सुवर्णसंगम

By admin | Published: October 18, 2014 12:57 PM2014-10-18T12:57:07+5:302014-10-18T12:57:07+5:30

बेळगाव येथे जानेवारी महिन्यात होणार्‍या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैयाज यांची निवड झाली आणि मराठी संगीत रंगभूमीचे एक पान अलवारपणे उलगडले गेले. तब्बल पाच दशके संगीत रंगभूमीवर बहुमोल असे योगदान देणार्‍या फैयाज यांच्याशी साधलेला खास संवाद.

Suvarna Sangam | सुवर्णसंगम

सुवर्णसंगम

Next

- राज चिंचणकर

 
यंदाच्या ९५व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून तुमची निवड झाली आहे, त्याबद्दल काय वाटते? 
यंदा माझ्या कारकिर्दीला ५0 वर्षे होत आहेत आणि या वर्षीच मला हा मान मिळत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या ५0 वर्षांत माझी सगळी नाटके मिळून साडेचार हजार प्रयोग झाले आहेत. जयमालाबाई शिलेदार, लालन सारंग यांच्यानंतर स्त्री म्हणून हा सन्मान मिळाला याचे वेगळे समाधान आहे.  
तुमच्या निवडीमुळे संगीत रंगभूमीचा सन्मान झाल्यासारखे वाटते का?
हो नक्कीच. माझ्या निवडीनंतर संगीत रंगभूमीवरील अनेकांचे मला फोन आले, की संगीत रंगभूमीसाठी मी काही तरी करायला पाहिजे. संगीत रंगभूमीचे जे काही प्रश्न आहेत, ते मी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या समोर नक्की मांडेन.   
बेळगावमध्ये हे नाट्यसंमेलन होत आहे. त्याविषयी तुम्हाला काय वाटते? 
 बेळगाव हे महाराष्ट्रातच आहे, असे माझे मत आहे. गेली कित्येक वर्षे मी बेळगावात नाटकांचे प्रयोग करत आली आहे. बेळगावचे रसिक नाटकांबाबत खूप चोखंदळ आहेत. बेळगावात आमच्या नाटकांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तशीही कलेला भाषा नसते. बेळगावच नव्हे, तर बंगळुरू किंवा हैदराबादला जाऊनही आम्ही नाट्यसंपदाचा महोत्सव केला होता. 
सध्याच्या संगीत नाटकांबद्दल काय सांगाल?
पौराणिक नाटकांत आपण अडकलो आहोत. त्यातून संगीत नाटकाला बाहेर काढणे गरजेचे आहे. काळाच्या ओघात संगीत नाटक बदलले पाहिजे, कारण नव्या पिढीला त्यातून काही नवे काही मिळायला हवे. आपली परंपरा असलेली संगीत नाटके हा मोठा ठेवा आहेच; पण ती नव्या पिढीपयर्ंत पोहोचण्यासाठी त्यात बदल करायला हवा. ऑपेरासारखे काही तरी करण्याचा प्रयत्न करायला हवा; जेणेकरून नवीन पिढीलाही ते आवडू शकेल. संगीत नाटकांत नावीन्य असायला हवे.
जुनी संगीत नाटके नवीन पिढीपर्यंत पोहोचावीत, असे वाटत नाही का? 
हो, नक्कीच; पण आजची नवी पिढी नाट्य संगीताच्या क्लासमध्ये जाऊन नाट्यपदे शिकते. संगीत रंगभूमीवरील काही जुने रंगकर्मीही या मुलांना शिकवतात; पण त्यातून या मुलांमध्ये सगळेच येते, असे मला वाटत नाही.  
फैयाज आणि कट्यार काळजात घुसली हे अतूट असे समीकरण समजले जाते.
हो, ते खरे आहे. कट्यार काळजात घुसली हे गेल्या ४0-४५ वर्षांतील एक नाटकच पाहिलं, तरी लक्षात येईल, की त्यात गाणे आहे, अभिनय आहे, त्याची संहिता उत्तम आहे, नाट्यसंपदाचे चांगले सादरीकरण आहे. पुढच्या ५0 वर्षांत असे नाटक होणार नाही. एखाद्या नाटकाची अशी भट्टी जमून येते. रसिकाश्रय महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी विविध प्रयोगांची आवश्यकता आहे. 
तुमच्या वेळचे प्रयोग हाऊसफुल्ल व्हायचे. आजच्या नाटकांबद्दल काय वाटते? 
आज मोठमोठी नाट्यगृहे बांधली जात आहेत, त्यामुळे तिथे हाऊसफुल्ल नाटकाची अपेक्षा करू नये. पूर्वी षण्मुखानंदसारख्या मोठय़ा नाट्यगृहांतही नाटके हाऊसफुल्ल होत होती; पण आता हाऊसफुल्लचा बोर्ड लागणे कठीण वाटते. सध्याच्या काळात ३00-४00 आसनव्यवस्था असलेली नाट्यगृहे बांधण्याची आवश्यकता आहे. यावर मिनी नाट्यगृहे हा उपाय होऊ शकतो. 
मराठी रसिकांची अभिरुची बदलली आहे, असे वाटते का?
लोकांना आज घरबसल्या सगळे काही बघायला मिळते. आता रविवारी तर नाटकेही घरच्या पडद्यावर बघायला मिळतात. त्यामुळे नाट्यगृहांवर परिणाम होतो. रांगा लावून तिकिटे घेणे वगैरे हल्ली फार आढळत नाही. कट्यारला मात्र रांगा लागायच्या. सकाळी साडेपाच वाजल्यापासून लोक बुकिंगला येऊन थांबायचे. छोट्या गंधर्वांच्या सौभद्रलाही अशा रांगा लागायच्या आणि थोड्याच वेळात हाऊसफुल्लचा बोर्ड लागायचा. तरीही लोकांमध्ये अभिरुची नाही, असे मला वाटत नाही. सवाई गंधर्वला म्हणा किंवा संगीत कार्यक्रमांना आजही जाणकार लोक गर्दी करतातच. संगीतातले दर्दी आहेतच.
तुम्ही मूळच्या सोलापूरच्या. तिथे असताना तुमच्यावर प्रथम संस्कार गायनाचे झाले की अभिनयाचे? 
मी तुझे आहे तुजपाशीमध्ये अभिनय केला होता; पण ललित कलामंदिर म्हणा किंवा रेल्वे सेंट्रल ड्रामाटिक म्हणा, यातून माझी नृत्य करणारी किंवा गायन करणारी अशी ओळख झाली होती. तिथून अभिनय सुरू झाला. लहानपणापासून मी मेळे आणि कलापथके यातून काम करत होतेच. सा, रे, ग, मची ओळख सोलापुरात झाली होती. 
तुम्ही मुंबईत कधी आलात आणि स्ट्रगलची कधी वेळ आली का? 
मी १९६५मध्ये मुंबईत आले; पण मी मुळात एकाच संस्थेत राहिले आणि मुंबईत काम करण्यासाठी जी मुलगी येते, तिला महिन्याला २५ प्रयोग मिळाले, तर अधिक काय हवे? नाटक हेच माझे अर्थार्जनाचे साधन होते. मला नाटकांत कामे मिळत गेली आणि त्यामुळे स्ट्रगल म्हणावा, असा काही अनुभव आला नाही. 
गाणे आणि अभिनय या दोन्ही गोष्टींवर तुमचे प्रभुत्व आहे. या दोघांचा यांचा मेळ कसा घातलात?
या दोन्ही गोष्टींची मला आवड होती आणि दोन्ही मला जवळचे वाटते. त्यामुळे गाणे आणि अभिनय माझ्याकडून दोन्ही होत गेले.  
अनेक ज्येष्ठ रंगकर्मींचे संस्कार तुमच्यावर झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? 
मी प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारात बसत होते. दारव्हेकर मास्तर, चित्तरंजनबापू यांचे स्कूल वेगळे होते आणि पणशीकरांचे स्कूल वेगळे होते. त्यापुढे जाऊन भालचंद्र पेंढारकर, मास्तर दत्ताराम यांच्यासोबतही मी काम केले. ही माणसे खूप प्रामाणिक होती आणि कला म्हणजे त्यांच्यासाठी पूजाच होती. संस्कृतचा वारसा असलेल्या पणशीकरांकडून मी उत्तम मराठी भाषा शिकले. दारव्हेकर मास्तर तर खर्‍या अर्थाने मास्तरच होते. त्यांच्याकडून व्याकरणाचे धडे मिळाले. तालमीच्या वेळी दोनदोनशे शब्दांचे व्याकरण मास्तर आमच्याकडून घोटवून घ्यायचे. गद्यातही ताल व लय असते, हे मास्तरांनी शिकवले होते. 
तुम्ही बेगम अख्तर व त्यांची गजल याकडे कशा वळलात?  
लहानपणापासून मला बेगम अख्तर यांचे गाणे आवडत आले आहे. नाट्यसंगीतासह उत्तर हिंदुस्तानी गायकीही मला आवडते. त्यांच्यासारखे गाता आले पाहिजे, हे माझे स्वप्न होते. १९६७मध्ये मी त्यांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी माझे कट्यार चार-पाच वेळा पाहिले. अनेकदा अख्खा दिवसच्या दिवस मी त्यांच्याबरोबर असायची. त्यांच्या अनेक मैफली मी कानांत साठवल्या. त्यांच्या सोबत सहा वर्षे राहिल्याने त्यांच्या गजलेचा प्रभाव माझ्यावर पडला.  
कट्यारमधली झरीना, वीज म्हणाली धरतीलामधली जुलेखा, तसेच गुंततामधली कल्याणी, मत्स्यगंधामधली सत्यवती अशा तुमच्या भूमिकांपैकी आव्हानात्मक भूमिका कोणती वाटली? 
सगळ्याच भूमिका चांगल्या होत्या. कट्यार म्हणजे खाँसाहेबांचा एकखांबी तंबू आहे आणि त्यात इतर पात्रे पूरक आहेत; पण झरीना ही त्यांच्या मुलीची भूमिका म्हणजे संपूर्ण वेळ मी वसंतराव देशपांडे यांच्यासोबत असायचे. त्यामुळे मी नाटकात सतत लोकांसमोर असायचे. हे नाटक लोकांनी डोक्यावर घेतले. या भूमिकेतून बाहेर पडताना गदगदायला व्हायचे. 
तुमच्या ५0 वर्षांच्या नाट्यप्रवासात दुसर्‍या कुणी केलेली एखादी भूमिका करावीशी वाटली नाही का? 
खरे तर मी इतरांनी केलेल्याच भूमिका जास्त केल्या. मी कल्याणी पाचवी केली, अश्रूमधली सुमित्रा पाचवी केली, मित्रमधली रुपवते दुसरी केली, तो मी नव्हेचमधली माझी सुनंदा कितवी, हे माहीतच नाही. माझे गाणे माझेच वाटले पाहिजे. फैयाजचे गाणे ऐकल्यावर ते गाणे मी गाते आहे, हे कळलेच पाहिजे. माझा अभिनय हा माझाच वाटला पाहिजे, असा प्रयत्न कायम राहिला.  
नवीन पिढीच्या कलावंतांना काय सांगाल?
आता संगीत नाटके तशी होत नाहीत; पण नवीन कलाकारांनी सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. भूमिकेचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. पात्र चांगले दिसले पाहिजे. कलावंताकडे फक्त गाणे किंवा अभिनय असून चालणार नाही. सादरीकरणाची कलाही उत्तम असायला हवी. 
मराठी नाटक किंवा मराठी रंगभूमीचे भवितव्य धोक्यात आहे, असे वाटते का? 
अजिबात नाही. मराठी नाटक कधी मारले जाईल, असे मला वाटत नाही. मराठी रसिक हा नाट्यवेडाच आहे. फक्त काळाची गरज ओळखून नाटके आली पाहिजेत. 
(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीमध्ये बातमीदार 
आणि नाट्य व चित्रपट समीक्षक आहेत.)

Web Title: Suvarna Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.