तेल अवीव
By Admin | Published: October 31, 2015 02:44 PM2015-10-31T14:44:53+5:302015-10-31T14:44:53+5:30
अशांत मध्यपूर्वेतल्या इस्त्रयलमधलं तेल अवीव हे शहर आहे जगातली ‘बेस्ट स्मार्ट सिटी’! या देखण्या शहरात आठवडाभराचा मुक्काम करून शोधलेली उत्तरं आणि सापडलेले प्रश्न..
>‘स्मार्ट सिटी’ म्हणजे नेमकं असतं तरी काय?
अपर्णा वेलणकर
मराठी दिवाळी अंकांचं रिंगण तोडून वाचकप्रियतेत मोठी झेप घेत गेल्यावर्षी एक लाख प्रतींचा टप्पा पार करणारा ‘लोकमत’ वृत्तसमूहाचा दिवाळी अंक
यावर्षीच्या अंकातल्या काही ठळक आकर्षणांचा वानोळा आजच्या ‘मंथन’मध्ये!
आपल्याला सिटी प्लाझामध्ये जायचंय, म्हणजे हे बघ.. इकडे. वी आर हिअर.’
हातातल्या स्मार्ट फोनच्या चिटुकल्या स्क्रीनवर तिच्या शहराचा नकाशा उघडून दोन लाल ठिपक्यांमधला दिशेचा बाण दाखवत शेक्केड मला सांगत होती.
तेल अवीव या मध्यपूर्वेतल्या देखण्या शहरातली पहिली सकाळ. आणि ही माझी पहिली इस्नयली मैत्रीण.
‘खूप वेळ आहे आपल्याकडे आणि फार लांबपण नाहीये. तर कसं जाऊया सांग.’
मी म्हटलं, ‘चल, चालत जाऊ. बीचवरून असंच चालत चालत जाता येईल का?’
शेक्केड हसली. म्हणाली, ‘चालत? नको नको. तुला सायकल चालवायची होती ना?’
मी म्हटलं, ‘चल!’
तर म्हणाली, ‘वेट, लेट्स फाईंड आउट, की तुङया या हॉटेलपासून डॉकिंग स्टेशन कुठे आहे?’
शेक्केडने स्मार्ट फोनवर दुसरी विण्डो उघडली. टेल-ओ-फन. त्यात थोडी खुडबुड केल्यावर तिला कळलं की, हॉटेलपासून दोनशे ऐंशी मीटर अंतरावरच्या उजवीकडल्या चौकात सायकलचं डॉकिंग स्टेशन आहे. तिथे आत्ता चौदा सायकली उपलब्ध आहेत. त्यातल्या सहा सायकली सव्वापाच फूट उंचीच्या स्त्रियांसाठी सोयीच्या आहेत, आणि त्यांपैकी एक आत्ता कुणीतरी ‘प्रोसेस’ करते आहे. म्हणजे अजून मिनिटभराने पाचच असतील.
संपलं नव्हतं.
शेक्केड म्हणाली, ‘लेट मी चेक द विण्ड फ्लो. उलटा वारा असला, तर फार दमशील तू. सवय नाहीये ना तुला!’
- तिने फोनवर तिसरी खिडकी उघडली.
त्यात तिला कळलं की, अमुक एक रस्ता घेतला, तर दीड किलोमीटर अंतर जास्त पडेल, पण वारा मागून वाहील आणि सायकल चालवायला फार फ्रिक्शन पडणार नाही.
‘वी आर ऑल सेट, चल.’
तलम मलमलचा मऊ टॉप आणि चुरचुरत्या गुलाबी शॉर्ट्स घातलेली उत्साही शेक्केड उडय़ा मारतच हॉटेलबाहेर पडली. मागून मी.
चालत चालत आम्ही टेल-ओ-फनच्या डॉकिंग स्टेशनपाशी आलो. शेक्केडने माङयासाठी एक तात्पुरतं अॅक्सेस कार्ड आणलं होतं. एटीएम मशीनसारख्या एका यंत्रच्या स्क्रीनसमोर ते धरल्यावर उपलब्ध सायकलींच्या रांगेचं चित्र झळकलं.
शेक्केड म्हणाली,
‘बघ, तुला कुठली हवी?’
- मी त्यातल्या एका सायकलच्या नंबरवर क्लिक केलं. शेक्केडने तिचं कार्ड दाखवून तिला हवी ती निवडली. खतम!
- शेजारी रांगेत उभ्या सायकली. निवडलेल्या सायकलीचं कुलूप खुलं झालेलं. ती स्टॅण्डवरून काढायची आणि निघायचं. समोर ऐन रहदारीचा धावता रस्ता. पण त्याच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त सायकल लेन्स. आणि मोटारींइतकेच लोक सायकलवरून मजेत निघालेले. त्यात शॉर्ट्स घातलेले टुरिस्ट, मुलांना मागे बसवून शाळेत पोचवायला निघालेल्या बायका आणि स्लीव्हलेस टीशर्ट्स घालून ऑफिसात निघालेले एक्ङिाक्युटिव्हजही!
- आम्ही निघालो. रमतगमत. गप्पा मारत. शेक्केड म्हणाली, शेवटच्या लेनमध्ये राहा. ही सावकाश जाणा:या सायकलींची लेन आहे!
स्टेशनवर पाचच लेडिज सायकली होत्या. सांगितलेली दिशा घेतल्यामुळे वारा मागूनच वाहत होता. शेक्केडचा फोन अमुक एका दिशेने सायकलवरून निघाला आहे, हे हलत्या जीपीएस सिग्नल्सवरून कळल्यावर वाटेतल्या एका चौकाभोवतीच्या निम्म्या सायकल लेन्स दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहेत, याचा अॅलर्ट तिच्या फोनमधल्या खिडकीवर झळकला होता, आणि सिटी प्लाझापाशी पोचल्यावर आमच्या दोन सायकली जवळच्या कुठल्या डॉकिंग स्टेशनवर पार्क करता येतील, हेही तिच्या फोनमधल्या अॅपने शोधून सांगितलं होतं.
वाटेतल्या एका रोडसाइड कॅफेमध्ये तिची आवडती कॉफी प्यायला थांबलो, तेव्हा तिला म्हटलं, ‘हे तू सारखं काय बघत असतेस स्क्रीनकडे? बॉयफ्रेण्ड?’
तर हात उडवून म्हणाली, ‘त्याला कुठेय एवढा वेळ? बॉयफ्रेण्डपेक्षा या सिटी अॅपकडेच बघावं लागतं अगं सारखं. हे बघ, माझी फी भरायची तारीख जवळ येतेय त्याचा अॅलर्ट! पुढच्या विकएण्डला आमच्या कॉलनीत पाणी येणार नाही, त्याची नोटीस. आणि ही राबिन स्स्वेअरमधल्या रॉक कॉन्सर्टची दोन डिस्काउण्टेड तिकिटं. रेट्स अजून खाली उतरले, तर मी जाणारेय. बघू, सिटीकडून लास्ट ऑफर काय मिळतेय ती!’
मी हसले, तशी म्हणाली, ‘यू डोण्ट नो डिअर, पण हे सिटी अॅपच हल्ली आमचे डेटिंगचे प्लॅन ठरवतं. आता बघ, मला हा रॉक बॅण्ड भारी आवडतो, तर ते लक्षात ठेवून सिटी अॅपने मला तिकिट्स ऑफर केलेयत, अॅण्ड आय अॅम इन रिलेशनशिप, म्हणून दोन तिकिटं! माङया बॉयफ्रेण्डला हे सुचलंसुद्धा नसतं.’
‘तुला बॉयफ्रेण्ड आहे, हे तुङया सिटीला कसं माहिती?’
‘व्हॉट डू यू मीन? - मीच अपडेट केली ना माझी इन्फो!’
***
इस्नयलचं सगळ्यात देखणं, रोमॅण्टिक, ग्लॅमरस आणि उत्साहानं उसळतं स्मार्ट शहर तेल अवीव. तिथल्या माङया पहिल्या दिवसाची ही सकाळ!
‘स्मार्टेस्ट सिटी ऑफ द वल्र्ड’ असा किताब मिळवलेल्या या शहराची जानपहचान करून घ्यायला म्हणून तेल अवीवमध्ये पोचले, तेव्हा अर्थातच भारतात नव्याने उसळलेल्या स्मार्ट सिटी कल्लोळाचा धुमाकूळ डोक्यात ताजा होता.
विकसित आणि विकसनशील जगामध्ये सर्वत्रच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणा:या ‘स्मार्ट शहरां’बद्दल मोठी उत्सुकता आहे. लंडन, बार्सिलोना, स्टॉकहोम, अॅमस्टरडॅम यांसारख्या ‘स्मार्ट शहरां’नी आघाडी घेऊन आधुनिक महानगरांच्या कुशल व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट तंत्रज्ञाना’तले वेगवेगळे प्रयोग जगासमोर आणण्याचा सपाटा लावला आहे.
जगभरातल्या अशा ‘स्मार्ट सिटी’जच्या प्रयोगशीलतेचा, नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतल्या वेगवान पुढाकाराचा आढावा घेऊन दरवर्षी जगातलं ‘स्मार्टेस्ट’ शहर निवडणारी एक स्पर्धा होते. युरोप-अमेरिकेतल्या बलाढय़ स्पर्धकांवर मात करून अशांत मध्यपूर्वेतल्या ‘तेल अवीव’ने 2014 सालासाठीचा हा किताब पटकावला. आणि ‘स्टार्ट-अप नेशन’ असं बिरुद अभिमानाने मिरवणा:या इस्नयलमधलं जेमतेम साडेचार लाख लोकसंख्येचं हे चिमुकलं शहर चर्चेत आलं.
एखादं शहर ‘स्मार्ट’ असतं म्हणजे काय?
डिजिटल टेक्नॉलॉजी आणि आयसीटीने (इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) गुंफलेल्या या व्यवस्थेत नागरी सेवांची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि वेग वाढवणा:या ‘ऑनलाइन’ व्यवस्था शहर नियोजनाच्या केंद्रस्थानी असतात. नैसर्गिक संसाधनांच्या बेसुमार वापराला आळा घालण्याचे मार्ग शोधले-वापरले जातात. सरकारी सेवा-शहरांतर्गत वाहतूक-वीज आणि पाणीपुरवठा यांचं नियोजन, आरोग्यसेवा, स्वच्छता आणि मलनि:सारणाची व्यवस्था हे सारं ‘रिअल टाइम रिस्पॉन्स’च्या आधाराने नियंत्रित होतं. शहर नियोजनात आणि नियंत्रणात नागरिकांच्या मताला/सहभागाला वाव असतो.. हे सारं वाचून/ऐकून माहीत असणं वेगळं.
- ‘अशा’ शहरात प्रत्यक्ष राहून, जगून, तिथल्या नागरिकांच्या आयुष्यात डोकावून पाहिलं, तर काय सापडतं?
या ‘स्मार्ट’ शहरांमधल्या नागरी जीवनाची प्रत, नागरिकांना मिळणा:या सुविधा, त्यांचे प्रश्न, त्यांवरची उत्तरं वेगळी असतात का? म्हणजे कशी? शहराच्या नियोजनात आणि नियंत्रणात सहभाग मिळालेले नागरिक त्या शहरांबरोबर प्रत्यक्ष जोडले जात असतील, तर या ‘रिअल टाइम कनेक्ट’मधून समूहजीवनाचं एक स्वतंत्र मॉडेल उभं राहतं का? ते नागरिकांशी किती संवादी असतं? शहर-व्यवस्थापनाच्या बहुतांश यंत्रणा ऑनलाइन आणि ‘डिजिटल’ झाल्याने शोषणाच्या आणि भ्रष्ट व्यवहारांच्या शक्यता कमी होतात/संपतात का? कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन यांचा वापर न करता येणारे/न परवडणारे, इंटरनेटच्या जाळ्याबाहेर असलेले, आधीच डिजिटल डिव्हाइडच्या फाळणीने मागे सुटलेले नागरिक या ‘स्मार्ट’ शहरात अधिकच मागे ढकलले जातात का?
- ते शोधायला, अनुभवायला मी तेल अवीवमध्ये पोचले होते. तर पहिल्यांदा भेटली शेक्केड. तेल अवीवच्या ‘सिटी’ने - म्हणजे आपली महानगरपालिका - माङया सोबतीला दिलेली वाटाडी. शिक्षण चालू असताना मध्येच ब्रेक घेऊन छोटय़ा छोटय़ा नोक:या करत होती. तेल अवीवसारख्या महागडय़ा शहरात तग धरायला पैसे कमवत होती.
शेक्केडच्या स्मार्ट फोनमधल्या ‘डिजि-टेल’ या तेल अवीवच्या पुरस्कारप्राप्त सिटी-अॅपमध्ये ‘शिरणं’ आणि तिच्याकडे असलेल्या डिजी-टेल रेसिडेण्ट्स कार्डची कळ वापरून सिटीने तिला दिलेल्या ‘पर्सनल वेबपेज’वरचा तपशील वाचणं म्हणजे शेक्केडच्या व्यक्तिगत आयुष्याचा व्हच्र्युअल फेरफटकाच होता.
इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करून ती राहत होती त्या अपार्टमेण्टचा परिसर, त्या परिसरातल्या कम्युनिटी सेण्टरमधे येत्या आठवडय़ात असणारे ‘तिच्या उपयोगाचे’ कार्यक्रम, तिने भरलेली आणि येत्या काही दिवसांत तिला भरावी लागणारी वीज-पाण्याची बिलं, महानगरपालिकेचे कर, पार्टटाइम नोकरीला लागल्याने तिच्या आयकराचे तपशील, तिचं घर आणि ऑफिस यांच्यामधल्या तिच्या रोजच्या रस्त्यावर पुढल्या महिन्यात होणा:या दुरुस्तीच्या कामामुळे तिने कोणत्या वेळी कुठला पर्यायी रस्ता घ्यावा हे सांगणा:या सूचना, ती राहते त्या भागात नव्याने बांधल्या जाणा:या इमारतींचे प्रस्तावित आराखडे, त्याबद्दल तिला शंका / हरकत असल्यास नोंदवण्याची ऑनलाइन सोय, तिचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि पार्किंग परमीट, पुढच्या आर्थिक वर्षात तिच्या रहिवासी भागासाठी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या विकासनिधीचा तपशील, त्या निधीचा विनियोग कसा आणि कशासाठी केला जावा याबद्दल तिचं मत नोंदवण्यासाठी/योजना सुचवण्यासाठी वेबलिंक, रस्ता-वीज-पाणी-स्वच्छता-वाहतूक-टेल ओ फनसारख्या महानगरपालिकेने पुरवलेल्या सुविधा या कशाहीबद्दल तक्रार असली, तर ती नोंदवण्यासाठीची वेबलिंक.. हे सारं शेक्केडच्या मुठीतल्या त्या इवल्या स्मार्ट फोनमध्ये सामावलेलं होतं.
..आणि तिच्यासाठी फार वेळ नसलेल्या बॉयफ्रेण्डला व्हॉट्सअॅपवर सारखं पोक करण्यापेक्षा हे डिजि-टेल अॅप तिच्यासाठी प्राधान्याचं होतं. कारण त्या अॅपवरूनच तिला तिच्या आवडत्या रॉकबॅण्डच्या कॉन्सर्टची दोन तिकिटं सवलतीत मिळणार होती, हे अॅपच तिला तेल अवीवमधल्या सगळ्यात ‘हॉट’ रेस्टॉरण्टमध्ये हॅपी-अवर डिस्काउण्ट मिळवून देणार होतं आणि अमुक एका दुकानात तिला आवडलेला महागडा ड्रेस समजा सेलमध्ये स्वस्तात मिळणार असेल, तर हे अॅपच तिला सगळ्यात पहिल्यांदा अॅलर्ट पाठवणार होतं.
शेक्केडला बॉयफ्रेण्ड आहे, तिला अमुक एक रॉकबॅण्ड आणि तमुक एक रेस्टॉरण्ट आवडतं, ती अमक्यातमक्या दुकानात शॉपिंग करते; हा सगळा ‘डाटा’ तिच्या महानगरपालिकेकडे कसा?
शेक्केड म्हणाली, ‘मीच अपडेट करते. त्यामुळे मला सिटीकडून डिस्काउण्ट्स ऑफर्स येतात, माङो पैसे वाचतात. आता हे बघ, राबिन स्क्वेअरमधल्या त्या रॉक कॉन्सर्टला जाणं मला अजिबात परवडणार नाही. पण कॉन्सर्ट सुरू होण्याआधी काही तास शिल्लक असलेली, विकली न गेलेली तिकिटं आयोजक सिटीला देतात. मग सिटी त्याबद्दलचे अॅलर्ट्स पाठवून ‘डिजि-टेल कार्ड’धारकांना लास्ट मिनिट ऑनलाइन बुकिंग ऑफर करते. कार्यक्रम सुरू व्हायच्या अगदी पंधरा-वीस मिनिटं आधी तो कार्यक्रम होणार असलेल्या परिसरात आजूबाजूला जे कुणी असतील, त्यांच्याच फोनवर शेवटचे टार्गेटेड अॅलर्ट्स येतात. काही काही वेळा तर फुकटसुद्धा जाता येतं. मी ट्राय करणार आहे.’
कॉफी संपवून सिटी प्लाझाच्या दिशेने सायकली काढता काढता शेक्केड म्हणाली, इंडिया इतका सुंदर देश आहे. तिकडची तू इकडे काय करतेयस?
मी म्हटलं, स्मार्ट सिटी आहे ना तुझं हे शहर, ते बघायला आलेय.
तिला आश्चर्यच वाटलं. म्हणाली,
‘रिअली? आय डिडण्ट नो दॅट!’
(पुढे काय झालं? - तेल अवीवमधल्या आठवडाभराच्या
फेरफटक्याचा साद्यंत वृत्तांत देणारा
हा दीर्घ लेख वाचा ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये.)
(लेखिका ‘लोकमत’च्या फिचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com