रंगमंच - दिग्दर्शक : नाटकाचा पहिला प्रेक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:00 AM2018-12-16T07:00:00+5:302018-12-16T07:00:02+5:30
नाटककाराने लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग दिग्दर्शकाने नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसकट पात्रांच्या हालचाली आणि अभिनयासहित पहिल्यांदा सादर होण्याअगोदर पाहिलेला असतो.
- योगेश सोमण-
कागदावरील नाटक दृश्य स्वरूपात अनुभवणं ही दिग्दर्शकातील पहिली क्वालिटी असली पाहिजे. मागच्या एका लेखात ‘सुचतं कसं’ याबद्दल मी माझी मतं शेअर केली होती. तशी आज एखाद्या दिग्दर्शकाला संपूर्ण नाटक कसं दिसत असावं, याबद्दल माझी मतं शेअर करणार आहे. तसंच एक नाटकवाला आणि त्याहीआधी एक प्रेक्षक म्हणून आठवणीतल्या नाटकांच्या आठवणीही शेअर करेन.. तर नाटक वा एकांकिका ‘दिसते कशी?’ ‘श्यामपट’ नावाच्या एका नाटकाचे मी दिग्दर्शन केले. नाटक लिहिलेही मीच होते. महाभारत लिहीत असताना व्यासमुनी संभ्रमात पडतात, वस्त्रहरणाच्या प्रसंगात पात्रं त्यांचं ऐकेनाशी होतात आणि कलाकृतीचे कथानक भरकटू लागते, म्हणून व्यासमुनी महाभारत दिग्दर्शक श्रीकृष्णाच्या हातात काही काळापुरती सुपूर्त करतात. असं कथानक असलेलं हे नाटक.
दिग्दर्शन करताना मला सर्वप्रथम हे जाणवलं की हे नाटकात नाटक चालू आहे. नेपथ्यात रंगमंचावर रंगमंच दिसला. नाटक महाभारतावर बेतले असले तरी पात्रांची भाषा आजची होती. पात्रांना आपापल्या भूमिकेबाबत पडणारे प्रश्न तुमच्या-आमच्यासारखेच होते. त्यामुळे प्रयोगाची रचना करताना रंगमंचाच्या बरोबर मध्ये एक बारा फूट बाय बारा फुटांचा चौथरा उभा केला. साधारण दीड फूट उंच. महाभारतातील म्हणजे व्यासांच्या नाटकातील प्रसंग सादर करायचे असतील त्या वेळी कृष्ण पात्रांना त्या चौथºयावर बोलावेल आणि प्रसंग सादर होतील अशी रचना केली. आणि चौथºयावर महाभारतातील नाटक चालू असताना त्या चौथºयाच्या आजूबाजूलाच व्यास, कृष्ण, गणपती आणि इतर मोकळी असलेली पात्रं महाभारतात चाललेले प्रसंग प्रेक्षकांबरोबरच बघत राहतील अशी योजना केली. एखाद्या प्रसंगाबाबत व्यासांना किंवा कृष्णाला काही शंका असेल, तर तिथेच चर्चा करून व्यास आणि कृष्ण नाटक पुढे नेत असत. म्हणजे श्यामपटच्या नांदीपासून सर्व पात्रं नाटक संपेस्तोवर रंगमंचावरच उपस्थित असत. महाभारतातील त्यांची एक्झिट आणि एंट्री म्हणजे बारा फूट बाय बारा फुटांच्या महाभारतातील रंगमंचावरून खाली उतरायचे. वेशभूषेच्या बाबतही हाच विचार मी नाटकाच्या वेशभूषाकारपाशी मांडला. मला वेशभूषा अशी हवी होती, की पात्र भूमिका रंगवत असताना नाटकातील म्हणजेच महाभारतातील वाटावी आणि भूमिका रंगवत नसताना सामान्य वाटावी. शिवाय काही प्रसंगांत एखादं पात्र दोन भूमिका करत असेल तर स्टेजवरच महाभारतात प्रवेश करण्यापूर्वी वेशभूषेत बदल करून ते पात्र प्रवेश करत असे. थोडक्यात, इतर प्रयोगांच्या वेळी जे विंगेत घडतं ते मी स्टेजवरच घडवलं. अगदी प्रसंगात लागणारी प्रॉपर्टी, युद्धाची आयुधं रंगमंचाच्या मागे दोन पिंप ठेवली होती. त्यात ठेवलेली असायची, पात्रांना प्रसंगानुरूप लागतील तशा वस्तू घेतल्या आणि ठेवल्या जायच्या. संगीताच्या बाबतीत हाच विचार मनात आला की रंगमंचावरील आणि आतील दोन्ही व्यवहार स्टेजवरच घडवतो आहे म्हटल्यावर पार्श्वसंगीत विंगेतून अथवा पिटातून वाजवून काही उपयोग नाही तेही प्रेक्षकांसमोर वाजवले गेले पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मी श्यामपट उभं करत होतो त्यात मला तालवाद्यंच ऐकू येत होती. नाटकाच्या प्रसंगानुरूप कोणालाही सहज वाजवता येतील असे ºिहदम पॅटर्न तयार केले आणि प्रयोगादरम्यान महाभारतातील पात्रांची वेशभूषा लेवून आमचे वादक समोर चालू असलेल्या नाटकाकडे बघत म्युझिक देत असत. अशा पद्धतीनं संपूर्ण प्रयोग बसवण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला, की महाभारताचे सर्वज्ञात कथानक असूनही नाटकातील नाटकातले हे प्रसंग प्रेक्षकांना खूप भावले. दुसरा फायदा हा झाला की सर्व कलाकारांची भूमिकेची लांबी समान झाली. अगदी सामान्य दूतापासून ते कृष्णापर्यंत सगळ्यांची अभिनय करण्याची लांबी दीड तास झाली. त्यामुळे आपोआपच रंगमंचावर एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हायची. मला या नाटकाच्या दिग्दर्शनावेळी आलेला मस्त अनुभव म्हणजे, लिहिताना नुसतंच कंसात लिहून ठेवलेले प्रसंग उदा. भीष्मांचा मृत्यू होतो, परशुराम कर्णाला शाप देतात, द्रोणाचा मृत्यू, जयद्रथाचा वध इत्यादी प्रसंग समोरील सोळा कलाकारांत, बारा बाय बाराच्या चौथरा आणि आसपासच्या जागेत काही पात्र त्या त्या प्रसंगातील भूमिकेत आणि काही पात्र ‘बघे’ या भूमिकेत. पात्रांच्या विविध हालचाली, संरचना करून नाटक वाचताना जसे प्रसंग दिसले तसेच साकार करता आले आणि प्रेक्षकांनाही ते खूपच भावले. नाटकादरम्यान केवळ एकाच रथचक्राचा भीष्म आणि कर्ण यांच्या प्रसंगातील वापर मला स्वत:लाच आवडून गेला. श्यामपट उभं करत असताना प्रयोगाला पाच-सहा दिवस राहिले होते तरी मला मनासारखा शेवट सुचत नव्हता. मनात सारखा ‘काळाचा पडदा पडला’ वगैरे असं काहीतरी येत होतं. पण रंगमंचावर ते कसं दिसणार हे सुचत नव्हतं आणि तालमीच्या एका संध्याकाळी मनातला विचार शब्दश: प्रत्यक्षात आला. प्रसंग असा उभा केला, भीम दुर्योधनाला मारतो, रंगमंचावर कौरवांची प्रेतं पडली आहेत, महाभारत संपत आलं आहे, व्यास आणि गणपती दोघेजण मागून एक मोठा काळा पडदा रंगमंचावर पसरतात, सर्व पात्रांच्या अंगावरून बाहेर फक्त कृष्ण, व्यास आणि गणपती उरतात. ते दृश्य दिसायलाही फार छान दिसायचं. अश्वत्थामा मात्र त्या पडद्याच्या खाली हालचाल करत राहायचा. बाहेरून एखाद्या हार्टबीटसारखं वाटायचं. संपूर्ण प्रसंगाला एका ठेक्यात ढोल वाजवून हार्टबिटसारखंच पार्श्वसंगीतही योजलं. सगळ्यात शेवटी कृष्ण चौथºयाच्या मध्यभागी उभा राहायचा आणि पडद्याखालील सगळे जण हळूहळू उभं राहायचे, जणू कृष्णाच्या मागे काळाचा डोंगर उभा राहिलाय असं वाटावं. नाटकाचे प्रयोग व्हायला लागले आणि मी कधी विंगेतून किंवा प्रेक्षकांच्या शेवटच्या रांगेतून सादरीकरण बघायचो, तेव्हा एकट्यानं मनाच्या रंगमंचावर पाहिलेल्या सादरीकरणाच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळायचा. (क्रमश:)
(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)