बोला, कसा घालवणार तुम्ही आजचा दिवस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 06:03 AM2021-05-16T06:03:00+5:302021-05-16T06:05:10+5:30
अखंड घरातच राहायचे तर रोजच्या दिवसाला काहीतरी उद्दिष्ट हवे, नाहीतर दिवस नुसताच घरंगळत निघून जातो..!
- वंदना अत्रे
वंदना, मी हल्ली रोज सकाळी तोंडावर दोन मास्क, हातात ग्लोव्हज घालते. बागेत उमलली असतील तेवढी मोगऱ्याची, चाफ्याची फुले छोट्या पिशवीत टाकते. छोटी सॅनिटायझरची आणि पाण्याची बाटली असतेच बरोबर. एकेक करीत आमच्या कॉलनीतील बिल्डिंगमध्ये प्रत्येक घरी जाते. आजोबा-आजींची कॉलनी आमची. दारातूनच आजोबा-आजींची चौकशी करते. त्यांना दोन फुले देते आणि थोड्या गप्पा मारून पुढे जाते. दोन तासात दहा-बारा घरातील आजी आजोबा नक्की भेटतात. ‘माझा दिवस नंतर खूप छान जातो...’- मेधाताई सांगत होती. मेधाताई ही आत्ता-आत्तापर्यंत नाशिकमधील एका कॅन्सरच्या रुग्णालयात पेशंटचे समुपदेशन करणारी माझी सत्तर-बहात्तर वयाची मैत्रीण. कोविड काळात जगतांना कोणते उदिष्ट डोळ्यापुढे ठेवून स्वतःला तंदुरुस्त ठेवते हे फोनवर सांगत होती...! पुन्हा-पुन्हा म्हणत होती, अखंड घरात राहायचे तर रोजच्या दिवसाला काहीतरी उद्दिष्ट पाहिजे बघ. नाहीतर दिवस नुसताच घरंगळत निघून जातो..! सत्तरीच्या वयात जगण्याच्या उद्दिष्टाबद्दल उत्साहाने बोलत असलेल्या या मैत्रिणीला कोणत्या हातांनी सलाम करावा हेच मला कळेना..! मनात आले, कधी विचार करतो बर आपण जगण्याचे उद्दिष्ट वगैरे गोष्टींचा? उठल्या-उठल्या रोज सकाळी स्वतःलाच प्रश्न विचारला, काय बरे असावे आजच्या दिवसाचे आपले उद्दिष्ट?
रोज मिळणारे उत्तर वेगळे असते. कधी रेंगाळत, मजेत दिवस घालवण्याची इच्छा असते तर कधी खूप दिवस ठरवून ठेवलेले काम करावेसे वाटते. पण असे आपल्या मनात आज काय आहे ते आपण कधी मनाला विचारतो का? जवळजवळ नाहीच! कोविडने आपली मानगूट पकडून आपल्याच घरात आपल्याला डांबून ठेवल्यावर दिवसाची सगळी चौकट खिळखिळी करून टाकली आणि समोर प्रश्न ठाकला.
बोल कसा घालवशील आजचा दिवस? तेव्हा जाणवले, रोज समोर येणाऱ्या दिवसाला, सात दिवस असलेल्या आठवड्याला आणि महिन्याला काही निश्चित उद्दिष्ट असले पाहिजे. आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, गाठायचे आहे त्याचे छोटे-छोटे तुकडे करून हे तुकडे रोजच्या दिवसाशी जोडले पाहिजेत. आणि आयुष्यात ‘काही मिळवायचे’ म्हणजे काहीतरी उदात्त वगैरे हवे असे कोणी सांगितले? भोवताली वातावरण कमालीचे जड, खिन्न असताना मला आनंदी आणि निरोगी राहायचे हेसुद्धा ‘आयुष्यात काही मिळवायचे’ या सदरात येऊच शकते. गच्चीवर छोटीशी बाग करायची आहे, रोज पहाटेचा सूर्योदय बघायचा आहे, जुने फोटो नीट लावून ठेवायचे आहेत, उत्तम पोळ्या करायला शिकायच्या आहेत ह्यापैकी काहीही उद्दिष्ट असू शकते! हे उद्दिष्ट हवे, कारण ते आपल्याला दिवस सुरु करण्याची दिशा देते.
दूरवर एखादे मुक्कामाचे ठिकाण दिसत असले की तिथपर्यंत जाण्याचा उत्साह आपल्याला येतो ना, तसेच काही घडते. आणि संध्याकाळी दिवस संपताना छान वाटत राहते. चार पावले पुढे गेल्यासारखे वाटत राहाते.
... उद्या सकाळी उठलात की
• अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी डोळे मिटून बसा, स्वतःला विचारा, कसा घालवणार आहे मी आजचा माझा दिवस? काय आहे आजचा अजेंडा?
•तुमचाच दिवस तुमच्यापुढे उलगडत जाईल.
• नोकरी, उद्योग करीत नसाल तर एक ‘रिकामपणचा उद्योग’सुचवते :
• रोज कोविड अशा नोंदी करा
ज्यामध्ये वास्तव परिस्थितीची नोंद असेल, पण त्या दिवशीची तुमच्या मनातील ठळक भावना कोणती ह्याची सुद्धा नोंद असेल. आणि त्या बरोबर त्या दिवशी घडलेली एखादी दिलासादायक घटनासुद्धा...!
• या विषयाचा आणि काळाचा पुढे जेव्हा केव्हा समाजशास्त्रीय अभ्यास होईल तेव्हा तुम्ही-आम्ही लिहिलेल्या या नोंदी फार महत्त्वाच्या ठरतील...!
( ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)
vratre@gmail.com