आज तो बहुत दहशत का माहोल हैं!
By admin | Published: January 2, 2016 02:31 PM2016-01-02T14:31:41+5:302016-01-02T14:31:41+5:30
समाजातल्या दांभिकतेवर आज कोणी कबिराएवढे परखड लिहिले तर लोक त्याचा खूनच पाडतील!
Next
>- शबनम वीरमणी
शबनम वीरमणी. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माहितीपट निर्मात्या, दिग्दर्शक. गोध्रा हत्त्याकांडानंतर अस्वस्थ झालेल्या शबनम देशातल्या धार्मिक विद्वेषावर उतारा ठरू शकणा:या कबिराच्या शोधात पायाला अक्षरश: भिंगरी लावून फिरल्या. भारतातल्या खेडय़ापाडय़ांपासून ते पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये ‘कबिराचा राम’ धुंडाळताना त्यांना असंख्य माणसे भेटली.. त्यातून निर्माण झाले ‘हद-अनहद’सारखे काळजाचा ठाव घेणारे चार माहितीपट, कित्येक पुस्तके अन् सीडीज्.. तेरा वर्षापासून ‘कबीर प्रोजेक्ट’साठी अविश्रंत झटूनही शबनम म्हणतात, ‘अभी कहॉँ कबीर समझ पायी हूॅँ.. जितना उनको पकडने की कोशिश करती हूॅँ, उतना वो हाथ से निकल जाते हैं!’
- त्यांच्याशी एक संवाद.
तुम्ही अनेक वर्षापासून ‘कबीर प्रोजेक्ट’वर काम करीत आहात. कुठवर आले आहे काम?
- गुजरातमध्ये गोध्रा हत्त्याकांड घडले, तेव्हा मी अहमदाबादमध्येच राहत होते. त्या भीषण हिंसाचाराने मला अक्षरश: हलवून टाकले. प्रचंड अस्वस्थता आली. त्या अवस्थेतच मी धार्मिक विद्वेष, हिंसाचाराला कशाने उत्तर देता येईल, याचा शोध घेऊ लागले आणि दिसला कबीर! आपल्या दोह्यांतून धार्मिक भेदभावावर कठोर प्रहार करणा:या त्या कबिराचा ‘राम’ नेमका कोण आणि कोठे आहे, याचा शोध घ्यावासा वाटू लागला. त्यातूनच सुरू झाली अविश्रंत भ्रमंती.. नंतरची आमची सहा-सात वर्षे अक्षरश: कबीरमय होऊन गेली. पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या या माणसाची ‘बाणी’ आजही एवढी समकालीन का वाटते? अशा प्रश्नाने मनात फेर धरला होता. एकमेकांच्या विरोधात तलवारी घेऊन उभ्या ठाकलेल्या माणसांना आपल्या शब्दांनी वास्तवाचे भान देणारा कबीर शोधायचा ध्यासच लागला मग.
कबीर आजही जिवंत राहिला तो मौखिक परंपरेतून. लहान-लहान खेडी, गावांतल्या अडाणी स्त्रियांच्या तोंडच्या दोह्यांतून, भजनांतून! कबिरांचे वैशिष्टय़ म्हणजे, त्यांनी आपली ‘बाणी’ लिहून ठेवलेली नाही. त्यांच्यानंतर काही जणांनी त्यांचे दोहे पुस्तकांत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला; पण त्या-त्या प्रांतातल्या माणसांनी आपापली भाषा, लहेजातून जिवंत ठेवलेला कबीरच अधिक प्रभावी आहे. आजही अनेक गायक, सुफी कव्वाल अत्यंत प्रामाणिकपणो कबिराची बाणी गावोगावी पोहोचवत आहेत. शास्त्रीय संगीतापेक्षा कबीर अशा लोकपरंपरेतून अधिक गायले जातात. लहानशा खेडय़ांतले लोकगायक जेव्हा काळजाला घरे पाडणा:या आवाजात कबीर सांगू लागतात, तेव्हा धर्मा-धर्मातले भेद नष्ट होतात. त्यांच्या सुरात समाजातले अन्य सूरही येऊन मिळतात. अशा माणसांना भेटून आम्ही त्या-त्या प्रांतातला कबीर समजावून घेतला, ऐकला, रेकॉर्ड केला. माहीतीपट, ऑडिओ सीडी, अनुवाद केले, पुस्तके, वेबसाइट असे बरेच काम केले. अनुवादाचे काम तर अनेक अंगांनी झाले. कबिराची बाणी खडी बोलीतली. त्यांनी ती लिहून ठेवलेली नाही. मालवा (मध्य प्रदेश), मारवाड (राजस्थान), कच्छ (गुजरात), बाउल (बंगाल), सुफी, सिंधी अशा कितीतरी प्रांत-भाषा, गायनप्रकारांतून ही बाणी आपल्याला भेटते. प्रत्येक भाषेतले शब्द काहीसे वेगळे, लहेजा अलग आणि गोडवा त्याहून भिन्न!
या प्रवासाला तेरा वर्ष झाली.. तुम्हाला कबीर कसे-कसे भेटले?
- अरे.. आज तो बहुत दहशत का माहोल हैं.. जरा काही झाले की चित्रपटांवर बंदी आणली जाते, चित्रंना विरोध केला जातो. बोलण्याचे स्वातंत्र्य अजिबात राहिलेले नाही. या पाश्र्वभूमीवर कबीर आशेचा दिवा आहे. त्या माणसाने कोणालाच सोडले नाही. हिंदूंना झोडपले अन् मुस्लिमांवरही कठोर टीका केली. समाजातल्या दांभिकतेवर आज कोणी कबिराएवढे परखड लिहिले तर लोक त्याचा खूनच पाडतील! म्हणूनच कबीर आजही आव्हानात्मक आहे आणि त्यांच्या निर्भयतेची आत्यंतिक गरज आहे. समाजात सर्वासोबत राहायचे असेल, तर एकमेकांच्या परंपरा, संस्कृतीचा आदर करायला हवा; शिवाय असा आदर ठेवून त्या परंपरांची चिकित्सा करण्याची मुभा असणारे वातावरण हवे. सगळे घाबरत-घाबरत जगत राहीले, तर कोणीच कोणावर टीका करणार नाही. कबिरांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे स्वत:वरची टीका. कबीर निव्वळ समाजातल्या प्रश्नांना वाचा फोडत नाहीत, तर ते स्वत:लाही प्रश्न विचारतात. आपण स्वत:बाबतच असुरक्षित, भयग्रस्त असू, तर इतरांचे काय? अशी माणसे समोरच्या माणसाकडे राक्षस म्हणूनच पाहतील.. हैं ना? हे सगळे बरेच कठीण आहे; पण स्वत:च्या चिकित्सेशिवाय समाज बदलू शकत नाही, हेही खरे.
या शोधप्रक्रियेत तुम्हाला स्वत:ला काय गवसले?
- त्या सहा-सात वर्षानी मला अगदी अंतर्बाह्य बदलून टाकले. मी एका पारंपरिक पंजाबी घरातली; पण कडवी स्त्रीवादी, डाव्या विचारसरणीची. कुटुंबातली कर्मकांडे, परंपरा मी कधीच झुगारून टाकल्या होत्या. धर्म म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट असे माङो ठाम मत झाले होते; पण या सफरीत मला नवी दृष्टी लाभली. अजूनही मी नेमकी कोठे आहे, हे शोधते आहे; पण तूर्त एवढे सांगू शकेन की, मी पूर्वीइतकी कट्टर राहिले नाही. तुमचा लढा सर्वात आधी आपल्या आतल्या भयाविरुद्ध हवा. कबिरांनी, गांधीजींनी आणि नेल्सन मंडेलांनीही हेच सांगितले. मंडेलांनी गो:यांविरुद्ध कधीच द्वेष पेरला नाही. त्यांनी लोकांना सांगितले, ‘तुमचा लढा तुमच्या आतल्या भीतीशी आहे.’ कबिरांनी माङयात हेच परिवर्तन घडवले.. ही प्रक्रिया आजही सुरू आहे.. कारण आपल्याला कबीर जेवढा समजला असे वाटते, तेवढाच तो न समजलेला असतो. आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशपासून ते थेट पाकिस्तानच्या कराचीर्पयत फिरलो. त्या सहा-सात वर्षात काय-काय आणि कोण-कोण नाही भेटले? ‘देश गेला तरी हरकत नाही; पण धर्म महत्त्वाचा’ असे डोळ्यांत अंगार फुलवून बोलणारी माणसे सापडली, कबिरावर जिवापाड प्रेम करणारी, त्यांच्या ‘बाणी’साठी आयुष्य वाहून घेणारी आणि त्यातला राम-रहीम समजून घेत प्रसंगी धर्माला बाजूला ठेवणारी माणसे गवसली आणि तुमच्यापेक्षा कबीर आम्हाला जास्त कळला आहे, असे अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगणारी पाकिस्तानी माणसेही भेटली. सतत सहा-सात वर्षे हातात कॅमेरा घेऊन कधी अयोध्या, कधी वाराणसी, तर कधी कराचीतल्या गल्ल्या धुंडाळणो सोपे नव्हते. माझा पिंड पत्रकारितेचा असल्याने चौकशीतून माहिती मिळवत गेले, माणसे शोधत गेले.
कबिराच्या काळात कवी काय म्हणतो, याला महत्त्व होते. लोक कवीच्या शब्दाकडे लक्षदेत असत. बदलत्या समाजरचनेमुळे आता हे कमी झाले, असे वाटते का?
- कबीर म्हणतात, ‘कलजुग आ गया, संत ना माने कोयकुडा, कपटी, लालची, उनकी पूजा होय..’ तरी तुमच्या मताशी मी फारशी सहमत नाही. या गोष्टी पूर्वीही होतच होत्या. तेव्हाही सगळे कोठे कबिरांचे ऐकत होते? त्यांना विरोध झालाच. तेव्हाही रूढी-परंपरा होत्याच. उलट तेव्हा तर ही जोखडे अधिक घट्ट होती, हिंसाही होतच होती; पण एवढे खरे की, तेव्हा देशाला शब्दपरंपरा होती. आज शहरांतल्या तरुण पोरांना कबीर माहीत नाही. आजची शहरी माणसे सांस्कृतिकदृष्टय़ा अक्षरश: निर्धन आहेत. गावातल्या शब्दपरंपरेचा शहरांत मागमूसही दिसत नाही. फॅशन म्हणून कोठे सुफी कबीरबाणी ऐकलीही जाते; पण ती किती गांभीर्याने घेतली जाते? जेव्हा जेव्हा तुम्ही कबीर ऐकाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला एखादा सणसणीत फटका खाल्ल्यासारखे वाटेल.
आता पुढे काय?
- भविष्यात? हा विचारच कधी केला नाही. एकाने आम्हाला सांगितले, ‘ये महिने-दो महिने का प्रोजेक्ट नहीं, इसे तुम जिंदगी का प्रोजेक्ट बना लो.!’ ते अगदी खरे आहे. ही एक लाट आहे, ज्यात वाहून जायचे आहे. ही सगळी धडपड कबीरबाणी जिवंत राहावी म्हणून अजिबात नाही. ‘बाणी’ तर अजूनही भक्कमपणो उभी आहे. उलट समाजालाच तिची गरज आहे. कधी ऊर्जा देणा:या, तर कधी फटके मारत भानावर आणणा:या ‘बाणी’मुळे आयुष्य अर्थपूर्ण होऊन जाते आहे.. बाकी आम्हाला काय हवे असणार? अब रहा सवाल इस प्रोजेक्ट के असर का..
तो मैं जवाब दूॅँगी - कबीर जाने!
मुलाखत : सुदीप गुजराथी