गळ तोंडात अडकलेले कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:09 AM2018-11-25T09:09:00+5:302018-11-25T09:10:04+5:30
निसर्गाच्या कुशीत :निसर्गाने दीर्घायुष्य दिलेले कासव मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अल्पायुषी ठरू लागले आहे. खाण्यासाठी, पाळण्यासाठी, जादूटोणा, नदीतील वाळू उत्खनन, पाणी प्रदूषण, मासेमारी आदी कारणांमुळे कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.
- सिद्धार्थ सोनवणे
सृष्टीचक्रातील अत्यंत महत्त्वाचे घटक असलेले कासव नदी, तलाव, विहिरीतील पाणवनस्पती, कीटक खाऊन पाणी स्वच्छ ठेवते. निसर्गाने दीर्घायुष्य दिलेले कासव मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अल्पायुषी ठरू लागले आहे. खाण्यासाठी, पाळण्यासाठी, जादूटोणा, नदीतील वाळू उत्खनन, पाणी प्रदूषण, मासेमारी आदी कारणांमुळे कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.
निसर्गातील मानवी हस्तक्षेपाला बळी पडलेले असेच एक कासव गेवराई येथील विद्रूपा नदीपात्रात मासेमारीसाठी वापरत असलेला गळ तोंडात अडकलेल्या अवस्थेत सर्पमित्र बाप्पा कानडे यांना आढळले. तोंडात अडकलेला गळ काढण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. अखेर त्यांनी कासव गळ काढण्यासाठी सर्पराज्ञीत आणून दिले.
सर्पराज्ञीत आणल्यानंतर या कासवाची माहिती विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांना देण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे यांनाही माहिती दिली. डॉक्टरांनी बीडला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी कासवासह बीड येथील पशुवैद्यकीय दवाखाना गाठला. त्यांनी ते कासव हातात घेऊन त्याच्या तोंडात अडकलेला गळ काढण्यासाठी प्रयत्न केला. त्याचवेळी कासवाने त्याचे तोंड त्याच्या कवचाच्या आत ओढून घेतले. डॉक्टर पुन्हा पुन्हा त्याचे तोंड पकडण्याचा प्रयत्न करीत होते. कासवही त्यांना हुलकावणी देऊन त्याचे तोंड पुन्हा कवचात ओढून घेत होते.
साधारणपणे २ ते ३ तास डॉक्टरांनी त्याला भूल न देता त्याचे तोंड पकडण्याचा प्रयत्न केला; पण काही केल्या त्यांना यश आले नाही. शेवटी डॉक्टरांनी भूल देऊन त्याचे तोंड पकडण्याचे ठरवले. त्यानंतर डॉ. महेश लकडे यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. भूल दिल्यानंतर कासवाला जमिनीवर मोकळे सोडले. त्याचवेळी कासव कवचातून तोंड बाहेर काढून चालू लागले. हळूहळू त्याला भूल चढू लागली. तोंड कवचात ओढून घेणार नाही यासाठी आम्ही त्यावर लक्ष ठेवून होतो. साधारणत: १० ते १५ मिनिटांनी ते कासव चालता चालता एका जागेवर थांबले. त्याचे तोंड कवचातून बाहेरच होते. काही क्षणात ते शांत पडले. त्याचक्षणी मी त्याचे तोंड पकडले. त्यानंतर डॉ. विजय चौरे यांनी त्याचे तोंड चिमट्याने उघडले व डॉ. महेश लकडे यांनी त्याच्या जबड्यात अडकलेला दीड इंच लोखंडी गळ चिमट्याने अलगत बाहेर काढला.
साधारण तीन ते साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर आम्हाला त्याच्या तोंडातील गळ काढण्यात यश आले. त्यानंतर हे कासव मी सर्पराज्ञीत घेऊन आलो. त्या रात्री सात वाजता कासव पूर्ण शुद्धीवर आले व चालू-फिरू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते त्यांना कळवून त्या कासवाला गेवराईजवळील तलावात सोडून दिले. निसर्गाने दीर्घायुष्य दिलेल्या या कासवाला शस्त्रक्रियेनंतर खऱ्या अर्थाने दीर्घायुष्य मिळाले.
(संचालक, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, ता. शिरूर का., जि. बीड)