टुमारोलँड
By admin | Published: August 5, 2016 06:41 PM2016-08-05T18:41:40+5:302016-08-05T18:41:40+5:30
विश्व.. नव्यानं तयार होणारं.. दरवर्षी तीन दिवस फुलणारं.. अन् अखेरच्या बीटपर्यंत मनसोक्त, निर्भयी, सर्वांगसुंदर आयुष्य जगायला भाग पाडणारं... अन् पुन्हा पुन्हा याच बीटवर येऊन मनाच्या सर्वोच्चानंदाचा ठेका धरत थिरकायला लावणारं विश्व
Next
>रचना दर्डा
(लेखिका ख्यातनाम फॅशन डिझायनर आहेत.)
शब्दांकन : पवन देशपांडे
संगीतात देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी अवर्णनीय जादू असते म्हणतात. ती जादू अनुभवून भारतात परतले, त्याला आता किती दिवस उलटले, तरी माझ्या त्वचेवरले रोमांच अजूनही तसेच फुललेले आहेत. काय दिलं या फेस्टिव्हलने मला? एक साधा मंत्र : आजचा दिवस जगा.. उद्यावर प्रेम करा अन् आयुष्यभरासाठी एकत्र या!
विश्व.. नव्यानं तयार होणारं.. दरवर्षी तीन दिवस फुलणारं.. अन् अखेरच्या बीटपर्यंत मनसोक्त, निर्भयी, सर्वांगसुंदर आयुष्य जगायला भाग पाडणारं... अन् पुन्हा पुन्हा याच बीटवर येऊन मनाच्या सर्वोच्चानंदाचा ठेका धरत थिरकायला लावणारं विश्व... तयार होतं दरवर्षी असं विश्व... संगीताच्या प्रत्येक धूनमधून.. तालामधून अन् स्वरांतून... जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण...एकमेकांचे गळे चिरू लागलेल्या देशांच्या रक्तरंजित सीमा नाहीत, सत्तेची उन्मादी गुर्मी नाही, वर्चस्वाचे प्रश्न नाहीत...राजकारण़़ दहशत़.. जातीपाती.. देशा-देशातील तंटे.. धर्मांमधलं वाढत जाणारं अंतर... सगळं सगळं बाजूला ठेवून हे विश्व जन्माला येतं. दरवर्षी. फक्त तीनच दिवसांचं वार्षिक आयुष्य असलेलं हे विश्व संपूर्ण आयुष्याचं समाधान देऊन जातं...
जग जवळ येणं म्हणजे काय, याचा प्रत्यक्ष अनुभव खरं तर या तीन दिवसांच्या विश्वात आहे. या विश्वाचं नाव आहे टुमारोलँड. हा आहे एक म्युझिक फेस्टिव्हल. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या आणि अँटवर्प शहरापासून केवळ पंधरा-वीस किमी अंतरावर असलेल्या बूम नावाच्या छोट्या शहरात या फेस्टिव्हलच्या रूपात दरवर्षी नवं विश्व निर्माण होतं आणि त्यातून दरवर्षी आनंदाचे अनेक क्षण जन्माला येतात.
हे विश्व आहे डीजेंचं.. इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकचं. इथं तीन दिवस रोज सलग बारा तास वाजत असतात बिट्स अन् त्यावर थिरकत असतो लाखो मनातला मॅडनेस...
यावर्षी या विश्वात पाय ठेवून अवघ्या तीन दिवसात अख्खं आयुष्य जगून घेतल्याचा अनुभव गाठीशी बांधल्यापासून आजपर्यंत त्या अर्थपूर्ण सोहळ्याची जादू माझ्या मनावर कायम आहे़ इथं येणाऱ्या प्रत्येकालाच हा अनुभव येत असावा कदाचित! हा फेस्टिव्हल सुरू झाला दहा-अकरा वर्षांपूर्वी! तेव्हाही त्याला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला होता. आता ती संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात भरणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी जगभरातील संगीतप्रेमी येतात. अर्ध्या जगातल्या देशांचे झेंडे तिथं एकमेकांशेजारी फडकत असतात. अगदी सारे वाद-तंटे विसरून. भारताचा ध्वज डौलानं फडकत असताना बाजूलाच त्याच आनंदात पाकिस्तानचाही झेंडा लहरत असतो. कोणत्याही असूयेविना एकमेकांसोबत राहून जगण्याचा आनंद लुटता येतो, हे विसर पडत चाललेलं साधं सत्यच इथे प्रत्येकक्षणी भेटतं आणि त्या हव्याहव्याशा जाणिवेने डोळ्यात पाणी उभं राहतं..
तीन दिवसांची कहाणी
मध्यरात्रीनंतर मुख्य स्टेजवर स्टार डीजे यायचे...
समोर उसळत वाहणारी संगीताची नदी आणि त्या उफाणत्या प्रवाहात नहाणारी बेभान शरीरं फक्त! बघताबघता त्या हजारो शरीरांना एकच आकार आल्यासारखा दिसे.. जणू एकाच आत्म्याला फुटलेले लाखो नाचते हात आणि थिरकते पाय! अखेरच्या दिवशी यावर्षीपुरता पूर्णविराम घेण्याची वेळ आली. कानावर पडणारे बिट्स थांबले होते, पण मनातून-शरीरातून उसळत्या संगीताच्या लाटा ओसरायला तयार नव्हत्या. बेल्जियममध्ये भेटलेल्या त्या लाटा आजही माझ्या मनातून धावत असतात आणि तिथे झालेल्या मैत्रीच्या कहाण्या आठवत राहतात. वाटतं, हे असं साध्या साध्या आनंदांच्या ओढीने एकत्र येण्यातलं सुख किती निर्मळ आणि चिरंतन असतं!
बेल्जियममध्ये प्रवेश केला त्याक्षणी ब्रसेल्सच्या एअरपोर्टवर तिथल्या इमिग्रेशन अधिकाऱ्यानं विचारलं.. ‘‘तुम्ही टूमारोलँडसाठी आलात का?’’
माझा भारतीय पासपोर्ट बघता बघता त्याने सहज विचारलेला हा प्रश्न माझ्यासाठी आश्चर्याचा होता़ पण त्याला तो सवयीचा झाला असावा़ कारण मी ‘हो’ असं उत्तर दिल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला तो म्हणाला.. ‘‘यंदा टूमारोलँड फेस्टिव्हलसाठी येणाऱ्या भारतीयांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा दुपटीनं वाढलीय.’’
माझी उत्सुकता आणखी वाढली. टुमारोलँड हा एक म्युझिक फेस्टिव्हल़ जगातला सर्वांत मोठा म्युझिक फेस्टिव्हल अशी त्याची ख्याती कधीपासून ऐकून होते. बेल्जियमपासून सुरुवात झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये तीन दिवसांमध्ये जवळपास शंभरेक डीजे आपल्या म्युझिकची जादू दाखवत असतात़ चाहत्यांना थिरकवत असतात. आता हा फेस्टिव्हल केवळ बेल्जियमच नाही तर अमेरिका आणि ब्राझीलनेही आपलासा केला आहे. तिथंही याचं आयोजन केलं जात आहे़
यावर्षी जुलैच्या अखेरच्या आठवड्यात बेल्जियममध्ये हा संगीतसोहळा झाला अन् मला त्यात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं़ ज्या सोहळ्याबद्दल मी फक्त ऐकून होते आणि आयुष्यात कधी तरी हा सोहळा अनुभवण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, असं वाटत होतं; ते प्रत्यक्षात येण्यामागे होते माझे दोन जिवाभावाचे मित्र : अंजली आणि हितेश!
ब्रसेल्समधल्या हॉटेलमध्ये पोचलो. तिथून फेस्टिव्हलचं अंतर अर्ध्या तासाचं होतं़ जिथं गाड्यांसाठी-पार्किंगसाठी शेवटचा टप्पा होता तिथून अडीच किलोमीटर अंतरावर हा सोहळा होता़ म्हणजे हे सारं अंतर पायी जायचं होतं़ पण, उत्सुकताच इतकी होती की हे अडीच किलोमीटरचं अंतर सहज पार झालं. एकाच दिशेने पायी जाणारे असंख्य लोक सोबतीला होतेच. प्रत्येकाच्या तोंडी वेगवेगळ्या डीजेची गाणीही होती.
सारं जग सोबत घेऊन आम्ही सर्व मित्रांनी फेस्टिव्हलमध्ये प्रवेश केला तेव्हा खरं तर चित्त जागेवर राहत नव्हतं़ तिथलं दृश्य मनावर मोहिनी घालणारं होतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो लोक त्यांच्या-त्यांच्या देशांचे राष्ट्रध्वज घेऊन एकत्र आलेले होते. डीजेंसाठी मोठ्ठं स्टेज. एखाद्या चित्रपटातल्या सेटसारखं. एक अख्ख जंगल. सगळ्या बाजूंनी लहान-मोठी कृत्रिम झाडं लावलेली. त्यावर काही स्क्रीन-लाइट्स. मध्यभागी डीजे. बाजूला आणखी काही स्टेज आणि त्याच्या बाजूला खाण्या-पिण्याचे स्टॉल्स. तिथे गर्दी करून जमलेले कितीतरी आनंदी चेहरे!
सुरुवात झाली तेव्हाचा क्षण शब्दांत व्यक्त करता येण्यासारखा नाही़ कारण प्रत्येक जण थिरकत होता़ प्रत्येकाचे हात वर होते... टाळ्या वाजवत होते. एकही व्यक्ती जागेवर स्थिर उभी राहू शकत नव्हती़ ही जादू आत्ताशी सुरू झाली होती़ आणि प्रत्येक तासागणीक त्यात अधिकाधिक चांगल्या डीजेंमुळे भर पडणार होती. लाइट्स, तासा-तासाला होणारी नयनरम्य आतषबाजी हे सारंच मनावर भुरळ घालणारं असतं. आजचा दिवस संपूच नये, अशी ती वेळ असते़ माझे अनेक फेव्हरिट डीजे तिथे होते़ त्यांना लाइव्ह ऐकणं हे माझ्यासाठी भाग्याचंच होतं़
टुमारोलँडच्या मुख्य भागात प्रवेश करताना प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉनिक ब्रेसलेट दिलं जातं. हे ब्रेसलेट म्हणजे तिथल्या सर्व ठिकाणी प्रवेश करण्याची किल्ली असते. शिवाय त्यात असते तुमच्या व्यवहाराची सारी माहिती. प्री-पेड डेबिट कार्डपासून सारं काही त्यात असतं. त्यात पैसे भरायचे अन् त्याद्वारेच सगळी खरेदी करायची. मद्यापासून ते अमली पदार्थांपर्यंत सर्वच गोष्टी तिथं खुलेआम उपलब्ध असतात. कशालाही बंदी नाही. पण, विशेष म्हणजे या साऱ्यापासून दूर राहू इच्छिणाऱ्या कुणालाही त्याचा कसलाही त्रास होत नाही़
आम्ही पोहोचलो त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यानं सांगितलेली गोष्ट किती खरी आहे, हे मी प्रत्यक्षच पाहत होते. अवतीभोवती कितीतरी भारतीय चेहरे! ओळख दाखवणारे, त्वचेचा एकसारखा रंग पाहून हसणारे, कधी गळामिठी मारणारे!
आजही भारतात डीजे संस्कृती तशी मर्यादितच आहे. शिवाय ही कला साध्य असणाऱ्या मोजक्या डीजेंना लाइव्ह ऐकायला मिळण्याची संधीही दुर्मीळच! अशा तोकड्या वातावरणातून बाहेर पडून ब्रसेल्समध्ये खास तीन दिवस हा सोहळा अनुभवण्यासाठी भारतीय येणं का आणि किती साहजिक होतं, हे तीन दिवस संपल्यानंतरच उमजलं.
बेधुंद करणाऱ्या लाइव्ह संगीतातून निर्माण होणारी ही उन्मादी ऊर्जा मोजक्या भारतीयांना परिचित आहे ती शास्त्रीय संगीताच्या मैफलींमधून! त्यापलीकडलं हे ग्लोबल म्युझिक रक्तातून धावण्याचा अनुभव भारतीयांसाठी आजही फारसा सर्वसमावेशक नाही. गोव्यात होणाऱ्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलची जादू काही अंशी अशाच प्रकारची असली तरी त्यालाही मर्यादा आहेत़ येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या, आयोजनाचा दर्जा आणि उत्कृष्ट डीजेंची उपस्थिती अशा साऱ्यांनाच कुठेतरी सीमा आहेत. शिवाय सुरक्षेचा प्रश्न तर सततच ऐरणीवरचा!
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिजिटल म्युझिक ऐकण्याची भूक भारतात फारशी भागत नाही. म्हणूनच अशा सळसळत्या गर्दीचा भाग होऊन आपल्या आवडत्या डीजेला लाइव्ह ऐकायचा सोहळा अनुभवण्याचं भाग्य देणाऱ्या टुमारोलँडसारख्या फेस्टिव्हलचं अप्रूप भारतीयांसाठी मोठंच!
सोहळ्याच्या ठिकाणी आम्हाला एक असाच वेडा भारतीय मित्र मिळाला. तो दिल्लीचा होता़ त्याचाही हा पहिलाच अनुभव होता़ स्वारी मजेत होती. बूममध्ये जिथं हा टूमारोलँड फेस्टिव्हल आयोजित केला होता तिथं जवळच तो तीन दिवस राहणार होता आणि तोही एक तंबूत! फेस्टिव्हलच्या जवळच वेड्या चाहत्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली असते. हा परिसर म्हणजे ड्रीमव्हिला. या स्वप्नमहालात साधे कापडाचे तंबू भाड्याने मिळतात. आपापला तंबू उभारायचा आणि आपल्यासारख्याच इतरांबरोबर गप्पा करत, गाणी म्हणत खुल्या आकाशाखाली रात्री जागवायच्या! नाहीतरी इथे झोपायला येतंच कोण?
अशा तीन रात्री.
आणि भेटणारे किती नवे मित्र. जडणारी किती नवी नाती आणि मैत्रीचे किती घट्ट बंध!
आजूबाजूच्या तंबूंमध्ये तुम्ही कधीही न पाहिलेल्या देशातले लोक राहत असतात़ ते तुमचे मित्र बनतात. काही आयुष्यभरासाठी मित्र होतात. देवाणघेवाण होत राहते. जिथं ही व्यवस्था असते तिथंच अंघोळीपासून ते खाण्या-पिण्याची सगळी व्यवस्था असते. शेकडो शॉवर्स असतात़ एवढंच नव्हे तर एकेकट्या आलेल्या महिला/मुलीही तिथं मजेने निभ्रांत राहू शकतील अशी सुविधा असते.
अशा मुक्त, निर्भर आनंदी वातावरणात संगीताच्या ओढीने एकत्र आलेल्या देशोदेशातल्या रसिकांची गाठ पडावी, ओळख-मैत्री व्हावी, सीमा ओलांडणारे बंध त्यांच्यामध्ये जुळून यावेत हा या फेस्टिव्हलच्या आयोजनामागचा मुख्य हेतू आहे. त्यातून एक नवसंस्कृती उभी राहत जाते अन् जग एकत्र येण्याची पहिली तार छेडली जाते, असा आयोजकांचा विश्वास आहे. आमच्या या दिल्लीकर मित्रालाच तीस देशातले जवळपास चाळीसेक नवे दोस्त मिळाले होते.
इथे आलेला प्रत्येक जण अशाच रोमांचकारी अनुभवासाठी मोठ्या जिद्दीनं येत असल्याचं दिसत होतं़ सगळ्या काळज्या मागे ठेवून जो तो फक्त संगीताच्या नदीत नहायला जमलेला आणि नवे मित्र करायला, नवी नाती जुळवायला उत्सुक असलेला! जणू तीन दिवसात अख्खं आयुष्यच जगून घ्यायला आलेला!
दररोज दुपारी १ वाजता सोहळ्याला सुरुवात होते आणि मध्यरात्री १ पर्यंत डीजेंची धुंद कायम राहते. संपूर्ण बारा तासाचा काळ म्युझिक आणि मस्तीचा. या काळात रोजच्या जगण्यातली कसलीही काळजी, शल्यं कुणाच्याही मनात शिरकाव करू शकणार नाहीत, असा सगळा माहोल! प्रत्येक डीजे जेव्हा जेव्हा आपला कार्यक्रम सुरू करायचा तेव्हा तेव्हा जगाच्या एकोप्याबद्दल बोलायचा़ सर्वांनी सुखानं एकत्र राहायलं हवं़ मित्र बनायला हवं़़़ तुमच्या आजू-बाजूला असलेल्या कोणत्याही देशाच्या तरुण-तरुणीशी मैत्री करा़, इथे जुळेल ती मैत्री आयुष्यभर अविरत टिकवा़़़ हे प्रत्येकाचंच सांगणं होतं. साधंच, पण हृदयाच्या आतून आलेलं. त्यामुळे मनाला भिडणारं! आपल्या शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी स्नेह्याचे हात हाती घ्यावेसे वाटायला लावणारं!
रोज मध्यरात्री १ वाजता स्वल्पविराम घेतला जातो तेव्हा आतषबाजी होते. अशा प्रकारची उन्मनी, देखणी आतषबाजी मी तरी आजवर कुठे पाहिलेली नाही.
उद्याच्या स्वागतासाठी आजच्या दिवसानं दिलेल्या प्रकाशरूपी स्वल्पविरामाच्या स्मृती घेऊन दर रात्री आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने निघायचो.
परत पुन्हा अडीच किलोमीटरचं ते अंतर पायी चालायचं! दिवसभराच्या नाच-गाण्यांचा, गप्पांचा, आनंदाचा थकवा अंगात भरलेला तरी मध्यरात्रीची ती रपेट कोण जाणे कुठून नवं चैतन्य आणायची!
पहाट फुटताना हॉटेलमध्ये परतलो की त्याक्षणी दुसऱ्या दिवशीचे वेध लागत. मग त्याच ऊर्जेने आमची पावलं पुन्हा टुमारोलँडच्या दिशेनं निघत.
रोज नवे मित्र होत होते़ नव्या आणि न ऐकलेल्या डीजेला ऐकण्याची-पाहण्याची संधी मिळत होती़ उसळत वाहणारी संगीताची नदी आणि त्या उफाणत्या प्रवाहात नहाणारी बेभान शरीरं फक्त! बघताबघता त्या हजारो शरीरांना एकच आकार आल्यासारखा दिसे.. जणू एकाच आत्म्याला फुटलेले लाखो नाचते हात आणि थिरकते पाय! काही स्टॉल्सवर भटकंती करत असतानाचा एक प्रसंग. आमच्यापैकी एकाशी आदल्याच दिवशी साधी तोंडओळख झालेला एक विदेशी तरुण दिसला. त्याच्या डोळ्यांवर एक रंगीबेरंगी काचांचा गॉगल होता. आम्हाला गंंमत वाटली. हौस म्हणून आम्ही तो आपापल्या डोळ्यांवर चढवून बघू लागलो, तर हा पठ्ठ्या क्षणात गायब झाला... त्याला शोधलं तरी दिसेना. दहाएक मिनिटात तोच आम्हाला शोधत आला. येताना त्यानं आम्हा सर्वांसाठी गॉगल विकत आणले होते. त्याला काही म्हणे-विचारेपर्यंत आमच्या हातात त्या देखण्या भेटी ठेवून मिठ्या मारत तो गेलासुद्धा! नंतर कळलं, ही सहज आलेली ‘भेट’ प्रत्येकी तीसेक युरोची म्हणजे त्या तरुण मित्राच्या खिशासाठी तशी फारच महागडी होती. नंतर कळलं, हे असे अनुभव इथे नवीन नसतात. अनोळखी माणसं एकमेकांना भेटी देतात, जेवू-खाऊ घालतात. जणू तू-मी असा भेदाभेद असा काही उरतच नाही!
हे असं वातावरण अनुभवण्याच्या ओढीने या महोत्सवाकडे वळणारी तरुण पावलंही खूप असतात! शिकताशिकता नोकरी करून, खर्च वाचवून, पैसे साठवून ही मुलं अख्ख्या युरोपातून इथे येतात.
तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी काही खास डीजे राखून ठेवलेले होते. त्यांना लाइव्ह ऐकणं ही कानांना तृप्त करणारी आणि नजरेचं पारणं फेडणारी गोष्ट होती. सर्वोत्कृष्ट डान्स म्युझिकचा हा कळसच जणू! प्रत्येक बिट थिरकायला भाग पाडणारा होता़ एनर्जी वाढवणारा होता़ अखेरच्या दिवशी जेव्हा यावर्षीपुरता पूर्णविराम घेण्याची वेळ आली त्यावेळी आकाश आतषबाजीनं उजळून निघालं होतं. अर्धा-पाऊणतास अतिशय सुंदर आतषबाजी सुरू होती़ कानावर पडणारे बिट्स थांबले होते, पण मनातून-शरीरातून उसळत्या संगीताच्या लाटा ओसरायला तयार नव्हत्या.
बेल्जियममध्ये भेटलेल्या त्या लाटा आजही माझ्या मनातून धावत असतात आणि तिथे झालेल्या मैत्रीच्या कहाण्या आठवत राहतात.
वाटतं, हे असं साध्या साध्या आनंदांच्या ओढीने एकत्र येण्यातलं सुख किती निर्मळ आणि चिरंतन असतं!
... स्वत:च अंगावर ओरबाडून घेतलेल्या जगाच्या जखमांवर कधीतरी या सुखाचं मलम लागावं!
अडीच लाख लोक, सुगंधी स्वच्छता!
अडीच लाख लोक एकाच ठिकाणी जमलेले असणं आणि त्यांच्या हाती वेगवेगळ्या पेयांच्या बाटल्या, ग्लास, हाती झेंडे, भिन्न प्रकारच्या वस्तू, चमकणारे गॉगल्स, चमचमत्या टोप्या असणं हे रात्रीचं चित्र म्हणजे सकाळचा कचराच!
- पण बेल्जियममध्ये मी पाहिलेलं चित्र मात्र वेगळंच होतं.
रात्री कचरा व्हायचा. व्हायचाच. कारण गर्दीच मोठी. एवढ्या गर्दीतून कचरा टाकायला कोण कुठे आणि कसं जाणार?
पण दुसऱ्या दिवशी आल्यावर मात्र सगळीकडे सुंदर स्वच्छता. जणू काल रात्री काही झालंच नसावं. मी तर आयोजकांच्या तत्परतेला हातच जोडले. कारण दुसऱ्या दिवशी या दोन-अडीच लाख लोकांनी टाकलेल्या कचऱ्याचा ढीग सोडाच, एक बाटली.. कागदाचा नकोसा कपटाही कोठे दिसत नसे. सगळा कचरा रातोरात गायब!
संपूर्ण परिसरात शेकडो स्वच्छतागृहं होती़ ती फाइव्हस्टार हॉटेलांपेक्षाही स्वच्छ़ एवढ्या मोठ्या गर्दीतही कुठेही मोठी रांग लागलेली दिसली नाही. घाण वास येतोय किंवा सांडलेलं पाणी वाहतंय, असं कुठेही दिसलं नाही़ प्रत्येक स्वच्छतागृहाच्या बाहेर, तुम्हाला फ्रेश करण्यासाठी म्हणून एक व्यक्ती सदैव उभी दिसे. एका हाती वॉटर स्प्रे, दुसऱ्या हाती डीओडरंटचा सुगंधी फवारा... मी जगात इतकी फिरले आहे, पण कुठल्या स्वच्छतागृहाच्या बाहेर ही असली सुगंधी सोय मी तरी पाहिलेली नाही.
कडक सुरक्षा
युरोपीय देशांमध्ये सध्या प्रत्येक क्षणाला दहशतवादी हल्ल्याची भीती आहे. कधीही काहीही होऊ शकतं अशी प्रत्येकाच्या मनात दहशत असते. या सोहळ्याला जाण्याअगोदर माझ्याही मनात अशी भीती होती. पण लाखो लोक तीन दिवस एकत्र येणाऱ्या या सोहळ्याची सुरक्षितता आधुनिक होती. या संपूर्ण परिसरावर लष्कराचीे सहा ते सात हेलिकॉप्टर निगराणी ठेवत होती. शिवाय स्थानिक पोलिसांचे अनेक ड्रोनही कायम घिरट्या घालत होते़ एवढंच नव्हे तर प्रत्येक वीस फुटावर गर्दीमध्ये आयोजकांनी बाउंसर तैनात केलेले होते़ साडेसहा-सात फूट उंच-धिप्पाड बाउंसरला पाहून तरी कोणी गोंधळ घालायची कोण हिंमत करेल? आणि कुणी केल्याचं आढळलंही नाही़
इतक्या मोठ्या प्रमाणात मुली आणि तरुण मुलं असूनही कोणत्याही प्रकारची छेडछाड झाल्याचं दिसलं नाही़ म्युझिकच्या नशेसोबतच तिथं सवयीच्या झालेल्या मद्य आणि अमली पदार्थांमुळे ज्यांनाही त्रास झाला किंवा ते स्वत: स्वत:ला कंट्रोल करू शकत नसल्याचं दिसलं ज्यांना उचलून दूर नेणारे बाउंसर तर ठिकठिकाणी तयारीत होते.
जपानी वेटरचं स्वप्न
आम्ही जिथं जेवायला गेलो त्या जपानी हॉटेलमधल्या वेटरशी गप्पा सुरू होत्या. तो म्हणाला, ‘‘मी पण यावर्षी पहिल्यांदाच हा फेस्टिव्हल अनुभवतोय. गेल्या दीड-दोन वर्षांची कमाई मी बाजूला काढली अन् तीन दिवसांच्या या म्युझिकल आयुष्यावर मनसोक्त उधळली. जगलो तीन दिवस. पण हे तीन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वोच्च आनंद देणारे दिवस होते़ कारण वर्षभर आपल्या रोजी-रोटीसाठीची धडपड आहे़ तीच कामं, तेच व्याप आहेतच़़़ त्यातून वेळ-पैसा काढून हे जगणं जगायचं होतं़ ते या तीन दिवसांत मिळालं़’’ त्याच्याकडे बघून संगीतात काय जादू असते, हे जाणवत होतं.
एक विशीतला तरुण आपली टूमारोलँडमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वर्षभर मेहनत करतो..तीन दिवस जगून घेतो... खरं तर या फेस्टिव्हलचं तिकीट अन् तिथं राहण्याचा खर्च लाखाच्या पुढचा. पण तरीही यानंतरचा प्रत्येक फेस्टिव्हल अनुभवण्यासाठी जोमानं मेहनत करणार आणि पैसे साठवणार असं तो सांगत होता.
...त्या रात्रीचं ते डीनर मला आजही आठवतं. ते फक्त त्या अन्नाच्या स्वादासाठी नव्हे, ते ज्याने वाढलं त्या आमच्या मित्राच्या आठवणीसाठी!