विज्ञानवादी गांधीजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 06:01 AM2019-02-03T06:01:00+5:302019-02-03T06:05:05+5:30

- विनय र. र. महात्मा गांधींनी जगाला ‘सत्याग्रह’ हे अनोखे साधन दिले. सत्याग्रह हा महात्मा गांधींचा सर्वात मोठा शोध ...

Towards an Understanding of Gandhiji's Views on Science.. | विज्ञानवादी गांधीजी!

विज्ञानवादी गांधीजी!

Next
ठळक मुद्देगांधीजींची पुण्यतिथी आणि त्यांच्या 150व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने..

- विनय र. र.

महात्मा गांधींनी जगाला ‘सत्याग्रह’ हे अनोखे साधन दिले. सत्याग्रह हा महात्मा गांधींचा सर्वात मोठा शोध आहे. त्या आधारे एक जनआंदोलन उभारून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले. त्याहीपलीकडे, ब्रिटिशांच्या गुलामीविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ करत असतानाच गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्याचाही मोठा ध्यास घेतला होता. शेतकरी, कामगार, कारागीर, श्रमांवर जगणाºया; परंतु प्रतिष्ठा नसलेल्या, मागास मानल्या जाणाºया कष्टकºयांची उत्पादनाची साधने अधिक कार्यक्षम कशी करता येतील याबद्दल त्यांनी प्रयोग केले, नवीन तंत्रे शोधून काढली. अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांसंदर्भात प्रयोग केले. प्रयोग करण्याच्या प्रेरणा अनेकांना दिल्या. चळवळीतून संघर्ष आणि तंत्रज्ञानातून नवी रचना अशा दोन्ही बाबी एकाच वेळेस त्यांनी केल्या.
गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह, स्वदेशी, शरीरश्रम, नयी तालीम अशा अनेक संकल्पना, मूल्ये, कार्यक्रम आपल्याला दिले. त्यावर आजही जगभर विचार आणि काम होत आहे. गांधीजींचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा या सर्व संकल्पनांचा मूलाधार आहे.
माणसाचे श्रम सुलभ करणारे; परंतु त्याच्या हातून रोजगार काढून न घेणारे; पर्यावरणस्नेही; सहज उपलब्ध होऊ शकणारे सुयोग्य तंत्रज्ञान व साधने निर्माण करणाºयांना आपण गांधी-विज्ञानाचे वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिक म्हणू शकतो. त्यात मगनलाल गांधी, आप्पासाहेब पटवर्धन, विनोबा भावे, जे. सी. कुमारप्पा, वाळुंजकर, लॉरी बेकर अशी अनेक नावे घेता येतील.
सूतकताई करणाºया चरख्यापासून ते आहार-आरोग्य, शेती, ग्रामोद्योग, सफाई, चर्मोद्योग, यात अनेक प्रयोग या तंत्रवैज्ञानिकांनी केले. पण रेल्वेसेवा, फोन, टेलिग्राम, छपाई, घड्याळ, शिवणयंत्र या त्या काळातल्या अत्याधुनिक यंत्रांनाही नाकारले नाही. माणसाच्या किमान गरजा भागवण्यासाठी यंत्रांमध्ये कोणत्या दुरुस्त्या, सुधारणा कराव्यात याबद्दल प्रयोग करण्याच्या प्रेरणा अनेकांना दिल्या. सी. व्ही. रमण, जे. सी. बोस, पी. सी. रॉय अशा भारतीय आणि आइन्स्टाइन, पिअरी क्यूरी अशा विदेशी वैज्ञानिकांशीही संपर्क साधला.
महात्मा गांधींनी तरुणांना आवाहन केले. अशी यंत्रे, जी कमी किमतीत बनवता येतील, सहज वापरता येतील, त्यांची दुरुस्ती आणि देखभाल गावात होऊ शकेल, जी केव्हाही वापरता येतील, ज्यावर कुटुंबातील लहानापासून थोरापर्यंत कोणालाही काम करून उत्पादन करता येईल. आपलं उत्पन्नाचं साधन उदरनिर्वाहाचे साधन बनवता येईल, असा चरखा बनवणाºयाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तेही १९२९ साली! कष्टकरी, उत्पादक, ग्राहक, दलाल, व्यापारी यांच्यात आपुलकी राहावी अशा समाजरचनेचा उद्देश महात्मा गांधींनी ठेवला. पुस्तकी शिक्षणापेक्षा हे कृतिशील शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे, असे गांधीजी सांगत.
सामान्यपणे असे मानले जाते की, गांधीजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विरोधी होते; परंतु खरे तर तसे नाही. सत्याचा शोध घेणे ही विज्ञानाची प्रेरणा आहे. गांधीजी आयुष्यभर सत्याचा शोध घेत होते. आपला हा सत्याचा शोधच त्यांनी आपल्या आत्मकथेत मांडला आहे. त्यांच्या आत्मकथेचे नावच मुळी ‘माझे सत्याचे प्रयोग’ असे आहे.
या आत्मकथेत गांधीजी लिहितात - ‘‘ज्याप्रमाणे वैज्ञानिक आपले प्रयोग अतिशय नियमपूर्वक, विचारपूर्वक आणि बारकाईने करतो आणि तरीही त्यांच्या निष्कर्षांना अंतिम मानत नाही; किंवा ते निष्कर्ष अंतिम आहेत याबाबत तो साशंक नसला तरी तटस्थ निश्चितच असतो, माझ्या प्रयोगांबाबत माझीही तीच भूमिका आहे. मी खूप आत्मपरीक्षण केले आहे, एका-एका मुद्द्याची छाननी केली आहे, तिचे पृथक्करण केले आहे; परंतु त्यातून निघालेले निष्कर्ष सर्वांसाठी अंतिम आहेत, ते खरे आहेत अथवा तेच खरे आहेत, असा दावा मी कधीच करणार नाही. मी इतके निश्चितपणे म्हणू शकेन की, माझ्या दृष्टीने हे सत्य आहे आणि याक्षणी तरी मला ते अंतिम सत्यच वाटते आहे. असे जर वाटत नसेल तर त्याआधारे मी कुठलेही कार्य उभे करू नये.’’ याप्रकारे गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवनाला व कार्याला सत्याचा आधार दिला होता.
गांधीजी यंत्रविरोधी नव्हते. गांधीजींनी स्वत:च म्हटले आहे की, मी यंत्रांच्या विरोधी कसा असू शकेन, जेव्हा माझे शरीरच एक नाजूक आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे! मात्र अशी यंत्रे असू नयेत की त्यामुळे माणसालाच काम न राहिल्यामुळे तो निष्क्रि य व बेकार बनेल. गांधीजींचा विज्ञानविषयक विचारही त्यांच्या सर्व विचारांप्रमाणेच मानवतेवर आधारित आहे. केवळ वस्तूंचे ज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे, अशी त्यांची धारणा आहे.
त्यांनी अशा विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला की ज्यायोगे माणसाचे श्रम सुलभ होतील, बेरोजगारी न वाढता उलट रोजगारनिर्मिती होईल, ही तंत्रे तयार करण्यास व वापरण्यास सोपी असतील, स्थानिक पातळीवर, शक्यतो घरच्या घरी निर्माण होऊ शकतील, ती पर्यावरणस्नेही असतील व त्याने व्यक्ती व समाज स्वावलंबी बनेल.
सर्वोदयाच्या व अंत्योदयाच्या प्रेरणेतून, त्याद्वारे त्यांनी जातिव्यवस्थेतील बंदिस्तपणा आणि विषमतेवरही आघात केला. गांधीजींची इच्छा अशी होती की सारे ‘सेवा संघ’ हे संशोधन संस्था बनावेत, ज्यातून ग्रामस्वावलंबनाच्या व ग्रामस्वराज्याच्या दिशेने वाटचाल होऊ शकेल. गांधीजींचे कुठलेही प्रयोग सुटे-सुटे नव्हते, तर त्यांच्या प्रत्येक प्रयोगात जीवनाशी जोडलेपण, सेंद्रियत्व आणि समग्रत्व होते. म्हणूनच त्यांचे प्रयोग ही जीवनदृष्टी आहे. व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि वैश्विक पातळीवरही.
गांधीजींनी विज्ञानाचे, वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व जाणले होते. विज्ञानात सत्याला स्थान आहे, सत्याच्या शोधाला स्थान आहे. पूर्वापार चालत आली आहे म्हणून त्याच एका कारणाने एखादी गोष्ट वैज्ञानिक ठरत नाही तर ती पुन्हा पुन्हा तपासणी करून घेतली पाहिजे, असा गांधीजींचा आग्रह असे. विज्ञानात सत्याबरोबर अहिंसा या तत्त्वालाही स्थान असावे असा गांधीजींचा आग्रह होता. हिंसा म्हणजे दुसºयाला ठार मारणे, भोसकाभोसकी करणे, रक्तपात करणे, इजा पोहोचविणे आणि अहिंसा म्हणजे याविरुद्ध वर्तन एवढाच अर्थ गांधीजींना अपेक्षित नव्हता.
एखाद्या व्यक्तीला वा समाजाला काम, रोजगार यांपासून वंचित करणे म्हणजेही हिंसा आहे. द्वेष वाढविण्यासाठी, युद्धे करण्यासाठी प्रवृत्त करणारे, हिंसेकडे नेणारे संशोधन वैज्ञानिकांनी करू नये, असे गांधीजी सांगत. गांधींच्या काळात दोन जागतिक महायुद्धे झाली. त्या युद्धांची भयानकता विज्ञान -तंत्रज्ञानाने किती वाढवली ते गांधीजींना दिसले होते. युद्ध सोडून विज्ञान, संशोधनाची दुसरी प्रेरणा व्यापार आणि नफेखोरी आहे. त्यातून माणुसकीपेक्षा विषमता वाढत जाते. ते टाळण्यासाठी संशोधनात अहिंसा मूल्य असण्याचा गांधीजींचा आग्रह होता. प्रत्येक व्यक्तीकडे असणाºया क्षमता समाजाच्या भल्यासाठी वापरत सर्वांचा अधिक माणूसपणाकडे विकास करणे हे ध्येय गांधीजींना अभिप्रेत होते. जात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग हे भेद ओलांडून समाज आणि व्यक्ती यांच्यात परस्परपूरक संबंध राहातील. ते त्याग आणि निष्ठा यांचे संगोपन करतील हा गांधींचा आशावाद होता. त्यांचा वारसा सांगणाºया आपण सर्वांनी वैज्ञानिक पद्धतीने तो सिद्ध करून दाखवला पाहिजे.

गांधी विज्ञान संमेलन
२८ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात सेवाग्राम, वर्धा येथे गांधी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महात्मा गांधींचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांनी सहकाºयांबरोबर वैज्ञानिक निष्ठेने प्रयोग करून विकसित केलेली तंत्रे, त्याचबरोबर आजच्या प्रदूषण, संसाधनांचा ºहास आणि बेरोजगारी अशा समस्या निर्माण करणाºया तंत्रविज्ञानाऐवजी पर्यावरण आणि संसाधने सांभाळत रोजगाराभिमुख तंत्र विकसित करण्याची मनोभूमिका तयार कशी करता येईल, ते या संमेलनात उलगडेल.

(लेखक मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत.)
vinay.ramaraghunath@gmail.com

Web Title: Towards an Understanding of Gandhiji's Views on Science..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.