मुलांची अभिव्यक्ती फुलविणारी शिक्षिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 09:35 AM2018-12-30T09:35:00+5:302018-12-30T09:35:02+5:30
आत्मप्रेरणेचे झरे : विद्यार्थ्यांच्या काव्यलेखन व अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा केंद्रातील जि.प. भिंदोन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांची मुलाखत.
- हेरंब कुलकर्णी
प्रश्न- तुम्ही विद्यार्थ्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे. आपले विद्यार्थी कविता लिहू शकतात हे तुम्हाला कसे जाणवले? त्यांची घरची पार्श्वभूमी वाचन-लेखनाची कदाचित नसेल ना?
- या गावात दूध व्यवसाय करणारे कष्टकरी लोक राहतात. बंजारा, भिल्ल जमातीचे अनेक विद्यार्थी शाळेत आहेत. शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना हे विद्यार्थी आज साहित्यलेखन करतात. मी स्वत: कविता लिहिते. त्या कविता मी शाळेच्या कार्यक्रमात म्हणायची. त्यातून मुलांमध्ये कवितेविषयी उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थीही कविता करू लागले. मुलांचे लेखन त्यातून बहरू लागले. मग आम्ही त्यातील निवडक ६० कवितांचा ‘दप्तरातील स्फंदन’ हा कवितासंग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला.
प्रश्न- विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या कविता-गोष्टी लिहाव्यात याबाबत नेमके कसे मार्गदर्शन केले ?
- कविता लिहिणाऱ्या मुला-मुलींना मी विविध कल्पना सुचवू लागले. त्यांना सुचलेल्या कल्पनेवर त्यांच्याशी बोलून त्या कल्पना अधिक विकसित करू लागले. त्यातून मुले कविता आणि कथासुद्धा लिहू लागली. आम्ही त्यांच्या लेखनात बदल काहीच केले नाही. त्यामुळे त्यांच्याच कल्पना साहित्यात आल्या. कथा कविता याबरोबर विविध प्रसंगांची वर्णने आमची मुले आता लिहू शकतात.
प्रश्न- साधारणपणे कोणत्या विषयावर मुलांनी कविता लिहिल्या आहेत?
- मुलांनी त्यांच्या रोजच्या अनुभवावर, नात्यांवर या कविता लिहिल्या आहेत. आई, भाऊ, बहीण, मित्र, निसर्ग, पाने, फुले, फुलपाखरू, विविध सण, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर अशा विषयांवर कविता लिहिल्या. लिहिताना त्यांच्या कथेतील निर्जीव वस्तू एकमेकांशी बोलतात. इतकी संवेदना व कल्पनाशक्ती मुलांची विकसित झाली आहे.
प्रश्न- तुमची मुले रोज दैनंदिनी लिहितात. हा उप्रकम कसा सुरूझाला? या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती विकासात कसा उपयोग होतो ?
- मी स्वत: दैनंदिनी लिहीत होते. त्यामुळे मी मुलांना रोज दैनंदिनी लिहायला सुचविले. मुले लिहू लागली. हळूहळू केवळ रोजचे दिनक्रम न लिहिता विशेष प्रसंग लिहावा हे त्यांच्या लक्षात आले मग मी केवळ प्रसंग न लिहिता त्यावेळी काय वाटले? मनात काय विचार आले? हे लिहायला सांगितले. मुले तेही लिहू लागले. मुलांना यातून एखादा प्रसंग कसा लिहायचा असतो याचे आकलन झाले व ते लिहिण्याचे कौशल्य विकसित झाले. त्यातून त्यांची भाषा विकसित झाली. सर्वात मोठा बदल हा की मुले अंतर्मुख व्हायला लागली. एखादा प्रसंग लिहिताना आपले काय चुकले? आपल्यात काय सुधारणा व्हायला हवी याचा नकळत विचार ती करायला लागली. त्यातून मुलांमधील भांडणे कमी झाली आणि सहकार्याची भावना वाढली. त्यांची संवेदनशीलता वाढली.
प्रश्न- तुमच्या मुलांचे लेखन वाचताना जाणवते की मुले खूप संवेदनशील आहेत. ही संवेदनशीलता विकसित करायला काही प्रयत्न केले का?
- मुलांशी सतत बोलत राहण्यातून संवेदनशीलता वाढते असा माझा अनुभव आहे. मुलांच्या रोजच्या अनुभवावर त्यांना बोलते करणे, त्यांनाच त्यावर अधिक विचार करायला लावणे असे मी करते. अगदी निर्जीव वस्तूविषयीही त्यांना विचार करायला लावते. पक्षी, प्राणी, निसर्ग याविषयी मी सतत बोलते. त्यातून पक्षी,प्राणी, झाडे यांना इजा करू नये, असे भान त्यांच्यात आले. मुले सामाजिक प्रश्नावरही विचार करू लागली. व्यसनाची समस्या आहे म्हणून दारूबंदीवर मुलांनी स्वत: नाटिका लिहून गावात सादर केली. तो आशय त्यांच्या कथा, कवितेतही आला आहे. आमच्या शाळेतून पास होऊन गेलेल्या मोठ्या मुलांचा मी व्हॉटस्अॅप ग्रुप बनवून त्या किशोरावस्थेतील मुलांशी मी संवाद करते. त्यांच्या भाव भावनांना वळण देण्याचा प्रयत्न करते. त्यातून ८ वी ९ वीला शाळा सोडून दूध धंद्याला जाणारी मुले मुली आता शिकू लागली. हा खूप मोठा बदल या गावात दिसतो आहे.