मंतरलेले जग!..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:04 AM2020-02-09T06:04:00+5:302020-02-09T06:05:07+5:30
संगीताच्या शोधात मी घराबाहेर पडलो. युरोप, आफ्रिका, मध्य पूर्वेतील देश, तिथली गावे पालथी घातली. ही भटकंती प्रत्येकवेळी मला भारतीय संगीताकडे घेऊन जात होती. भारतात आलो आणि वाटले, बस, हा देश हीच आपली कर्मभूमी.! कौटुंबिक कारणाने फ्रान्समध्ये परतावे लागले; पण आजही पॅरिसमध्ये जेव्हा मी सतार छेडतो, तेव्हा माझ्या मनात असते, बनारसमधील संध्याकाळ. सोबत गंगेच्या घाटावरची लगबग आणि मंदिरातील आरतीसाठी वाजणार्या घंटा..
- मिशेल ग्वे
‘ज्यांना सभागृहात धूम्रपान करायचे आहे त्यांनी तडक बाहेर जावे. आमच्यासाठी संगीत पवित्र आहे आणि मैफल म्हणजे आमची प्रार्थना आहे.’ - 1977 साली माँट्रियलमधील एका तुडुंब भरलेल्या सभागृहातील र्शोत्यांना पंडित रविशंकर यांनी हुकूम केला आणि मी अंतर्बाह्य थरारलो. ज्या देशात पाहुणे म्हणून आलो आहोत त्याच देशातील यजमानांना इतक्या थेट शब्दात सूचना देणारे पहिलेच कलाकार मी बघत होतो. काय घडेल आता नेमके?.
- मी उत्सुकतेने आवतीभोवती बघू लागलो. विरोधाचा एक शब्दसुद्धा न उच्चारता काही क्षणातच चिलीमवाले आणि धुरामध्ये बुडालेले र्शोते मुकाटपणे बाहेर पडले. सभागृहात आदबयुक्त शांतता पसरली अन् काही क्षणात मैफल सुरू झाली. पंडित रविशंकर अन् उस्ताद अल्लारखॉँ हे मला भेटलेले पहिले भारतीय कलाकार. तोपर्यंत मी रविशंकर आणि यहुदी मेहुनीन यांचे एकत्रित वाद्यवादन असलेली रेकॉर्ड फक्त ऐकली होती आणि एखादे व्यसन लागावे तशी पुन्हा-पुन्हा ती ऐकत राहिलो होतो. तेव्हा मी जेमतेम पंधरा वर्षांचा असेन. त्यानंतर या कलाकारांना भेटण्याची संधी सतत शोधत होतो. संगीत हा माझ्यासाठी त्या वयातसुद्धा जगण्याचा धर्म होता. त्यामुळे संगीताला पवित्र कला मानणार्या या संगीताशी माझे झटकन नाते जुळले; पण त्याच्याशी जिवाभावाचे मैत्र जुळण्यापूर्वी जग आणि चारही दिशा पायाखालून तुडवाव्या लागल्या.
मोठे होण्यासाठी बेबी फूड आणि पियानोचे स्वर हे दोन्ही आवश्यक असते असा समज व्हावा, असे माझे बालपण होते. किंबहुना प्रत्येक घरात जशी कुकिंग रेंज असते तसाच पियानोसुद्धा असतोच अशी माझी खात्री होती. अशा कुटुंबातील मुलाने संगीत शिक्षण घेणे हे फार नवलाचे नव्हते. वयाच्या आठव्या वर्षी क्युबेकमधील कॉन्सरव्हेटरीमध्ये माझे गिटारचे शिक्षण सुरू झाले. सात वर्षांच्या त्या शिक्षणाने मला काय दिले असेल तर, संगीत माझ्या आयुष्यात कशासाठी हे मला या काळात नक्की समजले.
संगीत हा माझ्यासाठी चारघटका वेळ घालवणारा छंद नव्हता, मला शोध होता तो माझी सही असलेल्या भाषेचा आणि अभिव्यक्तीचा. संगीतातूनच ती मिळेल याची मला खात्री होती; पण ते संगीत मला कुठे भेटेल, हा प्रश्न आणि इच्छा घेऊन मी घराबाहेर पडलो. देशोदेशीच्या संगीताची ओळख आणि धर्म समजून घेण्यासाठी. युरोप, आफ्रिका, मध्य पूर्वेकडील देशातील अनेक गावे त्यातील संगीताच्या साथीने पालथे घालत होतो. कलाकारांना भेटत होतो. आज जाणवते आहे, ही भटकंती मला भारतीय संगीताच्या जवळ घेऊन जात होती.
मला आठवतंय, 1981 साली मी आग्र्याला पोहोचलो. दोनेक महिन्यांत इथले शिक्षण आटोपून पुढे जायचे अशी योजना मनात पक्की होती. प्रारंभीचा माझा गुरु होता एक अगदी तरु ण सतारिया. क्युबेकसारख्या नितांत रमणीय, फुलांच्या गावातून मी आग्र्यात उतरलो. वातावरणात तर्हेतर्हेचे मसाल्यांचे वास, छोट्या गल्ल्यांमधून जमलेले मोठाले कचर्याचे ढीग, त्यावर बसलेली कुत्री, गाढवं आणि माणसांची नको इतकी वर्दळ. थोडक्यात, आल्या-आल्या काही तासातच पळून जाण्याची हमखास खात्री; पण तरीही मी थांबलो. त्या तरु ण गुरुकडे जे काही कानावर पडत होते ते मला अगदी नवे, आजवर न ऐकलेले असे वाटत होते. एखाद्या जुनाट पेटीमध्ये असलेल्या रत्नांचे केवळ कवडसे दिसावे एवढीच होती ती ओळख; पण जीव गुंतवून टाकणारी. जाणवले, काही राग आणि त्याच्या स्वरांच्या काही रचना याच्या पलीकडे आहे हे संगीत. म्हणजे, किती दूरवर जाणारे? किती खोलवर रु जलेले? कदाचित, याचा अंदाजही येणे मुश्कील असे काही. मग मी माझा मुक्काम आणखी दोन महिने वाढवला. वाटले, एवढे कदाचित पुरेसे असेल. पण, हा निव्वळ भ्रम होता माझा. आपण समुद्र ओंजळीत सामावण्याचा प्रयत्न करतोय ही जाणीव जशी लख्ख होऊ लागली, तसा मी माझा मुक्काम बनारसला हलवला.
बनारस. धावणार्या जगाचा वेग नाकारून आपल्या मस्तीत, विडा चघळत तब्येतीत स्वरांचा सांभाळ करणारे गाव. इथे मला भेटले गुरु सैनिया घराण्याचे रामदास चक्र वर्ती, त्यानंतर याच घराण्याचे आणखी एक उत्तुंग कलाकार उस्ताद मुश्ताक अली खान आणि मग जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक बी. सी. पाटेकर. या गुरुंच्या निमित्ताने बनारस हिंदू विद्यापीठामधील विलक्षण बुद्धिमान मित्रांचा आणि त्यांच्या अभ्यासाचा परिचय झाला. त्या वातावरणातील बौद्धिक चर्चा, अखंड सुरू असलेल्या छोटेखानी संगीत मैफली, त्यात होणारी संगीताच्या मांडणीची, शुद्धतेची, स्वर लगावाची, बंदिशीमध्ये आणि राग स्वरूपातून व्यक्त होणार्या भावाची चर्चा-वाद हे सगळे-सगळे मला संगीताकडे बघण्याची दृष्टी किती महत्त्वाची आहे ते सुचवत होते. रागाची चौकट आणि तालाचे आवर्तन हे झाले त्याचे निव्वळ शास्र; पण ते पुरेसे नाही, कारण संगीत म्हणजे जिम्नॅस्टिक्स नाही हा विचार इतक्या नेमकेपणाने थेट आजवर कोणी मांडला नव्हता. संगीत आणि जीवनाचे तत्त्वज्ञान, मूल्य यामधील असलेले आंतरिक नाते आजवर असे कधीच कुठे उलगडले नव्हते. या मंतरलेल्या अनुभवांनी मला पुन्हा-पुन्हा आश्वासन दिले, मी जे शोधत होतो ते हेच!
मी शोधात होतो अभिव्यक्तीच्या माझ्या शैलीच्या. ती शैली घडवण्याचे स्वातंत्र्य मला या संगीताने दिले. काळाच्या कसोटीवर कठोरपणे पारखून घेतलेल्या सांगीतिक भाषेचा हात न सोडता ही शैली घडवता येते याचे नि:संदिग्ध वचन मला दिले. या संगीतात मला दिसला अव्यक्त अशा स्वरांच्या मांडणीतून विणला जाणारा नाट्यपूर्ण भावनांचा एक विशाल पट आणि त्यासाठी वापरले जाणारे स्वरांचे बारकावे. संस्कृतसारख्या प्रगल्भ भाषेची झुळूकसुद्धा आजवर अंगावरून गेली नव्हती; पण बनारस विद्यापीठात भेटला अभिनव गुप्त नावाचा विचारवंत, तत्त्वज्ञ, सौंदर्याचा अभ्यासक. संगीतातील रस आणि तन्मय भाव याचा हातात हात घालून होणारा प्रवास सांगणारा. या संगीतातील मला सर्वात भावलेली बाब कोणती, तर स्वरांचा लगाव आणि त्याच्या मदतीने खुलत जाणारा कोणत्याही रागामधील रस. संगीतातील रसाचा विचार जाझ आणि ब्लूज या पाश्चिमात्य संगीत प्रकारातही केला गेला आहे; पण भारतात तो ज्या तर्हेने विकसित झाला आहे, त्याची मोजपट्टी कुठेच नाही.!
कुठे मिळाला हा विचार या संगीताला? मला वाटते, जीवनाकडे बघण्याच्या भारतीय तत्त्वज्ञानातून तो वर आलाय. या सगळ्या जीवन व्यवहाराच्या मागे उभ्या अदृश्य शक्तीवर या तत्त्वज्ञानाचा असलेला अढळ विश्वास, जीवनाची शाश्वतता आणि जन्म-मृत्यूच्या अविरत फिरत असलेल्या चक्र ावर असलेली र्शद्धा बघितली की या मातीमधील संगीत आणि कलाकार समजणे थोडे सहज होऊ लागते. हा मंत्र मला मिळाला आणि एकाक्षणी वाटले, बस, हा देश हीच आपली कर्मभूमी.!
सतार शिकण्यासाठी आवश्यक म्हणून मी पाटेकर गुरु जींकडून गायनाचे धडे घेऊ लागलो आणि जाणवले, गळ्यातून उमटणारे आणि त्यावेळी मनात स्फुरणारे स्वर बघण्याचा आनंद काही औरच..! त्यामुळे सतारवादनासाठी रागाच्या मुळापर्यंत मला नेणारी एक वाट एवढेच माझ्या गाण्याचे स्वरूप न राहाता मी एक गायक होण्याच्या वाटेला लागलो.
दहा वर्षांहून अधिक काळ मी भारतात राहिलो. हे सगळे अगदी सहज घडत गेले का? एक वेळ अशी आली होती की, यापैकी काहीही घडले नसते इतका मी आजारी पडलो. आज मी भारतीय छोले-भटुरे आणि कढी-पकोडे यांसारख्या पदार्थांचा अव्वल दर्जाचा भक्त आहे. मला गाणे शिकवता-शिकवता, दह्यात मुरवलेले लुसलुशीत तंदुरी मटण बनवण्याची दीक्षा उस्ताद फरीदुद्दिन डागर यांनी माझ्या बायकोला दिलीय; पण हे सगळे पचवण्याची क्षमता माझ्यामध्ये येण्यापूर्वी आणि येण्यासाठी पाच वर्षं मला माझ्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाशी लढावे लागले. या अन्नाची, ते शिजवण्याच्या चांगल्या-वाईट सवयींशी जुळवून घ्यावे लागले.
भारतीय माणसाच्या स्वभावातील अंगभूत चांगुलपणावर विश्वास ठेवत मी इथे पाय रोवून उभे राहण्याचे ठरवले आणि यातून सावरत गेलो. बनारस वगळता भारतातील मला आवडणारे शहर कोणते? मी मोजू लागतो, मुंबई, त्यातही कुलाबा आणि त्या परिसरातील लिओपोल्ड हॉटेल, कोडाईकनाल, धर्मशाला, मसुरी. बाकी भाषेच्या वगैरे प्रश्नांनी कधी मला फारसे हैराण केले नाही, कारण या संस्कृतीला जाणण्यासाठी मी अधिक खोल उतरू बघत होतो..!
संगीताची माझी ही तालीम कदाचित कधीच संपली नसती. कौटुंबिक कारणाने मला फ्रान्समध्ये परतावे लागले; पण मी परतलो म्हणजे काय? कारण पॅरिसमध्ये जेव्हा मी सतार हातात घेत पुरिया छेडतो, तेव्हा बनारसमधील संध्याकाळ माझ्या मनात असते. सोबत गंगेच्या घाटावरची लगबग आणि मंदिरातील आरतीसाठी वाजणार्या घंटा..
मिशेल ग्वे
सतारवादक आणि गायक असलेला मिशेल ग्वे हा फ्रेंच कलाकार. सध्या तो पॅरिसमध्ये भारतीय संगीताचा गुरु म्हणून काम करतो. भारतीय तत्त्वज्ञान आणि संगीताचा गाढा अभ्यास असलेल्या या कलाकाराने दहा वर्षे बनारस येथे संगीताचे शिक्षण घेतले. भारतातील अनुभवाच्या आधारावर ‘तालीम’ हे त्याचे पुस्तक आधी फ्रेंच आणि त्यानंतर इंग्लिश भाषेत प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहे.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com