अजय ते अप्सरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 06:02 PM2019-03-03T18:02:00+5:302019-03-03T18:05:02+5:30

ट्रान्सजेंडर्सना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागतो. आधी स्वत:शी, मग घरच्यांशी, त्यानंतर समाजाशी.. तरीही त्यांना स्वीकारलं जाईलच याची शाश्वती नाही. पण परिस्थिती आता बदलते आहे. हिंमत रखो, दुनिया बदलती है, याचा अनुभव मी स्वत: घेते आहे.

Transgender Apsara Reddy describes her journey from Ajay to Apsara .. | अजय ते अप्सरा..

अजय ते अप्सरा..

Next
ठळक मुद्देअखिल भारतीय महिला कॉँग्रेसच्या महासचिव म्हणून ट्रान्सजेंडर अप्सरा रेड्डी यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी बातचित

- अप्सरा रेड्डी 

* अजय रेड्डी ते अप्सरा रेड्डी हा तुमचा प्रवास कसा झाला?
- मी पुरुष म्हणून जन्म घेतला असला तरी, खूप लहानपणापासूनच स्वत:तल्या स्रीत्वाचा अनुभव मी घेत होते. शारीरिक, मानसिक कोंडी होत होती. आपल्या बाबतीत हे काय होतंय, मला काहीच कळत नव्हतं. पुरुषाच्या शरीरातल्या या स्रीपणामुळे मी बेचैन राहात असे. रात्रंदिवस एकटीच रडत असे. हा नेमका काय प्रकार आहे, त्याचा अंदाज मला आला तोच वयाच्या पंधराव्या वर्षी. त्यानंतर आईला मी विश्वासात घेतलं. तिला सारं सांगितलं. खूप कठीण काळ होता तो. आईशी तब्बल दोन-तीन वर्षं मी बोलत होते, तिला समजावत होते. सुदैवानं तिनंही समजून घेतलं. २०११ला थायलंडमध्ये मी लिंगबदलाची शस्रक्रिया केली आणि अजयची अप्सरा बनले.

* ट्रान्सजेंडर म्हणून लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, तो बदलताना तुम्हाला दिसतोय का?
- आमच्या जमातीकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन मुळातच चुकीचा आणि अपमानास्पद आहे. मी स्वत:देखील त्याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. घरी कोणी साधी लग्नाची आमंत्रणपत्रिका द्यायला आलं, तर तुम्ही या, पण ‘हिला’ आणू नका, तिला होस्टेलमध्ये ठेवा.. असं सांगितलं जायचं. नोकरीला असतानाही माझ्याजवळ फिरकायलाही लोकांना लाज वाटायची. शक्यतो माझ्यापासून दूर कसं राहता येईल याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा; पण आमच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी हळूहळू बदलतेय. लेकिन यह भी सच है, के जमाने के साथ हमने भी बदलना चाहिए. हद मे रहना चाहिए. भीक मागणं, लोकांना घाबरवणं.. असले प्रकार आमच्या जमातीतल्या लोकांनीही बंद केले पाहिजेत. आम्हीही टॅलेण्टेड आहोत, हुशार आहोत, काही करू शकतो, हे जर लोकांपुढे आलंच नाही, तर लोकांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलणार? दुनिया बदलती है, हमे हिंमत रखनी चाहिए.. या बदलाचा अनुभव मी स्वत: घेते आहे.

* अखिल भारतीय महिला कॉँग्रेसच्या महासचिव म्हणून तुमची नुकतीच नियुक्ती झाली आहे. राजकारणाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर्ससाठी काय करण्याचा तुमचा विचार आहे? त्यांची परिस्थिती बदलू शकेल?
राजकारणात ट्रान्सजेंडर्सकडे अगोदर वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं जात असे. कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला कॉँग्रेसच्या महासचिवपदी माझी केलेली नियुक्ती हा अतिशय क्रांतिकारी असा निर्णय आहे. आमच्याकडे पाहण्याचा किंवा आमच्याकडे कोणत्या नजरेनं पाहिलं जावं याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच्या लिंगावरून नव्हे, तर त्याच्या टॅलेण्टवरून, त्याच्यातल्या क्षमतेवरून केली पाहिजे, हा यातला मुख्य धडा आहे.
ट्रान्सजेंडर्समध्येही अनेक गुण आहेत. त्याचा त्यांनी वापर केला पाहिजे. पुढे आलं पाहिजे. शिक्षणात प्रगती केली पाहिजे. आहे तसंच राहायचं की शिक्षणाचा हात धरून विकासाच्या वाटेवर जायचं, हा निर्णय आम्हाला करावा लागणार आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून काही प्रमाणात लोकांच्या मानसिकतेत आपण बदल घडवून आणू शकतो, त्यांच्या डोळ्यांवरची झापडं बाजूला करण्याचा प्रयत्न करू शकतो; पण त्याला मर्यादा आहे. राजकारणातून मात्र मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडू शकतं.
आपल्या देशाची धोरणं सगळ्यांसाठी असतात. त्यात आम्हीही आलो. मग या धोरणबदलांच्या प्रक्रियेत आम्ही का सामील होऊ नये? ट्रान्सजेंडर्सना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

* तुम्ही परदेशात शिक्षण घेतलंय. पत्रकारिता, राजकारणाच्या क्षेत्रात मोठ्या पदांवर काम केलंय. तुमच्या या पार्श्वभूमीमुळे इतरांच्या तुलनेत कमी प्रमाणात भेदभाव तुमच्या वाट्याला आला असेल..
- हे फार चुकीचं गृहीतक आहे. मुळात गरीब, सर्वसामान्य लोक जास्त समजूतदार असतात. वस्तुस्थिती ते लवकर समजून घेतात, घेऊ शकतात. त्यांच्याकडून तुम्हाला प्रेमही मिळू शकतं. त्यामुळे त्यांच्याकडून फारसा भेदभाव वाट्याला येत नाही. श्रीमंत आणि उच्चशिक्षितांकडून येणारा अनुभव मात्र नेमका उलट, अतिशय त्रासदायक आणि किळसवाणा असतो. याचा आम्ही वारंवार अनुभव घेतला आहे. ते तुम्हाला जवळच येऊ देत नाहीत. बऱ्याचदा तुमचं अस्तित्वच नाकारण्याकडे त्यांचा कल असतो. अशा व्यक्तींच्या संगतीत आपण राहिलो, इतरांना ते दिसलं तर आपलं नाव खराब होईल, आपल्या चारित्र्याला काळिमा फासला जाईल असं त्यांना वाटतं. ज्या उच्चभ्रू समाजाच्या मी संपर्कात आले, तिथला माझा अनुभव तरी हेच सांगतो. खूप मोठ्या प्रमाणावर भेदभाव माझ्या वाट्याला आला; पण कायमच मी त्यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आणि माझं काम निष्ठेनं करीत राहिले.

* ट्रान्सजेंडर्सचा संघर्ष तुलनेनं आता कमी झाला आहे, असं वाटतं?
ट्रान्सजेंडर्सना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागतो. आधी स्वत:शी, मग घरच्यांशी, त्यानंतर समाजाशी.. तरीही त्यांना स्वीकारलं जाईलच याची शाश्वती नाही. आपली ओळख टिकवताना घरात राहून केलेला संघर्ष आणि घराबाहेर पडून केलेला संघर्ष यातही खूप मोठा फरक आहे. घरात राहून केलेला संघर्ष कायमच खूप अवघड असतो. घरच्यांना समजावणं आणि त्यांनी ते मान्य करणं कर्मकठीण. त्यामुळेच अनेकजण घरातून बाहेर पडतात आणि आपल्या कम्युनिटीत जाऊन राहातात; पण तिथला संघर्षही छोटा नाही. शिक्षणासाठी शाळा, कॉलेजात प्रवेश नाही, हाताला काम नाही, अशा अवस्थेत ट्रान्सजेंडर्सला राहावं लागायचं; पण आता शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत ट्रान्सजेंडर्सना प्रवेश मिळू लागलाय. शिक्षण आणि नोकरीचा प्रवास त्यातून सुरू होऊ शकतो. आयुष्य थोडं आणखी सुलभ होऊ शकतं, पण तरीही अजून खूप वाटचाल करायची आहे. त्या वाटेवर पावलं पडायला सुरुवात झाली आहे एवढं मात्र नक्की.

अप्सरा रेड्डी यांचा प्रवास..
मूळच्या तामिळनाडूच्या असलेल्या अप्सरा रेड्डी यांचा आजवरचा प्रवास अतिशय विविधांगी आणि यशस्वी राहिला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना सुरुवातीला मनापासून स्वीकारलं गेलं असं नाही; पण ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाय ठेवला, तिथे तिथे त्यांनी स्वकर्तबगारीनं त्यावर आपला ठसा उमटवला. अप्सरा रेड्डी या मुळात पत्रकार. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. 
बीबीसी वल्र्ड सर्व्हिस, द हिंदू, लंडन येथील कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट, न्यू इंडियन एक्स्प्रेस, डेक्कन क्रॉनिकल इत्यादी अनेक माध्यमांत अप्सरा यांनी मोठय़ा पदावर काम केलं आहे. उपभोक्तावाद, राजकारण, लाइफ स्टाइल, शिक्षण इत्यादी विषयांवरील त्यांचं सदरलेखनही प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान जॉन हॉवर्ड, एफ वन रेसर मायकेल शूमाकर, हॉलिवूड स्टार निकोलस केज, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, ए. आर. रहमान अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. भारत, र्शीलंका आणि इंडोनेशिया येथील त्सुनामीचं वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. स्वत:चं नियतकालिकही त्यांनी काढलं होतं. तामिळनाडूतील त्यांचा टीव्ही शो अत्यंत प्रसिद्ध होता. युनिसेफसाठी त्यांनी अल्पकाळ काम केलं आहे, याशिवाय ऑस्ट्रेलियातील भारतीय राजदूतांच्या माध्यम सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 
राजकारणात प्रवेश केल्यावर जयललिता यांच्या एआयडीएमके, तसंच भाजपा आणि आता कॉँग्रेसमध्येही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अप्सरा यांच्या कामाचा आवाका असा खूप मोठा आणि विविधांगी आहे. 

Web Title: Transgender Apsara Reddy describes her journey from Ajay to Apsara ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.