तिथेच टाका तंबू..
By admin | Published: February 6, 2016 02:36 PM2016-02-06T14:36:21+5:302016-02-06T14:36:21+5:30
निसर्गाच्या कुशीत शिरायचं, उघडय़ावर, टेण्टमध्ये राहायचं. ते बेभानपण आपल्यात भिनवून घ्यायचं. कॅम्पिंगचा हा अनुभव आपल्या जगण्याला नुसता हुरूपच देत नाही, तर अनेक गोष्टीही शिकवतो. हा अनुभव हवाच, नाहीतर नंतर तो विकत घ्यावा लागतो.
Next
- मकरंद जोशी
लहानपणी शाळेत असताना, वर्षातून एकदा होणा:या स्काउट कॅम्पचं आकर्षण ज्या अनेक गोष्टींमुळे वाटायचं, त्यातली सर्वात मोठी गोष्ट होती ती त्या तीन दिवसांमध्ये टेण्टमध्ये राहायला मिळायचं. पूर्णपणो शहरात वाढलेल्या आमच्यासारख्या अस्सल शहरी मुलांना त्या कॅनव्हासच्या छोटय़ाशा टेण्टमध्ये, मित्रंबरोबर दाटीवाटीनं राहताना वेगळीच मजा यायची. एक वर्ष आमच्या स्काउटच्या सरांनी आम्हालाच ते टेण्ट उभारायची जबाबदारी दिली आणि तेव्हा आम्हाला कळलं की साध्या दोन, तीन बांबूंवर एक कापडाचा तागा ताणून बसवणं किती कठीण असतं. आम्ही उभारलेले तंबू एकजात लुळेपांगळे होते. कुणाच्या तंबूचा कपडा वाळत घातल्यासारखा वा:यावर फडफडत होता, तर कुणाचा तंबू पिसाच्या मनो:यासारखा कललेला होता. पुढे कॉलेजात पदभ्रमणाची गोडी लागल्यावर उघडय़ा आकाशाखाली, किल्ल्याच्या मैदानावर, मोकळ्या माळावर मुक्काम ठोकायची वेळ काही वेळा आली; पण तेव्हा काही टेण्ट वगैरे परवडत नसल्यानं अक्षरश: उघडय़ावर झोपण्याचा अनुभव मिळाला. टेण्टमध्ये राहण्याची गंमत पुन्हा अनुभवायला मिळाली ती हिमालयात गेल्यावर. मनालीजवळच्या सोलंगनाल येथे झुळझुळ वाहणा:या झ:याच्या काठावर चांगला पाच, सहा दिवसांचा मुक्काम करता आला आणि कॅम्पिंगच्या अनुभवाची मोहोर मनावर पक्की झाली. पर्यटनाच्या क्षेत्रत काम करायला लागल्यानंतर लक्षात आलं की लोकांना वेगवेगळी ठिकाणं बघण्याची जितकी हौस असते, तितकी वेगळे अनुभव घेण्याची असतेच असं नाही. म्हणजे राजस्थानला गेल्यावर जैसलमेरच्या वाळवंटाची सफर करण्याची इच्छा असते, पण तिथल्या डेझर्ट कॅम्पमध्ये राहायचं म्हटल्यावर ‘तिथे झोपायला कॉट असेल का? तिथे अंघोळीची आणि मुख्यत: प्रातर्विधीची सोय काय असेल? तिथे रात्री सेफ असतं ना?’. अशी प्रश्नांची रांगच लागते.
आता आपण पर्यटन कशाला करतो तर रुटीन आयुष्यापेक्षा वेगळा अनुभव घ्यायलाच ना? मग दोन दिवस राहा की एखाद्या तंबूमध्ये, बघा की भिंती नसलेल्या घरात राहायला कसं वाटतं ते.
कॅम्पिंगचा इतिहास शोधला तर लक्षात येतं की पूर्वीच्या काळात जेव्हा सैन्य मोहिमांवर कूच करीत तेव्हा, वाटेतला मुक्काम हा असाच तंबू, राहुटीतला असायचा. लष्करी जीवनाचा अविभाज्य भाग असलेलं कॅम्पिंग नागरी लोकांनी स्वीकारलं ते पर्यटनाच्या छंदातूनच. स्वतंत्रपणो, मनमोकळी भटकंती करणा:या आणि नव्या नव्या प्रदेशांना भेट देणा:या मुशाफिरांसाठी पाठीवरचा तंबू म्हणजे हक्काचा निवारा. सूर्य कलू लागला की सोयिस्कर जागा शोधायची, तंबू उभारायचा, त्याच्यापुढे दगडाची चूल मांडून पाकसिद्धी करायची आणि रात्री त्याच शेकोटीच्या उबेला ताणून द्यायची. आधुनिक काळात कॅम्पिंगची पद्धत ब्रिटनमध्ये रूढ करण्याचं श्रेय दिलं जातं ते थॉमस हिरॅम होल्डिंग या भटकबहाद्दर शिंप्याला. आपल्या लहानपणी स्वत:च्या आई- वडिलांबरोबर अमेरिकेतल्या प्रेअरीजमध्ये कॅम्पिंगचा आनंद थॉमसने लुटला होता. त्या जोरावर त्याने मित्रंबरोबर आयर्लंडमध्ये सायकलिंग आणि कॅम्पिंगच्या सहली सुरू केल्या. त्याच्या या सहलीतूनच ‘कॅम्पिंग अॅण्ड कॅरावॅनिंग क्लब’ उभा राहिला. आपल्या अनुभवातून इतरांनाही कॅम्पिंगची प्रेरणा मिळावी म्हणून थॉमसने 19क्8 साली ‘द कॅम्पर्स हँडबुक’ लिहिले.
एकूणच भारतीय पर्यटकांच्या आधी परदेशातील पर्यटकांनी कॅम्पिंग अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने उघडय़ावर राहण्याचे पर्याय स्वीकारले आणि विकसितही केले. त्यामुळे आज युरोपपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत स्वत:चा तंबू घेऊन कॅम्पिंग करण्यापासून ते कारवानमध्ये राहण्यापर्यंत अनेक प्रकार लोकप्रिय झालेले पाहायला मिळतात. काही ठिकाणी रेडिमेड तंबू उभारलेले असतात आणि त्यांना हिटर, स्टोव्ह, बेड अशा सुविधांची जोड दिलेली असते, तर काही ठिकाणी कॅम्पिंग ग्राउंड्स असतात, जिथे तुम्हाला तुमचा तंबू नेऊन तो उभारायचा असतो आणि आतल्या सुविधा तुमच्या गरजेनुसार निर्माण करायच्या असतात.
मुळात कॅम्पिंग म्हणजे मिनिमम फॅसिलिटीज हे अध्याहृतच असते. पण कॅम्पिंगच्या या पारंपरिक स्वरूपाला छेद दिला तो आफ्रिकेच्या जंगलात पर्यटनाला जाणा:या युरोप, अमेरिकेतील धनाढय़ांनी. कारण या ‘फिल्दी रिच’ लोकांना जंगलातही टब बाथ आणि सेव्हन कोर्स डिनर हवं होतं. यातूनच ‘ग्लँपिंग’ अर्थात ग्लॅमरस कॅम्पिंग जन्माला आलं. आज केनिया, टांझानिया, साउथ आफ्रिका या देशांमधल्या नॅशनल पार्कमध्ये फाइव्ह स्टार सुविधा पुरवणारे टेण्ट कॅम्प्स मोठय़ा संख्येनं आढळतात.
भारतामध्ये हा तंबूतल्या निवासाचा फंडा आता थोडा थोडा रु जू लागला आहे. कारण चाकोरीबद्ध पर्यटन न करता वेगळ्या वाटा चोखाळणा:यांची संख्या वाढते आहे. आपल्या महाराष्ट्रात तंबूत राहण्याची कल्पना नव्वदच्या दशकात एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने, आपल्या किहीमच्या, तारकर्लीच्या आणि भाटय़ाच्या तंबू निवासातून प्रत्यक्षात आणली. आज हिमाचलमधील मनाली, सोलंग, उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट नॅशनल पार्क, हृषिकेशजवळचे राफ्टिंग कॅम्पस इथे तुम्ही कॅम्पिंगचा आनंददायी अनुभव घेऊ शकता. टेण्टमध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणो म्हणजे लडाखमधील पँगॉंग लेक, त्सो मोरीरी, हुंडर येथील वाळवंट, मनालीजवळचा चंद्रताल, जैसलमेरजवळच्या सँड डय़ून्स आणि हिमाचलमधील सांगला व्हॅली. या सर्व ठिकाणी अतिशय व्यावसायिक सफाईने केलेली तंबू निवासाची सोय उपलब्ध आहे. या प्रत्येक ठिकाणचे वैशिष्टय़ वेगवेगळे असल्याने, प्रत्येक ठिकाणी राहण्याची मजा वेगळीच आहे.
निसर्गाच्या जवळ जाण्याबरोबरच कॅम्पिंगचा अनुभव तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतो. उदा. कमीत कमी जागेत आणि वस्तूंमध्ये गुजारा कसा करायचा, टीम स्पिरिट म्हणजे काय आणि एक टीम म्हणून एकत्रितपणो आलेल्या अडचणी कशा सोडवायच्या. म्हणून तर आउटडोअर मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये कॅम्पिंगचा समावेश केला जातो. मग हिमाचल, लडाख किंवा राजस्थानला भेट द्याल तेव्हा ‘तिथेच टाका तंबू’ हे विसरू नका.
makarandvj@gmail.com