...तर गोदावारीच्याच दशक्रियेची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 08:11 AM2018-12-16T08:11:00+5:302018-12-16T08:15:01+5:30
आपल्या नद्या, आपले पाणी : गेल्या उन्हाळ्यात नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पाण्यात फार मोठी घट झालेली दिसली. अनेक जागी नदीत जे काही पाणी उरले होते ते हिरव्यागार शेवाळाने भरलेले होते. नंतर जुलै महिन्यात थोडा पाऊस पडल्यावर नदीच्या पाण्यात थोडी वाढ झाली; पण तरीही ते पाणी स्वच्छ नव्हते. नांदेडमधील गोदावरी नदीच्या शुद्धतेबद्दल दहा वर्षांपूर्वी नांदेडच्या सायन्स कॉलेजमधील प्रा. बनसोडे आणि इतर चार संशोधकांनी एक शोधनिबंध प्रकाशित केलेला आहे.
- प्रा. विजय दिवाण
नांदेड शहरातील वेगवेगळ्या घाटांवर होणाऱ्या अंत्यसंस्काराचे शेष, लोकवस्त्यांतून वाहून येणाऱ्या गटारींचे आणि नाल्यातील सांडपाणी, अनेक हॉस्पिटलमधून नदीपात्रात टाकला जाणारा जैविक कचरा, कत्तलखान्यांमधून वाहून येणारी रक्ता-मांसाची घाण, शहरातील छोट्या-मोठ्या उद्योगांमधून निघणारे दूषित सांडपाणी, या साऱ्या गोष्टी गोदावरीच्या पात्रातच सोडल्या जात असतात. या कचऱ्यामुळे नांदेड परिसरात गोदावरीचे पाणी अत्यंत प्रदूषित होत असून, त्या पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे आणि ते पाणी पिण्यालायक राहिलेले नाही, असा निष्कर्ष त्या वैज्ञानिकांनी काढला होता. गोदावरी नदी उगमानंतर ज्या नाशिक, पैठण यासारख्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणांवरून वाहते तिथेही या नदीचे प्रदूषण कसे होते हे आपण यापूर्वीच्या लेखात पाहिले होते. या प्रदूषणाबाबत झालेल्या संशोधकाची त्वरित दखल घेतली जाऊन गोदावरीची ही दुरवस्था सुधारण्याचे प्र्रयत्न शासन पातळीवरून व्हावयास हवे होते; पण दुर्दैवाने त्याबाबत वर्षानुवर्षे काहीही हालचाल झालेली दिसत नाही.
महाराष्ट्रातून निघणारी गोदावरी नदी नांदेडच्या पुढे तेलंगणा राज्यात प्रवेश करते. गतवर्षी तेलंगणात ‘पुष्करुलू’ महोत्सव साजरा झाला. तिथेही दुष्काळ आणि अवर्षणामुळे गोदावरीत पाणी नव्हते. मग गोदावरीच्या नदीपात्रानजीक अनेक कूपनलिका खोदल्या गेल्या आणि या सर्व कूपनलिकांचे पाणी नदीकाठच्या उंच टाक्यांत भरून त्याखाली ओळीने अनेक शॉवर्स बसविली गेली आणि मग त्या शॉवर्सखाली स्नान करून हजारो भाविकांनी ‘गंगास्नानाचे’ पुण्य कमावले. नदीला ‘पवित्र’ मानून पुण्य मिळविण्यासाठी किंवा पापक्षालनासाठी नदीमध्ये स्नान करणे हे आमच्या धर्मसंकारामध्ये महत्त्वाचे मानले जाते; पण ती नदी स्वच्छ राखणे किंवा त्या नदीच्या पाण्याचे स्रोत अबाधित राखणे या गोष्टींना मात्र त्यात कुठेही थारा नसतो. त्यामुळे ‘दक्षिणगंगा’ गोदावरी जशी प्रमाणाबाहेर प्रदूषित झालेली आहे, तसे तिचे पाणीही वरचेवर कमी होऊ लागले आहे.
दिल्लीच्या आय.आय.टी.चे एक संशोधक डॉ. अश्विनीकुमार गोसावी यांनी गोदावरीसकट देशातील बारा नद्यांचा साद्यंत अभ्यास केला आहे. त्यांनी असे नमूद केलेले आहे की, जागतिक उष्मावाढ आणि टोकाचे हवामान बदल यामुळे गोदावरी नदीचे पाणी आता घटू लागलेले आहे. या गोष्टीस श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटनेही दुजोरा दिलेला आहे. गोदावरी खोऱ्याच्या नाशिक ते पैठण भागात पूर्वी एकूण १९६ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध आहे, असे मानत असत; पण २००४ मध्ये जलसंपदा विभागाच्या एका अभ्यास गटाने काढलेल्या निष्कर्षानुसार आता नाशिक-पैठण भागातील गोदावरीची जलउपलब्धता ४२ अब्ज घनफुटांनी कमी होऊन आज केवळ १५४ अब्ज घनफूट एवढीच राहिलेली आहे. परिणामी, जायकवाडी धरणाच्या खालच्या भागात वाहणाऱ्या गोदावरीची जल उपलब्धताही त्या प्रमाणात कमी झालेली आहे.
या गोदावरी नदीवर अथपासून इथपर्यंत लागोपाठ उभे राहिलेले धरण प्रकल्प, नदीपात्रात वेगाने वाढणारे गाळाचे प्रमाण, या नदीपात्रात सर्वदूरपर्यंत कमी होत जाणारी जलउपलब्धता, उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत होणारे नदीचे प्रदूषण आणि या गोष्टींमुळे आंध्र प्रदेशात गोदावरी जिथे समुद्रास मिळते त्या नरसापुरम गावाजवळच्या त्रिभुज प्रदेशात होणारे घातक बदल या समस्त कारणांनी गोदावरी नदी क्षयग्रस्त झालेली आहे. अनादिकाळापासून पवित्र मानल्या गेलेल्या गोदावरीमातेची याच पद्धतीने परवड होत राहिली, तर एक न एक दिवस खुद्द गोदावरीचीच दशक्रिया करण्याची पाळी आपल्यावर येईल, यात शंका नाही.
( vijdiw@gmail.com )