‘स्व’ से स्वदेस... - स्वप्नातील आदर्श गाव घडवणारा एक निरंतर प्रवास
By देवेश फडके | Published: November 7, 2022 02:31 PM2022-11-07T14:31:04+5:302022-11-07T14:31:55+5:30
देशातील खेड्यांसाठी, गावकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. यातील एक असलेल्या ‘स्वदेस फाऊंडेशन’च्या प्रत्यक्ष कामांचा आढावा इगतपुरी तालुक्यातील तीन गावांमध्ये जाऊन घेतला.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती अशा अनेक गोष्टी आपल्याकडील विद्वानांनी पंडितांनी सांगून ठेवलेल्या आहेत. मात्र, याची प्रचिती अगदी काही घटनांमधून, उदाहरणंमधून आपल्याला येते. भारत हा देश अगदी विविधतेने नटलेला आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु, आजही देशातील अनेक खेडी, गावे, वस्त्या, वाड्या येथील परिस्थिती बिकट आहे. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झालेली असताना, दुसरीकडे देशातील अनेक ठिकाणची भयावह परिस्थिती चिंताजनक आणि चिंतनीय अशीच आहे. कितीही काळाकुट्ट अंधार असला, तरी आशेचा एक दिवा मेहनत, चिकाटी, निरंतरता, सातत्य, श्रम, ध्यास यांच्या जोरावर प्रकाशाची वाट मोकळी करून देऊ शकतो. असाच काहीसा प्रवास आहे, ‘स्वदेस फाऊंडेशन’चा.
‘स्व’ से स्वदेस हे ब्रीद घेऊन रॉनी स्क्रूवाला आणि झरिना स्क्रूवाला यांनी एका खडतर प्रवासाला सुरुवात केली आणि १९८३ मध्ये लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे आता कल्पवृक्षात रुपांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी ग्रामीण भागासाठी, समाजासाठी काहीतरी करायचे, या उद्देशाने १९८३ मध्ये SHARE (Society to Heal Aid Restore Educate) नावाने एनजीओची स्थापना केली होती. यानंतर सन २०१३ मध्ये याचे रुपांतर स्वदेस फाऊंडेशनमध्ये झाले. आता स्वदेस फाऊंडेशन मोठ्या प्रमाणात पसरलेला वटवृक्ष असून, हजारो नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धीची शाश्वत सावली देण्याचे काम करत आहे. स्वप्नातील गाव म्हणजेच आपल्या ड्रीम व्हिलेज ही संकल्पना स्वदेस फाऊंडेशनने आखली आणि पद्धतशीर नियोजन, काटेकोर प्रक्रिया, उत्तम व्यवस्थापन, कुशल नेतृत्व, संकल्प सिद्धिस नेण्याचा ध्यास या माध्यमातून देशाच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात रायगड जिल्ह्यातील ७५ गावे ड्रीम व्हिलेज म्हणून विकसित करून दाखवली.
ड्रीम व्हिलेज म्हणजे नेमके काय?
ड्रीम व्हिलेज ही काही पक्क्या धोरणांवर आधारलेली परिपूर्ण विकासाची संकल्पना आहे. पाणी आणि शौचालये, आरोग्य आणि पोषण, शिक्षण आणि आर्थिक विकास हा ड्रीम व्हिलेज या संकल्पनेचा मूळ पाया आहे. याच्या आधारे एखाद्या गावाचा विकास करण्यासाठी ‘4E (Engage, Empower, Execute And Exit)’चे धोरण आखण्यात आले आहे. स्वदेस फाऊंडेशनने एखाद्या गावाची निवड केली की, या धोरणाच्या आधारे काम सुरू केले जाते. गावकऱ्यांना ड्रीम व्हिलेजचा भाग करणे, त्यासाठी त्यांना सक्षम करणे, ठरवलेल्या गोष्टी अमलात आणणे आणि एकदा गाव ड्रीम व्हिलेज झाले, उद्देश साध्य झाला की, तेथून बाहेर पडणे, असे नियोजनबद्ध पद्धतीने, व्यवस्थापनाच्या माध्यमातून ड्रीम व्हिलेज साकारले जाते. एखादे गाव ड्रीम व्हिलेज झाले हे पडताळण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनने ४१ प्रकारचे पॅरामीटर समाविष्ट केलेले आहेत, यातील ८० ते ९० टक्के पॅरामीटर जे गाव पूर्ण करेल, ते गाव ड्रीम व्हिलेज म्हणून घोषित केले जाते. मात्र, त्यापूर्वी स्वदेस फाऊंडेशनची टीम त्याची पाहणी, ऑडिट करून त्याचा प्रक्रियाबद्ध अहवाल देते. स्वदेस फाऊंडेशन आतापर्यंत २७०० गावांपर्यंत पोहोचले असून, ७ लाखांहून अधिक गावकरी याचा लाभ घेत आहेत.
ग्रामीण भारताला सक्षम बनवण्याचे स्वप्न
सध्या स्वदेस फाऊंडेशनचे काम रायगड आणि नाशिक जिल्ह्यात मुख्यत्वे करून सुरू आहे. आतापर्यंत जी ७५ गावे ड्रीम व्हिलेज म्हणजेच स्वप्नातील गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत, ती सर्व रायगड जिल्ह्यातील आहेत. रायगडमधील महाड, माणगाव, म्हसाळा, तळा, सुधागड, श्रीवर्धन, पोलादपूर या ठिकाणी स्वदेस फाऊंडेशनचे काम सुरू आहे. तर, काही वर्षांपूर्वीच स्वदेस फाऊंडेशनने नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला असून, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगणा आणि इगतपुरी या ठिकाणी कामांना हळूहळू सुरुवात केली जात आहे. ग्रामीण भारताला सक्षम बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वदेस फाऊंडेशन काम करत आहे. पहिल्या टप्प्यात ७५० गावे ड्रीम व्हिलेज करण्याचे उद्दिष्ट स्वदेस फाऊंडेशनने ठेवले असून, गावांची ही संख्या हळूहळू हजारावर नेण्यात येणार आहे. ड्रीम व्हिलेज साकार करण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनने स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर आणि सक्षम यावर भर दिला आहे. एखादे गाव स्वच्छ झाले आणि राहिले पाहिजे, त्या गावात आरोग्याच्या सुविधा पोहोचायला हव्यात, गावातील शाळा नीट असायल्या हव्यात तसेच गावकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवेत, हाच स्वदेस फाऊंडेशनचा गाभा आहे. यासाठी गाव पातळीवर गावकऱ्यांच्या विविध समित्यांची स्थापना केली जाते. गाव विकास समिती ही मुख्य, त्याअंतर्गत शिक्षण समिती, आरोग्य समिती, पायाभूत सुविधांसाठी समिती अशा गरजेनुसार समित्या बनवल्या जातात. या समित्या स्वदेस फाऊंडेश आणि गावातील प्रशासन, ग्रामसेवक, आशा वर्कर यांच्या मदतीने गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध होतात. या समित्यांना मदत करण्यासाठी स्वदेस मित्र आणि पशु सखी यांची नेमणूक केली जाते.
स्वदेसच्या ड्रीम व्हिलेजमध्ये लोकमत
असे असले तरी गावाचा विकास, गावकऱ्यांचा सहभाग, गावकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लोकमत इगतपुरीमधील काही गावांमध्ये पोहोचले. या तालुक्यातील तीन गावांना आम्ही भेटी दिल्या. तेथील काही गावकऱ्यांशी, स्वदेसमधील समित्यांमध्ये काम करणाऱ्या गावकऱ्यांशी, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांशी मनमोकळा संवाद साधला. यातून, ज्या महिलेने गावाची वेस कधी ओलांडली नव्हती, ती महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरात जाऊन व्यवसाय करते, बँकांचे व्यवहार कोणाच्याही मदतीशिवाय करते, अशी अनेक उदाहरणे स्वदेस फाऊंडेशनने घडविली आहेत, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या.
गावकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर
स्वदेस फाऊंडेशन केवळ पाणी-शौचालये, आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, स्वच्छता यावर काम करत नाही. तर गावातील सामान्य महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर अधिक भर दिला जातो. बचत गटाच्या माध्यमातून गावातील शेती, जोडधंडे, शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ प्रोत्साहन नाही, तर ते प्रत्यक्षात येण्यासाठी योग्य प्रशिक्षणही दिले जाते. बचत गटातील प्रत्येक महिलेचे बँक खाते उघडले जाते. बचत गटाचे बँक खाते उघडले जाते. बँकिंग व्यवहार शिकवले जातात. व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गावातील महिलांसह तरुण, युवा वर्गाला कौशल्य प्रशिक्षणही दिले जाते. गवंडी कामापासून ते वाहन दुरुस्तीपर्यंत अनेकविध क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. गावातील तरुणांना कशात रस आहे, पुढे जाण्यासाठी कोणते क्षेत्र चांगले आहे, त्यानुसार हे प्रशिक्षण दिले जाते. गावकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षणे देण्यावर स्वदेस फाऊंडेशन पुढाकार घेत आहे, असे स्थानिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दारात पाणी येईल असे आयुष्यात वाटले नव्हते
पुढे आम्ही, इगतपुरी तालुक्यातील अगदी डोंगरांच्या कुशीत वसलेले एक गाव म्हणजे वासाळी येथे गेलो. या गावात वाघेवाडी नामक छोटी वाडी आहे. वाडीच्या मानाने लोकसंख्या चांगली आहे. या ठिकाणी देश स्वतंत्र्य झाल्यानंतर ७५ वर्षांपर्यंत घरोघरी पाणी नव्हते. या गावात स्वदेस फाऊंडेशनचा प्रवेश झाला आणि चित्रच पालटले. घरात पाणी आणण्यासाठी महिलांना खूप पायपीट करावी लागत असे. या वाघेवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील घरे एकाच ठिकाणी नाहीत, ती विखुरलेली आहेत. त्यामुळे घरोघरी पाणी ही संकल्पना प्रत्यक्षात तरी कशी येणार, यावर स्थानिक सरपंचांपासून गावकऱ्यांपर्यंत कुणाचाही विश्वास नव्हता. मात्र, स्वदेस फाऊंडेशनने हे काम प्रत्यक्षात आणून दाखवले. यासाठी सुमारे ५ ते ८ किलोमीटरची पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. जिथे मोबाइलचे नेटवर्क नीट पोहोचू शकत नाही, गावात जायला पक्का रस्ता नाही, दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत, अशा दुर्गम गावात स्वदेस फाऊंडेशनने प्रत्येकाच्या दारात पाइपलाइन नेऊन पाणी पोहोचवण्याचे पहिले ध्येय पूर्ण केले आहे. यानंतर आरोग्य, शिक्षण, उपजिविका हे टप्पे पूर्ण केले जाणार आहेत. आदर्श गाव साकारण्यासाठी गाव विकास समितीने १२ कोटी ०९ लाखांचे बजेटही तयार केले आहे. येत्या ४ ते ५ वर्षात सर्व गोष्टी पूर्ण करून गाव ड्रीम व्हिलेज करण्याचे ध्येय गावकऱ्यांनी घेतले आहे. या गावातील १९ जणांनी गवंडी कामाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. गावाचा विकास, घरापर्यंत आलेले पाणी याबद्दल बोलताना महिलांना होत असलेला आनंद आणि मिळालेले समाधान चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.
गावाचे भवितव्य घडवण्यासाठी गावकऱ्यांची एकजूट
इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील घोडेवाडी या गावातही आम्ही गेलो. वासाळीप्रमाणे येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. या घोडेवाडी गावात शासकीय निधी, योजना, सुविधा यांची वानवा होती. स्वदेस फाऊंडेशनने पुढाकार घेतला आणि गावात विकास समिती स्थापन झाली. अथक प्रयत्नांनतर आता घरोघरी पाणी, शौचालये असून, आरोग्याच्या सुविधा, आर्थिक विकास यावर भर दिला जात आहे. गाव विकास समितीने ५० विविध कामांचा आराखडा तयार केला असून, आगामी ३ वर्षांत तो पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट गावाने ठेवल्याची माहिती गावकऱ्यांनी लोकमतशी संवाद साधताना दिली. गावाचे काहीतरी भवितव्य घडेल, या निर्धाराने गावकरी एकत्र आले असून, आदर्श गाव करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे गावकरी आनंदाने सांगतात. याशिवाय शेततळे बांधणे, गाव प्लास्टिकमुक्त करणे, यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. या गावातीलही ३० मुले गवंडी कामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि गावासाठी काहीतरी करत असल्याचा आनंद दिसून येत होता. यानंतर आम्ही इंदोरे या गावाला भेट दिली. येथील कळसुबाई ग्राम विकास समितीने आदर्श ड्रीम व्हिलेज घडवण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संकटामुळे या गावातील योजना अमलात आणण्यासाठी मर्यादा आल्या होत्या. या सर्वांवर मात करून येथील १९ गावकऱ्यांनी गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"