'ते' आणि 'आपण'

By admin | Published: October 18, 2014 12:53 PM2014-10-18T12:53:29+5:302014-10-18T12:53:29+5:30

‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा कोरियात भरणारा आशियातला सर्वांत मोठा महोत्सव! त्याला कौतुकाने ‘आशियाचा कान महोत्सव’ असंही म्हटलं जातं. असा चित्रपट महोत्सव आपल्याकडेही भरतो; परंतु तिथल्या आयोजनातील सफाई, कल्पकता, नियोजन या सार्‍या गोष्टी उजव्या ठरतात. त्याविषयी..

'They' and 'you' | 'ते' आणि 'आपण'

'ते' आणि 'आपण'

Next

- अशोक राणे

 
'त्या मुली पाहिल्यास? बघ कशा आपापल्या जगात एकेकट्या रमल्यात..’’ पलीकडे बसलेल्या मुलींच्या दिशेने माझं लक्ष वेधीत माझा कोरियन मित्र  हे सांगत होता. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्टीसाठी आम्ही आलो होतो. हॉटेलच्या लाऊंजमध्ये बसलो होतो. मी पाहिलं, समोर एकाच सोफ्यावर चौघी बसल्या होत्या. जवळपास खेटूनच. प्रत्येकीच्या हातात मोबाईल होता. नजर मोबाईलच्या स्क्रिनवर आणि दोन्ही हाताची बोटे की पॅडवर सराईतपणे आणि एका वेगात फिरत होती. मधूनच एखादीच्या चेहर्‍यावर हसू, आश्‍चर्य, राग असं काही काही दिसत होतं. 
‘‘इथे पुसानमध्येच नाही तर सोलमध्ये गेलास, अगदी कोरियात कुठेही गेलास तर सर्वत्र सर्व ठिकाणी तुला हेच दृश्य दिसेल. मोबाईलमध्ये ही तरुण मुलं-मुली इतकी गुंतलेली असतात, की त्यांना आसपासच्या जगाचं सोड, मित्रमैत्रिणींचं, कुटुंबीयांचंही भान नसतं.’’ 
मी फक्त हसलो. त्याच्या चेहर्‍यावर बुचकळ्यात पडल्यासारखा भाव होता. मग मी म्हटलं, तुला वाटतं तसं हे केवळ तुझ्या कोरियातच दिसणारं दृश्य नाही. या घडीला जगात कुठेही गेलास तर सर्वत्र तुला हेच दृश्य दिसेल. धिस इज वर्ल्ड फिनोमिना.! 
आता त्याने सहमती दर्शविल्यासारखी मान हलवली. मला आरंभी आश्‍चर्य का वाटलं नाही, हे मी मग त्याला सांगितलं. कारण मोबाईल फोन हा हल्लीच्या पिढीच्या शरीराचा एक भाग; नव्हे त्यांचा सर्वांत महत्त्वाचा अवयव झालाय हे ठळकपणे दिसून येतच आहे. त्यातून ज्या दिवशी रात्री मी कोरियातील पुसानला जाणारं विमान पकडलं त्याच दिवशी मी माझा मित्र डॉ. आनंद नाडकर्णी याच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ (आय.पी.एच.) द्वारा आयोजित मनतरंग चित्रपट महोत्सवात एक शॉर्टफिल्म पाहिली होती. 
फिल्म सुरू होते आणि गाढ झोपलेला तरुण मुलगा दिसतो. हळूहळू त्याला जाग येते. अर्धवट जाग आलेल्या अवस्थेत कश्याबश्या आळसावलेल्या हालचाली करताना तो पहिली गोष्ट शोधतो, तो म्हणजे स्वत:चा मोबाईल. तो हाताशी येताच प्रथमच डोळे उघडतो आणि पाहतो काय तर मोबाईलचा स्क्रिन..आणि मागोमाग त्याची बोटं की पॅडवर फिरू लागतात. मेसेजेस पाहत, रिप्लाय करीतच तो बेडवरून उठतो. तसाच बाथरूममध्ये शिरतो. मोबाईल हातात ठेवून हाताची कसरत करीत ब्रशवर पेस्ट घेतो, कसेबसे चार रट्टे दातांवर मारतो. कशीबशी चूळ भरतो. दरम्यान चॅटिंग वगैरे सुरूच आहे. असाच उलटा प्रवास करीत हॉलमध्ये येतो. आजोबा ब्रेकफास्टची आठवण करतात. हा मान हलवूनच उत्तर देतो. आरशासमोर उभं राहून विविध प्रकारच्या पोझेस घेत सटासट फोटो काढतो. सलमान छाप पोझेस देताना हाडकुळे दंड आणि छातीवरच्या एकूण एक बरगड्या दिसतात. पण महाराज आपल्या दिसण्यावर सॉलिड खूश. मग एक फोन करतो आणि मित्राला सांगतो, 
‘‘यार मला दीडशे लाइक्स आले.’’ 
माझा कोरियन मित्र आता अर्थपूर्ण हसला. परंतु त्याच्या निरीक्षणात जशी काहीशी एक प्रकारची तक्रार होती, तशी मी मात्र केली नाही.  ‘सास भी कभी बहु थी’ या न्यायाने पोराबद्दल नाराजी व्यक्त करणारा बापही कधी तरी तरुण असतोच. मी हेच समजून घेण्याचा प्रयत्न करीत आलो आणि म्हणून माझी त्या मुलींबद्दल फारशी तक्रार नव्हती. प्रत्येक पिढी तरुण असताना नवनव्या गोष्टी, फॅशन्स येत असतात आणि ती ती पिढी त्यात उत्साहाने रमलेली असते. त्यामुळे ‘काय ही आताची पोरं’ असा सूर लावण्यात अर्थ नसतो. याला आणखीही एक बाजू आहे आणि ती म्हणजे, या वावटळीतही काही पोरं आपापल्या खुंट्या घट्ट धरून असतात. आपापलं व्यक्तिमत्त्व जपून असतात. आपापल्या सुरात आपापलं बोलत असतात. आपापले आविष्कार घडवत असतात.. आणि त्याचाही प्रत्यय लगेचच आला. मी ज्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कोरियाला आलो होतो, त्याच महोत्सवात अशी वेगळी आपापलं अस्तित्व अधोरेखित करणारी  ‘पोरं’ माझ्या नजरेस पडली होती. ती होती महोत्सवाच्या ‘न्यू करंट्स’ या विभागातील दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ वगैरे वगैरे. वर म्हटल्याप्रमाणे आताच्या मोबाईल वावटळीला पुरून उरलेली. 
‘न्यू करंट्स’ म्हणजे बुसान महोत्सवाचा मुख्य स्पर्धा विभाग! फक्त आशियाई दिग्दर्शकांच्या पहिल्या वा दुसर्‍या चित्रपटांपुरता र्मयादित असलेला! महोत्सवाच्या मुख्य ज्युरींना आणि आमच्या फीप्रेसी-म्हणजे चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या - ज्युरीला याच चित्रपटांतील उत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार द्यायचे होते. चित्रपटांची बदलती परिभाषा वापरीत काही नव्या गोष्टी ताकदीने करणारे हे आश्‍वासक दिग्दर्शक होते. त्यांची एक महत्त्वाची गोष्ट मला विशेष जाणवली आणि नोंदवावीशी वाटते. ती म्हणजे त्यांनी खूप जुनी परंपरा असलेल्या मेलोड्रामाचं बदलत आणलेलं स्वरूप! अतिशय कौतुकाची बाब आहे ही!   
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा कोरियात भरणारा आशियातला सर्वांत मोठा महोत्सव! यंदाचं त्याचं एकोणिसावं वर्ष! त्याला कौतुकाने आशियाचा कान महोत्सव असंही म्हटलं जातं. मला वाटतं याला संदर्भ त्याच्या एकूण पसार्‍याशी आणि भव्यतेशी आहे. आणि त्याअर्थाने ते खरंही आहे. नुकताच मी कान महोत्सव पाहिला होता. विषय निघालाच आहे तर एक अप्रिय वाटणारी नोंद करूनच पुढे जातो. 
भारताचा आंतरराष्ट्रीय महोत्सव गेली दहा वर्षे गोव्यात भरविला जातो. देशातल्या प्रमुख शहरात दर वर्षी फिरत राहणारा हा महोत्सव एकाच ठिकाणी आणावा आणि तोही गोव्यात आणावा, कारण कान समुद्रकिनारी आहे, गोवा समुद्रकिनारी म्हणजे गोवा कान होईल! दहा वर्षे झाली; परंतु अजूनही कुणी गोव्याला भारताचं कान म्हणत नाही. म्हणणार नाही. 
याचं कारण म्हणजे समुद्रकिनारा असून भागत नाही. त्यासाठी इतर बरंच बरं काही लागतं. मुख्य म्हणजे तशी भव्यदिव्य संकल्पना लागते. दूरवरचं पाहण्याची दृष्टी लागते. काही जण असंही म्हणतात, की कानसारखं बजेट आपल्याला मिळत नाही. ते काही पुरेसं पटणारं नाही. मुळातच सर्वप्रथम संकल्पना आणि दृष्टी महत्त्वाची! 
कानने साठी ओलांडली. बुसान पुढल्या वर्षी वीस वर्षांचा होईल. परंतु भव्यतेत बरंचसं साम्य! मुख्य म्हणजे कार्यक्रमात तीच कल्पकता! आयोजनात कमालीची सफाई! आणि मुख्य म्हणजे महोत्सवाच्या सबंध वातावरणात एकप्रकारची विलक्षण आपुलकी! आत्मीयता! परदेशी जाणार्‍यांना तिथलं सगळंच चांगलं दिसतं आणि मग सार्‍या देशी गोष्टींना ते नावं ठेवतात, असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यात अजिबात तथ्य नाही असं मी म्हणणार नाही. परंतु मी हा प्रकार कधी केला नाही. गेल्या वीस वर्षांत परदेशातल्या एवढय़ा महोत्सवांना मी गेलोय; परंतु किंचितही कुठे कसली गैरव्यवस्था मी अनुभवलेली नाही. आपला भारतीय चित्रपट महोत्सव लवकरच पन्नाशी गाठेल. परंतु अजूनही महोत्सवाचा कॅटलॉग महोत्सव सुरू झाल्यावरही चार चार दिवस मिळत नाही. पत्रकार आणि प्रतिनिधींना कुठले चित्रपट पाहावेत ठरवता येत नाही आणि मग ते ‘तुम्ही म्हणजे चालते बोलते संदर्भग्रंथ’ म्हणत आम्हा सिनिअर्सभोवती जमतात. असला गलथानपणा आपण कायम करत आलोय. कुणी काही म्हणा, ‘ते’ आणि ‘आपण’ हा फरक आहेच. कुठल्याही गोष्टीसाठी पैसा लागतो. पैशाचं महत्त्व नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु इतरही अशा काही गोष्टी सहज करता येतात. त्या करण्याची इच्छाशक्ती मात्र हवी. 
बुसान महोत्सवात ‘गाला प्रेझेन्स्टेशन’ या विभागात जागतिक सिनेमातील ज्येष्ठांचे चार, ‘अ विंडो ऑन एशियन सिनेमा’ यात ५६, न्यू करंट्स या स्पर्धा विभागात १२, कोरियन सिनेमा टुडेमध्ये ३१, ‘कोरीयन सिनेमा रेट्रोस्पेक्टिव्ह’ आणि ‘आर्कियोलोजी ऑफ कोरियन सिनेमा’मध्ये ९, ‘वर्ल्ड सिनेमा’मध्ये ५३, ‘फ्लॅश फॉरवर्ड’मध्ये ३५ शिवाय ‘वाईड अँगल्स’, ‘ओपन सिनेमा’, ‘फोकस ऑन जॉर्जियन सिनेमा’, ‘फोकस ऑन टर्कीश सिनेमा’, ‘मिडनाईट पॅशन’ अशा विविध विभागांतून जागतिक चित्रपटांची लयलूट होती. याशिवाय मग विविध विषयांचे चर्चासत्र, विशेष व्याख्याने, मास्टर क्लास असं बरंच बरं काही. बुसानने आणखी एक  वाखाणण्याजोगी गोष्ट केली आणि ती म्हणजे एशियन सिनेमाचं केंद्र निर्माण केलं. जागतिक पातळीवर आशियाई चित्रपटांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. शिवाय नवीन दिग्दर्शकांसाठी भांडवल पुरविण्याची व्यवस्था निर्माण केली.. आणि हे सारं कमी की काय म्हणून २0१७ ला ते आशियाई फिल्म स्कूल सुरू करीत आहेत. महोत्सवाचं मुख्यालय म्हणून भव्यदिव्य बुसान फिल्म सेंटर आहेच; परंतु या स्कूलसाठी ते नवी इमारत उभी करीत आहेत. त्याच्या जय्यत तयारीला सुरुवात झालीय. इतकंच काय मुंबईत परतल्यानंतर मी दुसर्‍या दिवशी त्यांची वेबसाईट पाहिली तर यंदाच्या पाहुण्यांचे आणि तमाम चित्रपट रसिकांचे आभार मानून मंडळी पुढल्या वर्षीच्या तयारीला लागलीसुद्धा! ‘ते’ आणि ‘आपण’ फरक आहे तो असा.! 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे 
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)

Web Title: 'They' and 'you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.