प्रवास
By Admin | Published: November 4, 2016 04:02 PM2016-11-04T16:02:24+5:302016-11-07T10:56:10+5:30
इस्तंबूल. ते सुंदर शहर आम्हाला आंजारत, खेळवत, कोड्यात पाडत ठेवत होते. खूप आखणी,विचार न करता गेल्याने आमचा प्रवास फार मस्त झाला.
- सचिन कुंडलकर
इस्तंबूल.
ते सुंदर शहर आम्हाला आंजारत, खेळवत, कोड्यात पाडत ठेवत होते.
खूप आखणी,विचार न करता गेल्याने
आमचा प्रवास फार मस्त झाला.
मी कुठेतरी बसून लिहित राहायचो आणि सई आपापली
भटकून यायची.
तिथे मी दिग्दर्शक नव्हतो,
ती नटी नव्हती.
आम्ही अनोळखी साधे प्रवासी होतो.
मी स्वयंपाक करायचो,
सई रोज भांडी धुवायची.
गच्चीवरच्या मांजरीशी भांडायची आणि वेडेपणा म्हणजे
रस्त्यात कुठे म्युझिक ऐकू आले की मोकळेपणाने नाचायची..
दिवाळीच्या आजूबाजूला असणाऱ्या शांत निवांत काळात प्रवासाचे वेध लागू लागतात. ओळखीच्या वातावरणातून उठून बाहेर जावेसे वाटते. शहरामध्ये राहून डोळ्यासमोर लगेचच दुसरी एखादी वस्तू, व्यक्ती किंवा इमारत जवळच उभी असते. आपल्याला दूरवरचे मोकळे काही पाहण्याची इच्छा तयार होते. मन रिकामे करावेसे वाटते. नवे काहीतरी आत साठवून घ्यायला आपण उत्सुक झालेलो असतो.
मला अनेक वेळा एक मोठा मोकळा प्रवास करण्याचे एक स्वप्न आहे. म्हणजे घरातून निघताना आपण कुठे जाणार आहोत हे ठरवायचे नाही. एअरपोर्टवर पोचायचे. समोर ज्या फ्लाइट दिसतायेत त्यापैकी एकीचे तिकीट घ्यायचे आणि भारतात कुठेतरी निघून जायचे. तिथून पुढे तसेच काही न ठरवता फिरत राहायचे. प्रवासाची खूप आखणी करणारी माणसे प्रवासाला जातातच कशाला, हा मला प्रश्न पडतो. ती फक्त चौकटीत खुणा करत असतात. अमुक ठिकाणी गेलो. तमुक ठिकाणी गेलो. त्यांचे प्रवास हे फेसबुकवर इतरांना दाखवायला केलेले असतात असे वाटते. वयस्कर माणसांना मोठ्या प्रवासी कंपन्या प्रवासाला नेतात त्याने त्यांना खूप मदत होते. पण जेव्हा मी तरुण माणसे असे करताना पाहतो तेव्हा मला हसून पुरेवाट होते.
आमच्या वेळी शाळेत असताना मीना प्रभू नावाच्या लेखिका एकट्या धाडसाने जगभर फिरायच्या. आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटायचे. दिवाळीला, वाढदिवसाला आमचे कल्पक नातेवाईक मला त्यांची पुस्तके भेट देत. त्यांची पुस्तके वाचून मला पहिल्यांदा प्रवासाला एकट्याने निघून जाण्याची ऊर्मी तयार झाली. त्या बाई करतात तसे माझ्या आईने करावे असे मी तिला सांगत असे. ‘‘तू पण एकटी प्रवासाला निघून जा. तुला खूप मजा येईल’’, असे मी तिला म्हणायचो. पण भारतीय स्वभावाचे लेखक कुठेही बसून लिहित असले तरी त्यांच्या कामात जो तोचतोपणा येतो तसे त्या बार्इंचे होत गेले. त्या स्वत:च्या लिखाणाला प्रवासापेक्षा जास्त गांभीर्याने घेऊ लागल्या आहेत हे त्यांच्या पुस्तकांवरून लक्षात येऊ लागले. अनुभव मुरू न देता, त्याचे दाट रसायन तयार होऊ न देता त्या फार वेगाने प्रवास- पुस्तक, प्रवास-पुस्तक असा रतीब घालू लागल्या. शिवाय त्या काळात घाईने लिहिणाऱ्या लेखकांवर अंकुश ठेवणारे मराठीमधील श्री. पु. भागवत हे संपादक काळाच्या पडद्याआड गेले आणि अशा वेगवान लेखकांवर धरबंध ठेवणे मुश्कील झाले. एकदा आपण लेखक आहोत हे एखाद्या बाईने किंवा पुरुषाने ठरवले की मग त्यांना आवरणे भारतात फार अवघड असते. मीना प्रभू ह्यांचा लिखाणाचा कस संपून गेल्याने अनेक वर्षे नव्या काळातील एकट्याच्या प्रवासाची प्रेरणा देणारे पुस्तक मराठीत येऊ शकले नाही. ह्या लेखिकेने चांगल्या शक्यता असतानासुद्धा प्रवासी होणे सोडून लेखिका बनायचा ध्यास घेतला आणि तिथे चूक झाली. त्या खूप घाईने आणि नुसते माहितीपर लिहू लागल्या. त्यात अनुभव उरले नाहीत. आणि त्यावेळी गूगल आले असल्याने त्यांच्या पुस्तकाची गरज संपू लागली. त्या आता पुस्तके लिहिण्यासाठी प्रवासाला जातात असे लक्षात येऊ लागले.
मला अनिल अवचट आणि मीना प्रभू ह्यांनी अती लिहून स्वत:ला फार लवकर संपवून टाकले ह्याचे फार वाईट वाटते. माझे मोकळ्या जगण्याचे आणि धाडसी स्वभावाचे ते दोन शिलेदार होते. महाराष्ट्रात चांगल्या माणसांचे कौतुक करून त्यांना लवकर मारून टाकायची मोठी परंपरा आहे. त्यापासून जपून राहायला हवे हे ह्या दोन लेखकांनीच काय पण त्यांच्या पिढीच्या अनेक चित्रपट दिग्दर्शक, नट आणि संगीतकारांनी आमच्या पिढीला दाखवून दिले. मराठी माणूस खूप सत्कार आणि कौतुक करू लागला की लांब निघून जाऊन मान खाली घालून काम करायला हवे. नाहीतर आपली रवानगी लवकरच माळ्यावर होणार आहे हे धरून चालावे.
मी एकट्याने पहिला प्रवास केला तो युरोपमध्ये शिकायला बाविसाव्या वर्षी गेलो तेव्हा. त्यावेळी मला असा प्रवास करण्याची इतकी गोडी लागली की मी आजपर्यंत एकट्याने निघून जाण्याची सवय आवरू शकलेलो नाही. प्रवासात कुणी सोबत असले तर मला आनंदच होतो; पण प्रवासाची आखणी करताना कुणी सोबत असण्याची मी वाट पाहत नाही.
मला आठवते ती मी पहिल्या प्रवासाची भरलेली बॅग. अनुभव नसल्याने मी इतके सामान घेऊन गेलो होतो की आज मला त्या बॅगची आठवण आली तरी हसून पुरेवाट होते. जरु रीपेक्षा जास्त कपडे, थंडी किती असते याचा अंदाज नसल्याने घेतलेले वारेमाप गरम कपडे. तो सर्व काळ पॅरिस शहरात उष्ण हवेची लाट पसरून फ्रेंच माणसे पस्तीस डिग्री तपमान सहन न होऊन मरत होती. आणि माझ्या बॅगमध्ये दहा स्वेटर, कानटोप्या, मफलर, मोजे, रोजची टूथपेस्ट संपली तर पॅरिसमध्ये फ्रेंच टूथपेस्ट घेणे महाग पडेल असे वाटून माझ्या बिचाऱ्या आईने अजून दोन पेस्ट बॅगेत कोंबलेल्या. तीच गत टूथब्रश आणि साबणाची. मी किती बाळबोध आणि मूर्ख असेन त्या काळी ह्याचे वर्णन करायला. मी त्या वीस वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्या प्रवासावर फिल्म करणार आहे. बरोब्बर याच दिवशी गेल्या वर्षी मी आणि माझी मैत्रीण सई ताम्हणकर, आम्ही दोघे इस्तंबूल ह्या सुंदर शहरात होतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे मुंबईहून आम्ही निघालो आणि इस्तंबूलमधील एका शांत टेकडीवरच्या परिसरात एक घर भाड्याने घेऊन आठ दिवस राहिलो. या प्रवासाची कोणतीही आखणी आम्ही केली नव्हती. आम्ही आमच्या ‘वजनदार’ ह्या चित्रपटाचे पाचगणीत शूटिंग करत होतो. मी काम करून कंटाळून गेलो होतो म्हणून एकदा रात्री सेटवर उभा असताना फोनवरून माझे इस्तंबूलचे तिकीट काढून टाकले. कोणताही विचार किंवा आखणी केली नाही. रद्द न करता येणारे तिकीट एकदा काढले की आपण मुकाट प्रवासाला जातो. ओरहान पामुक ह्या माझ्या आवडत्या तुर्की लेखकामुळे हे सुंदर शहर पहायची मला अनेक दिवस इच्छा होती. अर्धे आशियात आणि अर्धे युरोपमध्ये असणारे हे आगळेवेगळे शहर. सई पुस्तके वगैरे वाचत नाही. गेल्या दहा वर्षात तिने दोन पुस्तके वाचली असतील. तिला ओरहान पामुक वगैरे कुणी माहीत नव्हते. पण तिला भटकायला यायचे होते.
आम्ही एका गाण्याचे शूटिंग करत होतो. सई शॉट देण्यासाठी एका उंच शिडीवर उभी होती. तिने मला विचारले की फिरायला जावेसे वाटते आहे तर मी कुठे जाऊ? मी तिला म्हणालो, ‘मी चाललो आहे एकटा इस्तंबूलला, येत असशील तर चल.’
- तिने तिचा फोन शिडीवर उंच मागवून घेतला आणि तिथे वरती उभे राहून तिने त्याक्षणी माझ्याच फ्लाईटचे तिकीट बुक केले. चर्चा नाही. तयारी नाही. कोणतीही माहिती काढणे नाही. आम्ही सगळे शूटिंग पुढच्या चार दिवसात संपवले. इंटरनेटवरून आमचे विसा मिळवले आणि बॅग भरून चालते झालो.
पुढचे आठ दिवस ते सुंदर शहर आम्हाला आंजारत, खेळवत, कोड्यात पाडत ठेवत होते. खूप आखणी आणि विचार न करता गेल्याने आमचा प्रवास फार मस्त झाला. आम्ही रोज अनोळखी लोकांशी गप्पा मारायचो. भरपूर चालायचो. जर वाटले तर मी कुठेतरी बसून लिहित राहायचो आणि सई आपापली भटकून यायची. तिथे मी दिग्दर्शक नव्हतो, ती नटी नव्हती. आम्ही अनोळखी साधे प्रवासी होतो. मी स्वयंपाक करायचो, सई रोज भांडी धुवायची. गच्चीवरच्या मांजरीशी भांडायची आणि वेडेपणा म्हणजे रस्त्यात कुठे म्युझिक ऐकू आले की मोकळेपणाने नाचायची. आमचे घर एका उंच टेकडीवर होते. बिल्डिंगपाशी जायला सत्तर पायऱ्या चढाव्या लागत. शिवाय फ्लॅट चौथ्या मजल्यावर आणि लिफ्ट नाही. सईने मला शिकवले की खूप मोठ्याने आकाशात पाहत शिव्या घालत पायऱ्या चढल्या की आपल्याला दम लागत नाही. मग ती आणि मी श्वास भरून घायचो आणि मराठी आणि इंग्रजीतील दमदार शिव्या आकाशात पाहत मोठ्यांदा हाणत आम्ही त्या पायऱ्या चढून जायचो. घरातून दिसणारा समुद्राचा देखावा पाहिला की ते कष्ट विरून जायचे.
मी एकदा रात्री एकटा फिरून घरी परत आलो तर सई कोपऱ्यात बसून लहान मुलीसारखी एका कागदावर काहीतरी लिहित होती. मला पाहताच तिने ते कागद लपवले. मी विचारले तर ती म्हणाली,
‘मी कधी असा प्रवास केला नाही. मला जे वाटते आहे ते लिहून काढते आहे. मी फक्त अवॉर्डच्या कार्यक्र मांना परदेशी हिंडते. पण अशी कधी मोकळेपणाने आले नाही. मला खूप लिहावेसे वाटते आहे पण मी ते कुणालाही दाखवणार नाही. तुलाही नाही.’