जे छोट्यांना कळलं ते मोठ्यांनाही कळेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:50 AM2019-07-14T06:50:21+5:302019-07-14T06:55:02+5:30
त्या दिवशी मुलांनी यू-ट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. लहान लहान मुलं गावाबाहेर कोरड्या नदीत खड्डा खणत होती. त्यात जमलेलं पाणी वाटीनं जवळच्या कळशीत भरून घरी जात होती. एवढंसं पाणी भरायला त्यांना संध्याकाळ झाली. रमा, विश्वेश, हदिया, प्रणव त्यामुळे व्यथित झाले. त्यांनी ठरवलं यावर आपण काहीतरी करायलाच हवं आणि ते झपाटून कामाला लागले.
-गौरी पटवर्धन
‘आर. डब्ल्यू. एच’
‘चालेल.’
‘नक्की का? कारण ते फार अवघड आहे.’
‘असू दे. आपण त्यातल्या त्यात सोपं जे असेल ते करू.’
‘हो ना. एकदा आपल्याला जमलं की आपण सगळ्यांना म्हणू शकतो की आम्हाला करता येतं तर तुम्ही पण करा.’
‘ओक्के!’
‘अँक्च्युअली ते नाव ‘आर. डब्ल्यू. एच. पी.’ असं असायला पाहिजे. पी फॉर प्रणव. तो येईल ना उद्यापासून.’
‘परफेक्ट. म्हणजे आता कोणी विचारलं तर आर फॉर रमा, डब्ल्यू फॉर विश्वेश आणि एच फॉर हदिया.’
‘हदिया, तुझ्या घरी आपण गूगल करू शकतो का सगळं?’
‘हो. अम्मी आणि अब्बू हॉस्पिटलला गेले की केव्हापण करू शकतो.’ हदियाचे आईवडील दोघंही डॉक्टर होते. आणि दोघंही दिवसभर कामात असायचे. हदियाच्या सोबतीला एक आजी घरी असायच्या. त्यामुळे मुलं खेळायला ब-याचदा त्यांच्याकडेच असायची.
त्याप्रमाणे दुस-या दिवशी सगळ्यांनी हदियाकडे जमून हवी असलेली सगळी माहिती गूगल केली. ते चौघं दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचे; पण तरी त्यांचा बिल्डींगमधला ग्रुप पक्का होता. ते कायम एकत्र खेळायचे, सगळ्या उचापती एकत्र करायचे, एकत्र शिक्षा भोगायचे आणि एकत्र अभ्यास करायचे.
आता सातवीत गेल्यापासून त्यांना एकत्र करण्यासाठी अजून एक नवीन उद्योग सापडला होता, तो म्हणजे यू-ट्यूबवर व्हिडीओ बघायचे. अर्थातच त्यांना घरातून फार थोडावेळ त्यासाठी परवानगी असायची. आणि त्यामुळेच त्यांचा बराचवेळ हदियाच्या घरात जायचा. कारण तिथल्या तिला सांभाळणा-या आजींना मुलं व्हिडीओ बघतात यात काही विशेष गंभीर वाटायचं नाही. अर्थात, गंभीर काही वाटावं असलं काही ते बघायचेही नाहीत.
ते आपले मुलांनी करण्यासारख्या अँक्टिव्हिटिज बघायचे. प्रॅॅक्सचे व्हिडीओ बघायचे. कधीतरी वाईल्ड लाइफबद्दलच्या डॉक्युमेंटरीज बघायचे. कधी शाळेत दिलेल्या प्रोजेक्टसाठी मटेरियल शोधायचे. पण एक व्हिडीओ बघताना दुसरा समोर येतोच आणि कधी ना कधी सगळे त्यावर क्लिक करतातच. तसंच कधीतरी पुढचा पुढचा व्हिडीओ बघत ते यू-ट्यूबच्या जाळ्यात गुरफटले गेले आणि त्यांना अगदीच अनपेक्षितपणे एक व्हिडीओ बघायला मिळाला.
व्हिडीओ कुठला होता ते काही त्यांना समजलं नाही. पण त्यात अगदी छोटी 3-4 वर्षांपासूनची मुलं छोट्या बाटल्या हातात घेऊन जात होती. खूप लांब, उन्हातून, मोठे हंडे आणि कळश्या घेतलेल्या त्यांच्या ताई-दादांबरोबर किंवा आईबरोबर चालत जात होती. मग ते सगळेजण एका ठिकाणी पोहोचले. ते जिथे पोहोचले ती बहुतेक नदी असणार; पण आत्तातरी सगळीकडे नुसती वाळूच दिसत होती. मग त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पात्रात छोटे खड्डे करायला सुरु वात केली. हळूहळू त्या खड्डय़ात थोडं थोडं पाणी दिसायला सुरुवात झाली. मग प्रत्येकाने आणलेल्या वाटीने ते गढूळ पाणी थोडं थोडं करून सोबतच्या हंडे-कळश्या आणि बाटल्यांमध्ये भरलं. ते करायला त्यांना इतका वेळ लागला की मगाशी डोक्यावर असेलला सूर्य आता मावळायला लागला होता. सगळ्यांनी आणलेली भांडी भरल्यानंतर सगळेजण आले तसे परत जायला निघाले. संपूर्ण डॉक्युमेंटरीमध्ये कोणीच काही बोललं नाही. शेवटी फक्त एकच वाक्य आलं, ‘उद्या आपल्या सगळ्यांवर हीच वेळ येऊ शकते. आत्ताच पाणी वाचवा.. पाणी साठवा..’
ती छोटीशी डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर त्या चौघांनी कॉम्प्युटर बंद करून टाकला. कितीही प्रयत्न केला तरी त्या छोट्या मुलांचे बिचारे चेहरे त्यांच्या डोळ्यांसमोरून जाईनात. त्यांच्या शाळेत आणि सोसायटीत त्या वयाची मुलं छान छान वॉटरबॅग घेऊन बालवाडीत जायची. आणि या मुलांना प्यायला लागणारं पाणी इतक्या लांबून स्वत:चं स्वत: आणायला लागत होतं. ही वेळ आपल्यावर येऊ शकते ही कल्पनाच फार भयंकर होती. त्यांना शाळेतसुद्धा पाण्याच्या प्रश्नाबद्दल शिकवलेलं होतं. त्यामुळे अशी परिस्थती खरंच येऊ शकते हे त्यांना माहिती होतं. ती येऊ नये यासाठी ते त्यांच्या परीने पाणी वाचवतच होते. पाणी साठवा ही आयडीयाच नवीन होती. आणि त्यासाठी बरीच शोधाशोध करून त्यांनी ठरवल होतं आर.डब्ल्यू.एच.पी.. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोग्रॅम.
एक पूर्ण दिवस हदियाच्या घरी त्याबद्दल गूगल केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की मोठय़ा लोकांनी ठरवलं तर ते सहज असं पावसाचं पाणी साठवू शकतात. पण त्या चौघांसाठी मात्र ते जवळजवळ अशक्य होतं; पण म्हणून ते सोडून कसं देणार? कारण ते करणं गरजेचं होतं. पाणी वाचवण्याइतकंच पावसाचं पाणी साठवून वापरणं महत्त्वाचं होतं. मग आता काय करायचं?
करता येत नाही आणि सोडूनही देता येत नाही. याच्या मध्ये काय करायचं असत???
त्यावर चौघांचही मत पडलं की जमेल तेवढं करायचं असतं. मग काय? झाली शोधाशोध सुरू.. जास्तीच्या बादल्या, ड्रम्स, टब, पाट्या आणि ज्याच्यात पाणी भरता येतं असं सगळंच! प्रत्येकाने शोधून आणलेल्या वस्तू बिल्डिंगच्या एका कोप-या त ठेवल्या आणि बसले पावसाची वाट बघत.
मध्ये चार दिवस गायब झालेला पाऊस एक दिवशी आला नव्याने तयारी करून. आणि मग सकाळपासून जो पडायला लागला तो थेट दुस-या दिवशी संध्याकाळीच थांबला. पाऊस थांबल्या थांबल्या चौघही धावले त्यांच्या ड्रम्स आणि बादल्यांकडे आणि बघतात तर काय?
त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त पाणी गोळा झालं होतं. अगदी मोठे दोन ड्रम्स सोडले तर बहुतेक सगळ्या बादल्या भरल्या होत्या. टब आणि पाट्या तर भरून वाहत होत्या. ते बघितल्यावर चौघांची खात्रीच पटली की एवढं सगळं पाणी वाया जाऊ देणं चूकच आहे. अर्थात, एकदा समोर साठलेलं पाणी दिसल्यावर सोसायटीतल्या मोठय़ा माणसांनाही ते पटलं. आणि सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट ऊर्फ आर.डब्ल्यू.एच.पी. अर्थात रमा, विश्वेश, हदिया, प्रणव प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
-----------------------------------------------------------
ही आहे थोड्या ‘सटक’ वयातल्या
मुला-मुलींसाठी एक मोकळीढाकळी
‘स्पेस’
- या जागेत आम्ही तर लिहूच; पण मुलांनीही लिहावं असा प्लॅन आहे. मुलांनी काय लिहायचं? - याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.
थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली.. कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणा-या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का, असा एक बेत आम्ही शिजत घातलाय. त्याविषयी सांगूच !
तर भेटूया, येत्या रविवारी !
अधल्या-मधल्या मुलामुलींसाठी काय काय शिजतंय हे पाहायचं असेल, तर एका गरमागरम, ताज्या ताज्या भांड्यात जरा पटकन डोकावून पाहायला सुरुवात करा
:www.littleplanetfoundation.org
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com