गोष्टी गावाकडल्या...

By admin | Published: September 9, 2016 04:31 PM2016-09-09T16:31:33+5:302016-09-09T16:31:33+5:30

प्रिय दिल्ली, तुला गावाकडल्या गोष्टी ऐकून घ्यायची सवय नाही, असं कसं म्हणू? पण राजधानीचा साज आणि बाज उतरवून दिल्लीतून गल्लीत येण्याचं धाडस तू करणार नाहीस. हा संपूर्ण आठवडा मी गावाकडे, घराकडे आहे. हे भाग्य तुझ्या नशिबात नाही. म्हणून म्हटलं, निदान काय चाललंय गावी, काय बघितलं ते तरी तुला सांगावं...

Things went wrong ... | गोष्टी गावाकडल्या...

गोष्टी गावाकडल्या...

Next
- ज्ञानेश्वर मुळे

प्रिय दिल्ली, तुला गावाकडल्या गोष्टी ऐकून घ्यायची सवय नाही, असं कसं म्हणू? तुझ्या भवनांमध्ये आणि सदनांमध्ये ग्रामीण भागातल्या अत्याचारांपासून ते शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांपर्यंत सर्वांचेच प्रतिध्वनी उमटतात. तरीसुद्धा राजधानीचा साज आणि बाज उतरवून दिल्लीतून गल्लीत येण्याचं धाडस तू करणार नाहीस. फक्त एका महाशयांनी तुला दिल्लीतून उठवून मध्यवर्ती अशा दौलताबादला न्यायचा प्रयत्न केला होता आणि आम्ही सगळे तेव्हापासून त्या सद्गृहस्थाला ‘वेडा तुघलक’ असं म्हणायला लागलो. हा संपूर्ण आठवडा मी गावाकडे, घराकडे आहे. वाटलं, हे भाग्य तुझ्या नशिबात नाही. त्यामुळे निदान काय चाललंय, काय बघितलंय ते तरी तुला सांगावं.
माझा पहिला अर्धा दिवस पुण्यात, अर्धा प्रवासात गेला. 
त्यानंतर दुपारीच कोल्हापूरकडे प्रयाण. संपूर्ण रस्ताभर पावसाने प्रसन्नता दाटल्यासारखी वाटली. तरीही त्यातही पुणे ते सातारा हमरस्त्याची दुर्दशा आणि वारंवार टोलवणारे टोलनाके हेच लक्षात राहिले. सेवेची गुणवत्ता आणि वसुलीचं मूल्य यातलं अंतर सर्वसामान्यांना कळतं, पण ठेकेदारांना?
दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये पासपोर्ट प्रक्रियेची बदलती आणि सोपी सेवा, १५० देशांना ई-व्हीसा आणि सोलापूर इथे होऊ घातलेलं पासपोर्ट कार्यालय यांवर बातम्या होत्या. दुसरा दिवस मी माझ्या गावातच घालवला. खूप दिवसांनी नदीकडल्या शेतात गेलो. नुकतीच फुटलेली उसाची कांडी पावसाच्या किंवा पाण्याच्या प्रतीक्षेत होती. भुऱ्या रंगांच्या, आपल्या गायब झालेल्या चिमण्यांपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या नवीन अशा चिमण्या दिसल्या. दादा म्हणाला, ‘अलीकडे या अशा वेगळ्या रंगांच्या चिमण्या आणि पक्षी दिसताहेत.’ पावसामुळे नदीचं पात्र पाण्यानं गच्च भरलेलं आणि नेहमीच्या तुलनेनं प्रदूषणमुक्त दिसलं. समोर दिसणारं ते तांबूस रंगाचं पाणी मी माझ्या नजरेनं पोटभरून प्यालो. तिथल्या ताज्या हवेत माझ्या बालपणाचा प्रसन्न दरवळ होता. म्हसोबाच्या दीड फूट मंदिरात कोणताच फरक पडला नव्हता. पण अण्णा महाराजांची सीमेंटची पर्णकुटी आता नदीवर दिमाखानं उभी असलेली दिसली. नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या झाडाझुडपांमध्ये फेकून दिलेल्या प्लास्टिकची विविधरंगी, विविध आकारांची फुलं लपेटलेली होती. 
घरी परताना सायकलीवरून वैरणीचा बिंडा घेऊन जाणारा एक शेतकरी दिसला आणि वडलांची आठवण आली.
प्रिय दिल्ली, तिसरा दिवस मी शेजारच्या दोन प्रमुख शहरांमध्ये अनेकांना भेटण्यात घालवला. आधी कोल्हापूर आणि नंतर इचलकरंजी शहर. दोन्ही कार्यक्रमांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ‘आर्थिक आणि व्यापार’ यांच्यावर केंद्रित होते. कोल्हापूरला ‘जागतिक व्यापाराची संधी’ आणि इचलकरंजीला ‘देशातल्या उद्योगांची सद्य:स्थिती आणि भविष्याली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ’ असे व्यापक विषय. ग्रामीण भागात अशा विषयांना किती प्रतिसाद मिळेल ही शंका फोल ठरली. सर्व थरातल्या आणि सर्व वयोगटातल्या जनतेला या विषयांत रुची असलेली दिसली. विशेषत: युवकांचा आणि स्त्रियांचा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक होता.
थोडंसं असंबद्ध वाटेल; पण मी तीन मुद्द्यांवर भर दिला. या बदलांशिवाय आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं ‘अर्थक्रांती’ येणं शक्य नाही. देशातल्या राजकीय पर्यावरणात आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. यात नेत्यांचं प्रशिक्षण, मूल्यांचं भान, कायदानिर्मितीवर नेत्यांची ऊर्जा खर्ची होण्याची गरज, यांचा समावेश. 
दुसरं म्हणजे सामाजिक पर्यावरणात आवश्यक सुधारणा. समाजधुरीण, विचारवंत, स्वयंसेवी संस्था, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटना आणि नेते यांना राष्ट्रीय दृष्टिकोण आणि नवी आचारसंहिता हवी. 
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जनसंस्कृती’ पर्यावरणात म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनात मूलभूत शिस्त, कायदापालन, मतदार म्हणून भूमिकेतल्या जबाबदारीची जाणीव असणं आवश्यक, हे सगळं झालं नाही तर देशातली प्रतिभा विकसित होणार नाही आणि उद्योग, व्यापार, मेक इन इंडिया आणि कौशल्य विकास यांच्याद्वारे उपेक्षित क्रांतिकारी बदल प्रत्यक्षात येणार नाहीत. या सर्व सूचनांना उपस्थित श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद होता. मात्र अंमलबजावणी कोण आणि कशी करणार याबाबत मात्र सर्वांचा गोंधळ जाणवला.
चौथा दिवस मी पूर्णपणे गावात घालवला. पूर्वार्धातला बराच वेळ गौतम बुद्ध नगरात. माझ्या बालपणी माझे अनेक मित्र तिथे होते. तिथे खेळण्याचा, आवळे-चिंचा खाण्यातला वेगळाच आनंद होता. त्या काळी गावाबाहेरच्या मुख्य प्रवाहापासून अलग, गरिबी असलेली ती वसाहत आज आमूलाग्र बदललेली दिसली. सीमेंटचे रस्ते, सर्वांकडे टीव्ही आणि मोबाइल, वाखाणण्यासारखी स्वच्छता, तिथल्या स्त्रिया, पुरुष आणि मुलं यांचे कपडे साधे; पण तरीही टापटिपीचे. इथले १०० पेक्षा जास्त युवक युवती हे सरकारी -निमसरकारी संस्थांमध्ये नोकरी करत असलेले दिसले.
मला दगडू कांबळेच्या घरी जाण्याची संधी मिळाली. त्याची बायको, बहीण, मुलगा आणि आई या सगळ्यांचीच भेट झाली. त्याचं छोटेखानी घर आटोपशीर आणि सगळ्या सुखसोयींनी परिपूर्ण होतं. तिथं जवळजवळ सगळ्यांकडे संडास आहेत हेही त्यानं सांगितलं. आज त्याच्या घरातले सगळे सुुशिक्षित आहेत. नव्या पिढीतली वसाहतीतली सगळी मुलं-मुली शाळेत जाताना दिसली. दगडू ग्रंथालयात काम करतो. सुभाषचंद्र बोस यांच्या ‘नेताजी’ या टोपणनावावरून असलेलं हे ग्रंथालय सध्या खूप त्रास सोसत आहे. एका जागेतून हे ऐतिहासिक ग्रंथालय पळवून लावण्यात आलं आणि जिथं सरकारनं नवी जागा दिली आहे तिथंही बांधकाम करण्यासाठी मोठा विरोध होताना दिसला. लोकशाहीचा गैरफायदा घेऊन विधायक कार्याला थांबवू पाहणाऱ्यांचा एक नवा वर्ग उदयाला येतो आहे.
पाचवा दिवस मी माझ्या आजोळी गेलो. अनेक वर्षांनी मी माझा जन्म झालेली ती वास्तू बघितली. जुनी मातीची भिंत थोडीफार ढासळलेली दिसली. मामाच्या मुलांनी नवं घर बांधलं आहे. माझं मन मात्र जुन्या घरातल्या आठवणींनी काठोकाठ भरून गेलं. बालपणातल्या अनेक सुट्ट्या मी इथं घालवल्या. आजोळहून परतताना सांगलीचे तडफदार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याबरोबर तीन एक तास घालवले. एक माणूस काय काय करू शकतो याचं उत्तम दर्शन झालं. त्यांनी कृष्णामाई घाटावर केलेलं काम दाखवलं. संध्याकाळी कृष्णेत नौकाविहार घडवला आणि अमाप उत्साहाने भविष्यातल्या अनेक योजना सांगितल्या. सहाव्या दिवशी मी कोल्हापूरला आमच्या शाळेच्या छोट्याशा गेट- टूगेदर कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. चांगल्या माणसांनी राजकारणात यावं की नाही या विषयावर चर्चा चांगलीच रंगली आणि आश्चर्य म्हणजे दोनेक वर्षांपूर्वी ‘यायला नको’ असं बोलणारे या वेळी ‘यायला हवेत’ या बाजूनं बोलत होते. याच दिवशी आमच्या गावच्या बालोद्यान या अनाथ मुलांच्या वसतिगृहाला राजरतन आगरवाल यांनी पन्नास खाटा आणि कपाटं देणगी स्वरूपात दिली. माणसं खरोखरच चांगल्या कामाला पाठिंबा देतात हे पटलं.
सातव्या दिवशी ‘रवळनाथ सहकारी गृहनिर्माण सोसायटी’च्या बेळगाव शाखेचं उद्घाटन! मी भाषणासाठी मंचावर असतानाच डब्लिन विमानतळावर अडकून पडलेल्या एका मराठी बांधवाच्या नातेवाइकांनी मदतीसाठी एसएमएस पाठवला. तिथूनच मी डब्लिन आणि दिल्ली इथं संपर्क साधला आणि मंचावरून उतरण्याआधी मला सकारात्मक संदेश मिळाले. काहीच तासांत त्या बांधवांची सुटका झाली.
प्रिय दिल्ली, त्यानंतरचा शेवटचा दिवस पुण्यात गेला. ‘माती, पंख आणि आकाश’ या माझ्या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचं प्रकाशन आणि धनंजय भावलेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जिप्सी’ या माहितीपटाचं प्रदर्शन. 
... दिल्ली मला सोडवत नाही असं नव्हे, तर तीच फारशी सोेडत नाही हे खरं. सोमवारी सकाळी कार्यालयाच्या वेळेआधी तुझ्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी परत आलो. कार्यालयात फाईली आ वासून प्रतीक्षा करताना दिसताहेत!

(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.)

dmulay58@gmail.com

Web Title: Things went wrong ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.