वक्त ने किया...
By Admin | Published: October 25, 2014 02:47 PM2014-10-25T14:47:43+5:302014-10-25T14:47:43+5:30
चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर व्यक्तिमत्त्व म्हणजे बी. आर. चोप्रा. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने चोप्रांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल आणि त्यांच्या चित्रपटविश्वाशी संबंधित आठवणींना दिलेला हा उजाळा.
अशोक उजळंबकर
बी. आर. चोप्रा यांचा १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वक्त’ हा चित्रपट त्या काळी मल्टिस्टार चित्रपट म्हणून गाजला. या चित्रपटाची गाणी साहिर लुधियानवी यांची होती, तर संगीतकार होते ‘रवी’. या चित्रपटाचे निर्माता बी. आर. चोप्रा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. १९५0नंतर त्यांनी चित्रपटाच्या दुनियेत पाऊल ठेवले. अनेक नामवंत निर्माता-दिग्दर्शक मंडळींकडे सहायक म्हणून उमेदवारी केल्यावर त्यांना गोपाल पिक्चर्सच्या ‘अफसाना’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मिळाली. या चित्रपटातील एक गीत होते,
‘‘खुशियों के दिन मनाये जा, दिल के तराने गाये जा,
तुझको जवानी की कसम, दिल की लगी बुझाये जा,
दुनिया मेरी बसाये जा, आजा पिया-आजा पिया,
अभी तो मै जवान हूँ, अभी तो मै जवान हूँ’’
बी. आर. चोप्रा यांनी त्यानंतर शोले, चांदनी चौक या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘चांदनी चौक’ची नायिका मीनाकुमारी होती. यानंतर चोप्रा निर्माते झाले. बी. आर. फिल्म्स या बॅनरखाली त्यांनी ‘एक ही रास्ता’ची घोषणा केली. नंतर आलेल्या ‘नया दौर’ या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले व बी. आर. फिल्म्स हा बॅनर प्रस्थापित झाला. नया दौर’ नंतर ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘कानून’, ‘धरम पुत्र’, ‘गुमराह’ या चित्रपटांना दणदणीत यश मिळाले. त्यानंतर आलेला ‘वक्त’ हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अभिमानी व स्वकर्तृत्वावर विश्वास असलेल्या माणसाच्या संसाराची भूकंपाच्या एका हादर्यामुळे कशी वाताहत होते, याची ही कथा. या चित्रपटाकरिता रफी यांनी गायलेले साहिर लुधियानवी यांचे गीत प्रत्यक्ष जीवनात बी. आर. चोप्रा यांचीच शोकांतिका ठरली. गीताचे बोल अप्रतिम होते,
‘कल जहाँ बजती थी खुशियाँ, आज है मातम वहाँ, वक्त लाया था बहारें, वक्त लाया है फिजा’
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गीतात खूपच अर्थ दडला आहे. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना या गीतातील प्रत्येक ओळी आठवणीत ठेवाव्यात, अशाच आहेत. ‘आदमी को चाहिए, वक्त से डरकर रहे कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज,’ बी. आर. चोप्रा यांच्या यशाचा झेंडा ‘नया दौर’पासून सुरू झाला. तो ‘निकाह’पर्यंत थोड्या फार प्रमाणात यशस्वी होताच; परंतु एकदा उतरती कळा लागली, की सावरणे कठीण. ‘निकाह’नंतर दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या मालिकेला यश मिळाले. रामानंद सागर यांची ‘रामायण व बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत या मालिका एके काळी दूरदर्शनचे खास आकर्षण होते. नंतरच्या काळात या बॅनरला प्रचंड अपयशाचा सामना करावा लागला. हे बॅनर कर्जात बुडाले. चोप्रा यांच्या संपत्तीचा मध्यंतरी लिलाव झाला व त्या कर्जाची रक्कम चुकती करण्यात आली. यश चोप्रा यांच्या निधनानंतर रवी चोप्रा यांची प्रकृती खालावली. आजही हे कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाही. रवी चोप्रा यांनी या बॅनरच्या पुर्नउभारणीकरिता बरेच प्रयत्न केले; परंतु अपयश आले. यशाचे शिखर पादाक्रांत करणार्या चोप्रा कुटुंबाला हा फार मोठा धक्का होता. बी. आर. चोप्रा यांच्या जीवनावर बेतलेली ही घटना समोर आल्यावर असाच प्रसंग एका गायिकेवर आल्याची आठवण झाली. गीता रॉय या गायिकेचा गुरुदत्तसोबत विवाह झाला. गुरुदत्त यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब, बीबी और गुलाम’, ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटांना कलात्मक चित्रपटनिर्मिती म्हणून लोकप्रियता मिळाली. भारतीय चित्रपटसृष्टीत तयार झालेला हा पहिलावहिला सिनेमास्कोप चित्रपट. गुरुदत्तने स्वत:चीच कथा लिहीली होती.
वक्त ने किया, क्या हँसी सितम
तुम रहे न तुम, हम रहे ना हम
आपणच गायलेलं गीत आपल्याच जीवनाची शोकांतिका ठरेल, असे गीता दत्तला त्या वेळी वाटले असेल का? इतकेच काय, गायन क्षेत्रात जेव्हा ती दाखल झाली, ते ‘दो भाई’ चित्रपटातील गीत तिचीच व्यथा सांगून जाते,
मेरा सुंदर सपना बीत गया
मै प्रेम में सब कुछ हार गई
बेदर्द जमाना जीत गया
अशी असंख्य गाणी आहेत ज्यांमधून त्या कलावंताच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकला जातो. अर्थातच हा केवळ योगायोग होय. आपण सामान्य माणसांनी वेळेच भान ठेवूनच जीवनाचा प्रवास करावा. आपल्यावर कोणती वेळ केव्हा येणार आहे, याचा काही नेम नाही.
वक्त की गर्दिश में है, चाँद तारों का निजाम,
वक्त की ठोकर में है क्या हुकुमत क्या समाज.
वक्त से दिन और रात
वक्त की पाबन्द है ये आती-जाती रौनके
वक्त है फुलों की सेज, वक्त है काटों का ताज
खरोखरच शेवटी म्हणावे लागते,
वक्त से दिन और रात
वक्त से कल और आज..
साहिर लुधियानवी यांची ही रचना सर्वच पिढय़ांतील लोकांना संदेश देणारी आहे.
(लेखक हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)