Term insurance: लग्न झाले नसेल तरीही टर्म इन्शुरन्स आवश्यकच...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 09:50 AM2022-06-19T09:50:27+5:302022-06-19T09:52:13+5:30
Term insurance: टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे, असे बहुतेक लोकांना वाटते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात हे खरे असले तरीही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. अविवाहितांनी टर्म इन्शुरन्स का घ्यावा, याची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ...
- चंद्रकांत दडस, उपसंपादक
टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे, असे बहुतेक लोकांना वाटते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात हे खरे असले तरीही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. अविवाहितांनी टर्म इन्शुरन्स का घ्यावा, याची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ...
तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?
तुम्ही अविवाहित असला तरीही तुमचेही एक कुटुंब असते, जे तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे. विचार करा, तुम्हाला मुले आहेत. तुमचे पालक निवृत्त होणार आहेत किंवा तुमच्या उत्पन्नावर लहान भावंडे अवलंबून आहेत. जर अशा वेळी तुमचा अपघात झाला आणि तुम्ही हे जग सोडून गेलात तर तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?
...म्हणून टर्म इन्शुरन्स खरेदी करा
तुमच्यामागे कुटुंबाला कोणत्या आर्थिक त्रासातून जावे लागेल ते तुम्ही समजू शकता? तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीतून जावे लागू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे. तो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक
स्थैर्य देईल.
कुटुंबाला तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेल
तुम्ही लहान भावंडांसाठी गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर तुमच्या निधनानंतर त्याचा संपूर्ण भार तुमच्या कुटुंबीयांवर पडेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तणाव आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला अशा तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेल.
पालक होण्यासोबतच जबाबदाऱ्याही वाढतात
पालक या नात्याने, तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे अशी तुमची इच्छा नक्की असेल. तुम्हाला तुमच्या मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण करावीशी वाटत असतील. या स्वप्नांमध्ये चांगले शिक्षण आणि प्रशिक्षणही समाविष्ट असेल. या प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत असालच असे नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घ्या.