वाघ गायब! कोण जबाबदार?
By admin | Published: July 29, 2016 05:02 PM2016-07-29T17:02:35+5:302016-07-29T17:22:40+5:30
जय. आशियातला सर्वात मोठा वाघ. १८ एप्रिलपासून पेंच अभयारण्यातून तो गायब झाला आहे. त्याला रेडिओ कॉलरही लावली होती
- गजानन दिवाण
प्रिय जय,
असा अचानक कुठे निघून गेलास तू? साधारण तीन वर्षांपूर्वीही तू असेच केले होते. नंतर तू शेजारच्या घरात आढळून आलास. यावेळेसही तसेच होईल, असा आम्हाला विश्वास आहे. जन्मल्यापासून तू असाच खोडकर आहेस. एका ठिकाणी थांबणे तुला ठाऊकच नाही. त्यामुळेच तू प्राण्यांसोबतच माणसांमध्येही चांगलाच प्रसिद्ध झाला होतास. तुलाच पाहायला पर्यटक लांबून लांबून यायचे म्हणे. अलीकडेच तुझ्या गळ्यात रेडिओ कॉलर बांधली गेल्याने आम्हीही निश्चिंत होतो. तीच बंद पडली. वन अधिकाऱ्यांनीही तुला वाऱ्यावर सोडून दिले. तुला पाहिल्यास भल्याभल्यांना घाम फुटतो. तरीही भीती वाटतेय. या शिकाऱ्यांचा नेम नाही. कोणाशीही हातमिळवणी करून ते तुझा गेम करू शकतात. आता आम्हाला केवळ तुझ्यावरच विश्वास आहे. मागच्या वेळेप्रमाणे एखादा नवा कॉरिडोर शोधून तू तिसऱ्याच कुठल्यातरी जंगलात गेला असणार. आता पर्यटनाचे दिवस नाहीत. त्यामुळे तुला कुठे पर्यटकही दिसणार नाहीत. चिंता नको करूस. अनेक निसर्गसंस्थांचे दीडशेवर प्रतिनिधी तुझ्या मागावर आहेत. शिवाय त्यांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांच्यामार्फत का होईना खुशाली कळव.
तुझेच,
बिट्टू व इतर भावंडे
- हे पत्र पेंच व्याघ्र प्रकल्पातील उमरेड-करांडला अभयारण्यात सापडले. पेंचसह सर्वच व्याघ्र प्रकल्पांत सध्या याच पत्राची चर्चा आहे.
आशियातला सर्वात मोठा वाघ, जय. वय वर्षे सहा. वजन २५० किलो. माई नावाच्या वाघिणीच्या पोटी २०१० साली या ‘जय’ने जन्म घेतला. त्यालाच पाहायला पर्यटक नागझिऱ्यात यायचे. प्रत्येकाला तो दर्शनही द्यायचा. त्यामुळे अगदी कमी कालावधीत देशभर त्याचा लौकिक पसरला. जणू तो नागझिरा अभायरण्याचा ब्रॅण्ड अॅम्बॅसेडरच बनला. असा हा जय जुलै २०१३ मध्ये अचानक नागझिऱ्यातून गायब झाला. कुठे गेला? काय झाले असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच तो उमरेड-करांडला अभयारण्यात दिसला आणि जयप्रेमींचा जीव भांड्यात पडला. नागझिरा ते उमरेड-करांडला हे अंतर जवळपास ७५ किलोमीटर. नागझिरा, नवीन नागझिरा, किसानपूर, कार्डी, केसळवाडा, कोका या मार्गाने जयने सहा नंबरचा राष्ट्रीय महामार्गही पार केला. हा त्याचा प्रवास पूर्ण जंगलातून होता का, तर अजिबात नाही. अनेक मानवी वस्त्या, शेती पालथी घालून त्याने उमरेड गाठले. असा हा चंचल जय १८ एप्रिलला उमरेड-करांडला अभयारण्यातूनही गायब झाला. हे अपयश कोणाचे? पहिले डब्लूआयआयचे. अर्थात भारतीय वन्यजीव संस्थेचे. त्यांच्याच देखरेखीखाली ‘जय’ होता. दुसरे अपयश वनविभागाचे. जय गायब झाला हे समूजनही तीन महिने या विभागाने गांभीर्याने घेतले नाही. जगातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत आणि अशा ढिसाळ यंत्रणेच्या ंिनयंत्रणात ते वाढत आहेत, यापेक्षा दुर्दैव कुठले? डब्लूआयआयने ‘जय’ला रेडिओ कॉलर लावली होती. या कॉलरमध्ये एक चिप असते. ती सॅटेलाइटमार्फत एसएमएस पाठवत असते. त्याचे लोकेशन काय, जीपीएस रीडिंग काय ही माहिती या माध्यमातून मिळते. या हालचालींचा अॅलर्ट जसा डब्लूआयआयला जायचा तसाच तो पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनाही जायचा. तीन महिन्यांपूर्वी अचानक ही सॅटेलाइट कॉलर आणि रेडिओ कॉलर सिग्नलही बंद पडले. नंतर जय कुणालाच दिसला नाही. वाघाच्या मॉनिटरिंगची जबाबदारी डब्लूआयआयची. तरीही त्यांनी ती झटकली. म्हणे, ज्या अधिकाऱ्यावर मॉनिटरिंगची जबाबदारी होती, ते सुटीवर होते. कॉलर बंद झाल्यानंतर डब्लूआयआयने त्याचा मागोवा घेण्याऐवजी या अभयारण्यातील संशोधकांचे पथक मागे घेतले. युद्धभूमीतून प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी सैनिकांना मागे बोलवावे, असा हा प्रकार. त्यांच्या प्रकल्पांतर्गत सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन, तसेच ब्रह्मपुरीमध्ये दोन वाघांचे मॉनिटरिंग केले जात आहे. जय या प्रकल्पाचाच एक भाग. कॉलर बंद पडताच डब्लूआयआयने ‘जय’ला वाऱ्यावर सोडून दिले. त्यांच्याबाबतीत हे पहिल्यांदाच घडले असे नाही. नागझिरा अभयारण्यात सध्या पाच वाघ असल्याचे सांगितले जाते. यातले चार बछडे गायब आहेत. जयला दोन बछडे आहेत. बिट्टू आणि श्रीनिवास ही त्यांची नावे. या दोघांनाही रेडिओ कॉलर लावली आहे. यातल्या श्रीनिवासची कॉलर बंद पडली असून, १५ जुलैपासून तोही गायब आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी वरोरा भागातील माळढोकला डब्लूआयआयच्या अधिकाऱ्यांनी कॉलर लावली होती. त्याचा शोध अजूनही लागला नाही. डब्लूआयआयचे असे एकाहून एक कारनामे सध्या विदर्भातल्या व्याघ्रभूमीत चर्चिले जात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत हे अभयारण्य येते. त्यामुळे पेंच प्रशासनाचीही तेवढीच जबाबदारी येते. रेडिओ कॉलर बंद झाल्यानंतर डब्लूआयआयच्या संशोधकांनी पेंच प्रशासनाला तसे कळविलेही होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ शोधमोहीम राबवायला हवी होती. तसे झाले नाही. या घटनेचे गांभीर्य त्यांना कळलेच नाही. दुसऱ्यावर ढकलून ते मोकळे झाले. जय आमच्याकडे नाही, ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्ये आहे असे सांगून त्यांनी हात झटकले. मग जय गेला कुठे?
विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या रूपाने पेंच प्रशासनाकडे मोठी कुमक आहे. शिवाय वने किंवा वन्यजिवांसंदर्भात चिंताजनक स्थिती उद्भवल्यास राज्य राखीव पोलीस दलाचे एक पथकही वनखात्याकडे आहे. तीन महिन्यांपासून पेंचची एवढी मोठी फौज काय करीत होती? उमरेड-करांडला अभयारण्य होण्याआधी आणि नंतरही येथे वाघांची शिकार झालेली आहे. विदर्भात शिकार करणारी मध्य प्रदेशातील बहेलिया टोळी सक्रिय आहे. सहा महिन्यांत एकूण आठ वाघ गायब झाले आहेत. दोन वर्षांत ४० वाघ मारले गेले आहेत. कट्टू पारधी हा वाघांचा मोठा शिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब झालेला आहे. इतके मोठे धोके ‘जय’समोर असताना डब्लूआयआय आणि वनविभाग हातावर हात आणि तोंडावर बोट ठेवून आहे. दोघांनीही जणू हार पत्करली आहे. अशा स्थितीत आता एकच प्रतीक्षा आहे. मागच्या वेळेप्रमाणे स्वत: ‘जय’नेच कुठलातरी नवीन कॉरिडोर शोधून तिसऱ्याच जंगलात दर्शन द्यायचे.
श्रेय घ्यायला बाकी सगळे तयार आहेतच...
उत्साही स्वयंसेवकच आता शोधताहेत जयला!
डब्लूआयआय आणि वनविभागाला नाही जमले ते आता स्वयंसेवी संस्था करणार आहेत. तब्बल १५० ते २०० स्वयंसेवकांच्या माध्यमातून दहा संस्थांनी ४०० गावांमध्ये-परिसरात ‘जय’चा शोध सुरू केला आहे. ताडोबा-अंधारी, नवेगाव नागझिरा परिसरातील या गावांमध्ये पोलीसपाटील, शिक्षक, नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. गुरांची शिकार करणे हे ‘जय’चे वैशिष्ट्य. जयने अनेकवेळा गुरांची शिकार केली होती. शेतात काम करणारे, बैलगाडीला जोतलेले बैलदेखील त्याने मारले होते. गेल्या तीन महिन्यांत यातील कुठल्याही गावात अशी शिकार झाली नाही. त्यामुळे जय गेला कुठे हा प्रश्न कायम आहे. ‘जय’च्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्यांना यातल्या एका संस्थेने ५० हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
फक्त ‘जय’चीच चर्चा का?
‘जय’ सर्वांना माहीत होता. त्याच्या गळ्यात रेडिओ कॉलरही होती. म्हणून त्याची चर्चा. इतर वाघांचे काय? वाघाचे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणे नैसर्गिकच. तसे होणे हे चांगल्या निसर्गव्यवस्थेचे लक्षण. ‘जय’सारखेच इतर अनेक वाघ भ्रमणमार्गातून दुसऱ्या जंगलात जात असतात. त्यावर अभ्यास करावा वा चर्चा करावी असे का वाटत नाही? सर्वच वाघांच्या गळ्यात रेडिओ कॉलर बांधणे शक्य नसले तरी अशक्यही नाही. किमान संरक्षित क्षेत्रातील वाघांचा अभ्यास करता येऊ शकतो. नवीन भ्रमणमार्ग यातून समोर येऊ शकतात. हे करीत असताना रेडिओ कॉलर बंद पडून त्याचाही ‘जय’ व्हायला नको, एवढीच काळजी घ्यायला हवी.