वाघ वाढले, पण जगवणार कसे?

By admin | Published: January 24, 2015 03:11 PM2015-01-24T15:11:21+5:302015-01-24T15:11:21+5:30

माणसाच्या एका कुटुंबाला जगायला आवश्यक काय? किमान एक घर, जगण्यासाठी लागणारा किमान पैसा, दोन घास पोटात जाऊ शकेल इतकं अन्न, पाणी, वस्त्र वगैरे वगैरे.. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे काय? एका नर वाघाला त्याच्या अधिवासासाठी साधारण ४0 ते ५0 किलोमीटरचा परिसर लागतो

Tigers grew, but how to survive? | वाघ वाढले, पण जगवणार कसे?

वाघ वाढले, पण जगवणार कसे?

Next

- गजानन दिवाण

 
माणसाच्या एका कुटुंबाला जगायला आवश्यक काय? किमान एक घर, जगण्यासाठी लागणारा किमान पैसा, दोन घास पोटात जाऊ शकेल इतकं अन्न, पाणी, वस्त्र वगैरे वगैरे.. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे काय? एका नर वाघाला त्याच्या अधिवासासाठी साधारण ४0 ते ५0 किलोमीटरचा परिसर लागतो. देशातील वाघांची संख्या आता अडीच हजारांवर गेली आहे. उत्तम, पण या वाघांना जगण्याइतकी-वाढण्याइतकी जागा उपलब्ध आहे का? त्यांचा संसार फुलू शकेल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू शकतो का, याचाही विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. वाघांची संख्या टिकवणे आणि त्यात निरंतर वाढ करणे हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. 
 
अधिवासाचे काय?
मदुमलाई, बांदीपूर, नागरहोळे, वायनाड या कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ११ हजार चौरस कि.मी.च्या क्षेत्रात ५७0 वाघ आढळले आहेत. वाघांचा जगातील हा सर्वात मोठा अधिवास ठरला आहे. २00६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४११ होती. २0१0 साली ती १७0६ वर पोहोचली. आता यात ३0 टक्क्यांनी वाढ होऊन ती २२२६ झाली आहे. वाघ वाचविण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार, पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्थांनी केलेली जनजागृती आणि जंगलात-जंगलाशेजारी राहणार्‍या लोकांचा या मोहिमेतील सहभाग यामुळेच हे शक्य झाले आहे. १८ राज्यांत ३.१८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात वाघांचा हा संसार पसरला आहे.  एका वाघाला जगण्यासाठी लागणारे क्षेत्र आणि आपल्याकडे असलेले सुरक्षित क्षेत्र पाहिले असता वाढलेल्या आणि भविष्यात वाढणार्‍या वाघांना जगविणे तेवढेच मोठे आव्हान ठरणार आहे. अभयारण्यात वाघ वाढू शकतात. त्या अभयारण्याचे क्षेत्र कसे वाढेल? महानगरांत माणसं जशी एकेका खोलीत दाटीवाटीनं राहतात, तसे वाघ कधीच राहत नाहीत. एकतर ते घर सोडून दुसर्‍या घराच्या शोधात बाहेर पडतात किंवा इतरांना संपवून आहे त्याच घराचा ते राजा होतात. बाहेर पडलेल्या वाघाला सुरक्षित अधिवास मिळाला तर ठीक, नाही तर माणसांबरोबरचा संघर्ष ठरलेला. खाणारी तोंडे वाढल्याचाच हा परिणाम. ते रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. 
 
जंगलांना जोडणारे कॉरिडॉर
अधिवास आणि ‘इनब्रिडिंग’चा (माणसांच्या भाषेत एकच गोत्र) प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन जंगलांना जोडणारा कॉरिडॉर निर्माण करणे आणि तो सुरक्षित करणे आवश्यक आहे. देशभरात सध्या केवळ कान्हा ते पेंच याच एकमेव कॉरिडॉरवर अभ्यास झाला आहे. देशातले सारे ४३ व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरच्या माध्यमातून जोडणे गरजेचे आहे. असे झाले तर वाघांची संख्या वाढली तरी त्यांना स्वत:चे घर शोधणे कठीण जाणार नाही. असे किती वाघ आम्ही आपल्या जंगलांमध्ये वाढवू शकतो, याचाही विचार करायला हवा. कधीकाळी भारतातील वाघांची संख्या लाखाच्या घरात होती. २0१३ साली इंग्लंडमधील काही संशोधकांनी बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सच्या मदतीने अभ्यास केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्यात शिकार, अधिवास, माणसांबरोबरचा संघर्ष यासोबतच ‘इनब्रिडिंग’ हे त्यातील महत्त्वाचे कारण होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील वाघिणींशी मेटिंग न झाल्याने १00 वर्षांपूर्वीचे वाघ आणि आत्ताचे वाघ यांच्या डीएनएमध्ये प्रचंड तफावत तर होतीच; शिवाय आत्ताच्या वाघांत जवळपास ९३ टक्के विविधता कमी आढळून आली होती.  
 
जंगलांतील गावांचे पुनर्वसन 
प्राण्यांचे जगणे सुकर होण्यासाठी जंगलातील प्रत्येक गाव बाहेर आणण्याची गरज आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ११ गावांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे, तीन गावांत प्रक्रिया सुरू आहे, तर आठ गावांचे पुनर्वसन बाकी आहे. पुनर्वसन झालेल्या बोरी, कुंड, कोहा, धारगड, नागरतास, अमोना, बारूखेडा येथे आता प्राण्यांचा संसार फुलला आहे. वाघांसारखे प्राणी दिवसाही या भागात भेटतात. पुनर्वसन झाल्याने प्राण्यांचेच भले झाले असे नाही, जंगलातून बाहेर पडलेल्या आदिवासींचेही राहणीमान सुधारले आहे.  
 
 
वाघ
 
महाराष्ट्र 
१९0
 
कर्नाटक
४0६
 
उत्तराखंड
३४0
 
केरळ
१३६
 
तामिळनाडू
२२९
 
भारतातील  
एकूण वाघ    २२२६

Web Title: Tigers grew, but how to survive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.