हणून म्हणून गांजलेली ही माणसं एकदाची आपली किडनी विकायलाही तयार होतात.
त्याचंही आता ‘रॅकेट’ तयार झालंय. त्या कहाण्याही अंगावर शहारे आणणा:या आहेत.
शांताबाई रामदास खरात
अकोल्यातील राहुलनगरात राहणा:या या महिलेचे पती डफडं वाजविण्याचं काम करतात. त्यांना तीन मुलं. मोठा मुलगा विनोद याच्यावर पत्नीला जाळल्याचा आरोप आहे. तो सध्या कारागृहात आहे. दुसरा मुलगा अरुण हा बाळापुरात रिक्षा चालवतो, तर धाकटा जानराव शेतमजुरी करतो. मुलांच्या लग्नासाठी आई-वडिलांनी कर्ज काढले. या कर्जाचा डोंगर वाढत गेला. पैशासाठी सावकार घरी येऊन शिवीगाळ, मारहाण करायचे. अशातच तिच्या पतीची गाठ एका व्यक्तीशी पडली. किडनी विकली तर चांगला पैसा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले. शांताबाईचा पती त्यासाठी लगेच तयार झाला. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पतीने माघार घेतली. परंतु कर्ज फेडण्यासाठी शांताबाई तिची किडनी विकण्यास तयार झाली. किडनी तर विकली, पण त्यातही तिची फसवणूक झाली. जेवढी सांगितली तेवढी रक्कम मिळाली नाही. जो पैसा मिळाला, तो व्याजासहित सावकाराच्या घशात घालावा लागला. किडनीही गेली आणि पैसाही. आता तर तिच्याकडून जास्त कामंही होत नाहीत.
अमर सिरसाट
अमर अकोल्यातील किल्ल्याजवळ मोर्णा नदीच्या काठावर एका झोपडीत राहतो. गवंडी काम करायचा. सात आणि दहा वर्षाची दोन चिमुकली मुलं. पत्नी रेखा धुणीभांडी करून संसाराला हातभार लावते. अमरला दारूचे व्यसन होते. यातूनच त्याच्यावर कर्ज वाढत गेले. घेणोकरी घरी येऊन त्रस द्यायचे. त्यालाही किडनीच्या मोबदल्यात लाखो रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. त्याने किडनी विकण्याचा निर्णय घेतला. पत्नीने विरोध केला. पण अमरने तिच्या विरोधाला न जुमानता किडनी विकली. पुढे काय झालं? - किडनी विकून जे पैसे मिळाले, ते सर्व कर्ज फेडण्यात गेले. आता त्याची प्रकृती खालावली आहे. पूर्वीसारखं अंगमेहनतीचं काम जमत नाही. पती, चिमुकल्या मुलांची जबाबदारी आता रेखावर येऊन पडली. ही माउली धुणीभांडी करून संसाराचा गाडा रेटत आहे. खेळण्या-बागडण्याच्या आणि शिकण्याच्या वयातली त्याची मुलं आता त्यांच्याच शाळेसमोर संत्री, पापड विकतात!
देवानंद गोपालस्वामी कोमलकर
हातमजुरीवर त्याचं आयुष्य चालत होतं. पत्नी गीता, 11 आणि 7 वर्षाच्या दोन चिमुकलींसोबत हरिहरपेठेत लहानशा घरात राहतो. त्यालाही पैशाचे आमिष दाखवून, त्याची किडनी काढून घेण्यात आली. पाच लाख रुपये कबूल केले, पण तीनच लाख दिले. देवानंदची रोगप्रतिकार शक्ती आता कमी झाली आहे. जड काम त्याला ङोपत नाही. कुटुंब, मुलींचे शिक्षण, त्यांचे भविष्य डोळ्यासमोर आलं की, भविष्याच्या काळजीनं तो अस्वस्थ होतो.
आयुष्याची फसगत झालेल्या अशा दुबळ्या लोकांची यादी खूप मोठी आहे. सर्वाची परिस्थिती एकसारखीच. लक्ष्मीची अवकृपा जन्मापासूनच. किडनीची आवश्यकता असणा:या धनदांडग्यांसाठी आणि त्यांच्यासाठी राबणा:या टोळीने या गोरगरिबांना हेरले. सुरुवातीला त्यांना पैसाअडका पुरवला. या पैशावर व्याजाचं चक्र सेकंदाच्या काटय़ापेक्षाही वेगानं फिरलं. मग सुरू झाला पैशासाठी छळ. कधी धमक्या, कधी शिवीगाळ, तर कधी मारहाण.. सावकारांच्या या दुष्टचक्रात आपण कधी आणि कसे अडकलो, हे त्यांनाही कळलं नाही. हा छळ दिवसागणिक वाढत होता. परिस्थितीसमोर हरलेल्या या गरिबांना मग सावकारानेच मार्ग दाखवला. स्वत:ची किडनी विकण्याचा. तोर्पयत मनुष्याच्या शरीरात दोन किडन्या असतात, त्यांचं काम किती महत्त्वाचं असतं, हेही या भोळ्याभाबडय़ांना माहीत नव्हतं.
किडनी काढली. दोन-चार उन्हाळे-पावसाळे गेले. त्यांच्या शरीराचं गाडं एकाच किडनीवर सुरू आहे. त्यांच्या आयुष्यातून दूर झाला असेल तर फक्त सावकाराचा छळ. किडनी विकून मिळालेला सर्व पैसा सावकारांच्या घशात गेला. यांच्या खिशात पडले अवघे काही रुपये. तेही व्याजाची देवाण-घेवाण करण्यात सरले. आता त्यांच्या आयुष्याची सुरुवात पुन्हा तशीच होते. दिवस निघाला की कुणी लोकांच्या घरी धुण्या-भांडय़ाला जाते. कुणी गवंडी कामाला जातो, तर कुणी मिळेल ती मजुरी करून पोट भरतो..
किडनी तस्करीचे प्रकरण अकोल्यात उघडकीस आले. दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत गेली. या गोरखधंद्यात गुंतलेल्या अवैध सावकार आणि दलालांसोबतच काही प्रथितयश डॉक्टरांवरही संशयाची सुई फिरू लागल्यानंतर तमाम महाराष्ट्राच्या नजरा अकोल्याकडे वळल्या. एरवी, शेतकरी आत्महत्त्येच्या कलंकाने ओळखला जाणारा हा भाग यावेळी एका नव्या कारणामुळे डागाळला.
किडनी विक्रीचं प्रकरण राज्यभर चर्चेत असलं तरी, यातील पीडितांना आजही त्याचे गांभीर्य कळलेले नाही. काही पीडित तर जणू काही आपलंच चुकलं, असं समजून पसार झालेत. किडनी हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असतो. आपले रक्त शुद्ध करण्याचे काम दोन्ही किडन्या करतात. एक किडनी विकल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, याची या पीडितांना तसुभरही कल्पना नव्हती.
हा गोरखधंदा गरिबांच्या जिवावर उठणारा आहे, त्यांच्या संसाराची राखरांगोळी करणारा आहे. पण, शेवटी प्रश्न तोच.. त्यांच्यासाठी लढणार कोण? एकीकडे दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेले हे गरीब आणि दुसरीकडे या गोरखधंद्यातून मालामाल झालेले दलाल, डॉक्टर आणि किडनी विकत घेणारे धनाढय़ गरजू.
गरजू नाडलेल्यांना काय मिळेल? त्यांचे अवयव तर गेलेच, पण त्यांच्या झालेल्या फसवणुकीची किमान आर्थिक भरपाई तरी त्यांना मिळेल? नाही सुखात, पण किमान त्यांचं आयुष्य तरी त्यांना कुणापुढे हात न पसरता रेटता येईल? आत्ता सुपात असलेल्यांना सावरता येईल? कोण लढेल त्यांच्यासाठी?
कायदा? सरकार? तुम्हीआम्ही? की जगण्याची ही लढाईदेखील परत एकदा त्यांनाच लढावी लागेल?
सध्या तरी तेच दिसतं आहे..
(लेखक ‘लोकमत’च्या अकोला आवृत्तीत
संपादकीय विभागात कार्यरत आहेत.)