कुपोषण निर्मूलनाची त्रिसूत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 06:06 AM2019-07-07T06:06:00+5:302019-07-07T06:10:02+5:30
कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला.
- इंद्रा मालो (आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना, महाराष्ट्र राज्य)
काय केले?
कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला. केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सहा वर्षांच्या आतील मुले, गरोदर स्रिया तसेच स्तनदा माता व 15 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढ स्रिया, किशोरी मुलींना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्यसेवा, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार व आरोग्य शिक्षण या सहा सेवा देणे सुरू केले. फेब्रुवारी 2019 च्या मासिक प्रगती अहवालानुसार राज्यात तब्बल 57,91,338 बालकांचे वजन घेण्यात आले. 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो. अंगणवाडीत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार देण्यात येतो. यातील एकूण लाभाथर्र्ींची संख्या 61,96,020 इतकी आहे. आदिवासी प्रकल्पामध्ये अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जातो. त्यात माता व बालके असे 7,05,706 लाभार्थी आहेत.
काय घडले?
कुपोषित मुले आणि माता यांना पोषक आहार मिळू लागला. कुपोषितांची संख्या कमी झाली.
कुपोषणाचे प्रमाण 6 टक्क्यांनी (दरवर्षी 2 टक्के या प्रमाणे) कमी करणे तसेच लहान बालके, किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताशयाचे (अँनेमिया) प्रमाण 9 टक्क्यांनी कमी करणे व जन्मत: कमी वजनाचे बालकांचे प्रमाण 6 टक्क्यांनी कमी करणे ही उद्दिष्ट्ये ठरवली गेली. सर्व अंगणवाडी केंद्रांचे कामकाज कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअरमार्फत करण्यात येणार आहे.
सर्व अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तसेच तांत्रिक मनुष्यबळास अँण्ड्रॉइड फोन देण्यात आला आहे. जीपीएस यंत्रणेचाही वापर करण्यात येत आहे. अंगणवाड्यांमधील सर्व अभिलेख डिजिटाइज्ड् होणार आहे. एकात्मिक बालविकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. इन्क्रिमेंटल लर्निंग अँप्रोच (आयएलए) या उपक्रमांतर्गत विविध विषयावरील 21 मोड्युल्समार्फत अंगणवाडीसेविकांच्या समाजाबरोबरच्या वर्तनात बदल घडविण्याचे काम केले जात आहे. कम्युनिटी बेस्ड् इव्हेंटअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर दरमहा सामुदायिक कार्यक्रमांचे (ओटरभरण, बालभोजन) आयोजन करण्यात येत आहे.
उपक्रम नव्हे, जनआंदोलन!
कुपोषण मुक्तीसाठी नियोजन, अंमलबजावणी अन् जनसहभाग ही त्रिसूत्री आखण्यात आली आहे. याशिवाय पोषण सुधारणा या कार्यक्रमास जनआंदोलनाचे स्वरूप देण्यात आले आहे.
- इंद्रा मालो
(मुलाखत आणि शब्दांकन : यदु जोशी, लोकमत, मुंबई)