निसर्गातले नक्कलखोर
By admin | Published: December 19, 2015 03:57 PM2015-12-19T15:57:15+5:302015-12-19T15:57:15+5:30
निसर्गातलं आपलं अस्तित्व टिकवायचं तर प्रत्येकाला अनेक सव्यापसव्य करावे लागतात. काही कोळी आपण मुंगी असल्याचं भासवतात, कवडय़ा साप मन्यारचं ‘रूप’ घेतो, फुलपाखरं दुस:या जातीच्या विषारी फुलपाखरांचे रंग उचलतात, काही वनस्पती तर आपल्या फुलांना माशीचं इतकं बेमालूम रूप देतात, की नरमाशी या फुलाशीच प्रेमालाप सुरू करतात!
Next
>- मकरंद जोशी
वैविध्यपूर्ण आणि वैचित्र्यपूर्ण निसर्गातली विविधता थक्क करणारी तर आहेच, पण त्यामागचा कार्यकारणभाव अधिक अचंबित करणारा आहे. निसर्गाच्या अफाट चक्र ामध्ये प्रत्येक घटकाची विशिष्ट अशी जागा आहे, प्रत्येक घटकाला काही काम नेमून दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या रंगरूपामागे काही प्रयोजन आहे. या अशा भूमिका वाटून देतानाच निसर्गाने प्रत्येक जाती-उपजातीला स्वत:ची अशी खास वैशिष्टय़े, रंग-रूप दिले आहे. या रंग-रूपांच्या फरकामुळेच आपल्याला वेगवेगळे प्राणी, पक्षी, कीटक, फुले ओळखणं सोपं जातं. याच रंगरूपाचा वापर करून प्राणी आपला बचाव तर करतातच; पण निसर्ग इतक्यावरच थांबलेला नाही. काही काही जिवांना त्याने स्वत:च्या बचावासाठी नक्कल - मिमिक्र ी - करण्याची कलाही शिकवली आहे. सुमारे एकशेसाठ वर्षांपूर्वी ब्राझीलच्या जंगलांमध्ये फुलपाखरांचा अभ्यास करताना हेन्री वॉल्टर बेट्स या निसर्ग अभ्यासकाला असं जाणवलं की दोन वेगवेगळ्या जातीच्या फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षीत साम्य आहे. आता जेव्हा जाती वेगवेगळ्या असतात तेव्हा असं होत नाही, मग हे साम्य का आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्याच्या लक्षात आलं की ही चक्क नक्कल आहे आणि ही नक्कल एका चांगल्या, बिनविषारी प्रकारच्या फुलपाखराने दुस:या घातक, विषारी प्रकारच्या फुलपाखराची केली आहे. फुलपाखरांमध्येही बिन विषारी आणि विषारी - अर्थात त्यांच्या भक्षकांसाठी म्हणजे सरडे, पक्षी - असे प्रकार असतात हे तोपर्यंत माहीत होते; पण त्याचा फायदा घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी चांगल्या प्रकारची फुलपाखरे घातक फुलपाखरांची नक्कल करतात हे माहीत नव्हतं. ते जगाला बेट्सच्या अभ्यासामुळे कळले. त्यानंतर निसर्ग संशोधक, अभ्यासक यांचे लक्ष अशा प्रकारच्या मिमिक्र ीकडे गेलं आणि निसर्गातल्या इतर घटकांमधील नक्कलखोरही समोर आले.
बेट्सने ज्या प्रकारची मिमिक्र ी शोधली - चांगल्या जातीने घातक जातीची नक्कल करणो - त्याला बेटेशियन मिमिक्र ी म्हणतात. आपल्याकडचे त्याचे सर्वात उत्तम उदाहरण फुलपाखरांमध्येच पाहायला मिळते. टायगर वर्गातली फुलपाखरे जेव्हा अळी अवस्थेत असतात तेव्हा ती रु ईच्या झाडाची पाने खाऊन वाढतात. त्यामुळे त्या पानांमधील टॉक्सिन्स या अळीच्या शरीरात जमा होतात. पुढे या अळीचे फुलपाखरामध्ये रूपांतर झाल्यावरही हे घातक पदार्थ फुलपाखराच्या शरीरात साचलेले असतात. त्यामुळे टायगर जातीचे फुलपाखरू जर एखाद्या सरडय़ाने, पक्ष्याने खाल्ले तर त्याला त्रस होतो. साहजिकच या रंगाचे फुलपाखरू खायचे नाही हा संदेश भक्षकांच्या मेंदूवर नोंदवलेला असतो. त्याचाच फायदा डॅनिड एग फ्लाय जातीच्या फुलपाखराची मादी घेते. या मादीच्या पंखांचे बाहेरचे रंग हुबेहूब प्लेन टायगर फुलपाखरासारखे असतात. त्यामुळे भक्षक तिला घातक समजून टाळतात. आता मादीच ही नक्कल का करते, तर तिच्यावर प्रजोत्पादनाची जबाबदारी असते. त्यामुळे मादी वाचली तर नवी फुलपाखरे जन्माला येतील आणि नक्कल फक्त बाहेरूनच का तर डॅनिड एग फ्लायच्या नराला आपल्या मादीची ओळख पटली पाहिजे म्हणून आतमधून रंग जातीशी इमान राखणारे. ही अशी बेटेशियन मिमिक्र ी करणारे नक्कलखोर कीटकांच्या जगात अनेक आहेत. मिमिक्र ीचा आणखी एक प्रकार म्हणजे म्युलेरियन मिमिक्र ी. फ्रिट्झ म्युलर या जर्मन निसर्गतज्ज्ञाने हा प्रकार शोधून काढला. यामध्ये एकमेकांसारखी दिसणारी दोन्ही फुलपाखरे त्यांच्या भक्षकांसाठी खाण्यायोग्य नसतात. म्हणजेच नक्कल आणि अस्सल दोन्ही घातकच असतात. आता दोन्ही जर वाईटच आहेत तर मग ते एकमेकांच्या रंगांची नक्कल का करतात? तर ती निसर्गाने केलेली सोय आहे. भक्षकांना फक्त एकाच प्रकारची नक्षी, रंग लक्षात ठेवून सावध राहता येते. प्रत्येक घातक फुलपाखरासाठी वेगवेगळे रंग लक्षात ठेवावे लागत नाहीत. अमेरिकेतील मोनार्च फुलपाखरू आणि अॅडमिरल फुलपाखरू हे म्युलेरियन मिमिक्र ीचं आदर्श उदाहरण मानलं जातं.
फुलपाखरांप्रमाणोच नक्कलखोरांचे मोठे प्रमाण आढळते ते आर्चिनडे गटातल्या कोळ्यांमध्ये. स्वत:च्या बचावासाठी किंवा भक्ष मिळवायला सोपं जावं म्हणून हे अष्टपाद कोळी षटपाद मुंग्यांची नक्कल वठवतात. वेगवेगळ्या तीनशे कुळांमधले कोळी वेगवेगळ्या जातीच्या मुंग्यांची नक्कल वठवण्यात माहीर आहेत. त्यातील आपल्याकडे सहज दिसणारे उदाहरण म्हणजे साल्टिसडे कुळातील जम्पिंग स्पायडर. या कोळ्याची नर आणि मादी दोघेही विव्हर अॅण्टसची (ओंबिल किंवा आग्या मुंगी) नक्कल करतात. पानाला पाने जोडून आपले घरटे विणणा:या या मुंग्या चांगल्याच आक्र मक असतात आणि कडकडून चावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय जर त्यांना भक्षकाने खायचा प्रयत्न केला तर त्या वाइट चवीचे फॉर्मिक अॅसिड स्रवतात. त्यामुळे मुंग्यांचे सर्वसाधारण शिकारी या विणकर मुंग्यांच्या वाटेला जात नाहीत. याचाच फायदा घेऊन जम्पिंग स्पायडर आपल्या शरीराचा आकार या मुंग्यांसारखा करतो आणि स्वत:चा जीव वाचवतो. त्यातही या कोळ्याची मादी हुबेहूब मुंगीसारखी दिसते, तर नर एखादी मोठी मुंगी कामगार मुंगीला उचलून नेणा:या मुंगीसारखा दिसतो. आपली नक्कल खरी वाटावी म्हणून हे कोळी आपले पुढचे दोन पाय हवेत उंचावून, मुंग्यांच्या अॅण्टेनांचा भास निर्माण करतात. मात्र हे कोळी आपल्या नकलेचा फायदा घेऊन या मुंग्यांच्या वारूळात शिरु न मुंग्या खायचे धाडस करत नाहीत.
कीटकांप्रमाणोच सरीसृप अर्थात रेप्टाइल गटातही असे नक्कलखोर पाहायला मिळतात. मण्यार (कॉमन क्रेट) हा भारतातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक. निशाचर असलेली मण्यार नागापेक्षाही जास्त विषारी मानली जाते. निळसर झाक असलेल्या काळ्या कुळकुळीत अंगावरचे पांढ:या रंगाचे पट्टे ही मण्यार ओळखण्याची सोपी खूण. मण्यारच्या या रंगरूपाची नक्कल करणारा साप म्हणजे कवडय़ा साप (वूल्फ स्नेक). मात्र कवडय़ाने केलेली मण्यारची नक्कल बारकाईने पाहिली तर कळू शकते. एकतर पूर्ण वाढलेला कवडय़ा साप जास्तीत जास्त अडीच फुटांपर्यंत वाढतो, तर मण्यार पाच ते सहा फूट लांब असते. त्याचप्रमाणो मण्यारीच्या अंगावर जे पांढरे पट्टे असतात ते जोडीजोडीने असतात. कवडय़ाच्या अंगावर तसे नसतात. सगळ्यात मोठा फरक म्हणजे मण्यारीच्या मानेवर एकही पट्टा नसतो पण कवडय़ाच्या मानेवर ठसठशीत पट्टा असतो.
आणखी एक अफलातून मिमिक्र ी पाहायला मिळते ती चक्क वनस्पती विश्वामध्ये. वनस्पतींच्या बीज प्रसाराचे काम कीटक करतात, पण त्यांनी हे काम नक्की करावे म्हणून कीटकांना भुलवण्यासाठी वनस्पतींमध्ये थेट कीटकांचीच नक्कल करणारे बहाद्दर आहेत. बी ऑर्किड नावाच्या ऑर्किडचे फूल याचं झकास उदाहरण म्हणता येईल. एकतर ऑर्किड्स ही नेहमी दुस:या वृक्षावर वाढत असल्याने, त्यांना आपले परागीभवन करून घेण्यासाठी आकर्षक रंग आणि उत्तेजक गंध याची मदत लागतेच. पण कॉटोनिया प्रकारचे ऑर्किड त्यावरच न थांबता, आपल्या फुलाला चक्क माशीचे रूप बहाल करते. या ऑर्किडच्या लांब लांब काडय़ांच्या टोकावर डोलणारी फुले ही लांबून पाहिली तर पंख पसरून बसलेल्या माशीसारखी दिसतात. वा:याने डुलणा:या या काडीमुळे ही ‘माशी’ उडतेय असा भास निर्माण होतो आणि या फुलातून येणारा गंध नर माशीला भुलवायला पुरेसा असतो. मग नर माशी मिलनाच्या आशेने या ‘माशी’कडे ङोपावते,तिच्यावर स्वार होऊन तिला उचलण्याचा प्रयत्न करते. आता ही माशी म्हणजे झाडाचे फूल असल्याने ते जागचे हलत नाही. ही मादी आपल्याला साथ देत नाही म्हणून नर तिच्यावरून उडतो आणि दुस:या ‘माशी’कडे जातो. मात्र हे होताना फुलातील परागकण या नर माशीच्या अंगाला चिकटलेले असतात आणि तो नर दुस:या ‘माशी’कडे जातो तेव्हा हे परागकण त्या ‘माशी’च्या म्हणजेच फुलाच्या अंतरंगात पोहोचतात आणि परागीभवन होते. आता माशीची नक्कल करणा:या कॉटोनियाच्या फुलांचे परागीभवन जसे खात्रीशीरपणो होते, त्याचप्रमाणो त्याचे माशीचे रूप पाहून इतर कीटक त्यापासून दूर राहतात. आता या नकलेमध्ये बिचा:या ख:या नर माशीची फसवणूक होते. पण त्याला इलाज नाही. निसर्गात अस्तित्व टिकवण्यासाठी सारं काही क्षम्य असतं.
तर असे हे निसर्गातले नक्कलखोर, मानवी नकलाकारांपेक्षा जराही कमी नाहीत. कदाचित जास्तच सरस असतील, कारण नक्कल करून ते त्यांच्यावर निसर्गाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणो पूर्ण करतात.
makarandvj@gmail.com