..तो एक क्षण!

By admin | Published: January 16, 2016 01:21 PM2016-01-16T13:21:23+5:302016-01-16T13:21:23+5:30

घागर हातात घेऊन नदीत उभा असलेला कलाकार करतो तो रियाझ. सागरात उभा कलाकार करीत असतो ती साधना ..जिला काहीही साध्य करायचे नसते आणि जी कधीच साध्य होत नाही ती साधना! काहीही मागणो नसलेली, नि:संग. पण त्या टप्प्यावर जाण्यासाठी आधी रियाजातून जावेच लागते. आणि हा रियाज म्हणजे फक्त एक पलटा हजार वेळा घोटणो एवढाच नसतो..

..then a moment! | ..तो एक क्षण!

..तो एक क्षण!

Next
>- तालयोगी पंडित सुरेश तळवलकर
 
 
स्वरांचा एक पलटा शंभर वेळा वाजवला किंवा गायला की तो पाठ होतो, तोच पाचशे वेळा गायला तर तो आयुष्यात कधीही विसरला जात नाही; पण हजार वेळा तो घोटला तर त्याला तेज प्राप्त होते, असे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर नेहमी म्हणत. संगीत रंजक असते, मधुर असते, सुरेल आणि गाता-गाता भान हरपून स्वत:ला विसरून जावे असेही असू शकते. पण डोळ्यांना न दिसणा:या आणि फक्त कानावर पडणा:या स्वरांना तेजही असते? कोणाला दिसते ते? तानपुरा कानाशी लावून डोळे बंद करून गात असलेल्या गायकाला, कीसमोर बसलेल्या श्रोत्यांना? कसे असते ते? डोळे दिपवून टाकणारे, की त्या स्वरांचे आजवर न दिसलेले अंधारे कोपरे आपल्या प्रकाशात उजळून टाकणारे? हे तेज आकाशात क्षणभर चमकून नाहीशा होणा:या विजेचे, की संथपणो प्रकाश देत राहणा:या ज्योतीचे? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळत असतात ती कलाकाराच्या रियाजामध्ये. त्याने निश्चित केलेल्या त्याच्या उद्दिष्टामध्ये. 
रियाज कशासाठी? नदीवर जाऊन घागरभर पाणी मिळवण्यापुरते पाण्यात उतरायचे, की दोन्ही किनारे सोडून त्या वाहत्या पाण्यात स्वत:ला झोकून अखंड त्या प्रवाहाबरोबर जात राहायचे, भिजत राहायचे? 
- या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक कलाकाराने जरी जाहीरपणो दिले नाही तरी त्याच्या कलेतून ते व्यक्त होत असते. घागर की त्यापलीकडे असलेला अथांग सागर हे तो कलाकारच आपल्याला त्याच्या कलेतून सांगत असतो.! 
घागर हातात घेऊन उभा असलेला कलाकार रियाज करीत असतो, तर सागरात उभा असलेला कलाकार करीत असतो ती साधना. रसिकांचा अनुनय, त्यातून मिळणारी लोकप्रियता, मैफलींची आमंत्रणो, पुरस्कार, राजमान्यता हे सगळे त्या घागरीत मावणारे आणि त्यामुळेच मिळणारे. लौकिकदृष्टय़ा समृद्ध करणारे. आणि हवेहवेसे. ते मिळवण्याची आकांक्षा धरणो हे अगदी रास्तच आहे. पण त्यात नसलेले असे काही त्या सागरात उरतेच. त्याच्या तळाशी दडलेले. तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग मात्र फक्त साधनेचा. 
- अशा साधनेतून काय लागते हाती? फक्त एक क्षण. असा क्षण ज्यावेळी वाटते, ‘व्वा, काय चोख, निखळ स्वर लागला आज..’ किंवा ‘काय सुंदर स्थिर झाली आज लय’ एवढेच. चिमटीत अजिबात न पकडता येणारा पण मन भरून उरणारा आनंद.! कोणत्याही लौकिकाचा जराही स्पर्श नसलेला असा. 
खूप जुनी आठवण आहे ही. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांची. मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला डग्गा घेऊन ठेका धरायला सांगितला आणि तानपुरा घेऊन यमन सुरू केला. जेमतेम अर्धा-पाऊण तासच गायल्या असतील त्या. मी आजवर साथीच्या निमित्ताने ग्वाल्हेर, आग्रा, किराणा एवढेच नाही तर माई ज्या जयपूर घराण्याच्या आहेत त्या जयपूर गायकीचाही यमन अनेकदा ऐकला होता. फक्कड जमलेले काही यमन माङया स्मरणात पक्के ठसले होते. पण मी माईंकडून जो यमन ऐकत होतो तो आजवर ऐकलेल्या सगळ्या यमनपेक्षा अगदी वेगळा, अनोळखी आणि अद्भुत होता. स्वरांच्या त्या रेखीव आकृती, त्यातील जोम तरीही कमालीची लवचिकता, मांडणीचा डौल, लयीशी सुरू असलेला घरंदाज नखरा सगळेच असे काही जमून आले होते की प्रत्येक क्षणाला चकित व्हावे. 
‘अरे, गेले पाच सहा महिने हा यमन मला खुणावत होता. आज तू आल्यावर गाऊन बघितला एवढंच..’  
- तानपुरा खाली ठेवता ठेवता माई म्हणाल्या. 
गाणो सुरू करण्यापूर्वी कमालीची थकलेली दिसणारी, अंगा-खांद्यावर वाकलेली ऐंशी वर्षाची ही बाई आजकाल आवाज साथ देत नाही म्हणून कुरकुर करीत होती. पहाटे-पहाटे चार-दोन कोवळे सूर्यकिरण अंगावर उतरताच बागेतल्या सगळ्या मोग:याच्या कळ्या एकदम उमलाव्या तसे कानाशी तानपुरा घेताच त्यांच्या मनात रु जून असलेल्या यमनच्या सगळ्या कळ्या उमलल्या आणि एक घमघमता यमन माङया समोर आला. तो रियाजातून आलेला नव्हता, त्यामागे होती साधना. 
..जिला काहीही साध्य करायचे नसते आणि जी कधीच साध्य होत नाही ती साधना! काहीही मागणो नसलेली, नि:संग. पण त्या टप्प्यावर जाण्यासाठी आधी रियाजातून जावेच लागते. आणि हा रियाज म्हणजे फक्त एक पलटा हजार वेळा घोटणो एवढाच नसतो.. 
संगीत, नृत्य, वाद्यवादन असा कोणताही रियाज हा चार पातळ्यांवर करावा लागतो. शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा. त्या कलेचे तंत्र अचूक मांडण्यासाठी शरीर लागते. स्वर म्हणण्यासाठी  गळा आणि ठेका धरण्यासाठी हात तर हवेतच ना.! कलेत जे शास्त्र, विद्या असते ते व्यक्त करण्यासाठी बुद्धी लागते. गुरूंनी शिकवलेल्या एखाद्या पलटय़ावर विचार करून आपला नवा पलटा तयार करायचा तर बुद्धी हवीच आणि जर त्या रियाजात मन नसेल तर कलेतील भाव न उमटता ती कला फक्त बौद्धिक कसरत होऊ शकते. 
कलेच्या बाबतीत आणखी एक मेख आहे ती कलेच्या शिक्षणाची. हे शिक्षणही चार पातळ्यांवर असते. कलेतील शास्त्र समजावले जाते, तंत्र शिकवले जाते. त्यात जी विद्या अंतर्भूत आहे ती दिली जाते आणि त्या कलेचे संस्कार केले जातात. हा प्रवास ठोस गोष्टींकडून सूक्ष्म, अव्यक्त गोष्टींकडे जाणारा. एखाद्या रागाचे आरोह-अवरोह आणि त्याचे चलन हे त्याचे शास्त्र असते, तर ते स्वर कसे नेमके लावायचे ते शिकणो हे तंत्र असते! त्या रागाचा स्वभाव, त्याचे जवळच्या इतर रागांशी असलेले नाते हे विद्या आपल्याला सांगते.. पण तो राग बैठकीत मांडण्यासाठी लागतात ते संस्कार. गुरूने केलेले. त्यातील सौंदर्य केव्हा समजते?- तर तो राग गुरू प्रत्यक्ष गाऊन दाखवतात तेव्हा. हे सौंदर्य समोर बसलेल्या शिष्याला टिपावे लागते आणि सांभाळून ठेवावेही लागते. 
या सगळ्या प्रवासाची मजा म्हणजे यात हातात पेन्सिल देऊन लिहून-वाचून काहीच शिकवता येत नाही. सगळे काही गुरु मुखातून प्रात्यक्षिक दाखवतच शिकावे लागते. कलेला अधिकाधिक सुंदर करणा:या वाटा गुरू रोजच्या रोज त्याच्या शिकवण्यातून, रियाजातून दाखवत असतो. सावधपणो त्या बघत असताना आपली नवी वाट आपल्याला दिसू लागणो, सुचू लागणो हा क्षण कलाकार म्हणून आपल्या जन्माचा.! पण एकदा हा जन्म झाला म्हणजे कळा संपल्या असे मात्र होत नाही.! मग खरी खडतर वाट सुरू होते. आता वेगळीच आव्हाने समोर असतात. एक- गुरू कलेकडे बघण्याची जी नजर देतो ती नजर अधिक तेज करण्याची, तेज ठेवण्याची आणि दुसरे- सगळे काही समजले या अहंकारापासून स्वत:ला सतत दूर ठेवण्याची..  
असा अहंकाराचा वारा जरा जरी जवळ फिरकला तरी स्मरण करावे ते जगाकडे पाठ फिरवून फक्त साधनेत बुडालेल्या कलाकारांचे. 
अशा वेळी मला आठवण येते ती लयभास्कर खाप्रुमामा पर्वतकर यांची. एकाच वेळी दोन हातांनी दोन वेगवेगळे ताल, दोन पायांनी दोन वेगळे ताल असे एकूण चार ताल देत ते तोंडाने पाचव्या तालाची पढंत करीत..! घागरीच्या पलीकडे असलेला सागर इतका अफाट आहे..
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे

Web Title: ..then a moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.