चिंतन आणि मनन

By Admin | Published: May 6, 2014 04:50 PM2014-05-06T16:50:02+5:302014-05-06T16:50:02+5:30

विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करताना मुद्दे काढणे आणि नंतर त्या मुद्दय़ांच्या आधारे चिंतन आणि मनन करणे, हे तो विषय मनात पक्का ठसवण्याकरिता फार चांगले. तेव्हाच एखादा विषय आपल्या चित्तात कायमचा राहत असतो.

Thinking and meditation | चिंतन आणि मनन

चिंतन आणि मनन

googlenewsNext

 - भीष्मराज बाम

विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करताना मुद्दे काढणे आणि नंतर त्या मुद्दय़ांच्या आधारे चिंतन आणि मनन करणे, हे तो विषय मनात पक्का ठसवण्याकरिता फार चांगले. तेव्हाच एखादा विषय आपल्या चित्तात कायमचा राहत असतो. 

प्रश्न : चिंतन करताना बर्‍याच गोष्टी विसरल्या जातात किंवा आठवत नाहीत, त्यावर काय उपाय?
- प्रश्न एका विद्यार्थ्याचा आहे. गंमत म्हणजे अध्यात्मात रस असणार्‍या एका गृहस्थानेही हाच प्रश्न एका व्याख्यानाच्या वेळी विचारला होता. चिंतन आणि मनन या दोन्ही ज्ञान संपादनाच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. चित्त हे बुद्धीने केलेले निर्णय स्मृतीमध्ये साठवून ठेवते आणि आवश्यक असेल तेव्हा ते समोर आणते. समोरची वस्तू किंवा घटना यांचे प्रत्यक्ष स्वरूप काय आहे, ते ठरवण्याचे काम बुद्धीकडे आहे आणि स्मृती हे चित्ताचे काम आहे आणि संकल्प-विकल्प म्हणजे भविष्यात काय होईल, काय करायचे आहे ते ठरवणे मनाकडे आहे. अहंकार हे अंत:करण, आवड-निवड आणि आपले प्रतिसाद ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. वाणी ही सर्वच अंत:करणांबरोबर काम करते. कारण, शब्दांच्या साह्याने येणारे सर्व ज्ञान आणि कौशल्य ती बाहेरून आपल्या यंत्रणांमध्ये आणत असते. आता चिंतन आणि मनन या दोन्ही प्रक्रिया म्हणजे आपली चारी अंत:करणे आणि वाणी यांच्यामध्ये चालू असलेली चर्चाच आहे. जी वस्तू, घटना किंवा विषय समोर असेल त्यावर ही चर्चा चालते.
कल्पना करा, की अब्जावधी रुपयांचा कारभार असलेल्या एका कंपनीचे हे पाच अधिकारी चर्चेसाठी एकत्र बसलेले आहेत. अहंकार हे अंत:करण म्हणजे कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे. त्यामुळे त्याचे लाड करणे सर्वांनाच भाग आहे. त्याला काही समजावणे किंवा पटवणे हे कितीही अवघड असले, तरी त्याला पर्याय नाही. कारण, त्याची पोहोच थेट मालकाकडे आहे. बुद्धी म्हणजे ज्याला सगळं समजते अशी सर्वांची भावना आहे असा तज्ज्ञ. खरेतर या तज्ज्ञाचे इतर सर्वांनी ऐकायला हवे; पण तसे होतेच असे नाही. मन हे अंत:करण, सर्व कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांच्याबरोबरच एक इंद्रिय मानले गेले आहे. त्यामुळे त्याला सारी इंद्रिये सुखात असावीत आणि त्यांना दु:ख कधी होऊ नये असेच वाटत असते. चित्त हे सर्वांत चलाख असते. चिंतन आणि मननाची कटकट नको; म्हणून ते सर्व इंद्रियांना आणि अंत:करणांना सवयी लावून टाकते आणि या सवयी म्हणजे वृत्तींप्रमाणे शरीराच्या यंत्रणांचे कार्य चालू राहते. ही सोय अंत:करणांनाही बरी पडते. कारण, हवे तसे भरकटायला ती मोकळी राहतात; पण या वृत्तींमुळेच क्लेश वाढीला लागतात आणि दु:खच सारे जीवन व्यापून टाकते. मग त्या कंपनीची वाट लागली तर नवल नाही; म्हणून तर चारी अंत:करणे, वाणी, दहा इंद्रिये आणि योगाची शिस्त आपलीशी करून या वृत्तींचा निरोध करणे आवश्यक असते.
आता चिंतन म्हणजे चित्ताने विचारासाठी मांडलेले मुद्दे, तर मनन म्हणजे संकल्प आणि विकल्पासंबंधी मनाचे विचार. कोणताही विषय किंवा घटना आपल्यासमोर उलगडत जाते, त्यातला सत्याचा भाग आपली बुद्धी पुरेशी प्रगल्भ झालेली असेल तर ताबडतोब नोंदवते; पण त्यातल्या ज्या गोष्टी पुरेशा प्रगट झालेल्या नसतील, त्यांच्याबद्दलचे विचार चित्त पुढे मांडते ते चिंतन आणि भविष्यात त्यांचा आकार, रूप वगैरे कसे असेल, त्याचे विचार मन पुढे आणते ते मनन. चित्ताच्या विचारांना आधार स्मृतीचा असतो, तर मन हे कल्पना, म्हणजे जे पुढे होऊ शकेल ते मांडत असते. या प्रक्रियांमुळे आपल्या ज्ञानाचा पाया पक्का होतो आणि ते प्रत्यक्षात वापरण्याजोगे होते. पण समस्या ही आहे, की स्वभावात रुजलेल्या वृत्तींमुळे चित्तामध्ये स्मृतीचा असम्प्रमोष म्हणजे नको असलेल्या स्मृतींचा गोंधळ चालू असतो आणि मनही चित्ताने लावलेल्या सवयीमुळे विकल्पाकडे ओढ घेत राहते. मग ते चिंतन आणि मनन एकाग्रतेचाच भंग करून टाकते आणि समोर असलेले ज्ञानच ग्रहण केले जाऊ शकत नाही. त्याला पैलू पडले जाऊन त्याच्या उपयुक्ततेत भर पडणे बाजूलाच राहते.
यासाठी प्राणायामाचा आणि ध्यानाचा नियमित अभ्यास फार उपयोगी पडतो. कारण, त्याने आपल्या अंत:करणांना आणि इंद्रियांना योगाच्या शिस्तीची सवय होते. ध्यानामध्ये मानसपूजेसारखे भूतकाळातले उत्तम अनुभव आठवण्याचे प्रकार अतिशय उत्तम ठरतात. विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करताना मुद्दे काढणे आणि नंतर त्या मुद्यांच्या आधारे चिंतन आणि मनन करणे तो विषय मनात पक्का ठसवण्याकरिता फार चांगले. नुसते वाचण्यापेक्षा त्यातले मुद्दे लिहून काढून नंतर त्या मुद्यांच्या साह्याने या विषयाची मांडणी आपल्या शब्दांत करण्याची सवय लावून घेतली, तर त्या विशिष्ट भागाची स्मृती आपल्या चित्तात पक्की बसते असा अनुभव आहे. मग मुद्दे विसरले जात नाहीत. 
योगामध्ये अनुप्रसव आणि प्रतिप्रसव या संकल्पना आहेत. अनुप्रसव म्हणजे सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणे आणि प्रतिप्रसव म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे येणे. वाणीच्या म्हणजे शब्दांच्या आधारे हे करायचे असते. एखाद्या लेखकाला पुस्तक लिहायचे झाले, तर तो आधी विषय आणि पुस्तकाचे नाव पक्के करील. मग त्या विषयाचे निरनिराळे भाग करून पुस्तकाची प्रकरणे ठरवील आणि प्रत्येक प्रकरण लिहून पुस्तक पूर्ण करील. अशा पद्धतीने जर त्याने पुस्तक लिहिले, तर त्याने पुस्तक लिहिण्यासाठी अनुप्रसवाची पद्धत वापरली असे होईल. 
आता जर एखाद्याला त्या पुस्तकाचा अभ्यास करायचा असला, तर त्याला प्रतिप्रसवाची पद्धत वापरणे जास्त सोयीचे होईल. म्हणजे प्रत्येक प्रकरणातील परिच्छेदांचा अभ्यास करून त्यातले मुद्दे लिहून घ्यायचे आणि ते मुद्दे आधाराला घेऊन मग अनुप्रसवाने ते आपल्या शब्दांत मांडले, तर त्याला त्या स्मृती हव्या तेव्हा जाग्या करता येतील आणि परीक्षासुद्धा चांगली देता येईल. याबरोबरच वाचताना त्या-त्या भागाचा अनुभव चित्रणाने मनात जागा करण्याची सवय लावून घेता आली, तर त्या स्मृती अतिशय पक्क्या होतील. मग चिंतन आणि मननाचा जास्त उपयोग होऊन त्या ज्ञानाचे पुढले टप्पे सुचायला मदत होईल. हे जर जमले तर त्या विषयातले तुम्ही तज्ज्ञ होण्याच्या मार्गावर आहात, अशी पक्की खूणगाठ बांधायला हरकत नाही. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Thinking and meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.