तंत्रज्ञानाला संयमाचा बांध

By admin | Published: November 1, 2014 06:30 PM2014-11-01T18:30:06+5:302014-11-01T18:30:06+5:30

मोबाईलसारख्या साधनांनी प्रत्यक्ष संवादावर र्मयादा आणल्या आहेत. एखादे व्यसन लागावे त्याप्रमाणे नवी पिढी ही आधुनिक साधने वापरत आहे. या वापराला संयमाचा बांध असणे गरजेचे आहे; अन्यथा शरीराबरोबर मनाचीही हानीच होईल.

Techno Damage Dam | तंत्रज्ञानाला संयमाचा बांध

तंत्रज्ञानाला संयमाचा बांध

Next

- भीष्मराज बाम

 
प्रश्न : फेसबुक, मोबाईल फोन यांच्या वापराचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. आता वास्तवात न राहता काल्पनिक जगातच जगायची सवय लागली आहे. त्यामुळे मनावर फार ताण येतो. त्यासोबतच एकटेपणाची भावना फार जाणवते. या सार्‍या गोष्टींचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. यावर उपाय कोणता आणि मानसिक आरोग्य चांगले कसे ठेवता येईल?
उत्तर : आपल्याला भरपूर मित्र-मैत्रिणी असावेत, यश, कीर्ती आणि समृद्धी आपल्या वाट्याला सतत येत राहावीत, त्यासाठी असंख्य लोकांचा आपल्याशी संपर्क असावा, अशी ओढ प्रत्येकाच्या मनात निसर्गानेच निर्माण केलेली आहे. विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण होणे याकरताच आवश्यक आहे. शब्द आणि भाषा यांचा शोध या ओढीमुळेच लागला आणि या गोष्टी माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेल्या. विज्ञानाने संगणक, फोन अशासारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे संपर्क ही सहज सोपी बाब झाली. हजारो मैलांवरच्या माणसाशी संवाद साधणे अगदी कोणालाही शक्य झाले. 
माणसाच्या जडणघडणीत त्याच्या शरीराचा आणि सर्व इंद्रियांचा जसा सहभाग असतो, तसाच वाणीचाही असतो. कल्पनाविश्‍वसुद्धा चांगले समृद्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मनाला सर्वार्थता ही शक्ती दिलेली आहे. बाहेर काय चाललेले आहे ते समजण्यासाठी ही शक्ती अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्याला काय करायचे आहे हे ठरवून ते तसे करण्यासाठी ही शक्ती उपयोगी पडत नाही. त्यासाठी दुसरी एक शक्ती आहे ती म्हणजे एकाग्रता. मनाने त्या त्या इंद्रियाबरोबर बाहेर धावणे म्हणजे सर्वार्थता आणि सर्व इंद्रियांवर ताबा आणणे म्हणजे एकाग्रता. इंद्रियांची धाव सतत बाहेर असल्यामुळे सर्वार्थता सहज विकसित होते; पण एकाग्रता ही प्रयत्नाने विकसित करावी लागते. सर्वार्थता इंद्रियांची आणि त्याबरोबरच मनाची शक्तीही जलदतेने खर्च करून टाकते. एकाग्रता हीच शक्ती नियंत्रितपणे वापरून तिचा विकास करते.
आहार, विश्रांती, इतरांशी संवाद या सार्‍यांची ओढ नैसर्गिक असली तरी तिचा अतिरेक झाला तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्याच धोक्यात येते. या सर्व बाबी योग्य प्रमाणातच असाव्यात याची काळजी घ्यायला हवी; नाहीतर दारुड्या माणसाचा जसा स्वत:वरचा ताबा पूर्ण सुटतो आणि तो नशेच्या आहारी जातो, तसेच आपले होऊ शकते. मला आठवते कादंबर्‍या, नाटक आणि सिनेसृष्टीने विद्यार्थी असताना आमच्यावर केवढीतरी मोहिनी घातली आणि आमचे कल्पनाविश्‍व समृद्ध केले. त्यानंतर आतासुद्धा ही मोहिनी कायमच आहे. आमच्यापैकी या स्वप्नसृष्टीतच गुंतून पडले ते आपल्या आयुष्यात फारसे काही करू शकले नाहीत; पण ज्यांनी ज्यांनी हे मोहजाल तोडून आपली एकाग्रतेची शक्ती वाढवली, त्यांना त्यांना आयुष्यात उत्तम यश मिळवता आले. 
एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती म्हणजे संगणक, फेसबुक, मोबाईल फोन या सार्‍या दारू जुगारासारख्या वाईट सवयी नाहीत. त्यांचा अतिशय उत्तम उपयोग करून घेता येतो. वाईट आहे ते आपले त्यांच्या नको तितके आहारी जाणे. चांगला बोलता येणे हा उत्तम गुण मानला जातो. पण सारखी बडबड करीत राहणे हे त्या उत्तम वक्त्यासाठी सुद्धा वाईटच आहे. आपले स्वत:वरचे नियंत्रण सुटल्याने आपले नुकसान होते आहे, हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवे. हे नियंत्रण सुटल्याची खूण म्हणजे एखाद्या गोष्टीचा चाळा लागणे. ती करीत राहिल्याशिवाय चैन न पडणे. वेळ हीच आपल्या आयुष्यातली खरी संपत्ती आहे. ती जर वाया घालवत राहिलो तर आपल्यासारखे करंटे आपणच म्हणावे लागेल. सर्वार्थता आपल्या मनाची शक्तीच नाही तर उभारीसुद्धा खाऊन टाकते. आणि दुसरे म्हणजे एकाग्रतेचा विकास झाला नसला तर आपली वर्तमानात जगायची शक्तीपण नष्ट होत जाते.
कला, क्रीडा आणि छंद या तीनपैकी कोणताही एक नाद लावून घेता आला तर आपली वर्तमानात राहण्याची शक्ती परत विकसित व्हायला लागते. त्याबरोबरच प्राणायाम, योगासने आणि ध्यान या योगसाधना नियमित करीत राहण्यानेही खूप फायदा होतो. पण सर्वांत महत्त्वाची बाब ही की निग्रहाने आपले वेळापत्रक पाळण्याची सवय लावून घेणेसुद्धा सर्वार्थतेवर नियंत्रण आणायला उत्तम मदत करते.
मोबाईल आणि फेसबुकचा नाद लागला की जे प्रत्यक्ष समोर नाही त्यात आपण गुंतून पडायला लागतो.  या नादात समोर जे हजर आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष देण्याची अपेक्षा करीत आहेत, त्यांचे भान राहत नाही आणि आपण त्यांचा अपमान करायला लागतो. मुद्दाम वेळ काढून आपल्या प्रिय व्यक्तींच्या आणि प्रवास करून निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यानेसुद्धा हे नाद आपल्या कह्यात राहायला लागतात. 
जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी हे सारे आपल्या सहवासासाठी आसुसलेले असतात. आपण आपल्याच नादात राहायला लागलो तर त्यांचासुद्धा विरस होतो. प्रत्येक नात्यामध्ये आराधनेचा भाग असतो. तो आपल्याकडून दुर्लक्षिला गेला तर जे खरे आपले आहेत, त्यांनाच आपण दुखावून ठेवतो. आपण केवढाही मोठा पराक्रम केला तरी त्यांच्याकडून कौतुक झाले नाही तर त्या यशाला फारसा अर्थ राहत नाही. त्या सर्वांचे आराधन आपण त्यांच्या बारीकसारीक गोष्टींचेही भान राखून करायला हवे. सजीवांचा अवमान करून निर्जीव साधनांमध्ये गुंतून पडू नये, एवढे जरी व्यवधान सांभाळता आले तरी पुष्कळ लाभ होईल.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व 
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Techno Damage Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.