सहापट विद्यार्थीसंख्या वाढविणारा तांड्यावरचा शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 09:09 AM2018-11-18T09:09:00+5:302018-11-18T09:09:00+5:30
आत्मप्रेरणेचे झरे : बंजारा तांड्यातील विद्यार्थी स्थलांतर १०० टक्के थांबवून शाळेची पटसंख्या सहापट करणारे जालना जिल्ह्यातील श्रीराम तांडा येथील शिक्षक जगदीश कुडे यांची मुलाखत.
- हेरंब कुलकर्णी
बंजारा तांड्यातील विद्यार्थी स्थलांतर १०० टक्के थांबवून शाळेची पटसंख्या सहापट करणारे जालना जिल्ह्यातील श्रीराम तांडा येथील शिक्षक जगदीश कुडे यांची मुलाखत.
* तुम्ही २००४ साली या शाळेत आलात तेव्हा या शाळेची, तांड्याची स्थिती कशी होती? आज काय स्थिती आहे?
- मी आलो तेव्हा शाळेचे दरवाजे, खिडक्या काढून नेल्याने शाळा अंगणवाडीच्या खोलीत भरायची. तांड्यातील बहुतेक लोक रोजगारासाठी स्थलांतर करीत होते. शाळेचा पट फक्त २५ इतका होता व ती मुलेही दिवाळीनंतर पालकासोबत स्थलांतर करीत होती. आज शाळेचा पट १४७ आहे आणि त्यात २२ विद्यार्थी फक्त तांड्यावरचे आणि १२५ विद्यार्थी बाहेरून शाळेत येतात. त्यातील ५० विद्यार्थी हे इंग्रजी शाळेतून आलेले आहेत. ३० किलोमीटर अंतरावरून एकूण ९ गाड्यामधून मुले येतात. यावर्षी ६०० प्रवेश अर्ज आले होते; पण वर्गखोल्या दोनच व शिक्षक संख्या नसल्याने जास्त विद्यार्थी आम्हाला घेता आले नाहीत. इतका फरक पडलाय.
* अशा प्रतिकूल स्थितीत सुरुवातीला तुम्ही काय केले?
- प्रथम मी या लोकांची बंजारा भाषा शिकून घेतली. त्यामुळे या लोकांना मी आपला वाटायला लागलो. नंतर पालकांची सभा घेतली आणि स्थलांतर करताना मुले सोबत नेऊ नका, आजी-आजोबांकडे मुलांना ठेवा, अशी विनंती केली. तांड्यातील वृद्ध व्यक्तींना विश्वासात घेतले. लोक तयार झाले; पण लोकांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर आम्ही येतो. सुटीत मुलांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत शाळा भरवू, असे आम्ही सांगितले व त्याप्रमाणे आम्ही शाळा उन्हाळ्यात भरवली.
* शाळेची गुणवत्ता उच्च दजार्ची असल्याने यावर्षी ६०० प्रवेश अर्ज आले. ही गुणवत्ता उंचावण्यासाठी काय प्रयत्न केले?
- विद्यार्थी गटपद्धतीने अध्ययन करतात. स्वयंअध्ययन कार्ड वापरतात. त्यातून मुले ६ अंकी संख्येच्या गणिती क्रिया करतात. इंग्रजी संभाषण करतात. सतत सराव करीत असल्याने मुलांची भाषिक प्रगती झाली आहे.
* शाळाबाह्य मुले शाळेत आणणाऱ्या बालरक्षक मोहिमेत तुम्ही नेमके काय काम करताय ?
- आमच्या तांड्यावर स्थलांतर थांबल्यावर आमच्या केंद्रात, तालुक्यात, जिल्ह्यात स्थलांतर थांबविण्यासाठी कार्यशाळा झाल्या. मी त्या सर्व बालरक्षक कार्यशाळेत सहभागी होऊन मला आलेल्या अडचणी व उपाय मांडले. त्यातून इतर शाळांनीही विद्यार्थी स्थलांतर थांबविले. आमच्या मंठा तालुक्यात ८०० ते १००० विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले आहे. बालरक्षक चळवळीने संपूर्ण जालना जिल्ह्यात विद्यार्थी स्थलांतर थांबवण्याचा खूप चांगला प्रयत्न यावर्षी झाला.
* तुमच्या मुलांना नैतिक शिक्षण तुम्ही कसे देता?
- शाळेच्या परिपाठात श्यामच्या आईच्या गोष्टी मी सांगतो. त्याचा खूप चांगला परिणाम होतो आहे. भ्रूणहत्या रोखण्यासाठी मुलींच्या जन्माबाबत प्रबोधन केले. आज तांड्यावर मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. पूर्वी मुली ७ वीपर्यंत शिकायच्या व बालविवाह व्हायचे. त्यामुळे ७ वी पास झालेल्या मुलीचा व तिच्या आईचा सत्कार हा उपक्रम सुरू केला. आज बालविवाह तर थांबले; पण तांड्यावर १२ मुली पदवीधर, ६ मुली डीएड व २ मुली डीफार्मसी आहेत. मुलांना सतत नैतिक गोष्टी सांगितल्याने मुले सापडलेली वस्तू आणून देतात. या तांड्यावर पूर्वी दारूभट्ट्या होत्या; पण आज तांड्यावर सर्व लोक निर्व्यसनी आहेत. सतत लोकांशी बोलून हे घडले.
* ही सारी धडपड का करावीशी वाटते?
- खरे सांगू या शाळेवर मी आलो. मला या ऊसतोड मजुरांचे दु:ख बघवले नाही. अतिशय अमानुष कष्ट बघून वाटले की, या लोकांच्या मुलांना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. यांची पुढची पिढी चांगली शिकून या कष्टातून बाहेर आली पाहिजे. हीच माझ्या धडपडीची प्रेरणा आहे.