तरंगत अभयारण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:19 AM2018-12-23T01:19:39+5:302018-12-23T01:23:04+5:30
भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशांना ‘सेव्हन सिस्टर्स’ असे म्हटले जाते. आसाम, मेघालय, अरुणाचल येथे यापूर्वी जाऊन आलो होतो. मणिपूरला मात्र कधी गेलो नाही. डॉक्टर विश्वनाथ मगदूम या बालमित्राने आपल्या मुलाच्या
- डॉ. सुभाष देसाई
भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशांना ‘सेव्हन सिस्टर्स’ असे म्हटले जाते. आसाम, मेघालय, अरुणाचल येथे यापूर्वी जाऊन आलो होतो. मणिपूरला मात्र कधी गेलो नाही. डॉक्टर विश्वनाथ मगदूम या बालमित्राने आपल्या मुलाच्या विवाहासाठी मला निमंत्रण दिले आणि मणिपूर दर्शन घडले. नेताजी सुभाषचंद बोस यांनी स्वतंत्र भारताचा पहिला झेंडा मणिपूरजवळच फडकवला होता ते ठिकाण पाहायचे होते. जगातील सर्वांत लांब-रुंद असे तरंगते अभयारण्य मणिपूर राज्यातच आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी असलेला भारतातील फार सुंदर, निसर्गसंपन्न असा प्रदेश आहे.
मी आणि डॉक्टर मगदूम इम्फाळच्या वेगवेगळ्या दिशेला दररोज फिरायला जात होतो. तरुण-तरुणी धावत असतात, टेकडीवर तर व्यायामाचे सर्व प्रकार दिसतात. मणिपूरचे स्पोर्टस् कल्चर इतरत्र फार क्वचित पाहायला मिळेल. येथे पोलो हा लोकप्रिय खेळ आहे. त्याची भव्य मैदाने आहेत. मणिपूरजवळ नागालँड, दक्षिणेला मिझोरम, पूर्वेला म्यानमार. तिथे जायला एक फ्रेंडशिप ब्रिज ओलांडावा लागतो. २२३४७ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये मर्यादित असे हे छोटे राज्य. येथे मेइती जातीचे लोक आहेत. येथील हिंदूंवर श्रीकृष्ण भक्तीचा प्रभाव आहे. अनेक भव्य चर्चेस येथे आहेत.
मणिपूरवर निसर्गाने अनेक बाबतीत खैरात केली आहे. दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ प्राणी येथे पाहायला मिळतात. वाघ, बिबट्या, ब्लॅक पँथर, मलायन डुक्कर, हिमालयीन काळे अस्वल, हत्ती येथे आढळतात. कुल्लूक निर्बल स्टॅम्प टेल मॅकॉक, आसामी मॅकॉक, हॉर्नबिलच्या सहा जाती येथे आहेत. पक्ष्यांचे, फुलपाखरांचे असंख्य प्रकार येथे आढळतात. सांघाई या प्रकारची दुर्मीळ हरण हे तर इथले वैशिष्ट्य आहे. जगातील सर्वांत मोठे तरंगते अभयारण्य फक्त मणिपूरमध्ये आहे. त्याला ‘लोकटाक लेक’ असे म्हणतात.
पाण्यावर वनस्पती उगवल्या आहेत. मणिपुरी भाषेत याला ‘फुमडी’ म्हणतात. त्यात वैशिष्ट्यपूर्ण अशी ‘सांगाय’ हरणे वास्तव्य करतात. ‘युनोस्को’ने याला ‘जागतिक वारसा केंद्रा’चा दर्जा दिला आहे. हे अभयारण्य चाळीस चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले असून मोईरंग या गावाजवळ आहे. मी खाली उतरून खोदलेल्या पाण्याच्या वाटेने एका नावेतून आत गेलो. तरंगत्या जमिनीवर पाय ठेवले, इकडे-तिकडे सावधपणे चाललो. काही ठिकाणी ती जमीन खाली जाते आणि बुटात पाणी शिरते. काही ठिकाणी पंधरा-वीस फुटांचे गवत, झाडेही उगवलेली आहेत.
राजकुमार चंद्रजीत, सना सिंग या प्रसिद्ध मणिपुरी चित्रकारांनी काढलेल्या चित्रसंग्रहातून मणिपुरी इतिहास, कला, संस्कृतीचे दर्शन होते. या संग्रहालयाला भेट दिल्याशिवाय मणिपूरची तुमची भेट अपुरी ठरते.
मणिपूर हे मातृसत्ताक राज्य असावे अशी परिस्थिती आहे. बाजारपेठेत एकही पुरुष वस्तूंची विक्री करताना आढळत नाही. व्यवहारांमध्ये, कुटुंबव्यवस्थेमध्ये महिलांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. मणिपुरी विवाह सोहळा हा एक सुंदर सांस्कृतिक धार्मिक अनुभव असतो. अक्षता, फटाके, गोंधळ, गडबड, बेशिस्त, जेवणासाठी होणारी पळापळ या गोष्टी बिलकूल नाहीत.