थ्री इडियट्स आणि कलाप्रयोग

By admin | Published: January 28, 2017 04:06 PM2017-01-28T16:06:30+5:302017-01-28T16:06:30+5:30

जे. जे. च्या एका सरांना विचारलं होतं, ‘पिकासोमध्ये काय ग्रेट होतं?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘क्वाण्टिटी!’ पिकासो वेड्यासारखा पेंट करत राहायचा. एखादी गोष्ट एकदा सांगून पटली नाही तर सतत सांगायची, ही त्याची पद्धत होती. आम्ही तिघांनी तेच केलं..

Three Idiots and Art Use | थ्री इडियट्स आणि कलाप्रयोग

थ्री इडियट्स आणि कलाप्रयोग

Next
- संजय दैव
 
प्रकाश अथणे विख्यात इंटिरिअर डिझायनर, रघू जाधव कॅमेऱ्याच्या चौकटीतून वेगळं जग टिपणारे आणि संजय दैव ग्राफिक डिझायनर व जाहिरात सल्लागार. तिघांनीही कोल्हापूरच्या कलासंस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेलं. व्यक्त होण्याचे ठरीव साचे मोडण्याच्या आग्रहातून तिघंही एकत्र आले आणि त्यातूनच १९९४ मध्ये जन्माला आला ‘कलाप्रयोग’! या प्रयोगाला बघता बघता वीस वर्षं पूर्ण झाली. याचं दस्तावेजीकरण ‘कलाप्रयोग’ या ग्रंथाच्या व माहितीपटाच्या निमित्तानं नुकतंच झालं. त्यानिमित्त संजय दैव यांच्याशी गप्पा.

‘कलाप्रयोग’च्या कल्पनेचा उगम?
‘कोल्हापूर स्कूल’ ज्याला म्हटलं जातं त्या वास्तवदर्शी चित्रकलेनं कोल्हापूरचं नाव चित्रकलेत विशेष केलं. पण त्यात एक साचलेपण जाणवत होतं. बाहेरच्या जगात काय प्रयोग चालले आहेत, आपण जे करू पाहतोय त्यासाठीचा दर्शक ज्या प्रदर्शनातून निर्माण व्हायचा त्यासाठीचं ठिकाण, कलेवर संवाद घडण्यासाठी लोक एकत्र येणं असं काहीच घडत नव्हतं. रघू, मी व प्रकाश मिळून आमच्या परीनं आम्ही दोन वर्षं विरोध पत्करून ‘ओपन आर्ट गॅलरी’सारखा प्रयोग केला, पण तो पुढे रेटला गेला नाही. 
रघूची घरची परिस्थिती अतिशय बिकट. अशातून रिक्षा चालवत त्यानं कलाशिक्षण पूर्ण केलेलं व कॅमेऱ्यातून आपली नजर शोधलेली. साइनबोर्ड व नंबरप्लेट बनवणं, रंगवणं अशा वडिलांच्या खडतर व्यवसायातून प्रकाशने स्वत:ला रीतसर कलाशिक्षणाकडे नेलेलं आणि मीही ते पूर्ण करून जाहिरात व्यवसायात स्थिरावू लागलो होतो. बाहेर पडल्यामुळे जाणवत होतं की आपल्या गावातली कला पूर्वसुरींच्या नावाबरोबरच लयाला जाऊ द्यायची नसेल तर पुढची पिढी म्हणून आपण येणाऱ्या पिढीचं देणं लागतो. आपल्या गावात व्यवसायापलीकडे काहीतरी करायला हवं अशा विचारातून आणि अर्थात तिघांच्या मैत्रीमुळे ‘कलाप्रयोग’ अशा शीर्षकानं कामाला सुरुवात केली व पहिलं प्रदर्शन १९९४ साली भरवलं. उपलब्ध आर्ट गॅलरीला अशा प्रदर्शनाची सवय नव्हती की लोकांना असं प्रदर्शन पाहण्यात रस! आर्ट गॅलरीच्या लाईट सिस्टीम, बैठकव्यवस्था, पॅनल्स अशा अगणित गोष्टींच्या दुरवस्थेबद्दल संघर्ष करत असताना अटकेचाही अनुभव घेत वीस वर्षांचा टप्पा आम्ही २०१४ मध्ये पूर्ण केला. एक पक्कं ठरवलं की दरवर्षी प्रदर्शनाची अखेर होतानाच येत्या वर्षाची तारीख बुक करायची व प्रदर्शनाचा विषय ठरवून घ्यायचा, त्यानुसार प्रत्येकानं किमान दहा चित्रं वर्षभरात तयार करायचीच!

तुम्ही जिवलग मित्र, पण वीस वर्षं सातत्य व एकवाक्यता कठीणच!..
मैत्री घट्ट असली तरी राग होतात, ओढाताण होते, पुरे झालं वाटतं! पण आपण आपल्या नावासाठी काही करत नाहीये व जी आव्हाने पेलतो आहोत ती येणाऱ्या पिढीसाठी. त्यांचा कलाप्रवास कमी खडतर असावा, आपल्या अनुभवातून त्यांना मार्ग व उमेद देता यावी, त्यांना व्यासपीठ, कलेचा प्रवास, क्यूरेटिंगचं महत्त्व, मांडणीतील कल्पकता व प्रयोग याचं भान जागतं राहावं याबद्दल एकमत होतं. शिवाय येणाऱ्या प्रतिसादातून ‘कलाप्रयोग’नं एक कलात्मक गरज शहराला सांगितली, जाणवून दिली हे लक्षात येत होतं. त्यातून धीर वाढता राहिला. जुन्याजाणत्यांना बरोबर घेत कलेत काही करू इच्छिणारे तरुण आणि पालक यांच्यासाठी आम्ही चित्रशिल्पांची प्रात्यक्षिकं, चर्चासत्रं, शाळा-कॉलेजेसच्या मुलांना चित्रकला साहित्य पुरवून आर्ट गॅलऱ्यांमध्ये लाइव्ह काम करण्याचे स्वातंत्र्य असे अनेक उपक्रम राबवले. पडद्याआडच्या कलाकारांना ‘जीवनगौरव’ने सन्मानित करून त्यांच्याशी गप्पा घडवून आणल्या. 
इंटिरिअर, अ‍ॅनिमेशन, आर्किटेक्चर व जाहिरात ही चार क्षेत्रं; जी फाइन आर्टमध्ये सामावली जातात, हे लक्षात ठेवून मूळ कागद, ब्रश, मातीची ओढ विसरू नका, तरच नवे प्रयोग करता येतील हे आम्ही एकमेकांना सांगितलं व ते सगळ्यांपर्यंत झिरपलं. कमिटमेंट असली की एकवाक्यता असतेच!

या प्रवासातला विरोध कसा हाताळला?
- आता पुढे?
जे. जे. च्या एका सरांना मी विचारलं होतं, ‘पिकासोमध्ये असं काय ग्रेट होतं?’ तर त्यांनी उत्तर दिलं, ‘क्वाण्टिटी!’ - पिकासो वेड्यासारखा पेंट करत राहायचा. एखादी गोष्ट एकदा सांगून पटत नाही तर दोनदा, तिनदा सांगत राहायची ही त्याची पद्धत होती. आम्ही तेच केलं व आज त्याचं फलित पाहतो आहोत. अनेक कलाकार यातून पुढे आले. कोल्हापूरच्या कलासंस्थांमधील विद्यार्थ्यांनी यंदा पारितोषिकांचा विक्रम रचलाय. फाइन आर्टला जाणार म्हटल्यावर पालकांना आपल्या पाल्याबद्दल भीती हीच असते की यातून उदरनिर्वाह कसा होणार! मात्र यातून विचार पक्का करत आपण आपला मार्ग कसा विस्तारू शकतो हे सांगायचा प्रयत्न आम्ही सातत्यानं केला. आता एका टप्प्यावर ‘कलाप्रयोग’चं आमचं प्रदर्शन थांबवतोय, पण काम नाही! या वीस वर्षांचं दस्तावेजीकरण म्हणजे ‘कलाप्रयोग’ हा ग्रंथ व माहितीपट, ज्यातून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या धडपड्या तरुणांना मार्ग मिळेल. प्रत्येक पिढी बंडखोरी करून आपला रस्ता बनवते. आताची पिढी स्मार्ट आहे. पैसे जमले की एफडी करणाऱ्या मागच्या पिढीपेक्षा ती जगप्रवासाला निघून अनुभव घेण्यात आनंद मिळवते. आपला ओरिजिनल थॉट आपल्या जगण्यातून, विचारातूनच यायला हवा. निरीक्षणशक्ती मजबूत करण्यासाठी पीसीचा आयत पुरेसा नाही हे फक्त त्यांना उमजत जायला हवं. कला ही प्रदर्शन व विक्रीचे टप्पे ओलांडून माणसांची जगण्याची गरज बनते आहे. ‘कलाप्रयोग’ याचं भान ठेवत आता एका नव्या वाटेवर निघणार आहे. नवे मंच उभारणं, या मातीतले कलेतले नवे धुमारे जपणं, वाढवणं व जगभर पोहोचवणं यासाठी चाचपणी करतो आहोत.



शब्दांकन - सोनाली नवांगुळ

sonali.navangul@gmail.com

Web Title: Three Idiots and Art Use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.