टीबीचे रुग्ण
By admin | Published: January 28, 2017 04:09 PM2017-01-28T16:09:14+5:302017-01-28T16:09:14+5:30
साधा टीबी, पण अनेक वर्षे तो भारतात थैमान घालतो आहे. औषधोपचारांनी टीबीचे प्रमाण घटत असताना अचानक टीबीचे जंतू सध्या औषधांना प्रतिसाद देईनासे झाले. या विषयावर स्टोरी करण्यासाठी ‘टाइम’ साप्ताहिकाची क्रिस्ता माहर भारतात आली. या एका स्टोरीसाठी बिहारपासून ते मुंबईपर्यंत; अगदी धारावी झोपडपट्टीतही अनेकांना ती भेटली
- शशिकांत सावंत
तीन वर्षे काम केल्यावर ज्योती थोटम परत अमेरिकेला गेली आणि क्रिस्ता माहर हिची ‘टाइम’ साप्ताहिकाच्या साउथ एशिया, ब्युरो चीफ म्हणून नेमणूक झाली.
क्रिस्ताने आणि मी दोन तीन मोठ्या स्टोरीवर काम केले आहे. त्यातली एक ‘कॉण्टीजण्ट’ ही स्टोरी तर नऊ पानांची होती. प्रत्येक पत्रकाराचा स्पेशलिस्ट म्हणून एक विषय असतो. क्रिस्ताचा आरोग्य हा आवडता विषय होता.
साध्या टीबीची गोष्ट, पण अनेक वर्षे तो जगात आणि भारतात थैमान घालतो आहे. गेल्या काही वर्षांत या टीबीचे प्रमाण घटत होते, पण अचानक टीबीचे जंतू सध्या औषधांना प्रतिसाद देईनासे झाले. याला मल्टीपल ड्रग रेझिस्टंट टीबी म्हणजे ‘एमडीआर टीबी’ असे नाव पडले. याच विषयावर एक स्टोरी करायची होती. तिचं नाव ‘कॉण्टीजण्ट’. ही स्टोरी प्रामुख्याने एमडीआर टीबीवर होती. त्यासाठी बिहारपासून मुंबईपर्यंत अनेकांना ती भेटत होती. धारावीतही अनेक ठिकाणी ती जात होती. या विषयासंदर्भात चाललेले काम तिला बघायचे होते.
मुख्यत: फ्रान्स सरकारने एनजीओच्या साहाय्याने धारावीत मोठ्या प्रमाणावर एमडीआर टीबीसाठी काम केले होते. एमडीआर टीबीमध्ये पेशंटला अनेक गोळ्यांचे मिश्रण घ्यावे लागते. दरमहा साधारणपणे अठरा ते वीस हजार रुपये त्यावर खर्च असतो.
आम्ही हिंदुजातील डॉक्टर्सना भेटलो. झहीर उद्वादिया हे स्पेशालिस्ट डॉक्टर होते. मुंबईतून आणि बाहेरून इथे पेशंट येत. समुद्राच्या किनारी हे हॉस्पिटल आहे. हिंदुजा आणि जसलोक ही प्रामुख्याने श्रीमंतांची हॉस्पिटलं मानली जात. मी इथे कधीच आलो नव्हतो. उद्वादिया विद्वान होते. त्यांनी वैद्यकशास्त्राच्या इतिहासाचे पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्या रूममध्ये टीबीचे जंतू शोधणाऱ्या डॉक्टरचे चित्र आहे. आपल्या स्टोरीत क्रिस्ताने त्यांचा उल्लेख केला होता तसेच जिचा टीबी बरा होत नव्हता अशा लहान मुलीचाही.
२०११ मध्ये हिंदुजामध्ये कुठल्याच टीबीच्या औषधाला न जुमानणाऱ्या टीडीआर टीबीचा पेशंट हिंदुजात सापडला. या पेशंटचे नाव होते, शेख ओवैस.
प्रामुख्याने गरीब रुग्णांवर टीबीचा घाला होतो आणि त्यातील चार टक्के या बरे न होणाऱ्या टीबीचे असतात.
धारावीत याचे बरेच रुग्ण होते आणि धारावीत याबद्दल काम करणारे अनेकजण होते. आम्ही अनेक छोट्या-मोठ्या केंद्रांना भेटी दिल्या. एका केंद्रात औषधे घ्यायला नियमित पेशंट येत. खरे तर हे साधे कार्यालय होते. धारावीत काही डॉक्टरांकडे गोळ्यांचे किट्स ठेवलेले असत. त्यांनाही आम्ही भेटलो. धारावीतल्या एका हॉटेलमध्ये आम्ही एका कार्यकर्त्याला भेटलो. त्याच्यामार्फत काही एनजीओ कार्यकर्त्यांची नावे मिळाली. अकबर हा त्यापैकी एक. तो नवनिर्माण समाज संस्थेचे काम करत असे.
त्यांची दुसरी कार्यकर्ती होती शिल्पा कांबळे.
शिल्पा आणि अकबर या दोन एनजीओच्या कार्यकर्त्यांना भेटलो. यातील शिल्पा कांबळे ही कांदिवली मालाडच्या, अंबुजवाडी परिसरात, नवनिर्माण समाज एनजीओत काम करत असे. शिल्पा अत्यंत तरतरीत आणि उत्साही.
श्वास चित्रपटात अमृता सुभाष एका कार्यकर्तीचे काम करताना दाखवले आहे. तिचीच जणू प्रतिकृती.
शिल्पा चिक्कार प्रमाणावर फिल्डवर्क करत असे. सकाळी हिंदुजातले काम आटोपून क्रिस्ता आणि मी कांदिवलीच्या दिशेने टॅक्सीने निघालो. अशा लांब प्रवासात भरपूर बोलणे व्हायचे. क्रिस्ता ताजमध्ये उतरत असे. ताजची गाडीही तिने काही काळ वापरून पाहिली. पण ड्रायव्हर धारावीत कधी आला नव्हता. त्याने रस्ते तर चुकवलेच, पण धारावीत यायलाही तो नाखूश असे. हे चालक केवळ बिझिनेस मीटिंगची ठिकाणे, म्हणजे वरळी, एअरपोर्ट, फोर्ट, इतर पंचतारांकित स्थाने इथेच वावरत. शेवटी साधी टॅक्सी मुंबईत कशी सोयीची पडते हे तिला माहीत झाले.
स्टोरी करताना या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कारण पत्ता शोधणे हे सर्वात महत्त्वाचे काम असते. कटकट करणारे आणि मदत न करणारे चालक मूड खराब करतात जे स्टोरीच्या दृष्टीने घातक असते.
शिल्पाने आम्हाला अम्बुजानगरच्या एका झोपडीत नेले. नसीम महमद नावाचा एक पेशंट मरणासन्न अवस्थेत पडला होता. त्याच्या डोळ्यांच्या कडांतून पाणी येत होते. तोंड सुकलेले होते आणि पांढरा द्रव ओठांच्या कडांना साचला होता.
चार बांबू आणि गोणपाट लावून ही झोपडी तयार केली होती. तो आणि पत्नी दोघेच तिथे राहत होते. त्यांचे दुसरे कुणीही नव्हते. गेली पाच महिने तो उपचार घेत होता. उपचाराला काहीच प्रतिसाद नव्हता.
शिल्पाने आम्हाला भरपूर सहकार्य केले. नासिमच्या कुटुंबाला केवळ औषधोपचारच नव्हे तर अन्नधान्याची मदतही ती करत असे. डॉक्टरांबरोबरच एका रिक्षा ड्रायव्हरचीही आम्ही मुलाखत घेतली. तो म्हणाला, माझे महिन्याचे उत्पन्न नऊ-दहा हजार रुपये आहे, मला वीस हजाराची औषधे कशी परवडणार?
तो कसाबसा संसार रेटत होता. अर्थात एनजीओ हाच अशा पेशंटचा आधार होता.
अशा कहाण्या ऐकून देशातील तळागाळातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल तिला विलक्षण आदर वाटायचा.
मला आठवते, दिवसभर आम्ही त्या स्टोरीसाठी फिरत होतो आणि कुठेही आसपासच्या परिसरात टॉयलेट नव्हता. शेवटी एनजीओच्या कार्यालयात असलेल्या मोरीचा वापर काही महिला करत. तिथे शिल्पाने तिला नेले. अशावेळी खरंच आपल्या देशाबद्दल लाज वाटावी अशी मनात भावना यायची.
स्टोरीत लिहिलेल्या अनेक गोष्टी ‘टाइम’च्या फॅक्ट चेकिंग विभागाकडून तपासल्या जात. यामध्ये खूप वेळ जात असे. या स्टोरीवर फिल्डवर्क केल्यावर प्रत्यक्षात ती चारपाच महिन्याने प्रसिद्ध झाली तेव्हा क्रिस्ताने फोनवर म्हटले, तो जो अंबुजवाडीमधला पेशंट आहे त्याची तब्येत आता कशी आहे? (तिला म्हणायचे होते जिवंत आहे ना?) मला जाऊन पाहणे भाग होते.
पण शिल्पा कांबळे म्हणाली की तो बरा झालाय. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. मी तिला तो बरा झाल्याचे कळवले. पण स्टोरी छापून येण्यात इतका वेळ लागत होता की दरम्यान टाइम साप्ताहिक एमडीआर टीबीवर स्टोरी करते आहे ही गोष्ट जगजाहीर झाली आणि दरम्यान 'कारवान' या दिल्लीच्या साप्ताहिकाने त्यावर कव्हर स्टोरी केली.
पण टाइमची स्टोरी नऊ पानांत कृष्णधवल छायाचित्रांनी सजलेली होती. लेआउटसकट तिने मला स्टोरी २० फेब्रुवारी २०१३ रोजी अंतिम पाहणीसाठी पाठवली. ४ मार्चच्या अंकात ती छापून आली. नऊ पानांची ही स्टोरी अर्थात अपवादात्मक लांबीची होती. आतापर्यंतच्या साऱ्याच स्टोरीज ४-५ पानांच्या होत्या.
क्रिस्ता आणि इतरही परदेशी पत्रकारांबरोबर काम करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, खूपदा हे पत्रकार जेवत नसत. क्रिस्ता नेहमीच बिस्किटे खाऊन राहत असे. परिणामी मला जेवायला मिळायचे नाही. दोन-तीनदा क्रिस्ताबरोबर माझी चांगलीच उपासमार झाली. बहुतेक वेळा ही पत्रकार मंडळी असलेला अधिकाधिक वेळ कामासाठी जावा असे प्रयत्न करत राहतात. इतकी वर्षे मी पत्रकारांबरोबर काम केले आहे परंतु माझ्या लक्षात आले की त्यांना क्वचितच संध्याकाळी ड्रिंक किंवा इतर गोष्टींसाठी वेळ असतो.
कामाविषयी ही मंडळी अतिशय प्रामाणिक असतात. त्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम करताना एकदाही मला ‘पाट्याटाकू’ अनुभव आला नाही.
याउलट मिळेल तितकी माहिती मिळवायचा, ती शंभर वेळा खात्री करून तपासून पाहण्याचा त्यांचा अनुभव मलाही खूप काही शिकवून गेला. क्रिस्ताही त्याच जातकुळीतली आहे..
(दीर्घकाळापासून परदेशी लेखक-पत्रकारांचे मार्गदर्शक असलेले लेखक पुस्तकांच्या दुनियेतले जाणते मुशाफिर आहेत.)