गाठी सुटतात त्याची गोष्ट..

By admin | Published: June 10, 2016 04:07 PM2016-06-10T16:07:01+5:302016-06-10T16:09:23+5:30

गप्पांच्या एका अड्डय़ात नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त वाहत गेलेल्या गप्पा. पुरुष बायकांच्यात काय बघतात, ते जगजाहीर आहे; पण स्त्रिया पुरुषांच्यात नक्की काय बघतात, असा गहन विषय चर्चेला

The thing that bells are missing ... | गाठी सुटतात त्याची गोष्ट..

गाठी सुटतात त्याची गोष्ट..

Next

मेघना भुस्कुटे

(लेखिका ‘ऐसी अक्षरे या संकेतस्थळावरील ‘पॉर्न ओके प्लीज’ या विशेषांकाच्या संपादक आहेत.)
 
‘ऐसी अक्षरे’ या मराठी संस्थळाने  
‘पॉर्न ओके प्लीज’ 
या शीर्षकाचा विशेष अंक 
नुकताच प्रसिद्ध केला. 
एका चौकटीबाहेरच्या विषयाला 
गंभीर मोकळेपणाने हात घालण्याच्या 
प्रयत्नांची ही कथा.
 
गप्पांच्या एका अड्डय़ात नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त वाहत गेलेल्या गप्पा. पुरुष बायकांच्यात काय बघतात, ते जगजाहीर आहे; पण स्त्रिया पुरुषांच्यात नक्की काय बघतात, असा गहन विषय चर्चेला. 
अतिशय जवळच्या मित्रंचा गट. त्यामुळे संकोच असे नव्हते. तरीही काही विषयांबद्दल मोकळेपणी बोलणं जड जातं, हे लक्षात आल्यामुळे आम्ही सगळे जण थोडे अंतर्मुख झालेलो. अशा भारित वातावरणात  ‘पॉर्नवरच काढायचा का पुढचा विशेषांक?’ असा बॉम्ब भिरकावला गेला आणि मधोमध पडलेल्या त्या स्फोटक आणि आकर्षक वस्तूकडे आम्ही सगळे जण चकित होऊन बघत राहिलो! 
पुढचे अनेक महिने आम्ही जमेल तिथून जमेल ते ते गोळा करून आमच्या सामाईक पोतडीत जमा करत होतो. ब-याच कल्पना प्रत्यक्षात येणं शक्यच नव्हतं. शिवाय आजूबाजूला संदर्भसंपृक्त आणि आठय़ाळ-अभ्यासू माणसांची संख्या पुरेशी असल्यामुळे प्राचीन वाड्मयातल्या (आणि सत्यकथाकालीन साहित्यातल्या) अनेक संदर्भांचा खचच पायांशी पडत चाललेला होता. हळूहळू भंजाळायला व्हायला लागलं. 
पिवळी पुस्तकं म्हणजे पॉर्न ही सरधोपट व्याख्या होती. पण मग कामसूत्र? त्याला पॉर्न म्हणणं म्हणजे आपल्या थोरथोर संस्कृतीचा अपमान तर होताच; पण अगदी खरं सांगायचं तर त्याला पॉर्न म्हणणं पटतही नव्हतं.  ‘सरकाय लेओ खटिया’ नक्की पॉर्नोग्राफिक, पण मग ‘प्रेमजोगन बन गयी’मध्ये दिलीपकुमार-मधुबाला जे काही करतात, ती काय शुभंकरोति आहे का काय, असाही रोखठोक सवाल. भरीस भर म्हणून फूड पॉर्न आणि सॉफ्ट पॉर्न यांच्यासारख्या नव्यानंच कॉईन झालेल्या संज्ञा. त्यांना या कामजीवनाच्या चौकटीत नक्की कुठे बसवायचं होतं? गोंधळ - नुसता गोंधळ.
त्यातून वाट काढण्याच्या प्रयत्नात असताना एका निराळ्याच गोष्टीमुळे वीज चमकली. एका मित्राशी सहजच गप्पा सुरू होत्या. त्याचे आईबाप त्याला लग्नावरून कटकट करत होते आणि तो अपरंपार वैतागलेला होता; त्याबद्दलच्या युनिव्हर्सल गप्पा. तो बोलता बोलता वैतागून म्हणाला, ‘लग्न करणं सालं सोयीचंच असतं बघ. बाकी काही नाही तरी लॉजिस्टिक्स म्हणून ते स्वस्त पडतंच. बाजारानं केलेली सोयच आहे ती. उगाच का होमोसेक्शुअॅलिटीला समाजाचा इतका विरोध असतो? करणारच ते विरोध, कारण त्यातून बाजाराला काही फायदा नसतो!’  
या मार्क्‍सवादी दृष्टिकोनानं मी चमकले. संस्कृतीच्या नि धर्माच्या आणि परंपरेच्या वेष्टनात गुंडाळलेली लग्नासारखी गोष्ट बाजाराला सामील? हे काहीतरी खोलात जाऊन विचार करण्यासारखं होतं नक्की. बाजाराला वाढती तोंडं आवश्यक असतात. ती कोण पुरवतं? लोक. धर्मालाही वाढते अनुयायी आवश्यक असतात. ते कोण पुरवतं? लोक. लोकांना अधिकाधिक वस्तू, त्यातून मिळणारा आनंद आणि या आनंदाला सर्टिफाईड मान्यता देणारी एक व्यवस्था हवी असते. हे सगळं त्यांना कोण पुरवतं? बाजार आणि धर्म. परिणामी त्यांना बाजार आणि धर्म आवश्यक. या तिन्हीच्या मुळाशी आपली आदिम कामप्रेरणा - वासना - भूक. काय हवं ते म्हणा. अधिक भोग घ्या, अधिक प्रेम करा, अधिक भोग घ्या, लोकसंख्या वाढवा, अधिक भोग घ्या, अधिक वस्तू खरेदी करा, अधिक असंतुष्ट व्हा, अधिक धर्मशरण व्हा.. या व्यवस्थेला जे जे आव्हान देतील, ते ते शासनास लायक. समलिंगी लोक, प्रस्थापित धर्माविरुद्ध आवाज करणारे ख्रिस्तासारखे वा तुकारामासारखे संन्यासी लोक, थोरोसारखे बाजार नाकारू बघणारे लोक नेम इट अॅण्ड यू हॅव इट. विरोध होणारच. ते या व्यवस्थेला आवश्यकच आहे!
एखाद्या जगड्व्याळ स्वयंचलित यंत्रच्या साक्षात्कारानं व्हावं, तसं मला एकदम विश्वरूपदर्शन झालं. पॉर्न या गोष्टीच्या सर्वंकष व्यापकतेचं दर्शन घडून गोंधळ सुटायला सुरुवात झाली ती तेव्हापासून. मग चराचराचं भोग्य वस्तूत रूपांतर करणारं पॉर्न  दिसायला लागलं. अन्न, मनोरंजन, वस्त्रं, निवारा - काही काही त्यातून सुटलेलं नव्हतं. सगळ्याचं उद्दिष्ट जणू एकच - अधिक भोग घ्या, अधिक भोग घ्या..
भोगाच्या लालसेला खतपाणी घालतं, ते ते पॉर्न हे नक्की झालं. पॉर्नचा विचार करताना अश्लीलता या महत्त्वाच्या संकल्पनेला टाळून पुढे जाणं शक्यच नव्हतं. अश्लीलतेचा अर्थ आपण पटकन कशाशी जोडतो? कामुकता, नग्नता, लैंगिकता. तो तसा जोडणं रास्त आहे की नाही, हे पुढे बघू. पण या संकल्पनाही अस्पश्र्य राहणं शक्य नव्हतं तर. म्हणजे अश्लील साहित्याबद्दलचे सगळे गाजलेले खटले विषयचौकटीत सामील. इथे तेंडुलकर आठवणं अपरिहार्य होतं.   ‘काहीही आपत: चूक वा बरोबर नसतं. 
जे जे कलाकृतीला अनावश्यक, ते ते अश्लील’ ही त्यांनी कुठेशी केलेली चोख व्याख्या मदतीला आली आणि कामव्यवहार मूलत: अश्लील नाही, हे नक्की झालं. तो जेव्हा अनावश्यकरीत्या भोगप्रधान असेल, तेव्हा तो अश्लील होईलही; पण तोवर त्याला आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. 
प्राचीन भारतीय वा्मयातली कामुकता आणि खजुराहोसदृश नि:संकोच अभिव्यक्ती एका फटक्यात या पॉर्न-लेबलाच्या जोखडातून मुक्त झाली. 
 शेवटी डोक्यातल्या चौकटी स्वच्छ रेखून घेण्याचाच प्रश्न होता. तो सुटला आणि माङया - आमच्या डोक्यातली शृंगाराभोवती असलेली उगाच-गाठ सुर्रकन सुटली..
 
पॉर्न म्हणजे नेमकं काय, ते ठरवताना..
 
पॉर्न आणि कामव्यवहार या दोन गोष्टींमध्ये अन्योन्यसंबंध आहे हे नाकारता येण्याजोगं नव्हतं. पण  पॉर्न हे काहीसं ओंगळ विशेषण विषया सारख्या सुंदर आणि जीवनानं रसरसून भरलेल्या गोष्टीसोबत जोडलं जाणं खूपतही होतं. अशा आटय़ापाटय़ा खेळताना एक त्रिकोण हाती आला -
 कोणत्याही प्रकारे लालसा उत्पन्न करणारं, तिला खतपाणी घालणारं, त्यासाठी भोगवस्तूचे गुणधर्म प्रसंगी अवास्तव करून मांडणारं आणि वेळी त्यासाठी जिवंत व्यक्तीचं वस्तुकरण करायला मागेपुढे न बघणारं - पण प्रत्यक्ष भोगाची संधी न देणारं - ते ते पॉर्न. या अर्थानं चराचराचं पॉर्नीकरण होताना लख्ख दिसतंच आहे. खाद्यपदार्थापासून शरीरापर्यंत. माध्यमांपासून मनोरंजनापर्यंत - सगळ्याच गोष्टी कमी-अधिक गतीनं ओरबाडखोर संभोगाच्या दिशेनं वाट चालू लागतात, तो हा प्रकार.
 दुसरा अर्थ कलाकृतीच्या संदर्भातला. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकर कुठेसं म्हणाले आहेत. त्या अर्थानं - कलाकृतीच्या गाभ्याला अनावश्यक असूनही जे जे निव्वळ  आणखी-आणखी अशी हाव वाढवणारं, बांडगुळासारखं जोडलेलं आहे - ते ते पॉर्न. मग ते वरकरणी सुंदर आहे की असुंदर आहे, ते इथे महत्त्वाचं नाही. 
कलाकृतीच्या बांधेसूदपणाला ते किती मारक आहे, ते तेवढं महत्त्वाचं. टीव्हीवरच्या मालिकांमधले अनेक प्रसंग, कालबाह्य असूनही नव्वदोत्तर म. म. वर्गात अचानक बोकाळलेली गदिमा-बाबूजी-भावगीतं, अजय-अतुलचं हॉलिवुडी रेकॉर्डिंग आणि त्याला मिळालेली अनाठायी प्रसिद्धी सगळंच.
 तिसरा अर्थ शृंगाराच्या संदर्भातला. जे जे शृंगाराशी संबंधित आहे, पण नागडं-उघडं आहे, अनावश्यकरीत्या असुंदर-असंस्कृत-निर्लज्ज आहे - ते ते पॉर्न. म.चा.क. (मराठी चावट कथा), बरीचशी स्लॅश-स्मट (समलिंगी आणि गोड, गुलाबी पोर्नोग्राफिक कथा) फॅनफिक्शन, पोर्नोग्राफिक चित्रफितींचा आंतरजालावरचा पूर इत्यादि.
(‘पॉर्न ओके प्लीज’ या अंकाच्या संपादकीयातून)

Web Title: The thing that bells are missing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.