Tourism: यंदा तुमचं विमान चुकलंच !

By मनोज गडनीस | Published: April 16, 2023 01:30 PM2023-04-16T13:30:37+5:302023-04-16T13:31:51+5:30

Tourism: कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गेल्या मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. सध्या तर अशी स्थिती आहे की, मागणी तुफान आणि पुरवठा मात्र मर्यादित. याचा थेट परिणाम म्हणजे विमान तिकिटाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

Tourism: You missed your flight this year! | Tourism: यंदा तुमचं विमान चुकलंच !

Tourism: यंदा तुमचं विमान चुकलंच !

googlenewsNext

- मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी 

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गेल्या मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. सध्या तर अशी स्थिती आहे की, मागणी तुफान आणि पुरवठा मात्र मर्यादित. याचा थेट परिणाम म्हणजे विमान तिकिटाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत देशात वा परदेशात तुमच्या कुटुंबासह विमान प्रवासाचा काही बेत आखत असाल तर तुम्हाला उशीरच झाला आहे. विमान प्रवास किती महागला, का महागला, याचा वेध घेणारा हा सारांश...

विमान प्रवास का महागला ?
गेल्या काही महिन्यांत अनेक नव्या मार्गांवर थेट विमान सेवा सुरू झाल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर विमान प्रवासाला प्राधान्य दिले आहे. फेब्रुवारीत एका दिवसात देशातील प्रवासी संख्येने ४ लाख ४० हजारांचा उच्चांक गाठला. सद्य स्थिती अशी की, मागणी प्रचंड आणि पुरवठा मात्र मर्यादित. 
पुरवठा मर्यादित असण्याची कारणे म्हणजे, स्पाईस जेट आणि गो एअर सारख्या कंपन्यांची काही विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच आहेत. याची परिणती एकूण उड्डाणसंख्या कमी होण्यात झाली आहे. 
याखेरीज देशात जी नवीन विमानतळे विकसित झाली आहेत, तेथील ग्राऊंड चार्जेस आणि पार्किंग शुल्क यामध्ये तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. विमान कंपन्यांना हा खर्च सोसावा लागतो. त्यामुळे ही किंमत ते तिकिटाचे दर वाढवून ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात. याचाच प्रामुख्याने फटका विमान प्रवास महागण्याच्या रुपाने दिसून येत आहे. 

आता दिवाळीच्या सुट्टीचेच नियोजन करा...
साधारणपणे सुट्यांच्या काळात कुटुंबासोबत जायचे नियोजन केले जाते, तेव्हा ते किमान तीन महिने आधी केले जाते. याचा थेट फायदा म्हणजे, तीन महिने आगाऊ बुकिंग केले तर विमान प्रवासाचे दर स्वस्त पडतात. कुटुंब म्हणजे किमान चार लोक जरी गृहीत धरले तरी जाऊन - येऊन ४० ते ५० हजार रुपये विमान तिकिटांसाठी खर्ची पडतात. 

अनेक लोक एकावेळी विमानाने आणि एकावेळी रेल्वे किंवा अन्य मार्गाने प्रवासाचे नियोजन करतात. यंदा मात्र, एकेरी मार्गाच्याच तिकिटांचा हिशोब केला; तर चार जणांच्या तिकिटांचा खर्च हा ७० ते ८० हजारांच्या किंवा त्याही पुढे जात आहे. 

त्यामुळे आगाऊ बुकिंग करायचे म्हटले तर तीन नव्हे तर सहा महिने आधी केल्यास किंचित फायदा होईल, असे दिसते. त्यामुळे उन्हाळी सुटीत विमान प्रवासाचे नियोजन आता फसले असले तरी आतापासून नियोजन करून दिवाळी सुटीसाठी बुकिंग करता येईल.

कुठून बुकिंग करायचे ?
सध्या विमान, हॉटेल, पर्यटनाच्या ठिकाणी वाहन व्यवस्था किंवा तुमच्या टूरचे नियोजन करून देणाऱ्या अनेक वेबसाइट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या कंपन्यांच्या व्यवहारांत एक मेख आहे. ती अशी की, त्यांना ज्या विमान कंपनीकडून अथवा हॉटेलकडून जास्त कमिशन दिले जाते, त्यांचीच माहिती अधिक ठळकपणे या वेबसाइट्स मांडतात. 

किती महागला?
देशांतर्गत विमान प्रवास किमान २२ टक्के ते कमाल ४४ टक्क्यांपर्यंत महागला आहे. गेल्या मार्चपासून विमान प्रवासाशी निगडीत कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटले. त्यानंतर विमान कंपन्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या कंपन्यांनी तिकिटांच्या किमतीमध्ये वाढ केली. 

मुंबई ते दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या तीन महिन्यांत या मार्गावरील विमान प्रवासात किमान २२ टक्के वाढ झाली आहे. मुंबई ते लेह या मार्गाची किंमत परतीच्या प्रवासासह तीन महिन्यांपूर्वी ९ हजारांच्या घरात होती. आता मात्र परतीचा प्रवास १९ हजारांच्या घरात आहे. 

विमान प्रवासाबद्दल सांगायचे तर; या वेबसाइट्सवरून केवळ मर्यादित स्वरुपाची विमाने दिसतात. त्यामुळे त्यापलीकडे जाऊन जर आपल्याला माहिती मिळवायची असेल तर थेट संबंधित विमान कंपनीच्या वेबसाइट्सवर जावे. तिथे अनेक विमानांची माहिती मिळू शकेल. 

आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त आहे का ?
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशांच्या हवाई सीमेवरून प्रवास जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक  विमान कंपन्यांना वेगळा हवाई मार्ग निवडावा लागला आहे.
परिणामी, त्यांच्या वेळेत आणि इंधन खर्चात वाढ झाली आहे. ही वाढ ग्राहकांच्या खिशातून वसूल होत आहे. कोरोनामुळे अनेकांना परदेशात जाता आले नाही.
त्यामुळे परदेशात जाण्यास उत्सुक लोकांची संख्याही मोठी आहे. युरोपात जाणाऱ्या विमान तिकिटांच्या दरात १२ टक्के वाढ झाली आहे, तर अमेरिका - आशियातील विमानाच्या तिकीटदरांत १० टक्के वाढ झाली आहे. 

Web Title: Tourism: You missed your flight this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.