थँक यू व्हेरी मच, सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:02 AM2020-08-30T06:02:00+5:302020-08-30T06:05:06+5:30

प्रणव फोनवर अतिशय आग्रहानं मला निमंत्रण देत होता, सर, काहीही झालं, तरी माझ्या कार्यक्रमाला तुम्हाला यायलाच हवं. तारीख तुम्ही कॅलेंडरवर नोंदवून ठेवा, मी तुमची वाट पाहीन. हा प्रणव म्हणजे तोच,  ज्याला वर्षभरापूर्वी मीच  नोकरीतून काढून टाकलं होतं!.

Thank you very much, sir! | थँक यू व्हेरी मच, सर!

थँक यू व्हेरी मच, सर!

googlenewsNext
ठळक मुद्देमी अवाक् झालो होतो. तेवढय़ात दार ठोठावून एक जण आत आला. प्रणव मिश्कीलपणे म्हणाला, ‘सर, ओळखलंत का याला? लॉकडाऊनमुळे दाढी वाढलीये. हा जेम्स आहे. आपला एचआर.’ 

- मुकेश माचकर

‘सर, तुम्ही काहीही करून यायलाच हवं. तुमचा फार मोलाचा वाटा आहे माझ्या प्रवासात. तुमच्याशिवाय समारंभाला पूर्णता येणार नाही. समारंभाची तारीख कॅलेंडरात नोंदवून ठेवा तुमच्या. प्लीज या. मी तुमची वाट पाहतोय,’ हा प्रणव वारंगचा मेसेज खरं सांगायचं तर मला चकित करून गेला. 
त्याच्या कंपनीच्या वर्षपूर्तीची पार्टी होती. तिला मीही हजर राहावं, यासाठी त्याचा खूपच आटापिटा चालू होता. या मेसेजसारखे अनेक मेसेज त्याने पाठवले होते, दोन वेळा फोन करून रिमाइंडही केलं होतं.
त्याचा इतका निर्मळ आग्रह मला अस्वस्थच करून गेला. कारण, वर्षभरापूर्वी मीच त्याला नोकरीतून काढलं होतं. प्रणव आमच्या ज्वेलरी डिझाइन कंपनीतला एक तरुण मुलगा होता. काम हातावेगळं केल्याशिवाय स्वस्थ बसायचा नाही, मेहनती होता; पण चटपटीत नव्हता. वरिष्ठांवर इम्प्रेशन पाडण्याची कला त्याला अवगत नव्हती. थोडक्यात सांगायचं तर माझ्या हाताखाली काम करणार्‍या 80 टक्के  माणसांसारखाच तो होता. कामसू, प्रामाणिक, व्यवस्थित; पण तेवढंच. 
कोणतीही कंपनी अशाच माणसांच्या बळावर उभी असते आणि चालते. पण बेरोजगारीची कुर्‍हाडही अशाच माणसांवर सर्वात आधी पडते.
अख्ख्या देशावर कोरोनाचं संकट कोसळलं तेव्हा मालकांनी सर्व सीनिअर्सना झूम मीटिंगवर बोलावून सांगितलं, ‘आपल्या सगळ्या ऑर्डर अडकल्या आहेत. ओव्हरसीज मार्केट पूर्णपणे बंद पडलेलं आहे. हे सगळं कधी संपेल आणि कसं संपेल याची काहीच कल्पना नाही. आपण, लक्झुरी गुड्समध्ये आहोत. आपलं मार्केट ड्विंडल होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता कटू निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. अत्यंत इसेन्शियल स्टाफ सोडून बाकीच्यांना पिंक स्लिप द्या.’ 
मी काही बोलायचा प्रय} केला तेव्हा ते म्हणाले, ‘हा चर्चा करण्याचा विषय नाही मिस्टर सर्मथ. दहा ज्युनिअर्स कामावर ठेवून मी एक सीनिअर काढू शकतो, ते सोपंही आहे. पण मी ते करत नाहीये. तुमच्या फक्त 30 टक्के सॅलरीज कट होणार आहेत आणि सगळे पर्क्‍स फ्रीज होणार आहेत, हे नशीब समजा.’ 
मी उघडलेलं तोंड बंदही करायला विसरलो. बाकीच्या कोणीही तोंड उघडलंही नाही.
माझ्या डिपार्टमेंटला 13 माणसं होती. सगळी घरून कामात गुंतलेली होती. कंपनी कधी सुरू होणार, आम्ही सगळे कधी परत येणार, अशा विचारणा होत होत्या. अशावेळी मला सात माणसांना काढायचं होतं. त्यांच्यातला एक प्रणव होता. तो दिवस मला नीट आठवतो. आयुष्यातल्या फार वाईट दिवसांपैकी एक होता तो. 
त्या सात जणांना पूर्वकल्पना न देता बोलावण्यात आलं होतं. एचआरचा नवा पोरगा जेम्स माझ्या केबिनमध्ये हजर होता. कुणी दहा वर्षे काम केलेला, कुणी तीन महिन्यांपूर्वीच जॉइन झालेला, असे कर्मचारी येत होते. त्यांना ताबडतोब राजीनामा द्या, नाहीतर टर्मिनेट करावं लागेल, असं सांगत होतो. शक्यतो नजर चुकवत होतो. बाकी सगळं सांभाळायला जेम्स होताच. पक्का एचआरवाला.
प्रणवला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, ‘मी खूप दिवसांनी आज कामावर चाललोय म्हणून डबा वगैरे घेऊन पाठवलंय घरच्यांनी. मी सहकार्‍यांबरोबर डबा खातो, सगळं आवरतो आणि लंच टाइमनंतर सगळं पेपरवर्क  करतो.’ 
जेम्सने माझ्याकडे रोखून पाहिलं.. मी धीर एकवटून कठोरपणे म्हणालो, ‘नाही प्रणव. या केबिनमधून बाहेर जाण्याआधीच पेपरवर्क करायला लागेल. आत्ताच आणि बाहेर गेल्यावर लगेच ड्रॉवर वगैरे रिकामे करून हँडोव्हर द्यावा लागेल. आय अँम सॉरी.’ 
प्रणवच्या चेहर्‍यावर नेमकं काय उमटलं ते मी शब्दांत सांगू शकणार नाही. डोळ्यांत पाणी तरळणं आणि ते निग्रहाने आतल्या आतच परतवून लावणं असं एकत्रित घडतं, हे मी पहिल्यांदाच पाहात होतो. फार फार वाईट दिवस होता तो.
‘फार फार चांगला दिवस आहे हा,’ प्रणव बोलत होता. त्याची उत्साही टीम टाळ्या वाजवून कौतुक करत होती. तो म्हणाला, ‘विक्रम सर्मथ सर नसते, तर मला आजचा हा दिवस दिसला नसता. म्हणून मी आज त्यांना खास बोलावून घेतलं आहे. हे होते, म्हणून मी आज इथे आहे.’ लोकांनी अतिशय आदराने माझ्याकडे पाहात टाळ्या वाजवल्या. मी संकोचून गेलो. 
सोहळा संपल्यावर त्याच्या केबिनमध्ये आम्ही दोघेच बसलो असताना त्याला विचारलं, ‘मला तू बोलावलंस, याचा फार आनंद झाला. मी काही तुझ्याशी फार चांगला वागलो नव्हतो. तरीही तू समारंभात म्हणालास, मी इथे आहे त्याला सर्मथ सर कारणीभूत आहेत. तू असं का बोललास?’ 
प्रणव सहजतेने म्हणाला, ‘कारण ते खरं आहे सर. तुम्हाला माझा राजीनामा आठवतो? मी म्हणालो होतो, लंच घेऊन पेपरवर्क  पूर्ण करतो. कारण, मी दहा वर्षे माझ्या घरात जेवढा वेळ काढला नव्हता, तेवढा आपल्या ऑफिसात काढला होता. ते माझ्यासाठी घरच होतं दुसरं. म्हणजे तसं वाटत होतं मला. ते एका दिवसात, एका क्षणात, एका मीटिंगमध्ये होत्याचं नव्हतं होऊ शकतं याची मला कल्पना नव्हती. तुम्ही त्या दिवशी मला कठोरपणे सांगितलंत की लंच वगैरे काही नाही, राजीनामा द्या, सामान उचला, हँडोव्हर द्या आणि बाहेर पडा. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आघात होता. तो मला अचानक ब्रrाज्ञान देऊन गेला. मी कितीही कामसू असलो, प्रामाणिक असलो, तरी अँट दि एंड ऑफ द डे मी फक्त एक नोकर आहे. मला कधीही हाकलता येऊ शकतं. माझ्याशी माणसासारखा व्यवहारही करण्याची गरज कंपनीला वाटत नाही, इतका फुटकळ. सर, त्या दिवशी तुम्ही माझ्याशी चुकूनही प्रेमाने वागला असतात, हळवे झाला असतात, मला थोडा वेळ दिला असतात, तर मी बेसावध राहिलो असतो, पुन्हा कुठेतरी नोकरी केली असती. पुढेही प्रेमळ बॉस मिळेल सावरून घ्यायला किंवा किमान सांत्वन करायला, अशी समजूत घातली असती मनाची. पण, तुम्ही ते केलं नाहीत, माझ्याशी प्रेमाने वागला नाहीत, त्याबद्दल थँक यू सो मच. तिथे माझं आयुष्य बदललं. मी ठरवलं, आता नोकर नाही, बॉस बनायचं. छोटं का होईना आपलं युनिट स्थापन करायचं. केलं. नशिबाने साथ दिली. इथवर आलो. हे तुमच्यामुळेच तर झालं सर.’ 
मी अवाक् झालो होतो. तेवढय़ात दार ठोठावून एक जण आत आला. प्रणव मिश्कीलपणे म्हणाला, ‘सर, ओळखलंत का याला? लॉकडाऊनमुळे दाढी वाढलीये. हा जेम्स आहे. आपला एचआर.’ 
आता मी चक्रावलोच, मी विचारलं, ‘अरे, तू इथे कसा?’ 
तो म्हणाला, ‘त्या दिवशी तुमच्याबरोबर सात लोकांना काढून टाकताना मला फार त्रास झाला होता. दिला राजीनामा. नंतर नोकरी शोधत होतो. जाहिरात पाहून अप्लाय केलं. इथे पोहोचलो तर प्रणव सर होते इंटरव्ह्यू घ्यायला. ते म्हणाले, तिकडे राजीनामा का दिलास? मी कारण सांगितलं. मग म्हणाले, मला काढलंस तसं कुणालाही, कधीही काढणार नाहीस, अशी गॅरंटी देणार असशील तर तुझी नोकरी पक्की’ 
ते दोघे एकमेकांच्या हातावर टाळ्या देत हसत होते आणि मी मात्र आतल्या आत शरमून काळाठिक्कर पडलो होतो.
mamnji@gmail.com
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
चित्र : गोपीनाथ भोसले

Web Title: Thank you very much, sir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.