‘लोकमत’च्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषोतील धर्माचार्यांचे विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 06:00 AM2021-10-31T06:00:00+5:302021-10-31T06:00:02+5:30
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेदरम्यान विविध धर्मांच्या धर्माचार्यांनी केलेल्या मांडणीचा संपादित अंश.
- लोकमत न्यूज नेटवर्क
...इन्शाअल्ला, सदा ही मोहब्बत सुनाते रहेंगे!
-गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती
मंदिर, गुरुद्वारा, चर्चसह इतर कुठल्याही धार्मिक ठिकाणी जा. ज्या भावनेने व हेतूने तुम्ही प्रार्थना स्थळी जाल आणि तीच भावना व हेतू बाहेर आल्यावर नसेल, तर त्या धार्मिक ठिकाणी जाणे म्हणजे केवळ दिखाऊपणा ठरेल. असा दिखाऊपणा धर्मात नसतो. ‘सलाम’ याचा अर्थ होतो शांती. त्याला अमन असेही म्हणतात. या अमन (शांती)मुळे आपल्याला सब्र (धैर्य) व शुक्र (धन्यवाद) या दोन शक्ती मिळाल्या आहेत. या शक्तीच्या भरवशावर आपण कुठल्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो. व्यक्तीची भावना किंवा हेतू म्हणजे नियत. तुम्ही कुठल्या भावनेने आपल्या ईश्वराची प्रार्थना करता, हे महत्त्वाचे. एखाद्या व्यक्तीने नमाज अदा केली आणि त्यानंतर त्याने काही दुष्कृत्य केले, तर त्याने केलेली नमाज ही काहीही कामाची नाही. ही नियतच सर्व धर्माचा मुख्य पाया आहे.
बांगलादेशात जे काही झाले, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. असे लोक केवळ इस्लामचेच नव्हे, तर मानवतेचेही शत्रू आहेत. कोणत्याही धर्माच्या आस्थेला नुकसान पोहोचविणे हा सर्वांत मोठा गुन्हा आहे.
८०० वर्षांपासून अजमेर शरीफमध्ये सर्व मानवजातीची सेवा केली जाते. एकता, मानवता व शांतीचा संदेश दिला जातो. हा संदेश भारत देश पूर्वीपासूनच देत आला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जितके गुरुद्वारे आहेत, तिथे फरीदवाणी उच्चारली जाते. खानकाहें आणि आश्रमातील सूफी संत एकमेकांशी भेटायचे, अशी अनेक ठिकाणे देशात आहेत. बाबा फरीद यांच्या आश्रमात संत लोक यायचे आणि प्राणायाम करायचे. हा सह-बंध महत्त्वाचा!
नही है भारत देश जैसा कोई, अगर यहा पर आते है तो कोई दुसरा पराया और अंजान होता नही... हम एक है, एक है... एक वतन हमारा ये पैगाम इस सरजमी से पुरी दुनिया के अंदर इन्शाअल्ला हम देते रहेंगे... सदा ही मोहब्बत सुनाते रहेंगे”
(अजमेर शरीफ दर्गा, राजस्थान)
-------------------------------------
भारताकडे जग मोठ्या आशेने पाहते आहे!
- भिक्खू संघसेना
जगातील विकसित देशांनी आर्थिक, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकास केला. मात्र, त्यांचे लक्ष हे वरवरच्या भौतिक विकासाकडेच आहे. या धावपळीत ते आंतरिक सुख व आध्यात्मिक विकासाला विसरले. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या जगात जे काही सुरू आहे ते विचलित करणारे, चिंता करायला लावणारे आहे. धार्मिक हिंसा, युद्धाची आक्रमकता, द्वेषभावना, भेदाभेद या गोष्टींनी जग बरबटले आहे. अशा स्थितीत जगाला अहिंसा, करुणा, शांतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारत हा कोकाकोला, पेप्सीकोला संस्कृतीचा देश नाही. हा देश योग, आध्यात्म, ध्यानसाधना आणि आंतरिक शक्ती संपत्ती जोपासणाऱ्या संस्कृतीचा देश आहे. हे भारतीय ज्ञान जगाला आकर्षित करणारे आहे. म्हणूनच विश्वाचे अस्तित्व वाचविण्यासाठी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे.
भारत या आध्यात्मिक ज्ञानाने संपन्न असलेला देश! येथे भगवान राम, कृष्ण, भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गाची परंपरा येथील आध्यात्मिक गुरूंनी चालविली आहे. ही भूमी आध्यात्मिक गुरूंचे तारामंडळ आहे. हे आध्यात्मिक गुरू विश्वशांती आणि करुणेचे दूत आणि प्रचारक आहेत. भारताजवळ धार्मिक, आध्यात्मिक ज्ञान आहे, जे वैश्विक शांतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे आता भारतातील सर्वधर्मीयांनी मेंदूचा विचार, हृदयाची भावना समजून हातात हात मिळवून काम करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन जगात निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान शोधण्याची योग्य वेळ आता आली आहे.
(संस्थापक, महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लडाख)
-------------------------------------------------------
धर्माच्या नव्हे, पृथ्वीच्या रक्षणासाठी हातात हात घ्यायची वेळ!
-कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस
वेगवेगळ्या धर्मांमध्ये ईश्वराची संकल्पना आणि काही विचारही वेगवेगळे आहेत; पण त्यांच्यामध्ये समानताही खूप आहे. प्रत्येक धर्माचा मानवता, सत्याचा मार्ग व प्रामाणिकपणावर विश्वास आहे आणि प्रत्येकाला एकत्रित व शांततामय वातावरणात राहायचे आहे. मानवतेच्या समान धाग्याने आपल्याला एकत्रित बांधले आहे. खुल्या मनाने आणि मेंदूने विचार केल्यास असे दिसेल की, आपल्या सर्वांमध्ये विसंगतीपेक्षा समान दुवे अधिक आहेत. तेव्हा विसंगतीकडे लक्ष देण्यापेक्षा समानतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या अंधारात प्रकाशाची किरणे जागोजागी दिसली. वेगवेगळ्या, वयाचे, भाषेचे, पंथाचे लोक कोरोनापीडितांना, स्थलांतरितांना व गरीब, गरजूंना त्यांची जात, धर्म न पाहता मदत करीत होते. भारतीयांची ही संवेदना मानवता आणि एकतेचे मजबूत उदाहरण आहे.
भारतात अनेक प्रकारची विविधता असूनही येथील लोक हजारो वर्षांपासून एकतेने, शांततेने नांदत आहेत. हा भारतीय वारसा पुढेही टिकून राहील, ही मोठी जबाबदारी सर्व धर्मांतील धर्मगुरूंवर आहे. एका कुटुंबात अनेकांमध्ये गैरसमज असले तरी कुठल्या तरी समान दुव्याने ते एकत्रित राहतात. धर्मगुरू हा तो दुवा आहे. भारत हा ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचा झेंडा उंचावणारा देश आहे. त्यामुळे भारतच विश्वाचे नेतृत्व करेल आणि सामाजिक सौहार्द स्थापित करण्यासाठी समोर येईल. प्रत्येक धर्मात मानवाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांचे शोषण, आरोग्यसेवेत आणि शिक्षणाची संधी देण्यात असमानता बाळगणे योग्य नाही.
धार्मिक वादविवादाशिवाय वातावरण बदलाचे व ग्लोबल वॉर्मिंगचेही मोठे आव्हान आपल्या जगासमोर आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सर्व धर्मांच्या, पंथांच्या लोकांनी आपल्या पृथ्वीच्या रक्षणासाठी हातात हात धरून काम करण्याची गरज आहे.
(आर्चबिशप, मुंबई)