थॉमस हार्डी- त्याला ‘हे’ दु:ख दिसलं होतं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 06:03 AM2020-05-31T06:03:00+5:302020-05-31T06:05:10+5:30
शहरांमधून अचानक निर्वासित केले गेलेले लाखो मजूर अशक्य हालअपेष्टा सहन करत आपापल्या गावी निघाले आहेत. हे जथ्थे बघताना आठवण येते ती थॉमस हार्डीची! औद्योगिकरणाने गिळून टाकलेल्या इंग्लंडमधील ग्रामीण संस्कृतीच्या वेदना हार्डीला फार आतून समजल्या होत्या..
- लीना पांढरे
संपूर्ण विश्वावर कोविड१९ या व्हायरसचे संकट कोसळलेले आहे आणि या महामारीत लाखो मृत्यू झालेले आहेत. या ऱ्हासाच्या मागे जी अनेक कारणे आहेत यामध्ये जागतिकीकरण, शहरांकडे आणि मोठ्या महानगरांकडे होणारे स्थलांतर , अतिरिक्त औद्योगीकरण ,पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याकडे विकासाच्या नावाखाली संपूर्ण विश्वाने केलेलं दुर्लक्ष ,जैवविविधतेचा ऱ्हास , संकटग्रस्त दुर्मिळ झालेल्या वनस्पती व प्राण्यांच्या अनेक जाती व प्रजाती ही सर्व परिस्थिती कारणीभूत आहे .आज आपल्याला जैवविविधता टिकवली पाहिजे .वृक्ष आणि जंगले टिकली पाहिजेत . यामधून "गड्यानो आपला गाव बरा" या जाणिवेने परत निसर्गाकडे, पर्यावरणाकडे वळण्याची गरज अधोरेखित झालेली आहे .स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल दारिद्र्य ,उपासमार ,आजारपणे आणि होणारे मृत्यू याचे आपण असाहाय्य साक्षीदार आहोत.
यासंदर्भात एकोणिसाव्या शतकात ज्याने आपल्या कथा कादंबरी आणि कविता लेखनातून निसर्गाकडे परत जाण्याचा संदेश दिला व ग्रामीण भागामधील आणि लहान खेड्यांमधील नष्ट होणाऱ्या कृषी संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला तसेच गरीब शेतमजुरांची विदारक परिस्थिती आपल्या साहित्यातून मांडली त्याची आपण आज पुन्हा आठवण करण्याची गरज आहे हा आंग्ल कवी आणि कादंबरीकार आहे थॉमस हार्डी. बीबीसीने २००३ मध्ये एक सर्वे घेतला त्यामध्ये ऑल टाइम बेस्ट लव्हड दोनशे कादंबऱ्यांमध्ये हार्डीच्या अभिजात/ क्लासिक कादंबऱ्यांचा समावेश केलेला आहे. त्याच्या कादंबऱ्यांवर हॉलीवुडने चित्रपट काढलेले आहेत. २जुन १८४० साली त्याचा नैऋत्य इंग्लंडमधील डोरसेट परगण्यात जन्म झाला. आजपासून ९२ वर्षांपूर्वी म्हणजेच ११ जानेवारी १९२८ साली त्याचे निधन झाले. इंग्लंडमधील रीतीरिवाजाप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर त्याला वेस्टमिनिस्टर अॅबे लंडन येथे दफन करण्यात यावे असे ठरवले गेले .कारण सर्व लेखक आणि कवी यांना तेथेच चिरविश्रांती दिली जाते .मात्र थॉमस हार्डीचेआपल्या खेड्यावर ,भूप्रदेशावर इतके प्रेम होते की त्यांनी सांगून ठेवले होते की त्याच्या छोट्याशा खेड्यातच त्याच्या प्रथम पत्नीच्या थडग्याजवळ त्याला पुरण्यात यावे. शेवटी असा मधला मार्ग काढला गेला की थॉमस हार्डीचे हृदय त्याच्या चिमुकल्या खेड्यात पुरले गेले तर त्याचा बाकीचा देह लंडन येथे चिरविश्रांती घेत आहे. मृत्यूनंतरसुद्धा आपल्या मातीतच रुजलेला हा एक अनोखा अरण्यऋषी होऊन गेला.
हार्डीने डोरसेट जेथे त्याचा जन्म झाला त्या भूप्रदेशाला वेसेक्स असे नाव दिले आणि त्या भागातील छोट्या छोट्या गावांना आणि नगरांना वेगवेगळी काल्पनिक नावे दिली .सत्य आणि फँटसी याची सरमिसळ झालेली एक स्वप्नभूमी त्यांनी निर्माण केली. त्याचे संपूर्ण कुटुंब पिढ्यान् पिढ्यांपासून त्या ग्रामीण भागात रुजलेलं होतं .थॉमस हार्डीने नंतरच्या काळात शहरांमध्ये येऊन स्थिरावण्याचा प्रयत्न केला .पण तो तिथे राहू शकला नाही आणि पुन्हा तो त्याच्या मायभूमीकडे त्याच्या
वेसेक्समध्ये परत गेला .हा प्रदेश अत्यंत निसर्गरम्य आहे त्याच्या उत्तरेला टेम्स नदी वाहते तर दक्षिणेला इंग्लिश खाडी आहे तसेच पश्चिमेकडे कॉर्निश किनारे आहेत. तर पूर्वेला अटलांटिक समुद्रातील बेटे आहेत .येथील सर्व नद्या , समुद्र ,पहाड ,टेकड्या ,झाडे-झुडपे आणि मुख्य म्हणजे येथे राहणारी साधीसुधी शेतमजूर माणसे त्यांचे दारिद्र्य त्यांचे जगणे आणि येथील प्राणी ,पाखरे या सर्व गोष्टी जन्मापासून तळहाताच्या रेषांप्रमाणे थॉमसला परिचित होत्या.
वर्डस्वर्थने निसर्गाचे अत्यंत आल्हाददायक वर्णन करून खेड्याकडे परत जाण्याचा संदेश दिला या रोमँटिक चळवळीचा परिणाम थॉमस हार्डीच्या कादंबर्यांवर झालेला असला तरीसुद्धा हार्डीचा निसर्ग फक्त आल्हाददायक नाही तो कधी अत्यंत भीषण ,क्रूर होतो तर कधी पूर्ण अलिप्त राहतो.
थॉमस हार्डी हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व्हीक्टोरीया राणीच्या काळामध्ये लिहीत होता .तेव्हा विज्ञानाची प्रगती झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगीकरण आणि शहरीकरण झाले होते .हार्डीच्या काळातच तो रहात असणाऱ्या प्रदेशातील खेडी लंडन शहराची उपनगरे होऊ लागली होती. त्याच्या काळामध्ये रेल्वे ही खेड्यांमध्ये पोहोचलेली होती .मोटर गाड्या आणि पोस्ट ऑफिस सुरू झालेली होती .कृषी संस्कृतीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली होती तेथील शेतमजूरांनीआपली ट्रेड युनियन तयार केलेली होती .धान्याची पेरणी आणि कापणी करणारी यंत्रे आणि शहरापर्यंत दूध आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्या खेड्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या. या परिवर्तनाच्या काळाचा हार्डी साक्षीदार होता..या सगळ्याचं आत्यंतिक दुःख हार्डीला झालेले होते आणि त्यामुळे त्यांने त्याच्या वर्तमानकाळाबद्दल न लिहिता त्याच्या अगोदरच्या दूरस्थ भूतकाळामधील नष्ट होऊ पाहणाऱ्या ग्रामीण ,कृषी संस्कृतीचे चित्र आपल्या कादंबऱ्यांतून रेखाटून तो दस्ताऐवज अजरामर करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमधून पूर्ण नष्ट झालेल्या पुरातन ग्रामीण कृषी संस्कृतीच्या अखेरचा हुंकार हार्डीच्या कादंबऱ्यांमधून आणि कवितांमधून उमटतो. एक सहयात्री निरीक्षक आणि इतिहासकार या नात्याने हार्डीने आपली निरीक्षणे नोंदवलेली आहेत. तो ज्या खेड्यांमधील आम गरीब अज्ञानी शेतमजुरांना बद्दल त्यांच्या दैन्य आणि दुःखाबद्दल लिहित होता ते त्यांच्याविषयी असले तरी त्यांच्या वाचनाकरता नव्हते . हार्डीचा वाचक वर्ग हा लंडन शहरातील सुशिक्षित एलिट मध्यमवर्ग होता.
हार्डीने त्याच्या कादंबऱ्यांमधून संवादांमध्ये पूर्णतः बोलीभाषेचा वापर केलेला आहे .त्याच्या लेखनामधून इतिहास ,दंतकथा ,पुराणकथा , श्रद्धा, अंधश्रद्धा, दैवतं ,गावोगाव भरणाऱ्या यात्रा ,मांत्रिक ,शकुन-अपशकुन चेटकिणी, हडळी , जादू टोणा,चेटूक, सुगीमध्ये होणारे सणसमारंभ , ख्रिसमसच्या पार्ट्या, विवाह समारंभ, दफनविधी ,ग्रामीण इंग्लंडमधील संस्कृती तेथे असणारे श्रीमंत जमीनदार आणि अत्यंत गरीब शेतमजूर यांच्यामधील सामाजिक आणि सांस्कृतिक ताणेबाणे तसेच तेथील धनगर त्यांचे पशुधन , दुग्ध व्यवसाय ,रोज लाकूडफाटा गोळा करणारे मजूर ,तेथील फळबागा, सफरचंदाचा रस काढण्याचे चरक, खलाशी किंवा मासेमारीचा व्यवसाय करणारे गोरगरीब लोक आणि त्या सगळ्या लोकांना कधीही न लाभलेले स्थैर्य ,त्यांचे दैन्य, दुःख ,अनारोग्य , सर्पदंश आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे मृत्यू आणि पोट भरण्यासाठी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारे शेतमजूर पुरुष आणि स्त्रिया यांचे वर्णन येते उदरनिर्वाहासाठी भटकणाऱ्या मैलोनमैल पायी चालत जाणार्या एकाकी स्त्री आणि पुरुष शेतमजुरांच्या व्यक्तिरेखा त्याने आपल्या कादंबऱ्यांमधून साकारलेल्या आहेत.
या ग्रामीण इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या शोकात्म आणि काळ्या करड्या छटा असणाऱ्या शेतमजुरांच्या दुःखद कहाण्यांना प्रीतीच्या धाग्याची रुपेरी किनार लाभलेली आहे. थॉमस हार्डीच्या सर्व नायिका अत्यंत सुंदर आहेत .चुकीच्या पुरुषाच्या प्रेमात पडणे आणि मग अटळ विनाशाच्या कड्यावरून कोसळून आत्मघात करून घेणे ही त्यांची नियती आहे. खोल दरीतील धुक्याचा श्वास घेणारे आणि मातीतून उगवून येणाऱ्या डेरेदार झाडांसारखे , हिरव्या लिपीतील शब्द बोलणारे ,मातीत रुजलेले असूनही कुठेतरी स्वर्गीय प्रेमाचा उदात्त स्पर्श झालेले स्त्री-पुरुष त्याने रंगवलेले आहेत.
' फार फ्रॉम द मॅडींग क्राउड' या कादंबरीतआपली शेतजमीन सांभाळणाऱ्या ,बाजारात जाऊन लिलावामध्ये भाग घेणाऱ्या ,आपली घोडागाडी दौडवतं जाणाऱ्या बाथशीबा या देखण्या ,अहंकारी स्त्रीवर जीव जडवलेले तीन प्रेमवीर आहेत. सार्जंट ट्रॉय ,फार्मर बोल्डवूडआणि गॅब्रियल ओक. अपत्य जन्माच्या वेळेला आपल्या प्रेयसीला सोडून आलेल्या नुसतेच वरवरची खोटी चकाकी दाखवणाऱ्या सार्जंट ट्रॉयच्या प्रेमात पडून बाथशीबा त्याच्याशी लग्न करते आणि मग पस्तावते. फार्मर बोल्डवूडची गोळी लागून ट्रॉय मृत्यू पावतो .बोल्डवूड वेडापिसा होतो आणि मग अत्यंत कष्टाळू ,साधा ,सरळ आणि बाथशीबावर मनापासून प्रेम करणाऱ्या शेतमजूर गॅब्रियल ओकशी तिचा मिलाफ होऊन सुखांत शेवट होतो
'रिटर्न ऑफ द नेटिव्ह' मध्ये पॅरीसहून खेड्यात परत आलेल्या क्लिम योब्राईट या हिऱ्याच्या व्यापार्यावर युस्टेशिया भाळते आणि त्याच्याशी लग्न करते .तो आपल्याला या खेड्यातून पॅरिसला घेऊन जाईल अशी तिला आशा असते. पण क्लीमला दृष्टिदोष निर्माण होतो आणि गवत कापणारा शेतमजूर होऊन तो त्याच गावात राहतो. तेव्हा निराश होऊन युस्टेशिया तिच्या पूर्वायुष्यातील प्रियकराबरोबर पळून जाते पण ते दोघे जण रस्त्यात पाण्यामध्ये बुडून मरण पावतात असा शोकात्म शेवट या कादंबरीचा आहे.
"द मेयर ऑफ कॅस्टरब्रिज 'मध्ये मायकल हेनचर्ड दारूच्या नशेत आपली पत्नी सुसान आणि तान्ही मुलगी एलिझाबेथ- जेन हिला एका खलाशाला विकून टाकतो .नंतर पश्चाताप होऊन तो २० वर्षे दारू सोडतो आणि गवत कापणारा शेतमजूर म्हणून आपल्या जगण्याला सुरुवात केलेला हा माणूस त्याच्याच गावाचा कॅस्टरब्रीजचा महापौर होतो.पण नंतर त्याचा प्रतिस्पर्धी फारफ्रेकडून तो पराभूत होतो .शेतीमध्ये त्याचे नुकसान होते .दैन्य आणि दुःखामध्ये एका झोपडीत तो एकटाच मरून जातो त्याने त्याच्या सावत्र लेकीला भेट दिलेल्या सोनेरी पिंजऱयातल्या पाखरासारखा.
'टेस ऑफ द डरबरव्हेलीज 'या कादंबरीत टेस ही खेड्यातील मुलगी पोट भरण्यासाठी ज्या जमीनदाराच्या शेतावर काम करते तो जमीनदार अॅलेक तिच्यावर जबरदस्ती करतो त्यामधून तिला बाळ होतं आणि तेही मरून जातं .पोट भरण्यासाठी वणवणतं ती एका दूध डेअरीमध्ये कामाला लागते. जिथे तिला क्लेअर भेटतो आणि ती त्याच्याशी विवाहबद्ध होते. पण गैरसमजामधून तिचा प्रियतम पती दुरदेशी निघून जातो आणि पुन्हा तिला आपल्या पाशात अडकवायला अॅलेक परत येतो .उद्वेगाने ती त्याला ठार करते आणि मग पोलिसांपासून वाचण्यासाठी लपत-छपत रानावनातून धावत राहते आणि तिला साथ देतो तिचा परत आलेला प्रिय पती क्लेअर. पण शेवटी ती पोलिसांच्या हातात सापडते आणि तिला फासावर चढवलं जातं .एका अत्यंत कष्टाळू ,मनस्वी आणि स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या तरुण मुलीचे आयुष्य असा विदारक पद्धतीने संपून जाते .
'ज्यूड द ऑबस्क्यूअर'या हार्डीच्या शेवटच्या कादंबरीत लहानपणी शेत राखणाऱ्या नंतर दारोदार जाऊन पाव विकणाऱ्या ज्यूडला शहरात विद्यापीठात जाऊन स्कॉलर व्हायचे असते पण अरेबेला तिच्या मायाजालात त्याला फसवते आणि इच्छा नसताना तो तिच्याशी लग्न करतो पण नंतर ती त्याला सोडून शहरात निघून जाते. तो परत उत्साहाने अभ्यासाला लागतो. त्याच्या आयुष्यामध्ये स्यू येते. त्यांचे लग्न झालेले नसल्याने त्यांना घर मिळायला सुद्धा खूप अडचणी येतात. आत्यंतिक दैन्य आणि गरिबीमुळे त्यांचा मुलगा आपल्या भावंडाना भुकेने तळमळताना पाहावत नाही म्हणून मारून टाकतो आणि या सगळ्या संघर्षाला कंटाळून स्यू तिच्या पतीकडे परत जाते. अरेबेला इच्छा नसताना पुन्हा शहरातून परतून ज्यूडच्या घरात येउन दाखल होते पण तिच्या बेधुंद वागण्यात काहीही फरक पडलेला नसतो ती बाहेर मौजमस्ती करण्यासाठी गेलेली असताना मृत्यूशय्येवर पडलेला एकाकी ज्यूड या जगाचा निरोप घेतो.
थॉमस हार्डीच्या कादंबऱ्यांमध्ये दैन्य, दुःख ,वैफल्य एकाकीपणा प्रियजनांचा एकमेकांपासून वियोग याचं चित्रण असलं तरीही हार्डीच्या व्यक्तिरेखा पराजीत जरूर होतात पण उध्वस्त होत नाहीत .रोजच्या कामाप्रती ,आपल्या आसपासच्या परिसराप्रति ,निसर्गाप्रती , इतर माणसांच्याप्रति व आपल्या प्रिय व्यक्तीच्याप्रती त्यांची असणारी निष्ठा आणि गांभीर्य कधीच लोप पावत नाही. प्रेम आणि उदरनिर्वाहासाठी निष्ठापूर्वक करावयाचे खडतर काम ,कष्ट या प्रती असणाऱ्या चिरंतन निष्ठा परिवर्तनाच्या काळात नष्ट होत चाललेल्या आहेत याची लखलखीत जाणिव हार्डीला होती. आणि हे विलयाला जाऊ पाहणारे जग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेली साहित्य निर्मिती आजही आपणास प्रेरणादायी आहे.
pandhareleena@gmail.com
(लेखिका इंग्रजी भाषेच्या अभ्यासक आणि साहित्य आस्वादक आहेत.)